Categories
स्पेशल रिपोर्ट

शोध अंबेचा

वार्षिकांक - २०१६

देवीच्या प्रथा बदलतात गाथा बदलतात

देवीचा प्रसाद बदलतो नैवेद्य बदलतो

देवीचे रूप बदलते नाव बदलते

नाती बदलतात पती बदलतात

साथी बदलतात माथी बदलतात

रीती बदलतात बदलत नाही ती भाविकांची भक्ती!

आणि पुजार्‍याची शक्ती!

असे का होते? असे कसे होते? त्याचा हा शोध ….

शोध अंबेचा!

कोल्हापूरची प्रसिध्दी अनेक गोष्टीसाठी आहे. पण सामाजिकदृष्ट्या राजर्षी शाहूंची नगरी, पुरोगामी चळवळीचे केंद्र, तर धार्मिकदृष्ट्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले अंबाबाईचे मंदिर! यांची प्रसिद्धी जास्त आहे.

गावातल्या देवदेवतांबद्दल समाजात अत्यंत आपुलकी असते. या देवता आपल्या कुटुंबातल्याच आहेत, अशी भावना असते. सणसमारंभाला, परंपरेप्रमाणे नैवेद्य, पूजा-अर्चा काळजीपूर्वक केली जाते. विवाहप्रसंगी पहिली पत्रिका, पहिले दर्शन देवाचेच. यात एखादी त्रुटी राहिली, तरी लोकांना चुटपूट लागते. कोल्हापूरची अंबाबाईही याला अपवाद नाही.

कोल्हापुरात अंबेबरोबरच टेंबलाई, कात्यायनी, मरगाबाई, फिरंगाई, महाकाली, काळकाई इत्यादी देवता, तर जोतिबा, रंकोबा, खंडोबा, दत्त, विठ्ठल असे देव आपले स्थान टिकवून आहेत. यल्लम्माचे स्वत:चे भक्त आहेत, तर अलिकडच्या काळात गणपतीची मंदिरेही गर्दी खेचत आहेत.

अनेक शतके स्थानिकांमध्ये अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी देवी अलिकडे महालक्ष्मी नावाने प्रसिद्धीस आली, गर्दी खेचू लागली. हे सर्व धार्मिक क्षेत्रात शांतपणे सुरू होते. पण आता त्याला सामाजिक संदर्भ जोडला गेला. भारतीय घटनेने महिलांना दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे जनजीवन ढवळून निघाले, जीर्ण धार्मिक परंपरा आणि आधुनिक समतेचा विचार यांच्यामध्ये संघर्ष उभा राहिला.

तीन रुपे

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या मंदिरात एके दिवशी स्त्रीची तीन रुपे एकाच वेळी पाहायला मिळाली.

एक पार्वतीचे रूप असलेली अंबा, जिच्यापुढे स्त्रियांबरोबर पुरुष भाविकही नत्मस्तक होतात. दुसरी ‘स्त्रियांना पाळी येते. त्यामुळे त्या अपवित्र आहेत, त्यांनी गाभार्‍याच्या बाहेरूनच दर्शन घेतले पाहिजे,” असे मानणारी आणि पुरुषांपुढे नतमस्तक होणारी पारंपरिक विचारांची भाविक स्त्री आणि तिसरी – ‘पुरुषांना जिथपर्यंत जाता येते, तिथंपर्यंत मलाही जाण्याचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ म्हणत पुरुषी सत्तेपुढे नतमस्तक व्हायला नकार देणारी, गाभार्‍यात जायला सज्ज झालेली आधुनिक स्त्री! तीनही अंबेचीच रुपे काय?

67 वर्षांपूर्वी भारतीय संविधानाने स्त्रियांना समतेचा अधिकार दिला! 60 वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मंदिरप्रवेशाचा कायदा केला. या सर्व कायद्यांचा आणि तरतुदींचा अर्थ लावायला कोर्टाने 18 वर्षे घेतली आणि एक एप्रिल 2016 रोजी ‘मंदिर प्रवेश हा महिलांचा मूलभूत हक्क असल्याने कोणताही कायदा महिलांना रोखू शकत नाही,’ असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामागे संविधानातील कलम 15, 25 व 51 (क) ड आणि हिंदू मंदिरातील प्रवेशाबाबत 1956 चा कायदा यांचे पाठबळ होते.

स्वयंसेवी संस्था

निर्णय जाहीर होताच कोल्हापूरमध्ये ‘अवनि’ व ‘एकटी’ या स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) चालविणार्‍या अनुराधा भोसले आणि अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात, पोलीस बंदोबस्तात, जाहीर करून, प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना स्वत:ला ‘श्रीपूजक’ म्हणवणार्‍या अंबाबाईच्या पुजार्‍यांनी व आधीपासून वाट पाहत बसलेल्या महिलांनी गाभार्‍यात जाण्यापासून रोखले. या रोखणार्‍या महिला ‘भाडोत्री’ नव्हत्या, ‘भाविक’ होत्या, असा खुलासा पुजार्‍यांनी केला.

पण ‘असे बळाचा वापर करून रोखणे बेकायदेशीर असल्याने पुजार्‍यांवर कारवाई करावी,’ असे निवेदन नवीनच स्थापन झालेल्या ‘अंबाबाई देवस्थान, सर्वसामान्य भक्त महिला समिती’ने कलेक्टरना दिले. या समितीत कम्युनिस्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेहोते. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, तेव्हा या समितीने मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा दिला.

तोपर्यंत स्वयंसेवी संस्थेने घूमजाव केले. ‘हा सत्याग्रह वैयक्तिक असून त्याचा संस्थेशी संबंध नाही,’ असा खुलासा केला. स्वयंसेवी संस्थांचे स्वातंत्र्य शासन आणि देणगीदार यांनी नियंत्रित केलेले असते काय? पण ‘आपल्यावर देणगीदारांचा दबाव (?) अजिबात आलेला नाही,’ असे त्यांनी न विचारताच आवर्जून सांगितले.

‘अंबाबाई देवस्थान सर्वसामान्य भक्त महिला समिती’ने कोर्ट आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रीतसर पोलीस संरक्षणाची मागणी केली. तेव्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.अनिल देशमुख यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले. स्त्री-पुरुष समानता, कोर्टाचा निर्णय, संविधानातील तरतुदी इत्यादीवर तासभर चर्चा झाल्यावर त्यांनी पूर्वनियोजनानुसार मंदिराच्या पुजार्‍यांनाही बोलावून आणले.

पुजार्‍यांच्या मते – ‘गाभार्‍यात सर्वांना प्रवेश आहेच, पण मूर्तिसंवर्धन, दागिन्यांची सुरक्षितता, वाढणारी आर्द्रता, गाभार्‍याचा आकार, प्रचंड गर्दी, अशा कारणांनी स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रवेश देणे बंद आहे.’

वरील तांत्रिक कारणे सकृतदर्शनी खरी आहेत; पण “एखाद्या पुरुष पुजार्‍याऐवजी गाभार्‍यात स्त्री पुजारी ठेवण्यास त्यांची मान्यता नाही,” तेव्हा समिती आपल्या मागणीवर ठाम राहिली. मग पुजार्‍यांनी या वादात सर्वपक्षीय कृती समितीला ओढले. त्यांच्याशी विचारविनिमय करूनच निर्णय घेण्याचा आग्रह धरला.

शांतता राखा

कोल्हापुरातल्या टोलविरोधी आंदोलनात एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी शहरातील शांतता बिघडू नये, अशा उदात्त हेतूने ही कृती समिती स्थापन केली आणि ‘तृप्ती देसाईंना शांतता बिघडवू द्यायची नाही’ असा उद्देशही जाहीर केला.

हिंदू एकताचे कार्यालय असलेल्या प्रशस्त देवालयात सर्वपक्षीय कृतीसमिती चर्चेला बसली. त्यामध्ये कम्युनिस्ट, विद्रोही, संभागी ब्रिगेड, लाल निशाण, शेकापक्ष, अंनिस पासून भाजप, बजरंग दल, हिंदू एकता, हिंदू जनजागरण समिती, अंबाबाईचे पुजारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वत:ला बिगरपक्षीय म्हणवून घेणारे पुढारी, आस्तिक, नास्तिक अशा सर्वांनी हिरिरिने भाग घेतला. ‘मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे, परंपरा राखली पाहिजे, त्यासाठी महिलांनी प्रवेशाचा आग्रह सोडावा,’ हे एका बाजूचे मत, तर महिलेच्या पोटातून नऊ महिने राहूनच प्रत्येक जण जन्म घेतो, मग तो पवित्र आणि महिला अपवित्र होऊ शकत नाही, संविधानाने दिलेला समतेचा अधिकार मिळालाच पाहिजे, हे दुसरे मत!

अनेक वेळा चर्चा हमरीतुमरीवर, एकेरीवर आली, निमंत्रक निवास साळोखेंनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली; पण तोडगा निघेना, तेव्हा मीटिंग बरखास्त केली. यामध्ये चार तास गेले.

मीटिंगमध्ये पुरोगाम्यांनी आक्रमकपणे खूप शंका मांडल्या – अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी करण्याचा प्रयत्न झाला काय? ही अंबाबाई शिवपत्नी आहे की, विष्णुपत्नी? मंदिराचे मूळचे पुजारी कोण? मूर्ती भंगली आहे का? माथ्यावरचे शिवलिंग आणि नाग सुरक्षित आहेत का? महिला प्रवेशावर निर्बंधांची परंपरा आहे का? मंदिराचे उत्पन्न किती? ते कोणाच्या घशात जाते?

महिलांचा प्रवेश

मग पोलीस निरीक्षकांनी दोन्ही बाजूंना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. तिथेही दोन तास चर्चा झाली. शेवटी काही महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात गाभार्‍यात प्रवेश देण्यावर एकमत झाले. त्या महिला – कॉ. रुपाली मुकुंद कदम, कॉ. मीना अनिल चव्हाण, सीमा पाटील, कॉ. स्नेहल सतीश कांबळे, कॉ. सुवर्णा तळेकर, अरुणा माळी, कॉ. आशा बरगे, कॉ. आरती रेडेकर, कॉ. डॉ. मीनल सुनील जाधव, दीपा पाटील व वैशाली महाडीक; पण पुजार्‍यांनी ड्रेस कोडचा मुद्दा काढून प्रवेश नाकारल्याने त्यातील चार कमी झाल्या. महिलांसाठी ड्रेसकोडचा आग्रह धरणारे पुजारी सोवळे नेसले, तरी डोक्याचा चमन करून शेंडी ठेवत नाहीत, हा मुद्दा विचारात घेतला गेला नाही.

सर्वांच्या अनुमतीने कम्युनिस्ट आणि ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या देवीची ओटी भरून आल्या. त्यांच्या सोबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रवेशाचे फोटो काढून घेतले. पुजार्‍यांनी प्रत्येकाला नारळ देऊन त्यांचे स्वागत केले. ते नारळाला ‘श्रीफळ’ म्हणतात.

प्रवेश कशासाठी?

देव न मानणारे गाभार्‍यात कसे आले, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाची आठवण करून देण्यात आली- “या तळ्याचे पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नाही किंवा न प्याल्याने, आम्ही मरत नाही; पण सर्वांना मिळणारा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, यासाठी हा सत्याग्रह आहे.”

पण तरीही नास्तिकांनी ओटी घेऊन जावे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. इथे एक बाब स्पष्ट केली पाहिजे की, कम्युनिस्ट पक्ष किंवा ‘अंनिस’ ही संघटना नास्तिक मंच नाहीत. ते भारतीय घटनेने दिलेले उपासना स्वातंत्र्य मान्य करतात.

‘गाभार्‍यात अजिबात पाय ठेवू देणार नाही,’ असा सज्जड दम देणारे पक्ष संघटना, पुजारी जेव्हा दोन पावले मागे जाऊन प्रवेश देणे मान्य करतात, तेव्हा आपणही एक पाऊल मागे घेणे आवश्यक आहे. ‘पोलिसांना न्यायालयाचा मान राखण्यासाठी संरक्षण देणे बंधनकारक होते, अशा वेळी, विरोधकांशी चर्चेचे गुर्‍हाळ चालू ठेवण्याची गरज होती काय?’ याचे उत्तर आहे ‘होती’.

‘एक व्यक्ती शंभर पावले चालल्याने क्रांती होत नसते, शंभर माणसे एक-एक पाऊल पुढे जावी लागतात, तेव्हा क्रांतीच्या दिशेने वाटचाल होते,’ या तत्त्वानुसार सर्वांना- विरोधकांनाही – बरोबर घेणे योग्य आहे. या आंदोलनात भोंदू जनजागरण समितीने निषेधाचे पत्रक काढले आणि अलग पडले.

तणावाखाली असलेले हे आंदोलन कॉ. सतीशचंद्र कांबळे, कॉ. अनिल चव्हाण, कॉ. नामदेव गावडे, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. अतुल दिघे, भाई केशवराव जगदाळे इत्यादींनी संयमाने व चिकाटीने यशस्वी केले.

यावेळी पुजार्‍यांनी ड्रेसकोडचा मुद्दा उपस्थित केला. साडी नेसलेल्या महिलांना प्रवेश दिला आणि पंजाबी ड्रेसला विरोध केला. तेव्हा तृप्ती देसाईंनी विजयी रॅली काढून पंजाबी ड्रेसमध्येच गाभार्‍यात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

मंदिरात मारहाण

पोलीस संरक्षणात तृप्ती देसाईंना मंदिरप्रवेशासाठी नेण्यात आले आणि गाभार्‍यातून बाहेर पडताना, पोलिसांसमक्षच त्यांना बेदम मारहाण झाली. परिणामी त्यांना बाहेर आल्यावर इस्पितळात भरती करावे लागले. पाच पुजारी आणि दोन कार्यकर्त्यांवर सीसीटीव्ही फुटेज पाहून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुजार्‍यांवर पुढील गुन्हे दाखल झाले.

कलम 143/147 – गैरकायदेशीर जमाव जमवणे.

353 – शासकीय कामात अडथळा करणे.

336/337 – जीवितास धोका होईल असे कृत्य

332 – शासकीय कर्मचारी जखमी करणे.

506 – जीवे मारण्याची धमकी देणे.

मंदिरात महिलेला मारहाण करणारे पुजारी अजूनही सेवेत आहेत. त्यांच्यावर ना देवी कोपली, ना भाविक!

कोल्हापूरची परंपरा राजर्षी शाहूंची आहे, तशीच त्यांना शूद्र म्हणून हिणवणारे नारायण भटजीही इथलेच! त्यांचीही परंपरा राखली जाते, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

सत्यशोधक दासराम

कोल्हापुरातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक, राजकीय, अशा सर्व चळवळीमध्ये हिरिरीने सक्रिय भाग घेणारे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाज मनावर उमटविणारे कोल्हापूरचे थोर सुपुत्र म्हणून सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव ऊर्फ दासराम यांची ओळख होती. कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात त्यांनी समतेचे अनेक प्रयोग केले. रामदासांचे चमत्कार दाखवून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून दाखवणारा भालजी पेंढारकरांच्या ‘भगवा झेंडा’ चित्रपटावर बंदी आणण्यात त्यांचा पुढाकार होता. 1940 सालच्या अखिल भारतीय हिंदू धर्मपरिषदेस बा. सी. मुंजे येणार म्हटल्यावर ‘रंगीला धर्मवीर अर्थात बा. सी. मुंजे’ अशा पुस्तिका वाटून त्यांनी कोल्हापुरात खळबळ उडवून दिली. पूर्वीप्रमाणे महाद्वाराच्या सुरुवातीच्या चौकाला त्यांच्या नावाचा फलक लावावा म्हणून कार्यकर्तेप्रयत्नशील असून महापौर अश्विनी रामाणे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ‘मअंनिस’चे कोल्हापूरचे अध्यक्ष धनाजीराव जाधव यांनी सांगितले.

