Categories
चळवळ जो.वि.नि

विवेकी समाजनिर्मितीसाठी कुटुंबसंस्थेतील चुप्पी तोडूया!

फेब्रुवारी - २०१९

सध्या महा. अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियानाची सुरुवात जोरदार झालीय. 12 जानेवारी हा आपला ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि 14 फेब्रुवारी हा सगळ्याच तरुणाईला भुरळ घालणारा ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिन.’ या दोन दिवसांचं महत्त्व लक्षात घेत यावर्षीपासून आपण आपल्या जातिअंत विभाग आणि युवा विभागाच्या पुढाकारातून ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवणार आहोत, ज्याची सुरुवात यावर्षी आपण लातूरला 13 जानेवारीला उद्घाटन परिषद घेत केली. 2012 पासून डॉ. दाभोलकरांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानाने भरारी घेतलीय.

गेल्या तीन वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात आणि तरुणाईला आकर्षित करेल, अशा माध्यमांचा वापर करत आपण हे अभियान राबवित आहोत. एका whatsapp गटापासून प्रवास सुरू झाला. 50 दिवसांचं रीतसर ऑनलाईन प्रशिक्षण एका बॅचमध्ये देत आज 16 वी बॅच सुरू आहे. तरुणांचा प्रतिसाद अजूनही कमी होत नाहीय, हे विशेष. पुढच्या टप्प्यात सुरु झालेल्या ‘संवादशाळा’ अर्धशतक पूर्ण करत आल्यात. यांचं स्वरूप संवादी आहे; शिवाय पालक आणि तरुण दोघांनाही एकत्र बसवून वेगवेगळी सत्रं आणि activities मधून मुद्दा पोचवला जातोय, याचं सगळ्यांना अप्रुप वाटतंय.

मुळात या सगळ्याची खरंच गरज आहे का, हा प्रश्न आहेच. वर्षानुवर्षे आपल्याकडे विवाहसंस्था भक्कम पाय रोवून उभी आहे, त्यातल्या गुण-दोषांसह समाजाने ती स्वीकारली आहे. कोणीतरी एखादी व्यक्ती लग्न जमवून देण्याचं सामाजिक काम करत आहेच! प्रत्येक सीझनला शेकडोंनी लग्नं ठरतात आणि थाटामाटात होतातही. म्हणजे जोडीदाराची निवड होतेच आहे, दुसर्‍यांनी निवड केलेली असो किंवा स्वतः गरजवंत व्यक्तीने; या गरजू व्यक्तीला आम्ही ‘लग्नाळू’ म्हणतो, एवढंच. स्वतःचं काम स्वतः करणं आणि स्वावलंबी असणं जितकं आपण समजून घेऊ, त्याचं कौतुक करू तितकं, स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडू आणि स्वावलंबी राहू, हा विचार समाजात पचनी पडत नाही. प्रेम करून जोडीदार निवडला, याचा स्वीकार फारच कमी ठिकाणी दिसतो. त्याउलट या स्वावलंबी असण्याची शिक्षा म्हणून ज्या खुनांना प्रतिष्ठा आहे, त्यातून पालक स्वतःच्या मुलांचा किंवा त्यांच्या जोडीदाराचा खून करण्यापर्यंत मजल मारताना दिसतात. जितक्या उत्साहात लग्न होत आहेत, तितकेच घटस्फोट वाढत आहेत, असं ऐकायला मिळतं. हल्ली लग्नाबाबत, मुला-मुलींच्या अवाजवी अपेक्षांबाबत, तडजोडीची तयारी नसणं, यावरून घराघरांत होणारे वाद अशा कितीतरी अनुभवांबाबत लोकं आपलं म्हणणं मांडत असतात. लग्नव्यवस्थेत खूप ताण आहेत, फसवणूक आहे, रिस्क आहे असं सगळं कळतं; पण वळत नाही, अशीही स्थिती आहे. तरीही लग्न व्हावंच, ते समाजाच्या मापदंडात, व्याख्येत बसणारं व्हावं, या अवस्थेतून प्रत्येकाने जावंच, असा आग्रह सगळीकडे दिसतो. ‘लग्न का करावं वाटतं?’ या प्रश्नावर आधी फारसा कोणी विचार केलेला आहे, असं मात्र दिसत नाही. जनरीत आहे, लग्नाचं वय झालंय, शिक्षण झालंय, नोकरी लागलीय; आता काय, तर लग्नच बाकी आहे म्हणून लग्नकार्य उरकण्याकडे कल असलेली मंडळी आजूबाजूला असतात. शिकलेल्या मुली हा एक स्वतंत्र अडथळा असल्याचं अजूनही काहीजण नोंदवतात. मुलींना कमी शिकलेला, शेती करणारा, कुटुंब असलेला आणि स्वत:चं घर नसलेला मुलगा नकोच असतो, असा ठप्पा दिसत असतो. या सगळ्यांचा विचार करायला लागलो की, आपसूकच ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाची गरज लक्षात येते.

