Categories
अभिवादन

वंचिताच्या ‘माँ’ महाश्वेतादेवी

ऑक्टोबर – २०१६

आदिवासी आणि वंचिताच्या ‘माँ’ महाश्वेतादेवी. गेल्या महिन्यात महाश्वेतादेवींचे निधन झाले. त्यांचे परिचित विलास गीते यांनी वाहिलेली भावांजली.

“जीवनाचं गणित मांडता येत नाही. माणूस हा काही राजकारण्यांच्या पटावरचं प्यादं नाही. माझ्या मते, अस्तित्व आणि सामाजिक न्यायाचा अधिकार देण्याची मनुष्याला हमी देणं, हेच सर्व राजकीय कार्यक्रमाचं आणि विचारसरणीचं अंतिम ध्येय असायला हवं. सामाजिक व्यवस्थेत समूळ परिवर्तन व्हायला हवं, याच पक्षाची मी आहे.”

ढाका येथे एका सुसंस्कृत कुटुंबात दि. 14 जानेवारी 1926 रोजी महाश्वेतादेवींचा जन्म झाला. कुटुंबात लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि कलावंत यांचा समावेश होता. त्यांचे वडील मनीषचंद्र घटक हे प्रसिद्ध लेखक आणि कवी होते. आई धरित्रीदेवी यादेखील लेखन आणि समाजसेवा यांच्याशी संबंधित होत्या. प्रख्यात चित्रपट-दिग्दर्शक ऋत्विक घटक हे महाश्वेतादेवींचे काका होते. त्यांचे एक मामा सचिन चौधुरी हे ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’चे संस्थापक – संपादक होते, तर दुसरे मामा शंखो चौधुरी शिल्पकार होते.

महाश्वेता देवींचे शिक्षण कलकत्ता आणि शांतिनिकेतन इथे झाले. त्यांनी बी. ए. ही पदवी ऑनर्ससह प्राप्त केली आणि नंतर कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. ‘इप्टा’चे संस्थापक – सदस्य विजन भट्टाचार्य यांच्याशी महाश्वेतादेवींचा विवाह झाला. ते सी.पी.आय.चे कार्डधारक सदस्यही होते. त्यांचा मुलगा नवारूण भट्टाचार्य हादेखील बंगालीतील श्रेष्ठ कवी आणि कथाकार आहे.

महाश्वेतादेवी यांची 1956 साली प्रकाशित झालेली ‘झांसीर राणी’ (झाशीची राणी) ही पहिली कादंबरी राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील संशोधनात्मक कादंबरी आहे. पुढील वर्षी त्यांची ‘नटी’ ही कादंबरी व 1958 मध्ये ‘की वसन्ते, की शरते’ (वसंतात काय, शरदात काय) हा कथासंग्रह प्रकाशित झाला. तेव्हापासून त्यांच्या शंभरहून अधिक कथा, एक नाट्यसंग्रह, तसेच बालसाहित्याची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आणि त्या पुस्तकांचे स्वागतही चांगले झाले. महाश्वेतादेवी यांची महत्त्वाची अनेक पुस्तके इतर भारतीय आणि विदेशी भाषांतही अनुवादित झालेली आहेत.

महाश्वेतादेवींची पुस्तके केवळ संख्येनेच अधिक आहेत, असे नव्हे, तर वाचकांवरील प्रभावाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. ‘हजार चुराशी मां’ या आपल्या कादंबरीत त्यांनी आईच्या दु:खाचे अलिप्तपणे, पण खोलवर जाऊन भिडणारे चित्रण केले आहे. आपल्या मुलाचे प्रेत पोलिसांच्या शवागारात पाहून ती हादरते. हे सगळे काय आहे? का आहे? असे प्रश्न तिला पडतात, तर ‘अरण्येर अधिकार’ (अरण्यावरील अधिकार) या कादंबरीत त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आदिवासींच्या बंडाचे नेतृत्व करणार्‍या ‘बिरसा मुंडा’ याची गाथाच वर्णन केली आहे. या कादंबरीला 1979 साली ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला. ‘अग्निगर्भ’ या कथासंग्रहात महाश्वेतादेवींनी अदम्य साहसाने सामाजिक न्यायासाठी बलिदान देणार्‍या व्यक्तींवर लिहिलेल्या कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून महाश्वेतादेवींच्या साहित्यात नेहमीच गरीब, उपेक्षित, आदिवासी आणि समाजातील शोषित वर्गच केंद्रस्थानी राहिलेला आहे. अशा प्रकारे अन्यायकारक व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांची लेखणी नेहमीच सक्रिय राहिलेली आहे. समाजाची शिकार झालेल्या लोकांची, महाश्वेतीदेवींना नेहमीच चिंता वाटली आणि शोषक समाजव्यवस्थेच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्यांबद्दल त्यांच्या मनात नेहमीच प्रेम वाटत आले. दलित वर्गाच्या इतिहासाची त्यांना खूप आवड होती. कारण त्यांच्या साहित्यात एक वेगळाच स्वर उमटलेला दिसतो. ‘श्रेष्ठ गल्प’ (श्रेष्ठ कथा) या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे, “कथाकाराने इतिहासामधून प्रेरणा घ्यायला हवी, असे मला ठामपणे वाटते. प्रामाणिक दस्तऐवजीकरण हेच अन्यायाविरुद्धचे सर्वांत मोठे हत्यार असते, हा माझा अनुभव आहे.”