दासरामांचा काळ हा सत्यशोधक चळवळीचा धगधगता कालखंड होता. या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर परंपरावाद, धार्मिक, सनातनवृत्ती, ब्राह्मणी प्रवृत्ती यांच्याविरुद्ध वैचारिक आणि कृतिशील लढा सुरू होता आणि कोल्हापूर हे त्याचे केंद्र होते. गावोगाव जाऊन सत्यशोधक समाजाची शिकवण जनतेपर्यंत पोचवणे, सहभोजने आयोजित करणे, व्याख्याने आयोजित करणे, कमी खर्चात सत्यशोधक विवाह घडवून आणणे, असे विविध स्वरुपाचे कार्य, त्यावेळी कोल्हापूरमध्ये सुरू असे. दासरामांचा त्यात धडाडीचा सहभाग होता. अंबाबाई मंदिराशीही त्यांचा संबंध आला.

डॉ. छाया पोवार आणि डॉ. विलास पोवार यांनी दासरामांचे चरित्र लिहिले असून पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनने ते प्रसिद्ध केले आहे.

देवीची मूर्ती

मंदिराची बांधणी त्रिशुलाच्या आकाराची आहे. शिल्प सौंदर्य देखणे आहे. मंदिराच्या वरच्या भागाला अंबाबाई, तर उजव्या अंगांना समोरासमोर महाकाली, महासरस्वती आहेत. ही देवीची विविध रुपे म्हणजे समृद्धी, शौर्य आणि विद्यांची प्रतिके भाविक मानतात. मंदिरातील अंदाजे तीन फूट उंचीच्या काळ्याभोर शिलासनावर आदिमाया-जगन्माता-महालक्ष्मी-अंबाबाई उभी आहे. तिची उंची अडीच-तीन फूट असून ती चतुर्भुज आहे. वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये लांब गदा, डाव्या हातात पुढे केलेली ढाल, खालच्या बाजूच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग- म्हणजे महाळुंग आणि डाव्या हातात पानपात्र म्हणजे पाणी पिण्याचे भांडे आहे. मस्तकावरील मुकुटावर देवीने शिवलिंग धारण केले असून त्यावर नागफणा आहे. त्यामागे प्रभावळ्याची शोभा आहे. देवीचे वाहन असलेला सिंह तिच्यामागे उभा आहे.

या वर्णनावरून ती मूर्ती शास्त्रदृष्ट्या दुर्गा असल्याचे डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी ‘युगायुगीन करवीर इतिहास दर्शन’ या ग्रंथात नोंदवले आहे.

गाभारा व मंडप यावरील मजल्यावर शिवलिंगाची स्थापना केली आहे. तेथे नंदी मंडपही आहे. तेथे जाण्यास महाकाली मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ सोपान मार्ग आहे.

मंदिराची घडण नक्षत्राकार आहे. प्रदक्षिणेची वाटही नागमोडी आहे. बांधकामासाठी घडीव दगड एकमेकांत बसवलेले आहेत. चुना वापरलेला नाही. बाहेरील सर्व भिंती शिल्पसौंदर्याने नटलेल्या आहेत. सुंदर चौकटींच्या, उठावांच्या देवळ्या भिंतीतून तयार करून त्यामध्ये विविध प्रकारचा मुद्राभिन्न करणार्‍या नृत्यांगना आहेत. त्यांना लोक चौसष्ट योगिनी म्हणून ओळखतात. त्यामध्ये नर्तकी, मृदंगी, वंशी, टाळकरी, विणावादी, काटाकाढी, आरसा देखी असे प्रकार आहेत.

गाभारा पश्चिमाभिमुख आहे. त्याच्या उत्तरपूर्व आणि दक्षिण भागातील देवळ्यांमध्ये व्यंकटेश, कात्यायनी आणि गौरीशंकर आहेत. शेजारी महाकालीचा गाभारा दक्षिणाभिमुख असून देवळ्यांमध्ये चवरी आणि महाळुंग धारण केलेले द्वारपाल व वासुदेव यांच्या मूर्ती आहेत. महासरस्वतीच्या गाभार्‍यात अशा देवळ्या नाहीत.

या मुख्य देवळापुढे दर्शन मंडप आणि पुढे गरुडमंडप आहेत.

आवारातील देवदेवता

महाद्वारातून आत गेल्यावर डाव्या अंगाला गारेच्या गणपतीचे, सिद्धिविनायकाचे मंदिर येते. ही मूर्ती उभी आणि उजव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस लहान-मोठ्या चवरीधारी स्त्रिया आणि रिद्धी-सिद्धी आहेत. त्यासमोर आवारामध्ये उंच चबुतर्‍यांवर चार लहान व मध्ये एक मोठी अशा पाच दीपमाळा आहेत. चबुतर्‍याच्या चारी भिंतीत चार कोनाडे असून त्यामध्ये छोटा नाग, पाच फण्यांचा नाग, चतुर्भुज बैठा भैरव, शिवलिंग वगैरे मूर्ती आहेत. महालक्ष्मी-अंबाबाईच्या आवारात याखेरीज शेषशाही विष्णू, नवग्रह, नृसिंह, लक्ष्मी-नारायण, काळभैरव, खंडोबा, भवानी, राम, मारुती इत्यादी मोठ्या वाड्यात कुळे ठेवावीत, तशी अनेक मंदिरे आहेत.

काही मंदिरात आता साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज इत्यादी पोटकुळेही मूळ कुळाशेजारीच संसार थाटून आहेत.

उदाहरणार्थ, दत्तात्रयांच्या देवळामध्ये चिले महाराजांचेही दर्शन घेता यावे म्हणून डिजिटल फोटो कोपर्‍यात उभा केला आहे. पंचगंगा आणि साती-आसरा त्यांच्या ओवरीत भिंतीकडेने उभ्या असून ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ असा दिलासा देत स्वामी समर्थ मध्यावर बसले आहेत.

दशावतार मंदिरात विष्णूचे दशावतार भिंतीकडेने उभे आहेत, तर श्रीधर स्वामी महाराजांच्या दर्शनाची सोय डिजिटल फोटो लावून केली आहे.

एका ओवरीत आद्यशंकराचार्यांनाही स्थान मिळाले आहे, तर महाविष्णूच्या देवळात गजानन महाराज बसले आहेत.

पूर्वद्वाराला लागून एका बाजूला शेषनारायण मंदिर, तर दुसर्‍या बाजूला राम मंदिर आहे. कै. स्वातंत्र्यसैनिक अण्णा चव्हाण यांनी लिहिलेल्या आठवणीनुसार राम मंदिरासमोरील ‘रामाचा पार’ हा कोल्हापुरातील रोजच्या मीटिंग व सभांचे प्रमुख स्थान होते. देऊळ मध्यवर्ती असल्याने गावातील संध्याकाळच्या शिळोप्याच्या गप्पाही इथे होत असत. सत्यशोधकांनी एकेकाळी याच स्टेजवरून सभा घेतल्या आहेत.

पुढे अधिक प्रशस्त म्हणून सभांचे केंद्र रविवार पेठ बुरुजाकडे वळले. नंतर त्यालाच बिंदू चौक नाव मिळाले.

पाण्याचे हौद व सत्याग्रह

पूर्वी अंबाबाई मंदिराच्या आवारात गरुड मंडपाच्या दक्षिणेस व उत्तरेस पाण्याचे दोन मोठे हौद होते. हे हौद ब्राह्मण गृहस्थाने बांधले होते. त्यापैकी एक हौद फक्त ब्राह्मण समाजासाठी राखीव होता. देवीच्या पूजेअर्चेसाठी व ब्राह्मणांसाठी या पाण्याचा वापर केला जाई. ब्राह्मणेतरांना या हौदास स्पर्श करण्याची परवानगी नव्हती.

“ब्राह्मणेतर पाण्यास स्पर्श करील, तर तो गुन्हेगार समजून शासन करण्यात येईल,” असा जाहीरनामाही इथे लावला गेला.

बहुजन समाजात याची तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. “हौद ब्राह्मण गृहस्थाने बांधला असेल, तर तो सार्वजनिक ठिकाणी का बांधला? त्याची डागडुजी शासनातर्फे का? पाणी पुरवठा सरकारी योजनेतून का?” असे प्रश्न उपस्थित करून “हा जाहीरनामा तुम्हाला नीच ठरवून पाण्याला स्पर्श करू देत नसेल, तर उठा, कोल्हापूर सरकारकडे न्याय मागा,” असे आवाहन करणारी बातमी ‘गरिबांचा कैवारी’मध्ये देण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळातली ही घटना आहे.

त्यावेळी कोल्हापूर दरबारच्या पोलीस खात्यात जोग, जमादार आणि म्हैसकर फौजदार हे वर्णाश्रम धर्माचे कट्टर पुरस्कर्ते अधिकारी होते. त्यांनी हौदावर रक्षणासाठी पोलीस ठेवले आणि जमादार दिवसातून सात वेळा चौकशीसाठी भेट देऊ लागले.

हा अपमान धुऊन काढण्यासाठी दासरामांनी अगोदर जाहीर करून सर्वांसमक्ष या हौदावर आंघोळ केली. म्हैसकर फौजदाराने त्यांना तात्काळ अटक केली. दोनशे रुपयांचा जामीन घेतला. कोर्टात मात्र त्यांची सुटका झाली.

दासरामांच्या धाडसामुळे हौद सर्वांना खुला झाला, सर्वांना म्हणजे ब्राह्मणेतरांना-दलितांना सोडून!

महाप्रसादात वर्णाश्रम

त्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी अंबाबाईच्या मंदिरात महाप्रसाद म्हणून पटांगणातच जेवणाच्या पंगती उठत. अर्थात, पहिली पंगत ब्राह्मणांची, दुसरी ब्राह्मणेतरांची आणि तिसरी मागासवर्गीयांची!

दासरामांनी एकदा शेकडो मागासवर्गीयांना एकत्र आणून पहिल्या पंक्तीचा ताबा घेतला. त्यामुळे पुढे जेवणावळी बंद पडल्या व लाडू वाटप सुरू झाले.

आता देवस्थान समिती आणि महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्या माध्यमातून भेदभावविरहित महाप्रसादाची पद्धत सुरू आहे.

अलिकडे प्रसादविक्रीसाठी लाडू करण्याचा ठेका देण्यावरून वादंग माजले. राजकारणी समाजामधील चालीरीतींचा वापर खुबीने करून घेतात, याचा प्रत्यय आला. त्यांनी ठेका काढून घेण्यासाठी महिला अपवित्र हे जुनेच नाणे चालविले. पण उपयोग झाला नाही. आता महिला कैदी लाडूंचा उत्तम प्रसाद तयार करतात. त्यालाही भोंदू बचाव समितीने विरोध केला. पण प्रशासन ठाम राहिले.

स्वच्छता व स्वच्छतागृहे

गारेच्या गणपतीच्या पलिकडे देवस्थान व्यवस्थापन समितीचे ऑफीस दोन ओवर्‍यांमध्ये आहे. पुढच्या ओवर्‍यांत काही देव असून उत्तरेच्या बाजूस तटबंदीजवळ इमारती उभ्या आहेत. त्याला लागून पूर्वी मनकर्णिका कुंड होते. देवालयाच्या मूळ रचनेत स्वच्छतागृहांची सोय नाही. मनकर्णिका तीर्थ मुजवून त्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली. दर्शनरांगेत उभा असणार्‍या महिला फारच कुचंबणा झाल्यावर स्वच्छतागृहाकडे वळत, पण इथे आल्यावर याचा दर पाच रुपये असल्याचे कळल्यावर पर्स आणण्यासाठी पुन्हा परत वळत, अशी तक्रार भाविक करत.

मनकर्णिका कुंडावर स्वच्छतागृहे बांधल्यामुळे भाविकांची सोय झाली, तरी भक्तांच्या भावना दुखावल्या. त्यांनी आंदोलन केले. आता स्वच्छतागृहे बंद करून तिथे आपत्कालीन औषधोपचार केंद्र उभे केले आहे. नुकतेच दक्षिण दरवाजाकडे येणार्‍या रस्त्यावर इंदूमती गर्ल्स हायस्कूलच्या भिंतीस लागून नवीन स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. बारीत असताना कुचंबणा होऊ नये, अशी सोय पंढरपूरमध्ये आहे, तशी सोय कोल्हापुरात व्हावी, अशीही एक मागणी भाविक करतात.

अंबाबाईचा परिसर नेहमी स्वच्छ असतो. त्यासाठी ठेकेदार असून सफाई कामगारांची संख्या आणि तत्परता यांचा बरोबर मेळ बसलेला आहे. मंदिराच्या गाभार्‍याची स्वच्छता वर्षातून एकदा एकादशीला करण्याची प्रथा आहे. नवरात्रौत्सवापूर्वी अंबाबाईच्या मूळ मूर्तीला ‘इरलं’ पांघरून स्वच्छतेचे काम केले जाते.

शेतात काम करताना शेतकरी पावसापासून संरक्षण करण्यासाठी ‘इरलं’ वापरतात. ते बांबूच्या कामठ्या आणि पानांपासून बनवलेले असते. दरम्यान, भाविकांच्या दर्शनासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येते.

देवळात शाळा की शाळेत देऊळ?

दक्षिण दरवाजाला लागून विद्यापीठ हायस्कूलची भव्य इमारत उभी आहे. हायस्कूल आणि देऊळ यामध्ये पूर्वपश्चिम भिंत आहे. 1917 पूर्वी इथे राजर्षी शाहूंच्या आजी सकवारबाईंची थट्टी आणि वासुदेव तोफखाने यांचा वाडा होता. तोफखाने थिऑसॉफिस्ट! त्यांना अड्यार आश्रम सांभाळण्याचे अ‍ॅनि बेझंट यांचे निमंत्रण आले. ती तार राजर्षी शाहूंच्या हाती लागली. महाराजांनी तोफखाने यांना आपल्या संस्थानातच काम करण्याचे आवाहन केले. त्यासाठी आर्थिक मदत, वाडा, विस्तीर्ण माळ, मार्गदर्शन आणि प्रेरणाही दिली.

सकवारबाईंची थट्टी शाळेला रिकामी करून देण्यासाठी कैदी आणले होते आणि अंबाबाई देवळाच्या भिंतीला टेकून महाराज स्वत: जातीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे होते, अशी नोंद आहे.

तोफखाने मास्तरनी आपल्या वाड्यात शाळा सुरू केली होती. त्यांनी शाळेसाठी अर्धा वाडा दिला. राजर्षी शाहूंच्या निधनानंतर शाळेला झालेल्या कर्जाच्या बदल्यात उरलेला अर्धा वाडा शाळेला देऊन त्यांना बाहेर पडावे लागले हा भाग वेगळा. पुढे दीक्षित गुरुजींनी कार्य सुरू ठेवले.

शाहू महाराजांच्या विचाराने चाललेल्या या शाळेत सुरुवातीपासून सहभोजने चालत; शाळेला कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण अशा मान्यवरांनी भेटी दिल्या असून एकेकाळी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

शक्तीचे पीठ आणि विद्येचे पीठ इथे शेजारी-शेजारी सुमारे शंभर वर्षे नांदले. पण समाजाला आता विद्येपेक्षा भक्तीची गरज जास्त सरस्वतीपेक्षा लक्ष्मीची आराधना महत्त्वाची वाटू लागली. महालक्ष्मी देवस्थान विकास आराखड्यात शाळा हटवून तिथे भक्तांची सोय करण्याचे नियोजन झाले आहे, अशी चर्चा अनेक वर्षे आहे.

जगभरामध्ये लोक देवधर्माच्या गुंत्यातून बाहेर पडून विद्येच्या मागे लागले आहेत. खेड्यापाड्यातही शाळांची सोय देवळाच्या इमारतीत सहज केली जाते. पण कोल्हापुरात उलटेच घडत आहे.

