Categories
पुस्तक परिचय

रिंगणनाट्य : आता पुस्तकरूपात

ऑक्टोबर – २०१६

20 ऑगस्ट 2013 ची सकाळ नऊची वेळ. विविध वृत्तवाहिन्यांवर ‘विवेकवादी कार्यकर्ते, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून’, अशी बातमी झळकताना पाहून आत काहीतरी तुटत गेल्याचं जाणवलं. त्यादिवशी रक्षाबंधन होतं, तोच माझा वाढदिवसही! पण ते सारं बाजूला ठेवून आम्ही आमचा आक्रोश हृदयात ठेवून गावात मूकमोर्चा काढला व रात्री सातार्‍याला पोचून, डॉक्टरांचे अंत्यदर्शन घेतले. वातावरणातील अस्वस्थता व तणाव, मारेकरी सापडले का? अशी चर्चा करत जो-तो उभा होता.

वर्ष गेले तरी मारेकरी मिळत नाहीत, तशी कार्यकर्त्यांची अस्वस्थता व असंतोष वाढत होता. पण कोणीही हातात दगड घेऊन रस्त्यावर आले नाही किंवा कोणतीही तोडफोड केली नाही आणि तेव्हाच ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे व राजू इनामदार ही जोडगोळी अंनिसमध्ये सांस्कृतिक अंगाने निषेध व्यक्त करण्यासाठी, आपला राग, निषेध विधायक मार्गाने व्यक्त होण्यासाठी एक मंच तयार करत असल्याचे सांगितले, त्यातूनच समोर आले ‘रिंगणनाट्य’.

त्यानंतरचे जवळजवळ वर्षभर रिंगणनाट्य तयार झालेल्या 20 संघांनी महाराष्ट्रभर विवेकाचा आवाज बुलंद केला. त्या अंतर्गत रिंगणपर्व-1 मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय, तर नुकतेच रिंगणपर्व -2 मध्ये ‘संविधान’ या विषयावर कार्यशाळा घेऊन कार्यकर्तेजनमानसात सांस्कृतिक अंगाने विवेक जागर करू लागले, करत आहेत. त्या सार्‍या प्रक्रियेला शब्दबद्ध करणारे पुस्तक म्हणजे ‘रिंगणनाट्य’. अतुल पेठे व राजू इनामदार या दोन दादा माणसांनी आपल्या मेहनतीने हातात हात घालून एकमेकांना विश्वास देत या व्यवस्थारुपी बलाढ्य हत्तीला वठणीवर आणण्यासाठी सांस्कृतिक अंकुशच प्रभावी ठरू शकतो, याचा प्रत्यय आणून दिला. तो सारा प्रवास पुन्हा एकदा आम्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर या पुस्तकाच्या वाचनानंतर झरझर उभा राहिला. त्या कार्यशाळा, रिहर्सल, प्रयोगाची हुरहूर, झालेला विरोध, पुन्हा नव्याने मैदानात नव्या अस्त्रानिशी उभे राहणे सारंच रोमांचकारी होतं. हे सारं केवळ 180 पानांत इतक्या देखण्या पद्धतीनं व बारकाईने बांधण्याचे काम अतुल व राजू सरांनी केले. त्यांना रिंगण कलाकारांच्यावतीने द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.

हे पुस्तक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांना समजावून घेत ‘रिंगण’ धरलेल्या सर्व कार्यकर्त्या कलावंतांना अर्पण करण्यात आले आहे. रिंगण धरण्यापूर्वी या प्रस्तावनेतच ‘रिंगण’साठी विविध कार्यशाळांमधून विविध विषयाला भिडून कार्यकर्त्यांना सर्जनशील कलाकार कसे बनवितो, याचे दर्शन व्हावे, हे वाचकांना कळावे, अशी प्रामाणिक इच्छा लेखकांनी व्यक्त केली आहे आणि खरेच ‘आम्ही आज रिंगण धरितो’ प्रकरणापासून सुरुवात झालेले पुस्तक विविध सत्रांत शिबिरार्थींसोबत केलेल्या अनोख्या प्रयोगशाळेत आपण हरवून जातो.

या कार्यशाळांतून ज्या नवीन घोेषणा, गाणी व खासकरून रिंगणनाट्ये साकारली, प्रभावी ठरली, त्यातील निवडक कलाकृतींचा जाणीवपूर्वक समावेश या पुस्तकात केल्यामुळे हे पुस्तक खर्‍या अर्थाने संग्राह्य झाले आहे. नाट्यकर्मीच नव्हे, तर कॉलेजमधील पथनाट्य किंवा नाटक माध्यम हाताळणार्‍या सर्व कलाकारांना हे पुस्तक पूर्ण वाचूनच हातावेगळे करावे, अशी भुरळ पाडेल, यात शंका नाही.

कार्यशाळा ते नाटक या प्रवासाची गोष्ट सांगणारे हे पुस्तक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तृतीय स्मृतिदिनी पुण्यात डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्त प्रकाशित झाले आणि विशेष म्हणजे त्या पहिल्या आवृत्तीचे मानधन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देणार असल्याचे अतुल पेठे यांनी जाहीर करून आपण चळवळीबाबत किती नि:स्पृहतेने योगदान द्यायला हवे, याचा वस्तुपाठ घालून दिला. तेव्हा राजू इनामदार म्हणाले, ‘रिंगण’ हा आमच्या वेदनेचा मिलाफ आहे, हा आमच्या अस्वस्थेचा हुंकार आहे. हा आपल्या विचारांचा उद्गार आहे. हा आमचा विवेकाचा जागर आहे.

इंद्रायणी पाटील, इचलकरंजी

पुस्तकाचे नाव : रिंगणनाट्य
लेखक : अतुल पेठे, राजू इनामदार
प्रकाशक : साधना प्रकाशन, 431, शनिवार पेठ, पुणे.
फोन नं. (020) 24459635
मूल्य : 150 रुपये