‘लग्न’ जितका छोटा शब्द, तितकी मोठी, लांबलचक प्रोसेस.लहानपणापासूनच लग्न म्हणजे फार भारी वगैरे गोष्ट आहे, असं सांगितलं जातं; पण actually लग्नाला उभं राहेपर्यंत बर्याच बाबी कळत नाहीत. त्यात तुम्ही लोकांच्या ठराविक अपेक्षेत बसणारे नसाल तर अगदीच अवघड आहे.
Graduation संपल्यानंतर लग्नाचा थोडाफार विचार घरात सुरू झाला. बरं, माझ्या बाबतीत विचार केला, तर मी स्वतःला कधीच अगदी नवरी म्हणून, पारंपरिक अगदी ते साडी वगैरे नेसून, सून म्हणून, लाजरी-बुजरी म्हणून चुकूनही imagine केलं नाही. कधी चुकूनही स्वप्न बघितलं नाही. त्यामुळे माझ्या लग्नाची स्वतःची कल्पना आपसूकच थोडी वेगळी घडत गेली. त्यात प्रेमाचा साथीदार होता, त्याचे आई-वडील होते. माझे घरचे होते; मात्र लग्नाच्या नावाने येणारा कुठलाच गोंधळ, गोतावळा नव्हता; पण मग नेमकं काय होतं, इतकं बोलण्यापर्यंत मला संधी मिळाली नाही, हे देखील खरं आहे. का मिळाली नाही? तर याला अगदी मुख्य कारण आहे, माझं अगदीच जाड असणं. साधारण दिसणं. हं, आता लोक हे सरळसरळ तोंडावर बोलत नसले, तरी आपल्यासाठी कोणी स्थळ सुचवत आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपले जे येते त्यानुसार लग्नाच्या मार्केटमधली आपली स्वतःची किंमत कळते. अर्थात, मुला-मुलींच्या बाबतीत निकष वेगवेगळे असले, तरी स्थळ किती सांगून येतात, त्यावर बरंच काही कळतं. माझ्या बाबतीत लोकांच्या म्हणण्यानुसार सगळं अगदीच सुंदर होतं; पण माझी जाडी जास्तच त्रासदायक होती; पण त्याशिवाय शिक्षण, घरचे वातावरण, so called संस्कार वगैरे सगळंच, घरचं काम करते, काळजी घेते, आज ना उद्या चांगले पैसे कमावेल, चांगले बोलेल वगैरे असूनही लोकांच्या अपेक्षेच्या साच्यात मी बसत नव्हते. ओळखीचे, नातेवाईक स्थळ सुचवणार नाहीत, याचा आई-वडिलांना अंदाज असल्याने स्वतःच बघायला त्यांनी सुरुवात केली.
बघायला आलेल्या बर्याच जणांनी नकार देणं अपेक्षित होतंच; पण तरीही काही कांदेपोहेसारखे कार्यक्रम झाले. सगळं काही चांगलं; पण अशी मुलगी आहे, तर आई-वडील हुंडा देतील किंवा मग मुलाला जॉब तरी लावायला मदत करतील वगैरे आशेने काही मुलगेपण आले. बरं, आश्चर्य एक आहे, इतकं सगळं असूनही माझ्या लग्नाच्या कल्पना मात्र अजून स्पष्ट होत होत्या. त्यामुळे नोकरीच्या मदतीची आशा करू नका, हुंडा मिळणार नाही वगैरे गोष्टी मी आधीच बोलत होते. साडी नेसून समोर जाणार नाही. मी जशी रोज असते तितकीच सहज असेन, तेच कपडे असतील, कुंडली/पत्रिका मुळीच बघणार नाही, वगैरे हे पक्के ठरले होते. मी स्वतःच्या विचारांवर ठाम होतेच; शिवाय या काळात एक लग्न सुपारी ठरवून मोडले गेल्याने तर अजूनच विचार करायला संधी मिळाली. मी बारीक असते, दिसायला जरा देखणी वगैरे असते, तरीही मंगळसूत्र किंवा काहीच सौभाग्यालंकार घालायचे नाहीत, साडी हौस म्हणून ठीक; पण लग्न झाल्यानंतरचा युनिफॉर्म वगैरे म्हणून काही नेसणार नाही, कांदेपोहे केले तरी मुलाशी किमान दोन-चार महिने भेटी घेऊनच काय ठरवायचे ते ठरवेन. व्यसनी मुलगा नको..(ओकेजनल, प्रोफेशनल वगैरेच्या नावाने पण व्यसन करणारा नको) त्यात परत मला नीट जॉब असेल, तर मुलगा कमावता नसला, तरी चालेल वगैरे पक्के झाले. मुलगी देखणी आणि मुलगा कमावता वगैरे समीकरण का असेल काय माहीत? मुलाने कमावता असावेच, त्याने घराचा प्रमुख असावे वगैरे अपेक्षा मुलांनादेखील त्रासदायक आहेच की. या फुटकळ अपेक्षांपायी लग्न करताना आपण नोकरी, दिसणं, घरदार, संस्कार आणि अजून काय-काय? हे सगळं आधी स्वीकारतो आणि नंतर कुठेतरी आपण त्या माणसाला स्वीकारतो. हे मला तरी पटत नव्हते. याचा त्रास व्हायचाच. बरं, माझ्या वजन कमी करण्याने हे प्रश्न सुटले असते का, हा मोठा प्रश्नच पडायचा मला… मी वजन कमी केलेच तर मला कदाचित चांगला मुलगा वगैरे भेटलाही असता; पण त्याने माझ्यातल्या मला कितपत ओळखले असते?