विशेष म्हणजे शाळा वाचली पाहिजे, असे विचारही कोणी बोलून दाखवत नाहीत. या इमारतीत पाचवीपासून बारावीपर्यंत व पुढे इंग्लिश मीडियमचे पदवीपर्यंत वर्ग भरतात. सकाळी सातपासून सायंकाळी सातपर्यंत अव्याहत ज्ञानार्जन सुरू असते.

देवाचा त्रास

देवळातील गोंगाट, माईक, नगारा आणि घंटेचा त्रास विद्यार्थ्यांच्या सवयीचा बनला आहे. त्यामुळे काही वर्गातील विद्यार्थ्यांना जोरात बोलण्याची सवय लागते. बोर्डाच्या किंवा विद्यापीठाच्या परीक्षा असतानाही शांततेचे आवाहन कोणी करत नाही.

एका वर्षी परीक्षेच्या काळात माईक बंद करा म्हणून आम्ही काही शिक्षक देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात गेलो. त्यांची विचारले, ‘तुमची शाळा किती वर्षेसुरू आहे?’ आम्ही म्हटले, ‘1917 सालापासून!’ त्यावर त्यांचा सवाल होता – ‘मग इतकी वर्षे कोणाला त्रास झाला नाही आणि आताच होतोय काय?’

एका हजरजबाबीने उत्तर दिले – ‘इतकी वर्षे त्रास झाला; पण देवीच्या भीतीने कोण बोलत नव्हते, आता सांगायला आलोय.’ तेव्हा व्यवस्थापकांनी शिपाई बरोबर दिला. आम्ही माईक सुरू असलेल्या ठिकाणी गेलो, तर गरूड मंडपामध्ये एका छोट्या पाटावर ठेवलेल्या मूर्तीवर एक जोडपे पाने, फुले, अक्षता वाहत होते आणि दोघांना ऐकू जावे म्हणून भटजी मंत्र सांगत होता. आम्हाला पाहताच, त्याने ‘सर तुम्ही आलाय होय,’ म्हणत माईक सेवा बंद केली.

लोक भिडेस्तव बोलत नाहीत आणि विनाकारण त्रास सहन करत बसतात, ते असे!

आता ही शाळा विस्थापित होत आहे; पण कोणी बोलत नाही. राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली काढलेला शिक्षणाचा जाहीरनामा करवीर गॅझेटमध्ये पाहायला मिळतो- त्यामध्ये महाराज म्हणतात, “येत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाख्यातील सर्व शाळांत मोफत व सक्तीचे शिक्षण अमलात आणण्याचा उपक्रम सुरू ठेवण्याचा आहे. त्यासाठी पाचशे वस्तीवरील गावांत ताबडतोब शाळा सुरू कराव्यात, त्यासाठी शक्यतर सोयीस्कर इमारती पाहाव्यात. नसल्यास चावडी, देवळे, धर्मशाळा यांचा वापर करावा. देवस्थानासाठी उभारलेल्या निधीतून नित्यनैमित्यिक खर्च वजा जाता, शाळांस मदत व गावोगावी कामे म्हणजे पाण्याची सोय, धर्मशाळा बांधणे वगैरे कामामुळे खर्च करता येईल, अशी सोय लावून देण्यात यावी.” विकास आराखडा करताना महाराजांचे विचार शाळेत देऊळ आणण्यापूर्वी ध्यानात घ्यावेत.

शाहूंच्या जागेत शाहूंना विरोध

अंबाबाईच्या देवळात काही धार्मिक उत्सवप्रसंगी धार्मिक पुस्तकांचे स्टॉल लागतात. “दुर्जनांच्या नाशासाठी आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी” कटिबद्ध झालेल्या एका सनातनी विचारांच्या धर्मांध संघटनेनेही इथे स्टॉल लावला होता. सतत अल्पसंख्याकांच्या आणि पुरोगाम्यांच्या नावाने गरळ ओकणार्‍या त्यांच्या अंकाची भीड चेपली होती. तेव्हा त्यांनी “महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने – फुले-शाहू-आंबेडकर, सावित्रीबाई आणि अण्णा भाऊंची पुस्तके छापू नयेत” असे पत्रक प्रसिद्ध केले.

त्यांचा स्टॉल नेमका शाहू ट्रस्टच्या जागेत होता. ट्रस्टच्या निदर्शनास ही बाब आल्याबरोबर त्यांनी धर्मांध संघटनेच्या स्टॉलला बाहेरचा रस्ता दाखवला. देवळाच्या आवारातील पूर्व व उत्तर दरवाजामधला रामाचा पार व त्याच्या शेजारील देऊळ शाहू ट्रस्टच्या मालकीचे आहे.

देवस्थान व्यवस्थापन समितीनेही धार्मिकांना जागा देताना धर्मांधांना दूर ठेवण्यासाठी चिकित्सक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

देवीचे वार्षिक उत्सव

वर्षभर देवळामध्ये विविध उत्सव सुरू असतात. आश्विन महिना सर्वांत महत्त्वाचा-नवरात्रात आरती, पालखी, गोंधळ, सप्तशती पाठ, होमहवन असे नऊ दिवस यात्रेचे स्वरूप असते. पंचमीच्या दिवशी देवी पालखीत बसून त्र्यंबुली देवीच्या भेटीस जाते, तर अष्टमीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा करते. दशमीच्या दिवशी पालखीतून दसरा चौकात येते आणि सीमोल्लंघन-शमीपूजनात भाग घेते.

दीपावलीमध्ये मंदिर पहाटे तीन वाजताच उघडते. देवीचे अभ्यंगस्नान आणि दीपोत्सव साजरा होतो. पहाटे पाच व दुपारी बारा वाजता देवीला हजारो लिटर दुधाने स्नान घातले जाते. भक्त केशरी दूध घेऊन येतात, अशी माहिती महालक्ष्मी दर्शन पुस्तिकेत नंदकुमार मराठे यांनी दिली आहे.

भक्तीच्या कलशात शक्तीची फुंकर!

नवरात्रात आश्विन शुद्ध अष्टमीला जागर सोहळा होतो. मातीच्या वा तांब्याच्या घागरीमध्ये कुंकू घालून फुंकर घालत सायंकाळी सात ते रात्री बारापर्यंत जागर संपन्न केला जातो.

मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महालक्ष्मी मंदिरातील महाकाली मंदिरासमोर नवचंडी यज्ञ आणि हवन होते. पहाटे तोफेचा निनाद होऊन अष्टमी जागर सोहळ्याची पूर्णाहुती करून सांगता केली जाते.

जागराच्या निमित्ताने महिला भक्तीच्या कलशात शक्तीची फुंकर घालतात. सकाळी अन्नपूर्णादेवीची पूजा, षोडशोपचार करून, सोळा गाठींचा दोरा महिला डाव्या हातात बांधतात. दुसर्‍या दिवशी त्याचे विसर्जन करतात. अष्टमीला सूर्यास्तानंतर तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याची सुबक मूर्ती बनवितात. त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करून देवीसमोर कलशामध्ये शक्तीची फुंकर घालतात. काही महिलांच्या अंगात देवीचा संचार होतो.

देवीच्या संचारासंबंधी कुमार मंडपे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी अंगात येण्याचा खुलासा केला. देव अंगात येण्याचे खूप प्रकार दिसतात. विशिष्ट लयीत वाद्ये वाजू लागली की, भाविक नाचू लागतात. याप्रकारे पीर, यल्लम्मा, साती आसरा अंगात येतात.

गौरी-गणपतीच्या काळात स्त्रिया गाणी म्हणत खेळतात. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या अंगात येते. हे सर्व अंगात येणे खरे असते. म्हणजे घुमणारे महिला-पुरुष प्रामाणिक असतात. ते खरोखरच गुंग झालेले असतात. नवरात्रात घागर फुंकणार्‍या महिला घुमू लागतात, त्याही प्रामाणिक असतात. फरक एवढाच की, घागर फुंकताना त्यांच्या नाकात त्यांनीच घागरीत सोडलेला उच्छ्वास परत जातो. त्यातून शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. मेंदू बधीर होतो आणि स्वयंसूचनेनुसार अंगात लवकर येते.

पण या सर्व खरोखर अंगात येण्यामध्ये देव किंवा देवीचा काही संबंध असत नाही. एखादे गाणे ऐकताना, भाषण ऐकताना एकाग्रता निर्माण होते, बाजूचे आवाज ऐकू येत नाहीत. त्या एकाग्रतेची पुढची अवस्था म्हणजे अंगात येणे. त्याचा देवाशी काही संबंध नाही.

दर अमावस्या-पौर्णिमेला, शुक्रवार, मंगळवार इत्यादी दर आठवड्यात ठरवून अंगात येणारे बर्‍याच वेळा ‘ढोंग’ करत असतात. त्यांच्या अंगात ‘खरे’ आलेले असत नाही. पण कोणत्याही प्रकारे अंगात आले, तरी त्यांना दैवीशक्ती प्राप्त झालेली नसते, ते प्रश्नांची उत्तरे अंदाजाने देत असतात. त्यांना पुढे काय घडेल ते विचारण्यापेक्षा तिसरीच्या मुलाला येणारा एकोणीसचा पाढा म्हणा म्हटले, तरी त्यांना उत्तर देता येणार नाही.

घागर फुंकण्याचा खेळ मर्यादित महिलांमध्ये चालतो.

किरणोत्सव

अंबाबाईच्या देवळामधील किरणोत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होतात. आपण घर बांधले. त्याला एक झरोका किंवा खिडकी ठेवली. कोल्हापूर भागामधील घर असेल आणि झरोका किंवा खिडकी पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला नैऋत्येला किंवा आग्नेय दिशेस असेल, तर त्या झरोका वा खिडकीतून घरामध्ये सूर्यकिरण येतील. ते समोरच्या भिंतीवर लावलेल्या फोटोवर पडतील. घराच्या रचनेनुसार सूर्यकिरण रोज फोटोवर पडतील-वर्षातील फक्त एक महिनाभर पडतील अथवा वर्षातून एकच दिवस पडतील. ही घटना दरवर्षी घडेल.

अंबाबाईचे मंदिर बांधताना अशाच ज्ञानाचा उपयोग केला आहे. आकाशातील सूर्याचे भ्रमण दक्षिणेकडून उत्तरेकडे होताना त्याला उत्तरायण म्हणतात; तर भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होताना त्याला दक्षिणायन म्हणतात. अंबाबाई मंदिरामध्ये दक्षिणायन नोव्हेंबरमध्ये 9, 10 व 11 तारखेस सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात. हीच घटना उत्तरायणात 31 जानेवारी, 1 फेबु्रवारी व 2 फेबु्रवारी या तारखेस घडते. या दोन उत्सवात 80 दिवसांचे अंतर असते. यावेळी सूर्य तुळेच्या 22 अंशात असतो.

मूर्तीवर किरण पडण्यासाठी ते महाद्वारातून, गरूड मंडप, दर्शन मंडप, मंदिराचा आतील लहान भाग, गाभारा असे सुमारे 300 फुटांचे अंतर सरळ रेषेत कापून यावे लागतात. सूर्य मावळत असताना साधारणपणे सूर्यास्ताला एक मिनिट कमी असताना सूर्यकिरण मूर्तीवर प्रवेश करतात. पहिल्या दिवशी पायावर, दुसर्‍या दिवशी मध्यावर आणि तिसर्‍या दिवशी ते मस्तकावर पडतात. यावेळी मंदिरातील दिवे मालवलेले असतात. देवीची अलंकाराने पूजा बांधलेली असते.

सूर्यकिरण प्रवेश करण्यास अडथळा होऊ नये, अशा बेताने आडवे येणार्‍या इमारतीच्या बांधकामास नियंत्रित केले जाते. महापालिका त्यासाठी योग्य ती खबरदारी घेते. या घटनेला खगोलशास्त्राच्या दृष्टीने, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व आहेच. पण त्यापेक्षा धार्मिकदृष्ट्या महत्त्व जास्त आहे आणि आर्थिकदृष्ट्या तर फारच! कारण अशाच प्रसंगी दक्षिणा वाढते.

महालक्ष्मी की अंबाबाई?

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत अंबाबाई या नावाने प्रसिद्ध असणारी देवी आज महालक्ष्मी नाव धारण करताना दिसते. पूर्वी कोल्हापूरमधील शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षक ‘भाषांतर शब्दश: करायचे नसते,’ हे सांगताना एक उदाहरण देत. एका विद्यार्थ्याने केलेले भाषांतर सांगत –

“Fox foods Mango lady you me bread.”

मुलांना अर्थ कळत नसल्याने आपणच मूळ वाक्य सांगत – “कोल्हापूरचे अंबाबाई तू मला पाव.” तरीही मुलांना फारसे कळत नसे; हा भाग वेगळा!

कोल्हापूरच्या लोकजीवनाशी अशी अंबाबाई एकरूप झालेली होती. आज अंबाबाई हे नाव लुप्त होत आहे. सर्वत्र ‘महालक्ष्मी’चा प्रचार दिसतो. कोल्हापूरमधील रस्त्यावरील माहिती फलकावर, दिशादर्शक फलकावर, प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत ‘महालक्ष्मी’ शब्दाचा वापर सार्वत्रिक झाला आहे.

श्री महालक्ष्मी धर्मशाळा, श्री महालक्ष्मी अन्नछत्र, श्री महालक्ष्मी कॅलेंडर, श्री महालक्ष्मी मंदिराकडे, असे फलक जागोजागी दिसतात.

नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी लक्ष घालून श्री तिरुपती बालाजीकडून महालक्ष्मीसाठी शालू पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोकराव साळोखे होते.

महालक्ष्मी ही तिरुपतीची बालाजीची पत्नी असून ती रुसून कोल्हापुरात येऊन बसली आहे, अशी कथा या शालूमागे सांगण्यात आली. शालू आजतागायत येतो आहे; पण आता संदर्भ बदलण्यात आला. शालूचा दरवर्षी लिलाव होतो. यावर्षी शालूचा लिलाव पाच लाख पाच हजार रुपयांना पुण्याचे बांधकाम व्यावसायिक सुभाष येमुल यांनी घेतला.

तिरुपती आणि अंबाबाईचे नाते पूर्ववत करण्याचे कारण झाले ही महालक्ष्मी की अंबाबाई हा वाद!

धार्मिक पुस्तकातील संदर्भ

अंबाबाईसंबंधीची माहिती कुठे मिळेल म्हटल्यावर विक्रेते भाविकांना दोन-तीन पुस्तके दाखवितात.

‘श्री महालक्ष्मी दर्शन’ या मीनल प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या नंदकुमार मराठे लिखीत पुस्तकामध्ये अंबाबाई देवी, देऊळ, कोल्हापूर यांचा सारांशरुपाने इतिहास दिला आहे. जुन्या व नव्या काळातील उत्सव, मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम, विविध प्रकारच्या पूजा, यांच्याबरोबर कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळांचीही माहिती दिली आहे. अंबाबाई देवळाचा गाईड म्हणून या पुस्तकाची उपयुक्तता आहे.

विजय ऊर्फ तात्या शेंडे लिखीत ‘दक्षिणकाशी श्री करवीर कथासार’ हे पुस्तक सरस्वती बुक डिस्ट्रीब्युटर्स, पुणे यांनी तीस वर्षांपूर्वी प्रकाशित केले आहे. त्यात ते म्हणतात-

“या स्थळी श्री विष्णू-लक्ष्मी, महालक्ष्मी, अंबाबाबाईच्या रुपे येथे साकारली. मानव जन्म सार्थक होऊन अखंड मोक्षप्राप्ती होते.”