‘जोडीदाराची विवेकी निवड’ की ‘विवेकी जोडीदाराची निवड’ अशी शब्दांची गल्लत चळवळीतले कार्यकर्तेही खूपदा करतात. शब्दांची जागा बदलली की, अर्थ बदलतो हे आम्ही आवर्जून सांगतो. जोडीदार निवडताना; मग तो लग्नासाठी असेल, प्रेमासाठी म्हणून निवड असेल किंवा सहजीवनासाठी ‘लिव इन’ या पर्यायासाठी असेल, तो आपला विवेक जागरूक ठेवून निवडला जावा; ज्यामुळे आपल्या सहजीवनातील ताण कमी होतील आणि आयुष्य सुखानं घालवता येईल, एवढंच आपलं म्हणणं असतं. आपल्या जोडीदाराच्या आपल्या आयुष्यात येण्याने आपलं आयुष्य अधिक उन्नत व्हावं; त्याचबरोबर त्याचंही आयुष्य आपल्या सोबतीने अधिक गुणात्मक व्हावं, यासाठी आधीच विचारपूर्वक निर्णय घेतला जावा, असं आपण सांगतो. पालकही आवर्जून सांगत असतात की, ‘आम्ही जे काही करतोय ते मुलांच्या सुखासाठीच असतं, त्यांच्यासाठीच तर सगळं करतो.’ खरं तर यात काही चूक असतं, असं नाही; पण मुलांचं सुख आणि हित मुलांसोबत बसून ठरवता येऊ शकतं आणि परस्परसामंजस्याने संवाद होऊ शकतो, हे लक्षात आलेलं असतंच असं नाही. समाजाच्या चौकटीत जे होतं, ते हित साधणारं आणि सुख देणारं असतं, या संस्कारामुळे मुलांना नेमकं काय हवं आहे, याचा फारसा विचार केलेला नसतो, त्यातून मतभेद दिसतात. नेमकी हीच गरज ओळखून ‘अंनिस संवाद’ सुरू करण्याचा प्रयत्न करतेय. एकदा का हे लक्षात आलं की, सगळे या संवादाच्या प्रक्रियेत सहभागी होतात आणि त्याचा उपयोग होतो, हे आमच्याही लक्षात आलं आहे. या उपक्रमाने एका महत्त्वाच्या विषयाची ‘क्रेझ’ निर्माण झालीय, असं कोणी कौतुकाने म्हटलं की हेच आठवतं.

जोडीदाराची निवड हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या प्रक्रियेत प्रेम असावं की नसावं? आम्ही ज्या संवादशाळा घेतो, त्याची सुरुवात एका खेळाने होते. ‘लग्न’ शब्दाने काय-काय सुचतं, त्याची आम्ही यादी करतो. त्यात प्रेम असाही शब्द असतो; मग आम्ही लग्न म्हटलं की, प्रेम आवश्यक की अनावश्यक, असं विचारतो, तेव्हा अपवाद वगळता सगळीकडे आवश्यक असेच उत्तर येते. प्रेम नसेल, समोरच्या व्यक्तीविषयी ओढ, आकर्षण नसेल, काहीच भावना नसतील, तर ते नातं सुरू तरी कशाच्या आधारे करावं, हा प्रश्न आजच्या पिढीला पडतो. त्याचवेळी आम्हाला कोणी आवडत आहे, आमचं कोणावर प्रेम आहे, असं सांगण्याची हिंमतसुद्धा दाखवणं जीवावर बेतू शकतं, एवढी दहशत समाजात आहे. किती परस्परविरोध आहे यात! प्रेमाशिवाय कोरडं नातं कोणालाच नको असताना प्रेमाचं नातं नको, असं म्हणणार्‍यांनी प्रेम अनुभवलेलं नसतंच का, हा प्रश्न आजच्या पिढीला पडतो. एवढी कोरडी माणसं आजूबाजूला वावरत असताना समाज विकसित होतोय, असं म्हणता येईल का? याच दरीचा विचार करताना आपला उपक्रम ज्या पंचसूत्रीवर आधारलेला आहे, त्यातील पहिलंच सूत्र प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखणं आणि दुसरं सूत्र बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता पाहणं आवश्यक आहे, असं आहे. यावर आपलं भाष्य आहे, त्याचा निश्चित चांगला परिणाम होतो.

