Categories
डॉ. दाभोलकर खून तपास

मारेकर्‍यांची पोस्टर्स राज्यभरात लावणार..!

ऑगस्ट - २०१७

महाराष्ट्र अंनिस 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान करणार ‘जवाब दो’ आंदोलन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 जुलैला 47 महिने पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला नुकताच सशर्त जामीन दिला आहे. महाराष्ट्र अंनिस न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे फरार मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात शासन जी दिरंगाई करीत आहे, त्यामुळेच संशयित आरोपी जामिनावर सुटले आहेत, असे महाराष्ट्र अंनिसचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र शासनाकडून या दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिस 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2017 दरम्यान ‘जवाब दो’ हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे, अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाच्याद्वारे दिली आहे.

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, तपासातील संथ गतीमुळे कॉम्रेड गोविंद पानसरे खुनातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला नुकताच जामीन मिळाला. तो फरार होण्याची; तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने उच्च न्यायालयामध्ये या जामिनाच्या विरोधात अर्ज दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत सनातन संस्थेचे साधक व खुनातील संशयित आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार आणि त्याच्या साथीदारांना अटक होत नाही, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. असे असून देखील त्यांना पकडण्यासाठी सीबीआय आणि महाराष्ट्र शासन पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. सीबीआयने यातील दोन संशयित मारेकर्‍यांवर प्रत्येकी पाच लाखाची बक्षिसे जाहीर केलेली आहेत. पण महाराष्ट्र शासनाने तर अजून देखील कॉम्रेड पानसरे खून प्रकरणी या दोघांच्यावर बक्षीस जाहीर केलेले नाही. त्यांना फरार घोषित करून त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया देखील अजून झालेली नाही. शासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे विवेकवादी लोकांना असलेला धोका वाढत आहे. पत्रकात पुढे असे नमूद केले आहे की, सारंग अकोलकर आणि विनय पवार; तसेच त्यांचे साथीदार प्रवीण लिमकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे 2009 सालापासून गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटानंतर गेली आठ वर्षे फरार आहेत. या मधील सारंग अकोलकरवर तर इंटरपोलची ‘इंटरनॅशनल रेड कॉर्नर’ नोटीस असून देखील त्याला पकडण्याचे पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. विनय पवारवर पूर्वीचा गुन्हा नोंद नसताना देखील तो गेली आठ वर्षे फरार आहे. या दोघांना पकडण्यामध्ये गेली आठ वर्षे जी अक्षम्य दिरंगाई झाली आहे, त्यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे खून झाले. जर या फरार लोकांना वेळीच अटक झाली असती, तर हे तिन्ही खून टाळता आले असते. या सर्व दिरंगाईचा जाब महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असणार्‍या आमदार आणि खासदार यांना स्थानिक मान्यवर मतदारांच्या व्यापक शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणार आहेत. संसदेच्या व विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्याची चर्चा करावी, अशी मागणी देखील स्थानिक लोकप्रतिनिधींकडे करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केलेले आहे. या बरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शासनाला जनतेने या गोष्टींचा जाब विचारावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने जनतेला करण्यात आलेले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणामध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार हे शासनाने फरार घोषित केलेले दोन संशयित गुन्हेगार लोकांना कोठेही दिसले, तरी त्यांनी तातडीने सी.बी.आय. कार्यालय, बेलापूर (नवी मुंबई) अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. या संशयित मारेकर्‍यांचे सी.बी.आय.ने प्रसारित केलेले फोटोतील चेहरे लोकांना सहज ओळखता यावेत म्हणून महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्यभरात त्यांचे पोस्टर्स विविध ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.