सर्व पुराणांप्रमाणे यामध्ये ब्राह्मणकथांची रेलचेल आहे. कोलासुराला पुत्रशोक झाला, तेव्हा मुक्तीचा मार्ग सांगताना मुनी म्हणाले, “राजा तू पूर्वजन्मी ब्राह्मणांचा वध करून त्यांचे धन लुबाडलेस, आता तू त्यांचे घेतलेले द्रव्य दान करून उत्तरक्रिया केलीस, तर मुक्त होशील.”

या वर्षभरात दीपक भागवत ऊर्फ भागवतशास्त्री यांनी लिहिलेले ‘श्री करवीर महात्म्य कथासार’ मीनल प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. त्याचा आकार दुप्पट करताना त्यांनी सध्याच्या राज्यकर्त्यांचे विचार देवीच्या तोंडून वदवले आहेत. 80 व्या अध्यायात पराशरमुनींना देवी वदती झाली- “हे पराशरमुने जे देव, ब्राह्मण, धर्म, वेद यांचा द्वेष करतात, जे परनिंदा करतात, स्वकीयांची निंदा करतात, अशांना मी या क्षेत्रात राहू देत नाही.”

11 व्या अध्यायात लोपामुद्रेत अगस्तीमुनी सांगतात – “कांते मी (पराशरमुनी) ही तपश्चर्या लोकांच्या कल्याणाकरिता करत आहे. या कलियुगात वेदांचा अर्थ, त्यातील ज्ञान-विज्ञान लोकांपर्यंत जावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी श्रीहरीने ब्राह्मणांच्या पोटी अवतार घ्यावा. याकरिता मी तपाचरण आरंभिले आहे.”

वेदामधले ज्ञान विज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य सध्याचे राज्यकर्तेकरत आहेतच. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी “हत्तीचे डोके माणसाच्या धडावर चिकटविण्याची कला भारतात पूर्वी होती,” याची माहिती विज्ञान परिषदेत सांगितली. पण श्री हरीने ब्राह्मणांच्या पोटी अवतार घेतला नाही, ही उणीव राहिली आहे.

याच अध्यायात भर घालताना पराशर म्हणाले, “भक्तीहीन, सहपातकी, संशयी मनाचा, नास्तिक, सहेतुक या अशा प्रकारच्या व्यक्तींना या तीर्थक्षेत्रात यात्रेची फलप्राप्ती होत नाही.”

अश्वमेध तीर्थ या 21 व्या अध्यायातही वरील अर्थाची भर घातली आहे.

नोटा दुप्पट

नोटा दुप्पट करून देणार्‍यांच्या बातम्या अधूनमधून कानावर पडतात. या पुस्तकातून पुण्यफल. अनेक पटीने मिळण्याचे मार्ग नोंदवले आहेत. 35 व्या अध्यायात म्हटले आहे – नित्यदानापेक्षा अमावस्येस दिलेले दान शतपटीने, क्षयतीर्थास सहस्त्रपटीने, विषुवी लक्षपटीने, व्यतिपाती अनंत पटीने फलदायी होते.

अन्न, गायी, वस्त्र, जमीन, असा दानधर्म व्यतिपात योगावर केला, तर कृत पापांचा विनाश होतो. माणूस रोगमुक्त होतो. क्रांतिसाम्य काल हा सूर्यपर्वाप्रमाणे असतो. त्यासमयी दानधर्म, होमहवन केल्यास कोटी प्रमाणात फलप्राप्ती होते.

पुण्यप्राप्तीसाठी स्नान कुठे-कुठे करावे, हे 35 व्या अध्यायात सांगितले आहे.’…. ‘चैत्र मासात मयुरी संगमात, वैशाख मासात दशाश्वमेघात… आश्विन मासात रंकतीर्थात, मार्गशीर्ष मासात जयंती गोमती संगमात… माणसाने स्नान करावे. त्यास पुण्यफलाची प्राप्ती होते. यापैकी काहीही जमले नाही, तर पवित्र अशा पंचगंगेत नित्य स्नान करावे, त्यामुळे सर्व फलांची प्राप्ती होईल.’

पुस्तकात म्हटल्याप्रमाणे फलांची प्राप्ती किती होईल ठाऊक नाही. पण रोगाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. पंचगंगा आणि रंकतीर्थ म्हणजे रंकाळा तलावामध्ये होणार्‍या गटारांच्या किंवा कारखान्यांच्या प्रदूषणामुळे नेहमी केंदाळाचा-पाणवनस्पतीचा प्रश्न आ वासून उभा असतो. मासे मरून वर तरंगतात. जयंती-गोमतीमधून वर्षभर गटारे वाहतात. ती अडविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात.

मनुस्मृतीचे विचार

बाबासाहेबांनी नव्वद वर्षांपूर्वी मनुस्मृतीचे दहन केले. पण मनुस्मृतीतील कुविचार पुराणकथा व धार्मिक कथांमधून पाझरत असतात. ‘करवीर महात्म्य’ ही त्याला अपवाद नाही. 40 व्या अध्यायात महिलांबाबत विचार मांडले आहेत.

नारदमुनींनी श्रीकृष्णाची अवतारकार्याबद्दल स्तुती केली आणि त्यास सांबाने आपला अपमान कसा केला, तेही कथन केले. ते म्हणाले, “योगेश्वरा, तुझा पुत्र सांब खचितच सुंदर आहे; पण मी तुला कर्तव्यभावनेने सांगतो, कामभावनेने स्त्रिया आपले चारित्र्य, आपले कुल यांचा विचार करत नाहीत. कामासक्त होऊन सुंदर रुपाकडे आकर्षित होतात. अष्टनायिकांचा अपवाद सोडल्यास तुझ्या इतर सर्व स्त्रिया अत्यंत रूपवान अशा सांबावर आसक्त झाल्या आहेत.” नारदमुनींचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला धक्का बसला.

पुढे या कथेत श्रीकृष्ण सांबाला शाप देतो – “माझ्या अंत:पुरात येऊन माझ्या एकांतवासात व्यत्यय आणलास, तुला कुष्ठरोग होईल.”

श्रीकृष्णाच्या स्त्रिया म्हणजे सांबाच्या माता आहेत. सांबाचे विलक्षण रूपसौंदर्य बघून श्रीकृष्णाच्या अष्टनायिका सोडून इतर सर्व स्त्रिया कामासक्त झाल्या, असा उल्लेख ‘पुराण’कार, ‘करवीर महात्म्य’कर्ते आणि शास्त्रीबुवा बिनदिक्कत करतात. स्त्रियांसंबंधीचा हा विकृत दृष्टिकोन धार्मिक कथांमधून सतत पाझरत असताना केवळ मोर्चे काढून बलात्कार आणि खून थांबतील का, याचा विचार वाचकांनी करण्याची गरज आहे.

41 व्या अध्यायात वरील घाणेरड्या पापाचे क्षालन करण्याचा उपाय – “या पवित्रक्षेत्री (करवीरनगरीत) स्नान, जप-तप, तर्पण, दानधर्म इत्यादी कर्मे करावीत, त्यायोगे पाप आणि महापाप कर्मांचा विनाश होतो,” असा उपाय सांगितला आहे. 43 व्या अध्यायात गणिकाख्यान सांगितले असून गणिकेने पुत्राबरोबर संग केला आणि पापक्षालनार्थ करवीर क्षेत्री येऊन दोघेही पावन झाल्याची कथा आहे. विशेष म्हणजे या कथेतील पाप करणारे ब्राह्मण नसून वाणी आहेत. स्त्रीसंबंधी घाणेरडा दृष्टिकोन मनुस्मृतीमधून घेतला आहे. मनुस्मृतीच्या दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, नवव्या अध्यायात असे श्लोक आढळतात.

ब्राह्मणांना दान द्या

49 व्या अध्यायात निषादाने पशूपक्षी, गायी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची हत्या केल्याने त्याच्या मस्तकावर शिंग उगविल्याचा; पण ब्राह्मणाचा आदर सत्कार केल्याने राजेपद मिळाल्याची कथा आहे. त्यासाठी निषादाने ब्राह्मणाला – नारळादी उपहाराचे पदार्थ खायला दिले… विश्रांतीसाठी मंचकावर बसविले आणि त्याने व पत्नीने ब्राह्मणाची सेवा केली आहे. पुढे तीर्थयात्रा करून ब्राह्मणभोजने घातली आणि देह गंगार्पण केला.

63 व्या अध्यायात नारदमुनी कपिलाषष्ठीचे व्रत सांगताहेत – “भाद्रपद महिना, कृष्णपक्ष, षष्ठी तिथी, रोहिणी नक्षत्र, .. इत्यादी दहा योग एकत्र येतात, तेव्हा कपिलाषष्ठी येते. यावेळी ‘विष्णुमूर्तीयुक्त सूर्यमंडळ स्थापावे, ध्यान करावे, होमहवन करावे, सुवर्णाची सवत्स धेनू करावी व ब्राह्मणांना दान द्यावे. कपिष्ठाधेनूचेही दान करावे. यामुळे अश्वमेध यज्ञाच्या आठपटीने फलप्राप्ती होते.

ब्राह्मणांना दान द्या, दक्षिणा द्या, पूजा घाला, सोन्याची गाय-वासरासह द्या – म्हणजे पापमुक्त व्हाल. या आवाहनानंतर पुस्तकाच्या शेवटी विविध स्तोत्रे दिली आहेत. त्यातील शब्द विष्णुपत्नी अर्थाने आले आहेत.

मूळ स्त्रोत

या पुस्तकांचा मूळ स्रोत आहे, ‘करवीर महात्म्य’ हा ग्रंथ. हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. त्याचा मराठी ओवीबद्ध अनुवाद ‘दाजीबा जोशीराव’ यांनी केला आहे. सन 1823 ते 1850 या काळात दाजीबा जोशीरावांनी एकूण लहान-मोठे 25 मराठी ग्रंथ रचले. त्यातील एक ‘करवीर महात्म्य’ हा ग्रंथ 1850 साली रचला आहे. त्यामध्ये 72 अध्यायामध्ये आठ हजार ओवीसंख्या आहे. ‘पद्म पुराणान्तर्गत श्री करवीर महालयम्’ या संस्कृत स्थलपुराणाचा हा समाध्यायी मराठी अवतार आहे.

थोर संशोधक रा. चिं. ढेरे म्हणतात, “हा संग्रह बर्‍याच प्रमाणात ‘शाकंभरी महात्म्यम्’ या स्थलपुराणाशी साम्य राखणारा आहे. किंबहुना दोन्हींचा कर्ता एकच असण्याची ही शक्यता आहे. निदान दोन्ही ग्रंथांचे कर्तेपरस्परांशी संबंधित असतील.”

स्थलपुराण

करवीर महात्म्य हे ‘स्थलपुराण’ आहे. स्थलपुराणाचा उद्देश स्थळाचे महात्म्य वाढविणे, प्रसिद्धी करणे, प्रचार करणे, भाविकांना आकर्षित करणे, हा असतो.

त्या दृष्टीने विचार करता करवीर महात्म्य हे स्थलपुराण त्याच्या कामात पुरेसे यशस्वी झाले आहे. त्यावरून अलिकडे काढलेली पुस्तकेही इमाने इतबारे उद्देश सफल करत आहेत. समाजामध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रचलित विष्णू, शिव, पार्वती, ब्रह्मा आणि लक्ष्मी, श्रीकृष्ण इत्यादी देवदेवता आणि अगस्ति, लोपामुद्रा, नारद, पराशर इत्यादी ऋषी यांच्या जीवनातील प्रसंग कोल्हापूरशी जोडून कथा रचल्या आहेत. तिरुपती बालाजीशी सोयरीक जुुळविणे अधिक फायद्याचे आहे, असा अंदाज आल्यावर अलिकडे तसाही प्रयत्न झाल्याचे दिसते. स्थलपुराणामधून अशा बाबी बाजूला काढता आल्या, तर काही प्रमाणात इतिहास हाताशी लागू शकतो. डॉ. गणेश वासुदेव तगारे यांनी करवीर महात्म्याचा काळ इ.स. 1300 ते 1350 ठरवला आहे.

रा. चिं. ढेरे यांचा ग्रंथ

रा. चि. ढेरे यांचा अंबाबाई संबंधीही ‘करवीर निवासिनी महालक्ष्मी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

ते म्हणतात – ‘हे क्षेत्र शैव आहे की, वैष्णव आहे, इथला आदिशक्तीचा लीला सहचर, शिव आहे की, विष्णू आहे, याविषयी भक्त भाविकांची आणि अभ्यासकांची मते भिन्न-भिन्न आहेत!

शक्तिपीठ

करवीर शक्तीपीठासंबंधी सर्वमान्य कथा वरील ग्रंथात व्यवस्थित नोंदवली आहे. ती पुढीलप्रमाणे –

“पार्वती ही दक्षकन्या आहे. पार्वतीने शिवाशी केलेला प्रेमविवाह दक्षाला मान्य नसतो. दक्ष आपल्या राज्यात यज्ञ आरंभतो. पण यज्ञाचे निमंत्रण शिवाला देत नाही. हा शिवाचा अपमान पार्वतीला अधिक झोंबतो. ती यज्ञात उडी घेऊन देहत्याग करते. हे ऐकून शिव संतापतो. त्याच्या क्रोधातून निर्माण झालेला वीरभद्र दक्ष यज्ञाचा विध्वंस करतो. त्यानंतर शिव सतीचे शव हातावर घेऊन विषण्ण मन:स्थितीत भारत भ्रमण करतो. या भ्रमणात सतीचे अवयव ठिकठिकाणी गळत राहतात. करवीरस्थानी तीन नेत्र गळून पडतात. या स्थानी महाकाली-महासरस्वती-महालक्ष्मीचे रूपत्रयात्मक शक्तिपीठ तयार होते” (पान 5)

हुतात्मा मुतय्या

देवालयाची दुर्दशा करण्याचे काम विदेशी आक्रमकांचे असल्याचा समज सार्वत्रिक आहे. तथाकथित विचारवंत आपल्या वाणीतून त्याला खतपाणी घालत असतात. रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथातही असे उल्लेख आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या बाबतीत असा पुरावा उपलब्ध नाही. उलट स्वकियांनीच देवालयावर हल्ला केल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीविलास राजवाड्यातील संग्रहालयातील एक अभिलिखित विरगळ आहे. लक्ष्मीविलास पॅलेस म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान! त्या विरगळावर म्हटले आहे की, “जेव्हा चोल राजाने महालक्ष्मी मंदिरावर आक्रमण करून मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुत्तय्या नामक वीराने त्या दुष्ट कृतीला विरोध करताना आपले प्राणही गमावले.”

यावेळी कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील प्रथम सोमेश्वर याचे अधिराज्य होते. त्याचा काळ इ.स.1043 ते 1068 आहे.

राजाधिराज चोलाने श्री महालक्ष्मीचे मंदिर फोडण्या-तोडण्याचा प्रयत्न केला नाही, तर ते जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यावेळचे मंदिर लाकडी असावे. (करवीरनिवासिनी महालक्ष्मी ग्रंथात पान नं. 15) रा. चिं. ढेरेंनी ही माहिती दिली आहे.)

ग्रंथातील प्रार्थना

ढेरे यांच्या ग्रंथात दिलेल्या प्रार्थना पाहता – त्या प्रार्थना शैव आणि वैष्णव पंथांच्या ऐक्यानंतरच्या असल्याचे दिसून येते. प्रार्थनाकर्त्यांच्या मनात पंथाबद्दलचा अट्टाहास नाही. त्यांनी कधी अंबेला शिवपत्नी म्हटले आहे, तर कधी विष्णुपत्नी! अज्ञानातून; पण भक्तिभावाने त्यांनी प्रार्थना लिहिलेल्या आहेत.

जैनधर्मीय दृष्टिकोन!