महाश्वेतादेवींचा आदिवासींशी संबंध हा केवळ लेखनापुरताच मर्यादित नाही. अनेक वर्षांपासून गरिबांची आणि आदिवासींची परिस्थिती सुधारण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना त्यांचा सक्रिय पाठिंबा होता. पुरुलियामध्ये त्यांनी एका केंद्राची स्थापना केली. त्यात खेडिया, उरांव, संताळ अशा आदिवासींना, तसेच सालिस, डोंब, बावरी, चर्मकार, रोहिदास, कर्मकार अशा अनुसूचित जातींमधील व शोषित लोकांना शिक्षण दिले जाते. त्यांना हस्तकला शिकविली जाते आणि त्यांच्या आरोग्याची तपासणीही केली जाते.

महाश्वेतादेवींनी आदिवासींची विशेषत: आदिवासी महिलांची दु:खे, तुरुंगात होणारे त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन, नक्षलवाद्यांवर पोलिसांनी केलेले अत्याचार, तसेच गरिबांचा संघर्ष यांचे चित्रण आपल्या कथा-कादंबर्‍यांमधून केले आहे. विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या असूनही, त्यांचे लेखन उपदेशात्मक किंवा प्रचारात्मक होत नाही. त्या म्हणतात, “संक्रमणाच्या या काळात प्रत्येक जबाबदार लेखकाला शोषित, तसेच दलित वर्गाची बाजू घ्यावी लागेल; अन्यथा इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही. माझ्या साहित्यात एखादी राजकीय विचारसरणी शोधणं चुकीचं होईल. समाजाने अवहेलना केलेले लोकच माझ्या साहित्यातील मुख्य पात्रे आहेत.”

महाश्वेतादेवी या कार्यकर्त्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. नंतर दोन वेळा त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटही झाली. सविस्तर बोलणेही झाले.

महाश्वेतादेवी यांच्या कथा मी प्रथम बंगालीतून वाचल्या. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील आदिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात, याचे दाहक दर्शन झाले. प्रस्तुत लेखकाने बंगालीतून अनुवादित केलेला ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. महाश्वेतादेवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.

कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे.

आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो; पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेतादेवींनी केलेले वर्णन उच्चभ्रूंच्या तोंडात थप्पड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला, त्याची उंची वाढत-वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता; पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बर्‍यापैकी पोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता.

प्रत्यक्ष भेट : महाश्वेतादेवी यांची प्रत्यक्ष भेट 1998 साली परळीच्या साहित्य संमेलनात झाली. त्या वर्षी त्यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाला होता. परळी वैजनाथला झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. श्रोत्यांना त्यांचा परिचय करवून देण्यासाठी आयोजकांनी मला बोलावले होते. त्या वेळी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. ‘मी कुणालाही आणि कशालाही घाबरत नाही. अगदी वाघाच्या जबड्यात हात घालायलाही मी घाबरणार नाही,’ असे माझ्याशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या. त्यांची ही वाक्ये आणि निर्भय मुद्रा कधीही माझ्या स्मरणातून जाणार नाही.

संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसण्याचा मान आयोजकांनी मला दिला होता. त्यावेळी त्यांना मी विचारले, ‘आप कौनसी भाषा में बोलेगी माँ?’ त्या जर बंगालीत बोलणार असत्या, तर त्यांच्या भाषणाचा अनुवाद मी मराठीत केला असता, या विचाराने मी प्रश्न विचारला होता; पण मी त्यांच्यासाठी वापरलेले ‘माँ’ हे संबोधन त्यांनाही आवडले. कारण कार्यक्रम संपल्यानंतर मला छातीशी धरून त्या म्हणाल्या, ‘तुने मुझे माँ कहा ना, अब तू मेरा बेटा है।’ हे वाक्यही कायम माझ्या मनावर कोरलेले राहील. त्यानंतर काही वर्षांनी वडार बांधवांची संघटना बांधण्यासाठी त्या लक्ष्मण गायकवाड आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्याबरोबर नगरला आल्या होत्या. ती त्यांच्याशी झालेली शेवटची भेट.

विलास गीते, अहमदनगर