Categories
पुस्तक परिचय

प्रश्न तुमचा! उत्तर दाभोलकरांचे – पुस्तक प्रसिद्ध झाले!

ऑक्टोबर – २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चळवळीची गरज म्हणून अनेक व्याख्याने दिली. परिसंवाद, चर्चासत्रे याबरोबरच वैचारिक लिखाण देखील केले. अनेक वेळा त्यांना विरोधकांचा प्रतिवाद करावा लागला. महाराष्ट्रभर फिरून व्याख्याने देताना अनेक शंका-कुशंका विचारल्या गेल्या. शंका विचारण्यात अडवणूक करणार्‍या आडमुठ्या सनातन्यांपासून प्रामाणिक कार्यकर्त्यांपर्यंत आणि अभ्यासू विद्वानापासून अल्पशिक्षित श्रोत्यांपर्यंत अनेक पातळीवरील जिज्ञासूंचा समावेश होता.

असे प्रश्न एकत्र करून त्यांनी ‘प्रश्नचिन्ह-पूर्णविराम’ पुस्तक प्रसिद्ध केले. त्याचा उपयोग कार्यकर्त्यांनाही उत्तम झाला. काही वर्षांनंतर नवे प्रश्न उपस्थित झाले. काही जुने प्रश्न नव्या स्वरुपात पुढे आले. चळवळीची भूमिका स्पष्ट करण्याची गरज भासू लागली. नवीन साधने आली. त्यातून ऑडिओ-व्हिडीओ, सीडीच्या स्वरुपात प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा विचार पुढे आला. सीडी करण्याचे ठरले.

आयटी क्षेत्रात माहितीचा वापर सामाजिक कामासाठी करू इच्छिणार्‍या गिरीष लाड यांनी तंत्रज्ञानाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वत:हून घेतली. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांना प्रश्न विचारून मुलाखत घेण्याची जबाबदारी देण्यात आली. ‘एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फौंडेशन’च्या तुडुंब भरलेल्या सभागृहात 8 एप्रिल 2013 रोजी ही मुलाखत झाली. त्याचे शूटिंग दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांच्या टीमने केले; पण डॉक्टरांचा खून झाला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सीडी तयार झाली.

या सीडीमध्ये निवडक 25 प्रश्न व त्यांची उत्तरे शंभर मिनिटांमध्ये कव्हर करण्यात आली आहेत. सीडीची किंमत दोनशे रुपये आहे.

हीच प्रश्नोत्तरे लिखित स्वरुपात वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी हा पुस्तक प्रपंच! पण त्यासाठी तीन वर्षे लागली.

या पुस्तकातले प्रश्न सोपे, मध्यम व कठीण अशा तीन प्रकारचे आहेत. उत्तर तीन-चार मिनिटांत द्यावयाचे असल्याने संक्षिप्त व नेमके आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव, भूत, संमोहन, धार्मिकता इत्यादी संज्ञांचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाची चतु:सूत्री 1) शोषण, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे, 2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचारप्रसार व अंगीकार करणे, 3) धर्माची कृतिशील, विधायक आणि प्रसंगी कठोर चिकित्सा करणे, 4) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे- या प्रत्येकाची व्यावहारिक उदाहरणे त्यांनी दिली आहेत.

न्यायमूर्ती रानडे म्हणतात – ‘उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती म्हणजे श्रद्धा’- हीच व्याख्या प्रमाण मानून डॉक्टरांनी स्पष्टीकरण केले आहे.

बुवाबाजी व चमत्काराच्या विरोधातली संतवचने व प्रसिद्ध कवींच्या काव्यपंक्ती त्यांनी उद्धृत केल्या आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सूत्ररुपाने मुलाखतीमध्ये आले आहे.

ते म्हणतात- पाच-दहा हजार वर्षेअसलेल्या अध्यात्माने लोकांचा भुकेचा प्रश्न मिटविला नाही, तो अलिकडच्या चार-साडेचारशे वर्षांत आलेल्या विज्ञानाने मिटविला; म्हणजे जिथे अध्यात्म संपते तिथे विज्ञान सुरू होते.

मानवी प्रगतीचा इतिहास हा धर्मचिकित्सेचा इतिहास आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. “ज्या रस्त्यावरून तुम्ही जाणार, त्यावर अंधश्रद्धांच्या नावानं धर्मश्रद्धांच्या आधारे आलेले अनेक खड्डे, दगड, काटे, हिंस्त्र श्वापदं आहेत. ती दूर करणं आम्ही महत्त्वाचं मानतो; पण तुम्ही जर म्हणालात की हा पूर्ण रस्ता मोकळा करा, तर मी म्हणेन, ‘आम्हाला ते सगळे दगड हलविता येत नाहीत, सगळे खड्डे भरता येत नाहीत आणि सगळ्या हिंस्त्र श्वापदांचाही बंदोबस्त करता येत नाही. म्हणून आम्ही तुमच्या हातामध्ये एक छोटी चिकित्सेची बॅटरी देऊन एवढंच म्हणतो की, बाबांनो, तुम्ही या रस्त्याने जाणार आहात, तुम्हाला देवाकडं जायचं का नाही बघा; पण निदान या खड्ड्यात पडू नका.”

कार्यकर्त्यांनीही बदलाचे सहा टप्पे लक्षात ठेवलेत – विचार, उच्चार, प्रसार, संघटन, आचार आणि संघर्ष! तुम्ही आई-वडील, नवरा-बायको, भाऊ-बहीण यांना बदलू शकत नसला, तरी स्वत:ला बदलू शकता. निदान विचार करा, त्याचा उच्चार करा, प्रसार करा, जमलं, तर संघटनेत या. आपण सगळे मिळून काम करू. सगळ्या परिवर्तनाची सुरुवात विचारबदलापासून होतेे. विचारांना मूल्यांचा आशय मिळतो. त्यावेळी त्याला विवेक म्हणतात. अंनिसचे दुसरे नाव ‘समाजाचा विवेक वर्धिष्णु करणारी चळवळ’ असे आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हे पोचविण्याचा प्रयत्न आहे.

पुस्तक कार्यकर्त्यांना, व्याख्यात्यांना आणि जिज्ञासू सामान्य नागरिकांनाही उपयोगी आहे.

पुस्तकाचे नाव : प्रश्न तुमचा- उत्तर दाभोलकरांचे
प्रकाशक : साधना प्रकाशन, 431, शनिवार पेठ, पुणे
पृष्ठे : 48 पाने
किंमत 40 रुपये