“दक्षिण महाराष्ट्रातील शिलाहार राजवट आणि जैनधर्म” हा ग्रंथ प्रा. बी. ए. चौगुले आणि प्रा. ए. एम. सुतार यांनी लिहिला आहे. शिलाहारांच्या सहा शाखा असल्याचे नमूद करून ते म्हणतात, “कोल्हापूर येथे शिलाहारांची एक मुख्य राजधानी होती. शिलाहारांचा काळ इ.स.940 ते 1260 असा आहे. शिलाहारापूर्वीच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची उभारणी झाली होती.

महालक्ष्मी मंदिराच्या जवळच्या परिसरात जैन मंदिरे उभारली होती, असे दिसते. महालक्ष्मी मंदिरास लागूनच निंबदेवाने आदिनाथाचे मंदिर बांधले होते. सदरच्या मंदिराची माहिती देणारा लेख महालक्ष्मीच्या आवारातील शेषशायी देवालयाच्या तुळ्यावर कोरला आहे.

शेषशायी देवालयाची रचना अर्धमंडप अथवा पडवी, सभामंडप व गर्भग्रह अशी असून आज गर्भगृहात शेषशायी भ. विष्णुमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. तुळ्यावर विशाल मंदिर, सुंदर मनस्तंभ आणि आवारातील धनिकांचे वाडे, गणिकांच्या हवेली, आदीवर्णन विलोभीय आहे; परंतु दुर्दैवाने आज त्यातील काही अस्तित्वात नाही. शिलाहारकालीन काही लेखांत पद्मावतीचा उल्लेख आहे. ही देवता जैन तीर्थंकर पार्श्वनाथांची शासनदेवता होय.

अनौपचारिक चर्चेत – “तिरुपती बालाजीचे मंदिर हे जैनधर्मीय पार्श्वनाथांचे असून, एका युद्धानंतरच्या तहात ते हिंदू राजाला दिले गेले आणि महालक्ष्मीचे मंदिर हे पद्मावतीचे असून शासनदेवता म्हणून तिला ‘शालू पाठविण्याचा’ संदर्भ योग्य आहे,” असे पण ऐकायला मिळाले. अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेस शंभर-दीडशे मीटरवर रंकभैरव ऊर्फ रंकोबाचे देवालय असून, या देवालयाच्या आवारात पूर्व आणि उत्तर द्वारांच्यामध्ये उघडणारी दोन जैनमंदिरे आहेत. त्यातील एक 1008 नेमिनाथ तीर्थंकर जिन मंदिर, तर दुसरे 1008 रत्नत्रय पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे.

‘महालक्ष्मीचे मंदिर हे जैन देवता पद्मावतीचे देऊळ आहे,’ या जैनअभ्यासकांच्या तर्कास लिखित पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही.

अ‍ॅड. रमेश कुलकर्णी

अखिल भारतीय अंबाबाई भक्त मंडळाच्या व्यासपीठावरून बोलताना अ‍ॅड. रमेश कुलकर्णी यांनी पुढील मुद्दे मांडले.

अंबाबाई आणि महालक्ष्मी ही दोन्ही नावे पार्वतीचीच आहेत. विष्णुपत्नीला लक्ष्मी म्हणतात- महालक्ष्मी नव्हे!

लक्ष्मीच्या हातातून सुवर्णमुद्रा पडताना दाखवतात, तर पार्वतीच्या हाती शस्त्र असते. कोणत्याही देवीच्या मागे ‘महा’ प्रत्यय लागला की, ती पार्वतीचे, आदिमायेचे, जगन्मातेचे रूप समजले जाते. उदाहरणार्थ – महाकाली, महादेवी, महामाया, महागेवई इत्यादी.

कोल्हापूरमध्ये पार्वती महिषासूर मर्दिनीच्या रुपामध्ये आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर अंबाबाईला महालक्ष्मी नाव दिले गेले, असा उल्लेख स्कंद पुराणात आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी पूर्वीचे राजे, महाराजे देव-देवी इत्यादींची चरित्रे एकत्र करून लिहिलेल्या ग्रंथात हा उल्लेख आहे. पार्वतीचे देऊळ कुठेच नाही. सर्वत्र तिच्या रुपाचे देऊळ असते. जवळच हलसवडे गावी लक्ष्मीचे देऊळ आहे. ती विष्णुपत्नी आहे; महालक्ष्मी नव्हे. तिच्या हातातून सुवर्ण मोहरा पडताना दाखविल्या असून दुसरा हात रिकामा आहे.

उत्खननात शिवाच्या पूर्वीची देवाची अवस्था सांगणारी मूर्ती सापडली आहे. त्या मूर्तीमध्ये एकशिंगी एडका आणि म्हशीची शिंगे असलेला माणूस बसलेला दिसतो. त्यातून शिवाची कल्पना विकसित झाली. म्हणजेच शिवाची कल्पना आर्यपूर्व आहे. पण शिवाचा उल्लेख वेदांमध्ये नाही.

महामाया, आदिशक्तीची कल्पना आईप्रमाणे आहे. तिने आपले संरक्षण करावे, ही अपेक्षा आहे. खेड्यातून अनेक देवींची पूजा सुरू झाली. त्यांच्या एकत्रिकरणातून आदिमायेची कल्पना निर्माण झाली.

‘नारायणी’ शब्दाबद्दल बोलताना ते म्हणतात, “नारायणी शब्दामधील ‘नर’ शब्द वेदांमध्ये नाही. दक्षिण भारतात सूचिता नावाचे शक्तिपीठ आहे. त्या पीठातील देवीचे नाव नारायणी आहे. नारायणी हेही पार्वतीचेच रूप आहे. ती नारायणाची बायको असा अर्थ नाही.

वैष्णव व शैव पंथांमध्ये संघर्ष झाले. पुढे समन्वय झाला. त्यातून विष्णू आणि महादेव, हरी आणि हर यांचे एकत्र मंदिर तयार करण्याचा प्रयत्न झाला.

शिवाच्या जवळ विष्णुमंदिरे उभी करण्यात आली. अंबाबाई आणि तिरुपतीचे नाते स्पष्ट करताना त्यांनी ऐतिहासिक पुरावा समोर ठेवला. “तिरुपतीची स्थापना इ.स. 826 मध्ये तिरुमल इथे झाली. नंतर इ.स.966 मध्ये डोंगरावर झाली. तर अंबाबाईची स्थापना इ. स. 550 मध्ये झाली.

इ.स. 800 साली मोठा भूकंप झाला. भूकंपामध्ये मंदिर खचले. त्या वेळच्या राजाने मंदिर पुन्हा बांधले व नवीन मूर्तीची स्थापना केली. मूळची मूर्ती त्यांनी महासरस्वतीच्या देवळाच्या दर्शनी भिंतीवर बसवली आहे. पायर्‍यांच्या वरून ती दिसते. माहीतगार भाविक मूळ अंबाबाईला नमस्कार करून देवळात जातात.”

“अंबाबाईचे मंदिर तिरुपतीच्या पूर्वी 300 वर्षेस्थापन झाले आहे. मग अंबाबाई तिरुपतीची पत्नी कशी? मूर्तीवर असंख्य पुरावे आहेत. त्यावरुनही ही मूर्ती अंबेची असल्याचे सिद्ध होते.”

ते म्हणतात, “लक्ष्मीचे एकटीचे मंदिर कुठेच नाही. तामिळनाडूमध्ये आता तसा प्रयत्न झाला आहे. सर्वत्र लक्ष्मीसोबत विष्णू असतो. लक्ष्मीनारायणाचे मंदिर असते.”

“त्याउलट पार्वती नावाने पार्वतीचे मंदिर कुठेही असत नाही. तिच्या रुपाच्या नावाने भारतभर मंदिरे आहेत. पार्वतीच्या रुपाची देवी एकटी असते.”

यावर आक्षेप घेताना तज्ज्ञांनी कोल्हापूरपासून तीन चार किलोमीटरवर असलेल्या वडणगे गावी पार्वतीचे मंदिर असल्याचे म्हटले आहे.

“शिवाची मंदिरे लिंगस्वरुपामध्ये असतात. शैव मंदिरामध्ये त्यांच्या परिवारातील सर्व देवतांच्या मूर्ती असतात.

“अंबाबाईच्या देवळातही महाकाली, महासरस्वती, गणपती, नंदी यांच्या मूर्ती असून आवाराच्या बाहेरच शेजारी कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.”

‘देवीची एकटीचीच मूर्ती केली जाते, तेव्हा ती चतुर्भुज असते. पंडित महादेवशास्त्री जोशींनी याची माहिती दिली आहे. कोणत्या देवीचे आसन कोणते असते, याचीही माहिती नोंदवलेली आहे. अंबाबाई सिंहारूढ आहे, तर लक्ष्मीचे वाहन कुळुक म्हणजे घुबड आहे. अशा सर्व पुराव्यावरून ही आदिमाया पार्वतीच्या रुपाची अंबाबाईच आहे, हे सिद्ध होते.’

पुराव्यानिशी ही मूर्ती पार्वतीच्या रुपाची, शिवपत्नीची आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी “आमच्या श्रद्धा लक्ष्मी आणि महालक्ष्मीवरही आहेत, त्या तशाच ठेवा,” असे आवाहन केले.

अ‍ॅड. रमेश कुलकर्णींचे जीवन अंबाबाई देवळाच्या परिसरातच गेले असून यापूर्वी त्यांनी शिक्षक, पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांच्या सहभागामुळे ही चळवळ हिंदूविरोधी नाही, हे स्पष्ट झाले. सत्य समजून घेणे, हाच चळवळीचा मुख्य उद्देश आहे, असे ओळख करून देताना प्रतिपादन केले गेले.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत

कोल्हापूरमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण वक्तव्याने ठसा उमटविणारे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वक्त्यांचा संदर्भ घेऊन ‘पार्वतीही कमळात नसते, याची आठवण करून दिली आणि नवरात्रातल्या अंबाबाईच्या पूजा अलिकडे कमळातच बांधल्या जातात,’ हे निदर्शनास आणले. ते म्हणतात, “यामागे मोठे अर्थशास्त्र आहे.” देवीच्या एकूण उत्पन्नापैकी 75 टक्के पुजार्‍यांच्या घशात जाते. त्याचा उपयोग देवळासाठी किंवा कोल्हापूरसाठी अजिबात होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मंडळाच्या वतीने त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे जाहीरपणे पुढील मागण्या केल्या-

1) मूर्तीवरील नाग पूर्वीप्रमाणे पुन्हा घडवावा. त्यासाठी समिती गठित करावी.

2) अंबाबाई देवळाचा उल्लेख अंबाबाई असाच करावा; ‘महालक्ष्मी’ नको.

3) भक्तांनी अर्पण केलेली दक्षिणा योग्य ठिकाणी यावी म्हणून देवस्थान समितीने फलक लावावेत.

4) मंदिर वास्तूची दुरवस्था थांबवावी.

5) मंदिराचे बाजारीकरण थांबवावे.

शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचा विविध सामाजिक विषयात सखोल अभ्यास आहे. ‘बळी महोत्सवा’ची एक परंपराच त्यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केली. बलिप्रतिपदेस इथे वामनाचे डोके महिलेच्या हातून काठीने फोडले जाते. आता या उत्सवाने चांगलेच मूळ धरले आहे.

त्यांचा बहुजनांच्या दैवतासंबंधीही मोठा व्यासंग आहे. अखिल भारतीय अंबाबाई भक्त मंडळाने त्यांचेही जाहीर व्याख्यान आयोजित केले. ते म्हणतात – “लिहिता येत नाही, ते जनसमूह आपला इतिहास जत्रा, लोककथा, गाणी, प्रथा, यामधून जतन करतात.” त्यांनी पुराणशास्त्रीय पुरावे आणि लोकायत इतिहास पद्धत वापरून अंबाबाईने केलेले चार दिग्विजय सांगितले. पुराणातल्या सर्व देवतांना नातेवाईक आहेत; पण इटलाई, रेणुका, अंबाबाई, जोगाई, मरीआई इत्यादी बहुजन समाजातील देवींना नातेवाईक नाहीत. त्या स्वत:च शस्त्र घेऊन बहुजनांचे रक्षण करतात.”

अंबाबाईचा अर्थ सांगताना ते म्हणतात, “आंब म्हणजे पाणी. अंबाबाई पाण्याचे रक्षण करते, तर कोल्हापूरचा कोल्हासुराशी काही संबंध नसून तो शब्द कोलापूर आहे. कोला म्हणजे पाणी. अंबेने वर्षभर पाणी मिळावे म्हणून तलावनिर्मिती केली. कोल्हापूरमधील अनेक तळी मुजवली असली, तरी अजून रंकाळा, कोटीतीर्थ ही तळी पाहायला मिळतात. जिल्ह्यातील बहुसंख्य गावांत अशी तळी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘केरळपर्यंत कोकणचे सात भाग पडतात. त्यांना सप्तपाताळ म्हणतात, त्यात सात स्त्री सत्ता होत्या. तिथे मोजण्याची सप्तमान पद्धत होती. त्या राण्या देशावर आल्या आणि सातीआसरा म्हणून पुजल्या गेल्या. देशावर त्यांचा शैव राजांशी संघर्ष झाला.

इथे मोजण्याची वीसमान पद्धत होती. एकविसा, होनिविसा याप्रमाणे अठरा विसा म्हणजे 360 दिवस होतात. त्यावरून वर्षभर म्हणजे ‘अठराविश्वे’ असा शब्दप्रयोग तयार झाला आहे.

ते म्हणतात, “अगस्तिने लोपामुद्रेला सांगितलेल्या कथांना इतिहास म्हटले, तर स्त्रियांची लोकगीते, लोककथाही इतिहासच आहेत. त्यांनी ‘सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधके। शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते।’ या श्लोकामधील नारायणी शब्दावर आक्षेप घेतला. ते म्हणतात, ‘या श्लोकातील सर्व नावे पार्वतीची असताना ‘नारायणी’ तेवढे लक्ष्मीचे म्हणजे नारायणाच्या पत्नीचे आहे. तिथे मूळ शब्द ‘दाक्षायणी’ होता. तो नंतर बदलण्यात आला. दक्षाची कन्या पार्वती. तिच्या कथेचा इतिहास लग्नामधील ‘गुग्गुळ’ प्रथेमध्ये दिसतो.

अंबाबाईच्या देवळात गणपती, कार्तिकेय, शंकर आहेत. ही सर्व लक्षणे अंबाबाई देवीची आहेत, लक्ष्मीची नाहीत. विष्णू, वरुण, इंद्र इत्यादी देव इथले नाहीत. म्हणून ते कोणाच्याही देव्हार्‍यावर नाहीत. देवींच्या मध्ये भगिनीभाव, तर पुरुष देवांमध्ये बंधुभाव दिसतो. कामाक्षीच्या देवळात दर शुक्रवारी गाय मारली जाते. त्याजवळ असलेल्या तळ्याशेजारी बालभैरवचे देऊळ आहे.

वराह, नरसिंह, वामन अवतारांनी बहुजनांचे तीन नायक मारले, त्यानंतर पुढे काय केले? काहीही नाही.

अंबाबाईची पूजा करण्याचा अधिकार बहुजन नसलेल्या माणसाला नाही. अंबाबाई देवीच्या मूर्तीची विटंबना करून तिचे ब्राह्मणीकरण करण्याचा डाव आहे. ब्राह्मणीकरण करण्यासाठी देवांचे शाकाहारीकरण केले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी अंबाबाईचे शाकाहारीकरण करणार्‍या पुजार्‍यांना खडसावले आणि पुराव्याशिवाय देवीला दुसरा नैवेद्य चालणार नाही, असा आदेश काढला.