संवादशाळेत आपण हुंडा, पत्रिका आणि व्यसनाला ठाम नकार द्यावा, हे आग्रहाने मांडतो. यावर बहुतांश वेळा तरुणांचं एकमत असतंच, पालकही यावर हटवादी भूमिका घेत नाहीत. त्याला कारण म्हणजे आपण केवळ हे करू नका, ते करू नका, असं न सांगता ‘जोडीदाराची निवड विवेकी’ करण्यासाठी कोणत्या आवश्यक बाबी पाहाव्यात, हे सकारण पटवून देतो. नात्यातील सुरेल संवादासाठी 12 गुणांची पत्रिका एकेक गुणासह उलगडली गेली की, आपसूकच सगळे कुंडलीपेक्षा ही पत्रिका आवश्यक आहे, असं म्हणू लागतात. या 12 गुणांमध्ये, परस्परपसंती आहे, तसंच माणूस योग्य निवडला जावा यासाठी सदृढता, स्वभाव, आवडी-नावडी, सवयी, व्यसने, भविष्यातील स्वप्ने अशा महत्त्वाच्या; पण एरव्ही दुर्लक्षित केलेल्या बाबी देखील आहेत. ज्याची उपयोगिता लग्न झालेल्या पालकांना पटली नाही, तरच नवल! समोरचे श्रोते या संवादाच्या प्रक्रियेत जसे सहभागी होत जातात, तसं आपलं म्हणणं जास्त स्वीकारलं जातं, हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. कोण चूक, कोण बरोबर याहीपेक्षा जे सर्व सहभागाने होईल आणि कुटुंबाला आनंद देणारे असेल असं काय असू शकेल, यावर आपला भर राहतो. त्यामुळे स्वतःच्या चुकांकडे देखील लोकं तितक्याच मोकळ्या दृष्टीने पाहू शकतात आणि दिलखुलास दाद देतात.

गेल्या तीन वर्षांत तरुणाईला या उपक्रमाने काय दिलं, याचा विचार केला, तर जाणवतं की, या उपक्रमाने तरुणांना स्वतःची स्पेस दिली, हक्काने व्यक्त व्हायला जागा दिली. मुलींच्या वाट्याला येणारे अनुभव, त्यांना लक्षात येत असलेलं त्यांचं वस्तुकरण आणि त्याला त्यांनी केलेला विरोध व्यवस्थेच्या विरोधी असतो आणि त्यामुळे मुलींच्या अपेक्षा आणि त्यांच्या अतिरेकी मागण्या कुटुंबाला कशा घातक होऊ पाहत आहेत, हे हल्ली सोशल मीडियावर पद्धतशीर पसरवलं जातं. मुली वैचारिक अनुरूपता मागताना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व लग्नानंतर टिकून राहावं, याही अपेक्षेने सावध असतात, हे दिसतं. अशा मुलींची संख्यासुध्दा लक्षणीय आहे, हे याच उपक्रमामुळे कळलं. शिकलेल्या मुलींसह जोडीदार म्हणून कसं ‘डील’ करावं, हे पुरुषप्रधानता लादलेल्या मुलांनीही समजून घेण्याची गरज आहे. अशा संवादाला मुलेही सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतात. कार्यक्रम झाल्यानंतर स्वतःच्या मनातील अतिशय खाजगी सलदेखील अगदी मोकळेपणाने व्यक्त करणारी मंडळी अनोळखी कार्यकर्त्यांवर केवढा विश्वास दाखवत असतात! जे आजपर्यंत कुठं मांडू शकले नव्हते, ते सांगून मन हलकं करणारी मंडळी आपल्याला उपक्रमाचं महत्त्वच सांगत असतात. कोणाला पालकांसोबत बोलण्यासाठी मार्ग दिसत असतो, तर कोणाला आपण नेमकी काय चूक करून बसलोय, याची जाणीव होत असते. ज्या स्त्री-पुरुष समतेच्या पायावर आपलं सहजीवन अवलंबून असते, त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला असं सांगणारे चळवळीतील कार्यकर्तेसुद्धा भेटतात. माणसागणिक वेगळे प्रश्न आणि वेगळी समस्या आम्हाला आणखी गुंतवत जाते.

