Categories
जो.वि.नि

जोडीदाराच्या निवडीसाठी युवकांशी संवाद साधूया!

फेब्रुवारी - २०१९

सध्या सोशल मीडियावर मुलींच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, मुली कशा अविचारी अपेक्षा ठेवत आहेत, त्यामुळे त्यांचे लग्नाचे वय जास्त वाढत आहे, अशा एकतर्फी मांडणीचे मेसेज फिरत असतात. असे मेसेज मोठ्या प्रमाणात ‘शेअर’ करताना, तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना आपण पाहतो. तसेच लग्नानंतर मुले बायकोच्या नादाने कशी बिघडतात, आई- वडिलांना कशी विसरतात (किंवा थेट वृद्धाश्रमात पाठवतात), मुलीच्या आईच्या हस्तक्षेपाने संसार कसे मोडतात, असे मेसेजही मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांत पसरवले जात असतात. हे सर्व वाचल्यावर प्रश्न पडतो, खरंच, इतकं अविचारी असतं काय हो पती-पत्नीचं नातं? मुले लग्नानंतर स्वतःच्या बुद्धीने विचारच करत नसावीत का? लग्नाने जोडलेली दोन कुटुंबे एकमेकांची कायम शत्रूच असतात का?

वैवाहिक जीवन, त्यातून येणारे नातेसंबंध यामध्ये समस्या आहेत. संबंधही टोकाचे बिघडतात. परंतु हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते का? त्याची कारणे एवढी ठोकळेबाज आहेत का? आणि ती फक्त मुलींशीच निगडित आहेत का? की स्त्री-पुरुष विषमतेत भर घालण्यासाठी हे सर्व केलं जातंय? यातला स्त्रीद्वेषी विचार सोडून देऊन वैवाहिक नातेसंबंधांचा गुंता सोडवणं गरजेचं होतं. म्हणजे हा गुंता कमीत कमी होईल या दृष्टीने विचार होणं गरजेचं होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने युवावर्गाशी जोडून घेत काम करत आली आहे. युवांबरोबर काम करताना हे जाणवलं की, जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत फारसा संवाद आणि मोकळेपणा नसतो आणि स्वतंत्र विचार करू पाहणार्‍या युवा पिढीला ही पद्धत मान्य आहे, असं नाही. जोडीदाराचं स्थान आयुष्यात इतकं महत्त्वाचं असताना अतिशय घाईने, कधी कुणाचं तरी मन राखायला, कधी आकर्षणातून, दबावातून निर्णय घेतले जातात. तसंच मुलांनी जोडीदार, सहजीवन याविषयी फारसा विचार केलेला असतो, असंही नाही. पालकांनीही मुलांच्या अपेक्षा, स्वप्न समजून घेऊन निवडीचा निर्णय घेतलेला असतो, असंही नाही. हे सर्व टाळण्यासाठी एका व्यापक संवादाची गरज होती.

‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम अशा गरजेतूनच पुढे आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत होती, सहकार्य करत होती. हे करतानाही जाणवत होतं की, मुलांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करून घेतलेले असतातच, असं नाही. मुलांना निवडीसंदर्भात विचार करायला दिशा देणं गरजेचं होतं. ‘नात्यातील सुरेल संवादासाठी’ सात वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम गेल्या 3 वर्षांत व्यापक बनला आहे. सोशल मीडियाच्या प्रभावी उपयोगापासून प्रत्यक्ष संवादापर्यंत आणि युवावर्गापासून ते पालकांपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर हे अभियान राबवलं जात आहे. युवावर्गाबरोबरच पालकांचाही सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ च्या माध्यमातून लग्नाळू मुला- मुलींसाठी चालणारं ऑनलाईन ट्रेनिंग आता महत्त्वाचं ठरत आहे. जोडीदार निवडायला ट्रेनिंग कशाला? असा प्रश्न ही सुरुवातीस अनेकांना पडायचा; परंतु या ट्रेनिंगला मिळणारा वाढता प्रतिसाद हेच सांगतोय की, ट्रेनिंग ही आजच्या तरुणाईची गरज आहे. आतापर्यंत या ट्रेनिंगच्या 15 बॅचेस झाल्या आहेत. त्यात शेकडो मुले- मुली येऊन गेली. जसा हा उपक्रम ऑनलाईन चालतो, तसाच तो ऑफलाईनही चालतो, म्हणजेच मुले-मुली व पालकांसाठी एक दिवसाची ‘संवादशाळा’ घेतली जाते. ही ‘संवादशाळा’ एक भन्नाट अनुभव असतो. वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुद्दे स्पष्ट होत जातात. पालकांना आणि मुलांनाही संवादाची गरज या ‘संवादशाळे’तून पटलेली असते.

या उपक्रमाचे यश हे समाजाच्या गरजेत आहे, तसेच ते उपक्रमाच्या मांडणीतील आणि वापरलेल्या माध्यमांच्या वेगळेपणात आहे. या उपक्रमातून देऊ पाहत असलेला विचार हा जोडीदार निवडीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच माणूस म्हणून विवेकी जगण्यासाठीही उपयोगाचा आहे, असं युवावर्गाला जाणवतं. म्हणूनच, आधी उपक्रमाच्या गरजेतून संपर्कात आलेला युवा चळवळीशी पुढेही जोडून राहतो. ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून घेतलं जाणारं ऑनलाईन ट्रेनिंग असेल की प्रत्यक्ष संवादशाळा; यातून युवावर्गाशी बोलताना जाणवलं की, ते नक्कीच वेगळा विचार करू पाहताहेत; त्यांना संवादाचं माध्यम हवंय आणि ते माध्यम या उपक्रमातून मिळतंय हे जाणवतं. म्हणून हा संवाद महाराष्ट्रातील युवांशी करण्याचे ठरवले गेले. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन, तर 14 फेब्रुवारी हा तरुणाईच्या प्रेमभावनांचा उत्सव. या दोन दिवसांचे औचित्य साधून समिती 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान’ राबवित आहे.

या अभियानादरम्यान महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक तरी ‘संवादशाळा’ किंवा संकल्प परिषद घेण्याचा समितीचा मानस आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान पाचशे युवांपर्यंत हे अभियान पोचणार आहे. या अभियानाची उद्घाटन परिषद 13 जानेवारी रोजी लातूरला झाली, तर समारोप परिषद 10 फेब्रुवारीला औरंगाबादला होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पाहिलेले विवेकाधारित समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस