‘जनपरिवारा’चा एक वाचक विचारतो की, “नरेंद्र दाभोलकर, पानसरे आणि आता कलबुर्गी यांची हत्या एका धर्मांध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली, हे निर्दयी कृत्य धर्माच्या नावावर करण्यात आले. आपले यावर मत काय?”
धर्माच्या नावावर जितकी निर्दयी कृत्ये घडली आहेत, तितकी दुसर्या कुठल्याही नावावर घडली नाहीत किंवा कधी घडणारही नाहीत. वाईट कृत्ये करण्यासाठी चांगल्या नावाचा आडपडदा हवा असतो, सुंदर बुरखा पाहिजे, अशासाठी की असुंदर कृत्य लपवता यावे.
अधर्माच्या नावावर कधी वाईट कृत्य झाले नाही. कुणी करू इच्छिल तर कसे काय करील? नकली दही विकायचे असेल तर ‘असली दहीचे दुकान’ असे लिहिणे क्रमप्राप्त आहे. नकली दहीचे दुकान असे लिहिले तर नकली विकणे मुश्कील होईल, इतकेच नव्हे, तर असली देखील विकले जाणार नाही.
धर्म एक आडपडदा आहे. या आडपडद्याच्या मागे काय काय घडले नाही? येशूला कू्रसावर ठार मारण्यात आले. धर्माचा आडपडदा होता. सॉक्रेटिसला विष पाजण्यात आले. आडपडदा धर्माचा होता. ज्या न्यायाधीशांनी सॉक्रेटिसवर जो आरोप ठेवला तो आरोप असा होता की, सॉक्रेटिस लोकांना बिघडवीत आहे. तो लोकांना अधार्मिक बनवीत आहे. लोकांना तो अधर्म शिकवीत आहे. येथेही धर्माचा आडपडदा होता.
ही मोठी गंमतच आहे. या पृथ्वीवर जे काही थोडे महात्मा होऊन गेले की, ज्यांनी लोकांच्या जीवनात प्रकाश उजळला, फुले फुलविली, त्यांच्यामध्ये सॉक्रेटिसचे एक नाव आहे; परंतु त्याच्यावर असा आरोप ठेवण्यात आला की, तो लोकांना भ्रष्ट करीत आहे आणि एका अर्थाने न्यायाधीश जे म्हणत होते ते ठीकच होते. कारण ज्याला ते धर्म समजत होते, त्या धर्मापासून सॉक्रेटिस लोकांना हटवत होता. कारण तो धर्म नव्हता.
धर्मांसंबंधी एक अंध लोकांची धारणा आणि एक डोळसांची अंतर्दृष्टी आहे. अंधाची व डोळसाची धारणा आपसात मेळ खात नाही. सॉक्रेटिस म्हणाला, “मी जे काही करीत आहे तोच धर्म आहे. मी जे म्हणतो आहेत तेच सत्य आहे.” म्हणून त्याच्या विरोधकांनी असा निर्णय घेतला की सॉक्रेटिसला जिवंत ठेवता कामा नये.
हाच अपराध येशूचा होता. तो यहुदी लोकांचा धर्म बिघडवीत होता. तो त्यांचा धर्म भ्रष्ट करीत होता. तो त्यांची परंपरा तोडत होता. येशू ख्रिस्त म्हणाला, ‘माझे शरीर तुम्ही ठार कराल; परंतु माझी चेतना तुम्ही ठार करू शकणार नाही.’
धर्माच्या नावावर दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धर्माच्या नावावरच अशी निर्घृण कृत्ये केली जाऊ शकतात. धर्माच्या आड खूप काही होत आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, शीख एकमेकांची हत्या करीत आले आहेत. धर्माच्या नावावर मंदिर, मशिदी, चर्चेस जाळण्यात आली आहेत आणि धर्मपुरोहित त्यांना समजावत आहेत की, ‘जिहादात जो मरेल तो सरळ स्वर्गात जाऊन पोहोचेल. धर्मयुद्धात जो मरेल तो परममहान आनंदाचा धनी होईल. तेव्हा मारा आणि मरा.”
धर्म, जो जीवन जगण्याची कला आहे त्याने मरणे व मारण्याचा धंदा बनवला आहे. धर्म तर कसे जगायचे याचे विज्ञान आहे. धर्म हिंदू नसतो, मुसलमान नसतो, ख्रिश्चन नसतो, प्रेम कधी हिंदू असते काय? प्रेम कधी मुसलमान किंवा ख्रिश्चन असते काय? जर प्रेम हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन नसेल तर मग प्रार्थना कशी काय हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असू शकते?
लोक म्हणतात की, धर्मांध व्यक्तींनी दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या केली. कोणी माणूस वास्तविक धर्मांध असू शकत नाही. धर्म तर डोळा आहे म्हणून ‘धर्मांध’ असा शब्द वापरण्यात येतो. परंतु ते ठीक नाही. आपण अधर्मांध शब्द वापरायला हवा.
परंतु पाखंडी लोकांसाठी धर्मांध शब्दाचा आपण उपयोग करतो. जो कोणी हिंदू धर्मवेडा आहे किंवा जो कोणी ख्रिश्चन धर्मवेडा आहे, त्याला धर्मांध म्हणण्याची प्रथा रूढ आहे. वास्तविक अशा लोकांना धर्मांध म्हणू नये. त्यांना फक्त अंध म्हणणे पुरेसे आहे, फक्त वेडे म्हणणे पुरेसे आहे. ते धर्म गमावून बसले आहेत. फक्त धर्माची चादर डोक्यावर पांघरून ते चालत आहेत. ज्याला आपण धर्मांध म्हणतो तो वास्तविक मतांध आहे. धर्म फारच प्यारा शब्द आहे. मतांध किंवा मतवादी धार्मिक नाही होऊ शकत. म्हणूनच हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, जैन, बौद्ध यांना धार्मिक म्हणता येणार नाही.
ज्या मतांधांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची निर्घृण हत्या केली, ते एक व्यर्थ कृत्य त्यांनी केले. कारण दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांना मारले जाऊच शकत नाही. त्यांनी त्यांच्या देहांना मारले. वास्तविक पाहता एक दिवस त्यांचा देह असा मरणारच होता. त्याला मारण्याची काही खास जरूरी नव्हती. बुद्ध नाही राहिला, महावीर नाही राहिला, ख्रिस्त नाही राहिला, जो देह शेवटी आपोआप मरणार आहे त्याला मारण्यात काय अर्थ आहे? विनाकारण या मतांधांनी हा प्रयास केला आणि स्वत:लाच उगीच अडचणीत टाकले. त्यांनी हा खटाटोप केला. कारण त्यांना धर्माचे रक्षण करायचे होते. जणू काही हे धर्म जाणत होते. यांनी जणू धर्माचा अनुभव घेतला होता. त्यांना मुळीच ठाऊक नव्हते की आपण जे काही करीत आहोत ती धर्माच्या विपरीत कृती आहे आणि धर्मसुद्धा अलग अलग आहेत. माझा धर्म वेगळा, तुमचा धर्म वेगळा, कुठल्या धर्माच्या नावाने तुम्ही हत्या करता?
या जगामध्ये प्रमुख धर्म तीनशे आहेत आणि तीनशे धर्मांचे संप्रदाय तीन हजार आहेत. त्याशिवाय उपसंप्रदाय, पंथ, उपपंथ तीस हजार आहेत. या सर्व धर्म, संप्रदाय, उपसंप्रदाय पंथ, उपपंथ त्यांच्यामध्ये झगडा, तंटा, तरवारी चालतात.
वास्तविक धर्म तर एकच आहे. जसे विज्ञान एक आहे, प्रकाश एक आहे, चंद्र एक आहे. किती ओढ्यांमध्ये, तलावामध्ये, सरोवरामध्ये त्याची छाया पडते. त्याची करोडो प्रतिबिंब पडतात; परंतु चंद्र तर एकच आहे.
बुद्ध एक प्रतिबिंब आहे. महावीर दुसरे प्रतिबिंब आहे. महंमद तिसरे प्रतिबिंब आहे. येशू चौथे प्रतिबिंब आहे. झरथुष्ट पाचवे प्रतिबिंब आहे. हे सर्व सरोवर आहेत. या मतांधांना वाटले की, हे विवेकवादी विचारवंत त्यांच्या धर्माच्या विरुद्ध बोलत आहेत. धर्म काही कुणाची मक्तेदारी नाही. तुम्ही धर्माचा अर्थ समजता काय? धर्माचा अर्थ आहे, जो स्वभाव आपण धारण केला आहे तो. महावीराने धर्माची उचित अशी व्याख्या केली आहे. ‘वंथ्थु सहावा धम्म’ वस्तूचा स्वभाव धर्म आहे. धारयति स: धर्म: असे संस्कृत वचन आहे. जो समाजाची धारणा करतो तो धर्म.
परंतु हे मारेकरी या धारणेला वैतागले असावेत. ते वेडेच असावेत. विचारांचा विचारांशी सामना करण्याची हिंमत त्यांच्या नव्हती. म्हणून त्यांनी हत्येचा मार्ग स्वीकारला. हिंदू धर्माची रक्षा करण्याचा यांना कोणी ठेका दिला?
आता संघटीत धर्माला भविष्य राहिलेले नाही.
-फा. हिलरी फर्नांडिस
संपर्क : 9892692077