Categories
चळवळ

विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवातील सादरीकरण स्टुडिओ सफदर दिल्लीत संपन्न

ऑक्टोबर – २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ‘आटपाट निर्मिती’ आणि लोकप्रिय सिनेमा ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लघुपट महोत्सवाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, त्यातील निवडक दहा लघुपटांचे सादरीकरण 20 सप्टेंबर 2016 रोजी स्टुडिओ सफदर, दिल्ली येथे झाले.

विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या आयोजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या सामाजिक प्रश्नाला मध्यभागी ठेवून सहभागी कलावंतांनी लघुपटांची निर्मिती केली आहे; जे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कृतिशील अभिवादन ठरले आहे. सांस्कृतिक माध्यमातून आपला विचार ठामपणे मांडण्यासाठी या फिल्म्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अडीचशेपेक्षा अधिक लघुपट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील प्राथमिक फेरीनंतर 40 लघुपटांचे सादरीकरण दि. 17, 18 ऑगस्ट रोजी पुण्यातील ‘नॅशनल फिल्म अर्काईव्ह’ येथे प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत व समीक्षकांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त व उत्कृष्ट असे निवडक दहा लघुपटांचे स्टुडिओ सफदर, दिल्ली येथे दि. 18 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी तीन वाजता सादरीकरण झाले. पथनाट्य चळवळीचे खंदे पुरस्कर्ते व संघर्षशील नेते शहीद सफदर हाशमींच्या स्मृती जागविणार्‍या स्टुडिओ सफदर येथे मलयश्री हाशमी, सुधनवा देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, गिरीष लाड, दिपक गिरमे, माधव बावगे, डॉ. प्रगती पाटील, योगेश कुदळे, केशव कुदळे इत्यादी उपस्थित होते. काही फिल्मचे कलाकार व दिग्दर्शक या कार्यक्रमास उपस्थित होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मारून अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार संपविता येणार नाहीत, हे स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला असून तो दाभोलकर यांच्या विचाररुपाने जिवंत असल्याचा पुरावा आहे. येत्या कालखंडामध्ये यामधील निवडक लघुपटांचा महोत्सव व महाराष्ट्र अंनिसतर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्यामध्ये घेण्यात येणार आहे. दिल्ली येथील महोत्सव हा त्याचीच सुरुवात आहे.

केशव कुदळे