स्त्री राज्यांच्या प्रमुख राण्यांचे पुरुषसत्ताक शैव राजांशी संघर्ष झाले. त्याचे प्रतीक कालीमातेच्या पायाखाली शंकर असणार्‍या मूर्तीत दिसते. पुढे त्यांच्यात ऐक्यही झाले. ते विवाहातून प्रतीत होते.

ही बहुजनांची संस्कृती टिकवायची तर अंबाबाईचे मूळ स्वरूप टिकविण्याचे त्यांनी आवाहन केले.

तज्ज्ञांच्या मतावरून लक्षात येते की, ही शिवपत्नीच आहे. या मंडळींनी, मूर्तिशास्त्र, धर्मकथा, पुराणे, प्रथा, ऐतिहासिक नोंदी, लोकगीते इत्यादी साधनांचा वापर केला. तपशिलात थोडाफार फरक असला, तरी ठोकळमानाने त्यांनी लावलेले अर्थ समान आहेत. अंबाबाई ही विष्णुपती लक्ष्मी नसून शिवपत्नी पार्वतीचे रूप आहे.

खरी पद्मावती

तिरुपती बालाजीची पत्नी पद्मावती असून पति-पत्नीमधील भांडणामुळे ती रूसून कोल्हापूरला आली. तीच अंबाबाई असे म्हणून तिला शालू पाठविला जाऊ लागला.

ही लक्ष्मी नव्हे! ही विष्णुपत्नी नव्हे!! अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून आल्यावर हा शालू जगन्मातेसाठी-अंबेसाठी आहे, असे म्हणून तो स्वीकारला जात आहे.

दुसर्‍या कथेप्रमाणे पति-पत्नींच्या भांडणानंतर पद्मावती कोल्हापूरमध्ये येऊन राहिली. कारण अंबाबाईची आराधना केल्यास पती-पत्नीत समेट होतो का, हा समज- शंकर-पार्वतीमधील उत्कट प्रेम पाहता हा समज सत्य समजण्यास हरकत नाही. पद्मावती अंबाबाईची आराधना करण्यासाठी कोल्हापुरात येऊन राहिली. तिचे मंदिर अंबाबाई मंदिरापासून एक-दीड किलोमीटर वर दक्षिणेकडे आहे. मंगळवार पेठेत आडबाजूला असलेल्या या देवळाची माहिती कोल्हापूरकरांना आहे.

अलिकडे देवळाची डागडुजी केली असून नव्या रुपामुळे प्राचीनत्व दिसेनासे झाले आहे. या मंदिरात पद्मावतीशिवाय नाईकबा, नागराज, हनुमान, श्रीविष्णू, गजानन, गजलक्ष्मी, सटवाई, अगस्ति-लोपामुद्रा, नंदी आणि पाच फण्यांचा नागराज यांच्या मूर्ती आहेत.

मंदिरावर नावाचा मोठा फलक लावला असूनही, या देवीस तिरुपती बालाजीकडून कधीही शालू आलेला नाही. स्वत:हून आपण पद्मावती देवी आहोत, हे मान्य करणार्‍या देवीची दखलही कोणी घेत नाही; याचे कारण आडबाजूला असलेले लहान देऊळ हेच असावे.

म्हणजे देवसुद्धा शालू पाठविताना देवीची सांपत्तिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत, देवळाचा आकार यांचा विचार करतात की काय?

हरितालिकेची कहाणी

धार्मिक पुस्तकात सांगितलेली हरितालिकेची कथा पुढीलप्रमाणे आहे- पूर्वी हिमालय नावाचा राजा होऊन गेला. पुराणकथेमध्ये पुढे तो पर्वत बनला. या राजाची कन्या, तिला शंकराचे आकर्षण वाटले. ‘आपल्याला हाच पती मिळावा,’ अशी इच्छा तिच्या मनामध्ये उत्पन्न झाली. ध्यानी, मनी, स्वप्नी एकच ध्यास! पण शंकराचे वर्णन पाहता, कमरेला व्याघ्राजीन, अंगाला भस्म, डोक्यावर जटा, अशा तरुणाला कुठला श्रीमंत बाप आपली मुलगी देईल? हिमालयानेही तेच केले.

हिमालयाकडे नारदमुनी आले. त्यांनी सुचवले – “हिमालया तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यासाठी पाठविले आहे. म्हणून मी इथे आलो आहे.” पार्वतीला हे समजले. बाप दुसरीकडे – श्रीमंत घरात लग्न ठरवतोय, हे कळल्यावरही ती मनात झुरत बसली नाही. खाली मान घालून बापाच्या इच्छेप्रमाणे लग्न करायला ती तयार झाली नाही. तिने आपल्या सखींची मदत घेतली- दूर अरण्यात गेली, गुहेत राहिली, उपवास सहन केले, थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा सर्व नैसर्गिक संकटांना तोंड दिले. गुहेमध्ये महादेवाचे लिंग स्थापून पूजा केली, तप केले, शंकरांना प्रसन्न करून घेतले. शेवटी बापाने तिचे लग्न शंकराशी लावून दिले.”

स्त्रियांवर बंधने

पुरुषसत्ताक राज्यामध्ये स्त्रियांवर अनेक बंधने आली. तिने काय खावे? काय ल्यावे? काय पाहावे? कोणाशी बोलावे? किती हसावे? शेवटी संसार कोणाशी करावा? हेही ठरविण्याचे अधिकार पुरुषांनी स्वत:कडे घेतले. अशा काळातल्या बंडखोर युवतीची ही कथा आहे. त्यातल्या चमत्कारांना बाजूला काढले, तर समाजात आजही घडणारी ही कथा आहे. ही कथा पुरुषी दृष्टिकोन आणि स्त्रियांचे मत याबाबी उघड करते. युवती हे व्रत पिढ्यान्पिढ्या करत आहेत. पुरुष त्याला संमती देत आहेत; पण व्यवहारात मात्र ‘सैराट’ कथा घडत आहेत. स्वेच्छेने साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. अशा घटनांमागील स्त्री-पुरुष असमानतेचा भाग झाकून ठेवून त्याला जातीय मुलामा चढवला जातो. जातीय मुलामा चढवला नाही, तर सर्वच जातींचे पुरुष गुन्हेगार आहेत, हे लक्षात येईल, ही भीती आहे. जातीय मुलामा चढविल्याने दुसर्‍या जातीला शिव्या देऊन मोकळे होता येते. आपल्या कुटुंबातल्या स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

त्यापूर्वीची दक्षकन्या आणि शंकराची कथा म्हणजे उत्कट दांपत्य प्रेमाची कथा आहे. पति-पत्नी दोघेही परस्परांवर निरातिशय प्रेम करत आहेत. पतीचा अपमान पत्नीला सहन होत नाही, तर पत्नीचे निधन पतीच्या पचनी पडत नाही. आज तरुण-तरुणींच्या पुढे मनाजोगा पती किंवा पत्नी निवडताना जात-धर्माचा मोठा अडसर असतो. अशा युवकांना मदत व मार्गदर्शन करणारे ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र’ भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरमध्ये चालवते. आजपर्यंत त्यांनी शेकडो जोडप्यांना मदत केली आहे. लातूरमध्येही असे केंद्र चालविले जाते. शासकीय पातळीवर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले जाते. हे सर्व कार्य हरितालिका व्रताची अंमलबजावणीच आहे.

अंबेच्या दोन्हीही कथांमधून समाजाने बोध घेणे गरजेचे आहे. घरातील युवक-युवतीला त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य देणे आणि पति-पत्नीने परस्परांशी प्रेमाने वागणे, ही अंबेची खरी भक्ती आहे. मग तुम्हाला डोक्याचे चमन करून बालाजीपासून अंबेपर्यंत धावत येण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.

अंबाबाई की महालक्ष्मी? पुस्तिका

कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष के. देसाई यांनी ‘करवीरची अंबाबाई की महालक्ष्मी’ ही पुस्तिका लिहिली. ही अंबाबाईच आहे असे प्रतिपादन करताना त्यांनी सचित्र पुरावे सादर केले. मुखपृष्ठावरच देवीच्या मस्तकावरील भलीमोठी नागफणी दिसते. दुसर्‍या पानावर शिवशक्ती संगमाचे तांत्रिक यंत्र; त्यापुढे अंबाबाई मंदिरातील ‘सरस्वती’ म्हणून सांगितले जाणारे शिल्प, हे महिषासूर मर्दिनीचे असल्याचा फोटो; या फोटोत महिषासूर मर्दिनी ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्यबाण, पाश इत्यादी आयुधासह रेड्याचा वध करत असून ती वाघावर स्वार झालेली दिसते.

पुढे त्यांनी दक्षराजाच्या पुराणकथेचा उल्लेख करून निर्माण झालेली शक्तिपीठे दिली आहेत.

श्रीचक्र – मंदिरातील श्रीचक्र दगडावर कोरलेले आहे. भारतात जिथे-जिथे शक्तीपीठे आहेत, तिथे-तिथे श्री चक्र उपासना होत असते. शिव आणि शक्तीच्या संगमातून सारे विश्व निर्माण झाले, असा तांत्रिक नकाशा असतो. श्रीविद्येचे उपासक श्रीललित सहस्त्रनाम, श्रीसूक्त, त्रिशती, अशा विविध रुपात उपासना करत असतात. त्यामुळे नवरात्रीमध्ये नवचंडीचे पाठ करताना दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण तेरा अध्याय करणारे उपासक आहेत. काही लोक श्रीदेवी कवच, कुंजिका आणि नवार्ण मंत्राचा जप करण्याचे अनुष्ठान करतात. नवरात्रीमध्ये तांत्रिक विधियुक्त यज्ञ करून प्राणिबळी किंवा कोहळा दिला जातो. ‘यज्ञ आणि पशुबळी, मद्य आणि मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. वर्षातून एक दिवस चक्र उपासनेचा तांत्रिक विधी पार पाडला जातो. पण त्याची जाहीर वाच्यता कोणी करत नाहीत,’ असा जुन्या जाणत्या लोकांचा दाखला लेखकांनी दिला आहे.

कलकत्ता, गोहत्तीच्या तांत्रिक पिठांना अनेक प्रकारचे बळी दिले जातात. शृंगेरीची शारदांबा, बदामीची बनशंकरी अशा शक्तिपीठाच्या ठिकाणी ‘श्रीचक्र’ हा तांत्रिक नकाशा कोरलेला आढळतो. तिथेही श्रीचक्र उपासना होते.

पूर्वापार हे दुर्गा मंदिर अंबाबाई या नावाने प्रसिद्ध असताना एका कॅलेंडर कंपनीच्या प्रसिद्धीनंतर पैसा देणारी, समृद्धी आणणारी देवी, असा जाणीवपूर्वक प्रचार करण्यासाठी शिवपत्नी अंबेला विष्णुपत्नी लक्ष्मी बनवले. महाप्रसाद, महामंडळ तसाच ‘महालक्ष्मी’ हा शब्द रूढ करण्यात आला. माथी मारण्यात आला. असा आरोप करून ते म्हणतात – “शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरप्रमाणे करवीरच्या अंबाबाईचे मंदिरही शासनाने ताब्यात घ्यावे. पुजार्‍यांना ताळ्यावर आणण्यासाठी ‘ब्राह्मणेतरांनी मंदिरात जाण्यावर बहिष्कार घालावा.”

अनेक बिनतोड पुराव्यानिशी लिहिलेल्या या पुस्तिकेला भाविकांनी पसंती दर्शविली. लेखकाची या विषयावर व्याख्यानेही झाली. साळोखेनगरमधील एका व्याख्यानानंतर त्यांना धमकी आली.

चौथ्या गोळीवरचे नाव

महालक्ष्मी ही विष्णुपत्नी लक्ष्मी नसून, शिवपत्नी पार्वती आहे- अंबाबाई आहे – असे सांगणार्‍या सुभाष के. देसाई यांना त्या कारणाने धमकी आली. पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे. –

“महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे; शिवाय ती शिवपत्नी आहे, विष्णूपत्नी नाही, असे जे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्यापुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल; पण असले प्रबोधन करणार्‍यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला आहे, हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते, ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहत जा. कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील, असे वाटत नाही. सनातन धर्मातील सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसर्‍या देसाईचे नशीब साथ देईलच, असे नाही.” – एक हितचिंतक

पत्राशिवाय त्यांना धमकीचे फोनही आले.

पोस्टाचा शिक्का, पत्रातील मजकूर, त्यातील उल्लेख, हस्ताक्षर, पत्राची भाषा, संदर्भ इत्यादीवरून धमकी देणारा परिचयातील, स्थानिक, सनातनी विचारांचा, पुजार्‍यांचे हित जपणारा असावा, असा कयास कार्यकर्त्यांनी बांधला. पत्रातील ‘तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतला आहे’ हा संदर्भ डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचा आहे. त्याबद्दल पत्रलेखकाला अभिमान वाटतो आहे. प्रबोधन करणार्‍यांचा शेवट असा होतो, असे सांगून पत्रलेखकाने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. यावरून या तीन खुनांमध्ये अजून काही साधक सामील असावेत; तसेच दोन आरोपी पोलिसांनी पकडले असले, तरी अजून मागे मोठे केंद्र अस्तित्वात असावे, त्यांना शासकीय यंत्रणा आपल्याला हात लावणार नाही, याची खात्री असावी, असा तर्क डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

हे केंद्र अंबाबाई देवळातील पुजार्‍यांचे हितसंबंध सांभाळत आहे. त्यांना तृप्ती देसाई यांना संपवायचे होते; पण ते जमले नाही, हेही पत्रावरून लक्षात येते.

सध्या सुभाष देसाई यांना सशस्त्र पोलीस अंगरक्षक पुरविण्यात आला आहे.

डॉ. सुभाष के. देसाई

देसाई कोल्हापूरकरांना फ्रीलान्स पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी अभ्यासासाठी जगभर भ्रमण केले असून ते सिंहवाणी नावाचे साप्ताहिक चालवितात. विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. विवेकानंदांच्यावरील त्यांच्या व्याख्यानातील एक वाक्य – “गीता पढनेसे फूटबॉल खेलना अच्छा है”- स्वामी विवेकानंद. फेसबुकवरून शेअर केल्यावर प्रस्तुत लेखकास (अनिल चव्हाण यांना) घरातून उचलून नेऊन मारू, अशी फोनवरून धमकी आली होती. पोलिसांनी तपास करून धमकी देणार्‍यास शोधून काढले. त्यावरती न्यायालयात केस दाखल केली.

देसाईंना लेखी पत्र आणि फोनवरून धमकी आली आहे; पण पोलीस अजून धमकी देणार्‍यापर्यंत पोचू शकलेले नाहीत; पण कार्यकर्त्यांनी आणि देसाईंनी धमकीला भीक घातलेली नाही.

अंबाबाईचा धर्मांधाकडून वापर

प्रार्थनास्थळाकडे पाहण्याचे दृष्टिकोन विविध असतात. भाविकांचे ते शांती मिळण्याचे ठिकाण असते. आपल्या जीवनातील अडचणी सोडविण्याचा मार्ग असतो. व्यापार्‍यांना तेच ठिकाण धंद्याचे दिसते. पुजार्‍यांना दक्षिणा आणि अर्पण महत्त्वाचे असते, तर धर्मांधांना धर्मा-धर्मात भांडणे लावण्यासाठी प्रार्थनास्थळांचा वापर करण्याचा मोह होतो.