या माध्यमातून आपण केवळ लग्न जुळवून देत नाही, तर लग्न करण्यापूर्वी कोणत्या बाबी विचारात घ्यायला हव्यात, हे सांगतो असं जरी म्हणत असलो तरी आजपर्यंत 16 जणांना आपापले जोडीदार मिळाले. अर्थात, आपण सुचवत असलेल्या ‘परिचयोत्तर विवाह’ या संकल्पनेला समजून घेत हे तरुण विवाहबद्ध झालेले आहेत. आपण सुचवलेल्या पर्यायांना व्यवहारात आणता येतं, हेच यातून सिद्ध होतं. या जोडप्यांची कहाणी ऐकणं हे आपल्याला सुद्धा त्यांची नव्याने ओळख करून देणारे असते. कारण जोडीदार निवडीच्या वेगळ्या वाटा समजावताना, सहजीवनाच्या कल्पना प्रत्यक्षात आणताना त्यांनाही संघर्ष करावा लागलेला असतोच; पण त्यासाठी अंनिसने पाठिंबा दिलाय, हे सांगायला ही मंडळी विसरत नाहीत. आपण रुजवू पाहत असलेला विवेकी दृष्टिकोन तरुणांना बळ देतो, याचं समाधान आहे. स्त्री-पुरुष समतेच्या वाटेने चालणारी ही तरुणाई डॉ. दाभोलकरांचं विवेकी समाजनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल करत असते. सुरुवातीला संघटनेत सहभागी नसणारे तरुण उपक्रमाच्या माध्यमातून संघटनेला जोडले जातात, हे उपक्रमाचे यश म्हणायला हवे!

12 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान आपण संकल्प अभियान राबवत प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान घेऊन जात आहोत. गावागावांतील तरुणांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत हे अभियान पोचवत त्यांना संकल्पित करण्याचा समितीचा मानस आहे. कॉलेजमध्ये किंवा जिल्हास्तरीय तीन तासांची एक परिषद किंवा पूर्ण दिवसाची ‘संवादशाळा’ अशा स्वरुपात मांडणी होईल आणि युवकांशी संवाद साधला जाईल. यातील एक युवा परिषद 10 फेब्रुवारीला पनवेल येथे, तर सांगता परिषद औरंगाबाद येथे 14 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. आपल्या स्तरावर जिथं शक्य असेल तिथं एक तरी ‘संवादशाळा’ अनुभवावी, असं आवाहन आम्ही आवर्जून करत असतो. संवादाचे पूल यातूनच सांधले जातात. प्रत्येक ठिकाणाहून या अभियानाला मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे आणि उद्याच्या विवेकी समाजाचे आशादायी चित्र उभे करणारा आहे.

सुरुवातीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सारख्या सोशल मीडियाच्या वापराविषयी प्रचंड कुतूहल सगळ्या स्तरावर दिसायचं. नेमकं ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कसं प्रशिक्षण घेत असतील, हे कुतूहल आणि एकीकडे पोरखेळ असेल ही चेष्टा या दोन्हींचा अनुभव ‘जोडीदाराची विवेकी निवड’मध्ये सक्रिय असलेल्या टीमने घेतला; पण जसजसे अधिकाधिक तरुण याला जोडले जाऊ लागले, तसा आपसूकच हा विषय माध्यमांनी देखील उचलून धरला. प्रिंट मीडिया असो की, इलेक्ट्रॉनिक मीडिया; दोहोंनी याची चांगली दखल घेतली आणि उपक्रमाचा प्रसार होत गेला. यातून प्रशिक्षित झालेल्या, लग्न होऊन गेलेल्या तरुणांनी देखील उपक्रमाची अपरिहार्यता अनुभवातून मांडायला सुरुवात केली. स्वतःच्या अनुभवातून इतरांना देखील जोडीदार निवडीपूर्वी जाण यावी, समज यावी म्हणून मदत करायला सुरुवात केली आणि आज तर हा विषय वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोचवण्यासाठी हीच तरुणाई झपाटून काम करताना दिसते, संघटनेला जोडून घेताना दिसते. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ टीम म्हटलं की, महाराष्ट्रभर काम करणारे उत्साही तरुण डोळ्यासमोर येतात.

या सगळ्यांसोबत आपण लग्नव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा, लग्न करणार्‍या प्रत्येकाला आपले अवकाश मिळवण्याचा सुरक्षित मार्ग सन्मानपूर्वक देण्याचा विचार देत आहोत. कुटुंबव्यवस्था टिकावी, यासाठी त्यातल्या प्रत्येक नात्याला प्रशिक्षण देण्याची गरज सांगत आहोत. हरवत चाललेला संवाद सुरू होऊ शकतो, यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रेमाच्या नावावर होणार्‍या हिंसेला विरोध करताना प्रेमाने जग जिंकता येतं यावरचा विश्वास निर्माण करू पाहत आहोत. विवेकी समाजनिर्मितीसाठी कुटुंबसंस्थेतील चुप्पी तोडण्याचे काम या माध्यमातून होत आहे, हे नक्की!

–आरती नाईक

राज्य कार्यवाह, जोडीदाराची विवेकी निवड विभाग

संपर्क : 8898836984