Categories
संतविचार

मीरा प्रभू रैदास शरण ले

मार्च - २०१८

मीराबाई संत रैदासांची शिष्या होती. आपण गुरूचा खूप शोध घेतला, अखेर संत रैदासात मला माझा गुरू मिळाला. त्यांच्या त्यागाला, ज्ञानाला मी शरण गेले, अशा आशयाची मीराबाईंची अनेक पदे आहेत.

अशा पदांच्या आधाराने लोक रैदासांना मीराबाईंचे गुरू म्हणून मानत आलेले आहेत. काहीजणांचे मत आहे, मीराबाई आणि राणी झांशी या वेगवेगळ्या आहेत; पण बहुतेक अभ्यासकांचे मत आहे, दोन्ही एकच व्यक्ती आहेत. ऐतिहासिक अंगाने बघायला गेले तर मीराबाईंचा जन्म 1555 चा आहे आणि रैदासांचा मृत्यू 1575 मध्ये झाला, हे अनेक पुराव्याने सिद्ध झाले आहे. यावरून हे सिद्ध होते की, रैदासांच्या मृत्यूच्या वेळेस मीराबाई 20 वर्षांच्या होत्या. अशा स्थितीत मीराबाई आणि रैदास यांची भेट झाली असणे स्वाभाविक आहे.

रैदास जवळजवळ 105 वर्षे काशीत राहून ब्राह्मण-पंडितांविरोधात संघर्ष करीत ‘निर्गुण’ धर्माचा प्रचार करीत होते. ते आपला सत्संग चौका-चौकात भरवत आणि आपल्या अभंगांतून, दोह्यांतून, भजनांतून सनातन धर्माच्या वर्णवादी व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत. त्यांनी सत्तेशी कधीच खुशामतखोरी केली नाही, सतत सत्तेच्या विरोधीच राहिले. बहुधा मीराबाई रैदासांच्या या पवित्र्यानेच प्रभावित झाल्या असाव्यात. कारण रैदास ज्या प्रकारे मंदिरांच्या बाहेर आपले सत्संग भरवत व लोकांना एकत्र करत, त्याचप्रमाणे मीराबाईही राजेशाहीच्या विरोधात राजमहालाला झिडकारून रस्त्यावर लोकांच्यात आल्या होत्या. समानता आणि भक्ती आंदोलन हा मीराबाई आणि रैदास यांना जोडणारा समान दुवा होता. त्यामुळे विचारांच्या पातळीवर एकाच मार्गाने चालणार्‍या मीराबाईने रैदासांना आपले गुरू म्हणून स्वीकारले यात काहीच आश्चर्य नाही.

मीराबाईंच्या या निर्णयाला ब्राह्मणांनी प्रचंड विरोध केला. त्यांचे म्हणणे होते, काशीत इतके मोठ-मोठे साधू, महात्मे, पुरोहित असताना मीराबाईने एका खालच्या जातीतल्या व्यक्तीला गुरू मानणे हे शास्त्रसंमत नाही परंपरेच्या विरोधात आहे. पण विद्रोही मीराबाई या विद्वानांच्यापुढे झुकल्या नाहीत. उलट त्यांनी रैदासांना चित्तोडला सन्मानपूर्वक आमंत्रित केले. रैदासांनी अनेक वेळा हे आमंत्रण नाकारले होते; पण आयुष्याच्या शेवटच्या काळात वृद्धत्व आणि आजारपणामुळे कमजोर झालेल्या रैदासांनी ते मीरेचे आग्रही आमंत्रण स्वीकारले व ते चित्तोडला गेले. मीराबाईंनी तेथे त्यांच्या सन्मानार्थ सहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या भोजनाला मीराबाईने उच्च-नीच वर्ण,वर्गातल्या स्त्री-पुरुष, लहान – मोठे सर्वाना आमंत्रित केले होते. सर्वांनी एकाच पंक्तीत एक साथ जेवण करायचे होते. या सहभोजनातून रैदास-मीराबाई लोकांत जो भेदभाव होता, तो कमी करू इच्छित होते.

असं सांगतात, रैदास जेव्हा चित्तोडला आले, तेव्हा सारी नगरी त्यांना बघायला गोळा झाली. सहभोजनाच्या पूर्वी रैदासांनी ठिकठिकाणी सत्संग भरविले. लोकांशी आपल्या पदांतून, भजनांतून, अभंगांतून, दोह्यांतून थेट संवाद साधत. अस्पृश्यता, अंधश्रद्धा, धर्मांधता सोडण्याचे आवाहन करीत. रैदास चित्तोडच्या ज्या-ज्या गल्ल्यांमधून जात, तेथे त्यांच्या भोवती गर्दी जमा होई ती त्यांच्या पाठोपाठ चालू लागे.

परंपरावाद्यांना हे सहन होणे शक्यच नव्हते. ब्राह्मणांच्या एका गटाने मीराबाईला सुनावले, आम्ही सहभोजनात सामील होणार नाही, रैदासांबरोबर कोणतीही धार्मिक कृती करणार नाही. खालच्या जातीच्या लोकांबरोबर भोजन घेणे आम्हाला कधीच मान्य होणार नाही. मीराबाईने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण सारेच व्यर्थ! त्यांचे म्हणणे एकच, रैदास खालच्या जातीचे आहेत. त्यामुळे रैदासांबरोबर ना जेवण होणार, ना रैदासांना ब्राह्मणांच्या आधी जेवता येणार! अखेर मीराबाईने ब्राह्मणासाठी वेगळे जेवण बनविले व त्यांची जेवणाची वेगळी सोय केली.

असेही सांगितले जाते की, जेव्हा ब्राह्मणांनी भोजनास सुरुवात केली, तेव्हा त्याना अचानक भास झाला की, रैदास पंक्तीत आहे. सगळे ब्राह्मण जेवण सोडून उभे राहिले. पण रैदास नाहीत समजल्यावर पुन्हा पंगत बसली. सगळे ब्राह्मण आसपास बघू लागले, त्यांना भास होऊ लागला की रैदास आपल्याजवळच आहेत. मोठा गोंधळ माजला. मीराबाई त्यांना समजावू लागली तर ते मीराबाईंवरच आरोप करू लागले, ‘रैदासाला तू पंक्तीत आणत आहेस आणि तू धर्म भ्रष्ट करायला पाहात आहेस.’ अखेर मीराबाईने खुलासा केला, ‘रैदास श्री कुंभश्यामच्या मंदिरात सत्संगात आहेत आणि हजारो लोक तेथे जमा झाले आहेत.’

पण रैदासांनी या प्रकारे मंदिरात सत्संग भरवणे तत्कालीन ब्राह्मण वर्गाला मान्य झाले नाही. एका खालच्या जातीतल्या माणसाने मंदिरात भजन गाणे त्यांना धर्मविरोधी वाटत होते. मंदिरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर ब्राह्मणांनी घातक प्रहार केले. रैदास तेथेच कोसळले. सांगितले मात्र असे गेले की, त्यांच्या शरीरातून सूर्याच्या किरणासारखे प्रखर किरण बाहेर पडले आणि क्षणात त्यांचे पार्थिव शरीर त्या तेजस्वी प्रकाशात विलीन होऊन गेले.

असेही सांगितले जाते की, रैदासांच्या मृत्यूची दु:खद वार्ता समजताच त्यांची पत्नी लोना यांचाही मृत्यू झाला.

–राजेशकुमार