याच परेशानीत असताना ‘जोडीदाराची विवेकी निवड’ची पोस्ट फेसबुकला बघितली आणि विशेष काही वाटले म्हणून व्हॉट्सअॅप batch जॉईन केली. रोजच्या रोज पडणारे प्रश्न मला ‘अरेच्या! हेच तर मला पाहिजे होते,’ असे सांगायचे. त्यातही बर्याच बाबींचा आपण यापूर्वी अगदीच विचार केला नाही, हेदेखील जाणवत होते. एकंदरीत, हा प्रवास म्हणजे सोनं हातात लागण्यासारखंच होतं. त्यात रोजच्या सवयीपासून आयुष्यातल्या स्वप्न, ध्येयापर्यंत विचार करता येण्याचा स्कोप मिळाला, ते देखील भन्नाट होतं. आपल्याचसारखे अजून काही लोकही विचार करतात, हे बघून तर लग्नाच्या मार्केटमध्ये ‘एलियन’ असल्याचा फील निघून गेला आणि मी स्वतःला एक माणूस म्हणून जास्त जवळून बघायला लागले. कुटुंबीयांना अधिक जास्त समजून घेऊ शकले; शिवाय माझ्या लग्नाबाबतच्या कल्पना मी त्यांना अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकले. हा प्रवास खूपच भारी होता आणि लग्नाचे दडपण नव्हते. मी या ग्रुपमध्ये सात batch केल्या, दीड वर्ष जवळजवळ. माझ्या जोडीदाराबाबत असलेल्या अपेक्षा अधिकाधिक क्लिअर झाल्या. आनंद आणि मी याच बॅचमध्ये बोलायला लागलो. माझे उत्तर आनंदचे घरचे पण वाचत असल्याने ते देखील मला ओळखत होते. दोघांच्याही घरून आमचे आम्हालाच निर्णयस्वातंत्र्य असल्याने अजून जास्त चांगले झाले. प्रादेशिक, भाषिक, शिक्षण, जॉब इतक्या बाबी वेगवेगळ्या असूनही आम्ही ‘जोविनि’च्या माध्यमातून एकत्र येऊ शकलो. एकमेकांना अधिक वेळ देऊन समजू शकलो. बरं, बोलताना काय बोलायचे? हा प्रश्न कधीच आमच्यासमोर नव्हता. कारण ‘जोविनि’ने कित्येक मुद्दे दिलेच होते आणि सोबतच ते मांडण्याची, बोलण्याची दिलखुलास स्पेस पण उपलब्ध करून दिली होती. पहिलीच भेट. चक्क 8 कप चहा प्यायलो. निर्णयस्वातंत्र्य खर्या अर्थाने आमचे आम्हालाच असल्याने हा आनंद आम्हाला मिळत होता, हे देखील तितकेच खरे आहे. तरीही आई-वडिलांनी त्यांची बाजू देखील मांडली. आनंदसोबत झालेला टिपिकल चहा-पोहे कार्यक्रम आनंदच्या घरी सोलापूरला झाला, तो पारंपरिक पद्धतीने मुलीकडे वगैरे झाला नाही. त्यात दोघांच्या आई-वडिलांनी अक्षरशः आम्हाला समोर बसवून एकमेकांसोबत लग्न का करावेसे वाटते? आम्हाला एकमेकांच्या कोणत्या बाबी जास्त आवडल्या? त्यावेळी मी मुंबईला जॉब करत होते आनंद सोलापूरला क्लासेस चालवत होता; मग मुंबई -सोलापूर कसं करणार? काय-काय ठरवलं आहे, त्याबाबत असं सगळं विचारलं. आम्ही लग्नाचा निर्णय कोणत्या तरी आकर्षणामुळे घेत नाही आहोत, न हे ते ‘कन्फर्म’ करत होते. माझे आई-वडील तिथून निघाल्यानंतर मला रात्री बस होती औरंगाबादसाठी; त्या वेळेत म्हणजे जवळजवळ तीनएक तासात आनंदचे आई-बाबा आणि मी बोललो. एकमेकांना अधिक समजून घेतलं, निवांत बोललो. यात कुठेही मुलाचे आई-वडील वगैरे टाईप दडपण नव्हतं; सहजता होती. आमच्या लग्नाच्या निर्णयापूर्वी झालेल्या कुंडली नाकारून मेडिकल टेस्ट, कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय, पत्रिका वगैरे न छापण्याचा निर्णय, अगदीच कमी लोकांना लग्नात बोलावण्याचा निर्णय, कोणतेही विधी, पूजा न करण्याचा निर्णय, नोकरीच्या सोयीच्या हिशोबाने जिथे राहावे लागेल, तिथे राहण्याचा निर्णय अगदी सगळेच निर्णय आमचे होते आणि घरच्यांची अगदी आनंदाने, राजी-खुशीने सोबत होती. आज स्वतःला जेव्हा बघते, तेव्हा गेल्या सहा वर्षांत लग्न म्हणून जे-जे काही स्वप्न बघितले ते सगळेच मी खरेखुरे जगतेय; ते देखील अशा जोडीदारासोबत ज्याने मला मी केवळ आहे, तसेच स्वीकारले नाही, तर माझ्या घरच्यांना देखील तितक्याच आपुलकीने स्वीकारले. गेली दोन वर्षे जगणं म्हणजे मज्जा आहे जोडीदारासोबत. प्रेम आहे, मैत्री आहे, सोबत आहे, समता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे सहजीवन आहे; संसार नाही. adjustment आहे; compromise नाही, हे सगळं शक्य झालं ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमामुळेच. सहभागी म्हणून 2015 ला सुरुवात जरी केली असली, तरी आज या टीमचा एक भाग आहे ते याच एका कारणामुळे की, ही वाट इतरांनाही मिळावी…
-दीक्षा काळे, औरंगाबाद