देवळात स्फोट

महाराष्ट्रभर दंगली घडवून आणण्यासाठी अंबाबाईच्या देवळात स्फोट घडविण्याचे मनसुबे यापूर्वी आखण्यात आले आहेत. उत्तर दरवाजाजवळ नवग्रह मंदिर आहे. 1993 साली या मंदिरात सुतळीबाँबचा स्फोट घडवून आणण्यात आला. नियोजनाप्रमाणे लगेच मोर्चा निघाला. नियोजनाप्रमाणे शेजारच्या मशिदीवर दगडफेक करण्यासाठी धर्मरक्षक धावले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अंबाबाईच्या देवळात स्फोट झाल्याची विचारणा करणारे फोन कोल्हापुरात खणखणू लागले. पण नियोजन वाया गेले. दंगली पेटवणे, ऐनवेळी रद्द करण्याची पाळी धर्मांध संघटनांवर आली. त्याचे कारण स्फोट झाल्याबरोबर बाहेर पळणार्‍या आरोपींना अनिल उगळे नावाच्या कार्यकर्त्याने पकडले व पोलिसांत दिले, ते दोघेही आरोपी हिंदूच निघाले.

आरोपी निर्दोष

स्फोट घडवणार्‍यांवर पंधरा-वीस वर्षे खटला चालला आणि ‘आपल्याच धर्माचे आहेत’ म्हणत पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. भा.क.प.कोल्हापूरचे माजी सेक्रेटरी कॉ. दिलीप पवार यांच्या चरित्रातही वरील घटनेचा उल्लेख आहे.

धर्मांध संघटनांकडे पोलिस खात्याचे लक्ष नाही, अशा संघटनांमध्ये पोलिसांचे खबरे नाहीत, पोलीस अशा संघटनांच्या कारवायांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. काही वेळा त्यांना झुकते माप देतात, अशी टीका झाली. त्याचा प्रत्यय पुढे डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या खुनांमुळे आला.

अजूनही पोलीस खात्याने आपला धर्मांध संघटनांबाबतचा दृष्टिकोन बदललेला नाही. ही बाब देशहिताला बाधक आहे. देवाच्या-धर्माच्या नावावर दंगली घडविणार्‍यांना जनतेनेच खड्यासारखे बाजूला काढण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हा सेक्रेटरी व रेशन बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय नेते कॉ. चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

पश्चिम महाराष्ट्रामधील 3067 मंदिरांवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती देखरेख ठेवते. या समितीकडे देवस्थानची स्थावर व जंगम मालमत्ता व इतर कारभार आहे.

देवस्थान समितीने यापूर्वी 2006 साली अंतर्गत लेखापरीक्षण करून घेतले. त्यानंतर शासनाने लेखपरीक्षण करण्यासाठी दलाल अँड फर्मची नियुक्ती केली व यंत्रणा लावून सर्व 3067 मंदिरांच्या जमिनींचा शोध घेतला, तेव्हा 27 हजार एकर जमिनींच्या नोंदी सापडल्या. प्रत्येक देवस्थानाकडे दागिने किती आहेत, त्याची माहिती समितीकडे असणे आवश्यक आहे. पण जोतिबा आणि अंबाबाई मंदिर वगळता अन्य देवस्थानांकडे किती दागदागिने आहेत, त्यांचे मूल्य किती आहे, त्यात आता वाढ किती झाली आहे? यासंबंधीची माहिती उपलब्ध नसल्याचे लेखा परीक्षणात म्हटले आहे.

दागदागिने पोलीस पाटलांच्या ताब्यात असतात. परंतु कोणत्या पोलीस पाटलांकडे किती दागिने आहेत, त्यांचे मूल्य काय आहे, याची नोंद नसल्याचे अहवाल सांगतो.

अंबाबाईचे दागिने आणि साड्या!

अंबाबाई देवीला भाविकांकडून दागिने अर्पण केले जातात. त्यांना पुढे दोन रस्ते फुटतात. एक रस्ता देवस्थान समितीकडे जातो, तर दुसरा पुजार्‍यांकडे.

देवस्थान समितीकडे आलेल्या दागिन्यांची पावती दिली जाते. त्याची रजिस्टरला नोंद होते; पण पावती बुकाप्रमाणे रजिस्टरची आणि रजिस्टरप्रमाणे प्रत्यक्ष दागिन्यांची तपासणी केली असता त्यामध्ये तफावत आढळली, ही बाब गंभीर असल्याचे ताशेरे लेखा परीक्षणात मारले आहेत.

काही वेळा भक्तांकडून साडी अथवा रोख रक्कम अर्पण केली जाते. त्याची रीतसर पावती करून रजिस्टर ठेवले जाते. तथापि साडी रजिस्टर अद्ययावत नाही. देणगी स्वरुपात मिळालेल्या साड्या मूळ किमतीच्या 60 टक्के दराने विक्री केल्या जातात. त्याची रक्कम खात्यास नोंद आहे. परंतु साडी स्टॉक बुक ठेवलेले नाही. समितीने शिल्लक साड्यांची एकदाही मोजदाद करून तपासणी केलेली नाही. साड्या ठेवण्याची जागाही सुरक्षित नाही, असे शेरे अहवालात मारले गेले आहेत.

समितीकडील दागिन्यांचे मे. सी. एन. पाठक यांनी 19 डिसेंबर 1993 ला मूल्यांकन केले होते. त्यानंतर आजतागायत मूल्यांकन झालेले नाही. 15 सप्टेंबर 2016 च्या ‘लोकमत’मध्ये म्हटले आहे की, 469 मंदिरातील भक्तांनी अर्पण केलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा थांगपत्ता लागत नाही.

अर्थात, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नियम आणि कायद्यांच्या कक्षेत येते. त्याचे वेळाने का होईना; पण लेखा परीक्षण केले होते. त्यावर शासनाचे म्हणजे; पर्यायाने जनतेचे नियंत्रण आहे. त्यांच्या कामातील त्रुटी दूर करणे शक्य आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू असतात.

पुजार्‍यांचे कुरण

पण मंदिरात गाभार्‍याच्या आत अर्पण केलेले दागदागिने, मौल्यवान वस्तू, दक्षिणा यांचे काय होते? ते सर्व कुणाच्या घशात जाते? त्याचा जनतेसाठी काही उपयोग होतो काय? उत्पन्न किती असते, याची मोजदाद होते काय?

या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे मिळणे शक्य नाही. हे उत्पन्न पुजार्‍यांकडे जाते. ते त्यांचे राखीव कुरण आहे. पुजार्‍यांची नेमणूक वंशपरंपरेने होते. म्हणजे त्यांच्यासाठी शंभर टक्के जागा राखीव आहेत. पुजार्‍यांची नेमणूक गुणवत्तेवर करावी, म्हणजे भक्ती व्यवस्थित होईल, भाविकांना पुण्य व्यवस्थित पोचेल, असा विचार कोणी करत नाही.

अखिल भारतीय अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणतात – “अंबाबाईचे लक्ष्मीकरण थांबविणे आवश्यक आहे, त्याचबरोबर इथल्या पैशाचाही विचार करणे आवश्यक आहे. ”

मूर्तीवर नाग आहे, तिच्या मागे सिंह आहे, हे सर्व पुष्पहार घालून झाकले जाते. भाविकांना प्रवेश देताना आर्द्रतेचे कारण सांगतात. फुले घालून आर्द्रता जास्त वाढते, तेव्हा मात्र हा विचार होत नाही. नट-नट्या आल्या की, त्यांना जायला परवानगी असते, एका वेळी आठ-दहा पुजारी गाभार्‍यात थांबतात, तेव्हा आर्द्रता वाढत नाही काय? देवीसाठी नैवेद्य करणारी स्त्री, अपवित्र म्हणून तिला प्रवेश नाकारणे चूक आहे. परंपरा सांभाळा म्हणणारे सोयीच्या परंपरा सांगतात; पण भंगलेली मूर्ती चिकटविण्यासाठी साडेतीन किलो एमसील वापरले आहे, हा परंपरेचा भंग आहे.

पैसा जातो कुठे?

अंबाबाई मंदिराच्या खात्यावर फक्त 76 कोटी शिल्लक आहेत. शिर्डीचे देवस्थान केवळ पन्नास वर्षांचे आहे, तरी तीन हजार कोटी शिल्लक आहेत. त्यांनी 500 कोटी विमानतळासाठी दिले आहेत. अंबाबाईला मिळणारा पैसा देवीसाठी खर्च करायचे ठरवले तर देवस्थान विकासासाठी निधी शासनाकडे मागण्याची गरज नाही, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

अंबाबाईच्या देवालयात देवस्थान समितीच्या 12 दानपेट्या आहेत. त्यामधील गुप्तदान समितीकडे जमा होते. त्याचा रीतसर हिशोब ठेवला जातो.

‘सोने-चांदी, वस्तुरुपाने देणगी स्वीकारण्याची सोय आहे,’ असे फलक त्यांनी लावले आहेत. या देणगीची रीतसर पावती मिळते.

समितीकडे सुमारे 35 कर्मचारी असून त्यामध्ये पगारी पुजारीही आहेत. त्यांनी विविध सेवांचा दरफलक लावला आहे. साडीसह अभिषेक 501 रुपये, भाविक साडी घेऊन आले, तर अभिषेक 251 रुपये.

खणनारळ, साड्या

देवळाबाहेर शेतकरी सहकारी संघाच्या दुकानात साड्या सव्वाशे रुपयांपासून दीड-दोनशे, हजारांच्याही मिळतात. इतर दुकानातही मिळतात; पण संघाच्या दुकानात छापील किंमतच घेतली जाते, असे मत त्यांच्या कर्मचार्‍याने व्यक्त केले.

खण-नारळ संघाच्या दुकानात 30 रुपयांमध्ये मिळतात. इतरत्र काही ठिकाणी त्यांची किंमत 40 रुपये किंवा 51 रुपयांपर्यंतही होते. गाभार्‍याच्या उंबर्‍यापर्यंतचे दान देवस्थान समितीचे, तर उंबर्‍यावरील दक्षिणा पुजार्‍यांची समजली जाते. पुजार्‍यांचे अभिषेकाचे दर भिन्न आहेत. इतर उपमंदिरातही पुजार्‍यांच्या फोन नंबरसह अभिषेक पूजा इत्यादी दरफलक दिसतात.

पुजार्‍यांना अभिषेक, पूजा, लघुरूद्र आणि गर्भगृहातील दानदक्षिणा अशा मार्गाने उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ – दशावरतार मंदिरात अभिषेक 51 रुपये, तर संपूर्ण दशावतारांचा अभिषेक 151 रुपये, नृसिंह लघुरूद्र 2001 रुपये असा फलक आहे.

देवळे खाजगी विकास सरकारी

देवालयाच्या ओवरीमध्ये उपदेवळे आहेत. त्यातील काही खाजगी मालकीची आहेत. उदा. एकमुखी दत्त मंदिरावर खाजगी देऊळ असल्याचा फलक असून मालक पुण्याला असतात, असाही उल्लेख आहे. ‘कोल्हापुरात फ्लॅट घेतला आहे; पण सध्या पुण्याला राहतात’ तसाच हा प्रकार दिसतो.

त्याच देवळाच्या ओळीतील सुमारे 13 ओवर्‍यांमध्ये विविध वस्तूंची व पेढ्यांची दुकाने आहेत. यातील देव कुठे आहेत? त्यापुढे कोपर्‍यात देवीचा प्रसाद करण्याचा मुदपाकखाना असून शेजारी नगार्‍याची इमारत आहे. दुसर्‍या मजल्यावर असलेला नगारा दिवसातून ठराविक वेळा वाजवला जातो. शेजारच्या शाळेची मागणी – ‘नगारा हळू वाजवा,’ अशी असते, तर भाविक ‘नगारा हळू का वाजवता?’ अशी तक्रार करत असतात.

नशीब आजमवा

देवालयाच्या आवारात दोन लॉटरी स्टॉलना जागा देऊन देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविकांना नशीब आजमावण्याची संधी दिली आहे.

अनेक वर्षेहे स्टॉल व्यवस्थित सुरू आहेत. याचा अर्थ व्यवसाय होतो आहे. अंबेच्या कृपेने लॉटरी कितीजणांना लागली? लॉटरी काढणारे आणि जिंकणारे यांचे देवळातील प्रमाण आणि देवळाबाहेरील प्रमाण काय आहे? असा तौलनिक अभ्यास करून श्रद्धेचे महत्त्व, श्रद्धेचा फायदा तपासणे शक्य आहे. तसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

मूर्ती जतन करण्याचे महत्त्व

रुढी, प्रथा, परंपरा, पुराणकथा, लोकगीते, आचारधर्म, म्हणी, वाक्प्रचार, मूर्तीचा आकार-घडण, मूर्तीच्या हातातील शस्त्रे-साहित्य, मंदिरांची घडण इत्यादी बाबींवरून इतिहास संशोधक इतिहासाचा मागोवा घेतात, निष्कर्ष काढतात. निष्कर्ष पुन्हा-पुन्हा तपासता यावेत म्हणून इतिहासाची साधने जतन करून ठेवली जातात.

रुढी, परंपरा, पुराणकथा, लोकगीते इत्यादी लिखित स्वरुपात नोंद करून त्यांचे जतन होते. मूर्ती, देवालये आहे, त्या स्थितीत सांभाळण्यामागे भाविकांची श्रद्धा आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा विचार असतो. म्हणूनच अंबेची मूर्ती आहे त्या आयुधांसह जतन करणे महत्त्वाचे असल्याचे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. विलासराव पोवार यांनी व्यक्त केले.

देवांचा इतिहास

मानवी विकासाच्या एका टप्प्यावर स्त्रीसत्ता होत्या. स्त्रीगणाच्या प्रमुख स्त्रीला फार मान होता. ती सर्वांना सांभाळून घेणारी, आईप्रमाणे समतेने वागणारी, अभ्यासू, मार्गदर्शक, कामामध्ये आणि संघर्षामध्येही नेतृत्व करणारी असे. तशी असली, तरच गण टिकण्याची शक्यता होती. अशा गणप्रमुख स्त्रीला आजच्या राजकीय नेत्यांपेक्षा, राष्ट्रप्रमुखापेक्षाही जास्त मान होता.

अशा गणमाता देवी म्हणून पूजल्या जात. त्यांच्या मूर्ती करताना त्यांच्या हातात, त्याकाळची आधुनिक आयुधे दिली जात. म्हणून कोणत्याही देव-देवतांच्या हातात आजचे आधुनिक शस्त्र – एके छप्पन्न, रायफल वगैरे दिसत नाही.

मूर्तीच्या हातामधील शस्त्र, साहित्यावरून त्या काळच्या विकसित शस्त्रांचा अंदाज बांधता येतो.

त्याचवेळी काही भागांमध्ये पुरुषसत्ताक राज्ये होती. त्यांचे प्रमुख पुरुष देव बनले.

या दोन्ही सत्तांच्या मध्ये संघर्ष झाले. त्यानंतर समन्वयही झाला. संघर्ष पुराणकथामधील राक्षस वधामध्ये वर्णिले आहेत, तर समन्वय देव आणि देवींच्या विवाहामध्ये! स्त्री राज्याच्या प्रमुख देवी एकट्याच आहेत. कारण त्या राज्यात पुरुषाचा-नवर्‍याचा उल्लेख केला जात नव्हता.

दोन्ही देवतांना मानणारे समाज एकत्र होत, त्यांच्यात एकी होई, तेव्हा पुरोहित देवतांची लग्ने लावून टाकत. स्त्रीगणांचे पुरुषगणाशी संघर्ष झाले, तेव्हा इथल्या पुरुष सत्ता शैवपंथीय होत्या. अजून वैष्णवांचा उदय झालेला नव्हता. म्हणून स्त्रीदेवता या पार्वतीची रुपे, पुरुष देवता शिवाचे अवतार समजणारी देवालये दिसतात.

पुरोहितांनी रचलेली पुराणे त्याकाळच्या प्रचलित चालीरीतीशी संबंधित असतात, त्यातून त्याकाळचे तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते. तत्त्वज्ञान समाजावर राज्य करत असते. समाजातील तत्त्वज्ञानाचा मंदिरावर प्रभाव पडतो.

