Categories
कार्याध्यक्षांची डायरी

विवेकी मार्गाने सामाजिक सौहार्द प्रस्थापित होईल!

फेब्रुवारी – २०१६

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतरच्या दोन- अडीच वर्षांच्या धावपळीनंतर आपण संघटना बांधणीच्या मूलभूत कामाकडे पुन्हा लक्ष घातले आहे. याचाच एक भाग म्हणून आपण पदाधिकार्‍यांची विभागीय प्रशिक्षण शिबिरे घेतली. या शिबिरांना अपेक्षित सर्वच पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत, हे खरे आहे. पण जे पदाधिकारी प्रशिक्षणास उपस्थित होते, त्यांना त्याचे महत्त्व आणि उपयुक्तता लक्षात आली आहे. कामाची गुणवत्ता वाढण्यास त्याची मदत होणार आहे.

या शिबिरांमधूनच युवा संवाद मेळाव्याची कल्पना पुढे आली. पुणे येथे दि. 16 व 17 जाने. 2016 रोजी राज्यभरातील निवडक 40 तरुण कार्यकर्त्यांचा ‘युवा संवाद मेळावा’ यशस्वीपणे पार पडला. या मेळाव्यात संघटनेची धुरा पुढील काळात कामातील आनंद म्हणून नव्हे तर जबाबदारीचे भान म्हणून खांद्यावर घेण्याची कटिबद्धता या तरुणांनी अधोरेखित केली. ही कार्याध्यक्ष म्हणून मला आश्वस्त करणारी म्हणून आनंददायी घटना वाटते.

दि. 6 व 7 जानेवारी 2016 रोजी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे ‘नाईन्थ वर्ल्ड अ‍ॅथिइस्ट कॉन्फरन्स’च्या उद्घाटनामध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवले होते. माझ्यासोबत म.अं.नि.स.चे राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे कार्यवाह डॉ. सुदेश घोडेराव निमंत्रित म्हणून उपस्थित होते. भारतातील विविध 20 राज्यांमधून आणि 5 देशातून मिळून जवळपास पाचशे जण या ठिकाणी उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेत नास्तिकतेबद्दलच्या अ‍ॅथिइस्ट, रॅशनॅलिस्ट, फ्री थिंकर, नॉन- बिलीव्हर, ह्युमॅनिस्ट या विविध छटांचे तपशील कळले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव धर्माबद्दलची संविधान सुसंगत भूमिका आणि भारतीय कसावर आधारित विवेकवाद हे मुद्दे मांडता आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे परिषदेत सहभागी देश-विदेशातील मान्यवरांना आपल्या संघटनेबद्दल औत्सुक्य आणि आदर होता. त्यामुळे कॉन्फरन्समध्ये आणि बाहेर मीडियात देखील बराच फोकस आपल्याकडे होता. हे सांगण्याचा हेतू एवढाच की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वाढ आणि विस्ताराच्या भरपूर संधी आणि मागणी देखील आहे. त्या कॅश करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम आखणे खूप आवश्यक आहे. विविध राज्यांमध्ये काम करताना ते संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने न बघता त्या-ठिकाणच्या इच्छूकांना कामासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे आणि विचार व कार्यपद्धतीतील एकवाक्यता निर्माण करण्यासाठी कोऑर्डिनेशन करणे असे मी त्याकडे बघतो. या परिषदेचे संयोजन करणार्‍या डॉ. विजयम गोरा आणि कुटुंबियांनी निरोप देताना आंध्रप्रदेशात अधिक सवड काढून ठिकठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी येण्याचे आग्रहाचे आणि आपुलकीचे निमंत्रण दिले आहे.

याच आंध्रप्रदेशातील रोहित वेमुला या तरुण संशोधक विद्यार्थ्याचे आत्महत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. हैदराबाद विद्यापीठातील एक अभ्यासू संशोधक असलेल्या रोहित वेमुला या दलित तरुणाला विद्यापीठ व्यवस्थापनाकडून होणार्‍या दडपशाहीमुळे शेवटी आयुष्य संपवावे लागले. या दडपशाहीचे धागेदोरे थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचू पाहत आहेत. ही घटना निषेधार्हच आहे. हा प्रश्न केवळ दलित-सवर्ण अशा संघर्षापुरता सीमित नाही. तर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनापासून सुरू झालेल्या असहिष्णू घटनांच्या मालिकेतीलच ही पुढची कडी आहे. देशभर सर्वत्र व सर्वव्यापी असहिष्णू वातावरण नाही, हे जरी खरे असले तरी अशा अप्रिय घटना देखील थांबत नाहीयेत, हे वास्तव आहे.

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे लंडनमधील घर स्मारकासाठी खरेदी करणे, इंदू मिलच्या जागेवर राष्ट्रीय स्मारकाची मुहूर्तमेढ रोवणे आणि संसदेचे विशेष अधिवेशन भरविणे यासारख्या कृतीतून भाजपा सरकार सकारात्मक संदेश पोहोचू पाहत आहे. त्यापेक्षा आपल्याच परिवारातील ज्या व्यक्ती संघटनांना अजून समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायासारखी संविधान मूल्यं पचनी पडत नाहीत तेच अशा घटनांमध्ये कसे पुढे असतात’ याचा अभ्यास करून अशा घटना थांबविण्याची इच्छाशक्ती दाखवून विश्वासाचे वातावरण निर्माण करणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

दुसर्‍या बाजूला ही विवेकाचा आवाज दडपून टाकू पाहणारी विवेक आणि अविवेक यातील लढाई आहे, जी प्रदीर्घ काळ आणि अहिंसक मार्गानेच लढावी लागेल. त्यासाठी सर्व सनदशीर मार्गाने अथक़ प्रयत्न करावे लागतील, ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधावीच लागेल. विद्वेषाला-विद्वेषाने उत्तर देण्याने कधीही मांगल्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच अ.भा.वि.प. च्या मुंबई येथील कार्यालयावरील हल्ल्याचे देखील समर्थन करता येणार नाही. यापूर्वीच्या देशातील प्रत्येक दंगली आणि हिंसक घटनांत क्रिया-प्रतिक्रिया, अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन असे शब्दच्छल झाले आहेत. पण विवेकी मार्गाने मार्गक्रमण करीतच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होईल, यावरचा दृढ विश्वास कायम ठेवून काम करीत राहू या.

अविनाश पाटील,

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अं.नि.स.