लहान मूल जसे मोठ्यांचा प्रतिसाद पाहूनच माकड उड्या मारते, तसे समाजाला रुचणारे बदल पुरोहित मंदिरात करतात. वेगळे बदल केले, तर ते पचत नाहीत. त्यांच्या दृष्टीने दक्षिणारुपाने मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा असतो.

त्यामुळेच कालानुरूप मंदिराचे धर्म-पंथही बदललेले आढळतात. एकेकाळी एका धर्माचे किंवा पंथांचे असलेले देऊळ दुसर्‍या काळात दुसर्‍याच पंथ किंवा धर्माचे समजले जाते. पण त्यातील चालीरीती सूक्ष्म कर्मकांडात टिकून राहतात.

अंबाबाईलाही शिवपत्नी पार्वतीऐवजी विष्णुपत्नी लक्ष्मी बनविण्याचे प्रयास झाले. त्याला दाक्षिणात्यांचा प्रतिसाद मोठा मिळाला. भाविकांची संख्या प्रचंड वाढली; पण स्थानिकांना त्या उड्या रुचल्या नाहीत. स्थानिकांची अभ्यासूवृत्ती आणि जागरुकता यामुळे ती शिवपत्नीच राहिली. लोकजागृती करणार्‍या वसंतराव मुळीक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे त्यासाठी अभिनंदन केले पाहिजे.

शासकीय नियंत्रण

देवळांचा उपयोग सर्वसामान्यांसाठी, समाजाच्या-देशाच्या विकासासाठी व्हायचा असेल, तर देवळातल्या आचार-विचारांवर आणि आर्थिक मिळकतीवर शासनाचे-भारतीय घटनेचे नियंत्रण हवे.

असे बिल आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी आलेल्या एका बिलाबाबतची घटना पुढे देत आहे.

देवस्थान बिल

1944 साली देवस्थान बिल आले. त्याला विरोध करण्यासाठी पुणेरी वृत्तपत्रे पुढे सरसावली. तेव्हा दासरामांनी ‘मानवधर्माचे पालन’ या अग्रलेखात स्पष्ट मत नोंदवून बिलाला पाठिंबा दिला.

ते म्हणतात – “धार्मिक अंधश्रद्धा आणि धर्मभोळेपणा यांनी हिंदू समाज सडून गेला आहे. 90 टक्के समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन 10 टक्के लोकांनी त्यावर जगण्याचे दिवस आता यापुढे चालू देणे म्हणजे आपण उद्याच्या नव्या जगात राहण्याला नालायक आहोत, अशी स्पष्ट कबुली देण्यासारखे आहे.

श्रद्धा, भावना यांचे चोचले कोणाला पुरवायचे असतील, तर ते प्रत्येकाने आपापल्या उंबरठ्याच्या आत अगदी नंगेपणाने पुरावावेत; पण घराबाहेर एका मानवधर्माच्या भावनेने, नुसते हिंदू नव्हे, तर मुसलमान, जैन, ख्रिश्चन, वगैरे समाजांनीही, वावरले पाहिजे. देवळे म्हणजे अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यसने, व्यभिचार यांचे अड्डे न राहता, त्या पिठावरून समाजाच्या प्रगतीच्या, तत्त्वांचा प्रसार व्हावयास हवा. यादृष्टीने विचार केल्यास सध्याची देवळे आणि दारूचे गुत्ते, यामध्ये समाजाच्या मानसिक अधोगतीच्या दृष्टीने विशेष अंतर आहे, असे आम्हास वाटत नाही.

सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करताना ते ‘सुबोध सुमनावली’ मध्ये म्हणतात –

ब्राह्मणांनी विष्णू। सोम क्षत्रियांनी॥

रूद्र तो शूद्रांनी। पुजावा हो॥1

असे जेथे झाले। देवाचे विभाग॥

तेथे कशी आग। नसेल ती॥2

दासराम सांगे। कोठली ती माया॥

जेथे असे पाया। दुहीचाच॥3

72 वर्षांपूर्वीचे हे विचार आजही भाविकांनी समजून घेतले पाहिजेत.

दासरामांच्या धाडसामुळे हौद सर्वांना खुला झाला, सर्वांना म्हणजे ब्राह्मणेतरांना-दलितांना सोडून!

गरुड मंडपाच्या दक्षिणेस व उत्तरेस पाण्याचे दोन मोठे हौद होते. हे हौद ब्राह्मण गृहस्थाने बांधले होते. त्यापैकी एक हौद फक्त ब्राह्मण समाजासाठी राखीव होता. देवीच्या पूजेअर्चेसाठी व ब्राह्मणांसाठी या पाण्याचा वापर केला जाई. ब्राह्मणेतरांना या हौदास स्पर्श करण्याची परवानगी नव्हती.

“ब्राह्मणेतर पाण्यास स्पर्श करील, तर तो गुन्हेगार समजून शासन करण्यात येईल,” असा जाहीरनामाही इथे लावला गेला.

हा अपमान धुऊन काढण्यासाठी दासरामांनी अगोदर जाहीर करून सर्वांसमक्ष या हौदावर आंघोळ केली. म्हैसकर फौजदाराने त्यांना तात्काळ अटक केली. दोनशे रुपयांचा जामीन घेतला. कोर्टात मात्र त्यांची सुटका झाली.

दासरामांच्या धाडसामुळे हौद सर्वांना खुला झाला, सर्वांना म्हणजे ब्राह्मणेतरांना-दलितांना सोडून!

बदलाचे फायदे

शिवपत्नी महालक्ष्मीला, विष्णुपत्नी लक्ष्मी बनवण्यामुळे तिरुपतीला जाणार्‍या भक्तांचा लोंढा कोल्हापूरलाही येऊ लागला. पतीनंतर पत्नीचेही दर्शन घेतले पाहिजे, ही ‘श्रद्धा’ त्यासाठी उपयोगी पडली.

महालक्ष्मी शब्द लक्ष्मीशी जवळीक साधणारा आहे. ‘लक्ष्मी’ मिळण्यासाठी महालक्ष्मीची भक्ती करण्याचा पर्याय सामान्यजनांना योग्य वाटतो.

अलिकडच्या 20-25 वर्षांत देवालयामुळे परिसराचे अर्थशास्त्र आमूलाग्र बदलले. धार्मिक क्षेत्रामध्ये दिसणार्‍या वस्तूंचा व्यापार प्रचंड वाढला. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवणारे, छोटे व्यावसायिक, फेरीवाले, हॉटेलवाले, लॉज, धर्मशाळा, फुल-हारवाले, खणनारळ-साडी विक्रेते, पूजेचे साहित्य, आभूषणे, चप्पल, खेळणी, शीतपेये, चहा-वडा विक्रेते, पार्किंग व्यवस्थेपासून चप्पल सांभाळणार्‍यापर्यंत यादी खूपच मोठी आहे.

खण-नारळ विकून चरितार्थ चालविणारे शंभरच्यावर निघतील, हारतुरेवालही, तसेच खाद्यपदार्थांनी सहज दीडदोनशे कुटुंबांचा चरितार्थ चालवला आहे. पूर्वी क्वचितच दिसणारा ‘आप्पे’ हा दाक्षिणात्य पदार्थ आता स्थानिकही चवीने चाखताना आढळतात. अर्धा किलोमीटरच्या परिसरातील अनेकांनी राहत्या घरांचे रूपांतर भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळेमध्ये केले आहे, दुकानात केले आहे. फोर व्हीलर पार्किंगच्या जागेत शंभर-दोनशे वाहनांची सोय केली असून मिनिटाला एक वाहन तिथे प्रवेश करते, तरीही गर्दी हटत नाही. खास गर्दीच्या दिवशी पार्किंगचा दर तासावर लावला जातो.

केवळ चप्पल सांभाळणार्‍यांची संख्या पंधरा-वीस असून त्यांना एकमेकांशी स्पर्धा करावी लागत नाही, एवढी गर्दी असते.

प्रत्येकजण आपल्या गतीने विकास साधून घेतोय, त्यात पुजारीही मागे नाहीत. अंबाबाई देवालयाच्या आवारातील देवळे खाजगी आहेत. ती खाजगी कशी झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांचे उत्पन्न खाजगी असले तरी त्यांच्या विकासाची जबाबदारी शासकीय का आहे? महालक्ष्मी विकास आराखड्याच्या खर्चामध्ये त्यांचा वाटा किती? पुजार्‍यांचा वाटा किती? त्याचे उत्तर शून्य आहे.

राखीव जागा

मुख्य देऊळ आणि उपदेवळे यांचे पुजारी ब्राह्मण असून त्यांना हे काम वंशपरंपरेने मिळते. म्हणजे त्यांच्यासाठी शंभर टक्के जागा राखीव आहेत.

देशभर कनिष्ठ आणि मध्यम जाती लाखोंचे मोर्चेकाढत आहेत. त्यांची मुख्य मागणी आहे, ‘आम्हाला नोकर्‍यांत राखीव जागा द्या.’ या मुद्द्यावरून राखीव जागा समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये वादविवाद घडत आहेत. सरकारी नोकर्‍यांप्रमाणे खाजगी नोकर्‍यांतही राखीव जागा ठेवाव्यात, अशीही मागणी होत आहे. कारण खाजगी कारखानदाराला शासनाची प्रचंड मदत, सबसिडी, सवलती मिळत असतात. देशातील संसाधनांचाच ते वापर करत असतात. देशातल्या बँकांकडून कर्ज घेत असतात.

धार्मिक क्षेत्रासाठीही शासन भरमसाठ देणग्या-मदत जाहीर करत असते. नाव देवालयाचे असले, तरी त्याचा खरा फायदा पुजार्‍यांनाच होतो. त्यांचा धंदा विनासायास वाढतो. इतर व्यावसायिकांना भांडवलखर्च असतो. स्पर्धा असते, तशी पुजार्‍यांना नसते. त्यांचे कुटुंबीय पुजारी पदावर हक्क सांगतात; त्यांच्यासाठी या राखीव जागाच असतात.

दान-दक्षिणा रुपाने मिळणार्‍या पैशाची मोजदाद होत नाही, त्यामुळे पुजारी इनकम टॅक्सपासूनही मुक्त राहतात.

म्हणून पुजार्‍यांची भरती सर्व जातीतून आणि गुणवत्तेवर करावी, त्यामध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व मिळावे, ही मागणी समर्थनीय आहे.

पाया आणि इमला

मानवी समाजात धर्म, कला, प्रथा, साहित्य, सण, संस्कृती यांना महत्त्व असते. त्या बाबी विकसित होतात, काळानुसार बदलतात.

या सर्व बाबी म्हणजे समाजाची इमारत असते. त्या-त्या काळचा समाज या बाबींनी बांधलेलाच असतो.

पण या इमारतीचा पाया असतो आर्थिक! अंबेच्या बाबतीतही या सर्व बदलांचे कारण आर्थिक आहे. मार्क्सने सांगितलेला पाया आणि इमला यांचा द़ृष्टांत इथे तंतोतंत लागू पडतो.

आर्थिक फायदा समोर दिसल्यानेच

प्रथा बदलल्या गाथा बदलल्या

रूप बदलले प्रसाद बदलला

नाती बदलली साथी बदलले

निष्कर्ष

अंबेचा शोध घेताना, काही बाबी नजरेस आल्या. त्या अशा –

– भंग पावली, तरी मूर्ती पूजली जात आहे.

– राजर्षी शाहूंच्या मदतीने- प्रेरणेने, विचाराने उभी असलेली शाळा – मंदिरासाठी विस्थापित केली जात आहे.

– फुटाणे हा मूळचा प्रसाद बंद करून, तिरुपतीप्रमाणे लाडूंचा प्रसाद दिला जातो आहे.

– अंबाबाईची पूजा बांधताना, तिच्यामागचा सिंह, मस्तकावरील नागफणी, शिवलिंग-फुलांनी झाकण्याचा प्रयत्न होतो.

– शिवपत्नी अंबेला विष्णुपत्नी लक्ष्मी बनविण्याचे प्रयत्न होतात.

– ही विष्णुपत्नी लक्ष्मी नसून, शिवपत्नी अंबा आहे, हे सांगणार्‍या अभ्यासू भाविकास खुनाच्या धमक्या येतात.

– स्त्रीसत्तेचे प्रतीक असलेल्या देवालयात स्त्रियांना अपवित्र ठरवून प्रवेश नाकारला जातो; प्रसंगी मारहाण होते.

– स्त्रीला देवालयात मारहाण करणारे पुजारी देवीच्या सेवेत राहतात.

– पुजार्‍यांची पदे ठराविक ब्राह्मण कुटुंबातूनच भरली जातात.

– आवारातील अनेक देवांची देवळे खाजगी आहेत; पण विकास आराखड्यात त्यांचा खर्चाचा वाटा नाही.

– पुजार्‍यांच्या उत्पन्नाची मोजदाद नाही, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर कर नाही – विकासाचा खर्च शासन करत आहे.

मागण्या

वरील बाबींचा विचार करून ‘अंबाबाई देवालय सर्वसामान्य महिला भक्त समिती’ने सर्वमान्य मागण्या केल्या आहेत – 1) खाजगी व सार्वजनिक असा भेदभाव न करता पुजार्‍यांची पदे सर्व जातीमधून भरावीत. त्यात महिलांनाही संधी द्यावी.

2) देवालयातील सर्व उत्पन्न देवस्थान समितीकडे जमा करावे व त्यातून पुजार्‍यांना वेतन देण्यात यावे.

3) अंबाबाईला अंबाबाईच राहू द्यावे, तिची लक्ष्मी करू पाहणार्‍या पुजार्‍यांवर कारवाई करावी.

4) देवळात स्त्रीला मारहाण करणार्‍या पुजार्‍यांवर कारवाई करावी.

5) अंबाबाईचा मूळचा फुटाणे हा प्रसाद बदलू नये.

6) डॉ. सुभाष देसाई यांना धमक्या देणार्‍यांचा शोध घ्यावा.

7) राजर्षी शाहूंच्या प्रेरणेने उभा असणार्‍या शाळेचे विस्थापन न करता विकास आराखडा राबवावा.

अंबेचा शोध घेण्याचे तत्कालीन कारण झाले- ‘महिलांच्या प्रवेशास प्रतिबंधाचे!’ सत्याग्रह करून महिला गाभार्‍यात जाऊन आल्या.

पुढे काय? – पुढे वादळ शांत झाले. भाविक महिला गाभार्‍यात जाण्याचा आग्रह धरत नाहीत. सत्याग्रही महिलांना “देव देवळात नसतो, देवळात पुजार्‍याचे पोट असते, देव दीन-दुबळ्यांच्या सेवेत असतो,” हा गाडगेबाबांचा संदेश पटलेला आहे. त्या पुन्हा देवळाकडे फिरकलेल्या नाहीत; पण त्या वरील मागण्यांसाठी आग्रही आहेत.

समाज विकासाची गती पाहत त्या नक्कीच यशस्वी होतील, यात शंका नाही.

अनिल चव्हाण, कोल्हापूर

संपर्क : 9764147483

दंगली घडविण्यासाठी मंदिराचा वापर

1993 साली या मंदिरात सुतळीबाँबचा स्फोट घडवून आणण्यात आला. नियोजनाप्रमाणे लगेच मोर्चा निघाला. नियोजनाप्रमाणे शेजारच्या मशिदीवर दगडफेक करण्यासाठी धर्मरक्षक धावले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अंबाबाईच्या देवळात स्फोट झाल्याची विचारणा करणारे फोन कोल्हापुरात खणखणू लागले. पण नियोजन वाया गेले. दंगली पेटवणे, ऐनवेळी रद्द करण्याची पाळी धर्मांध संघटनांवर आली. त्याचे कारण स्फोट झाल्याबरोबर बाहेर पळणार्‍या अनिल उगळे नावाच्या कार्यकर्त्याने आरोपींना पकडले व पोलिसांत दिले, ते दोघेही हिंदूच निघाले.