ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका सुंदर-सुश्राव्य श्लोकाने केली. संत ज्ञानेश्वरांच्या अभंग पंक्तीही यांनी उद्धृत केल्या. ‘जे अविवेकाची काजळी। फेडोनी विवेकदीप उजळी। ते योगिया पाही दिवाळी निरंतर॥’
धार्मिक दहशतवाद आणि अहिष्णुतेविरोधी परिषद घेण्याचे कारण नमूद करताना त्यांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेचा संदर्भ दिला. ज्या-ज्या वेळी समाजात असे असहिष्णू वातावरण तयार झाले किंवा होत असते, त्या-त्या वेळी समाजातील विचारवंत एकत्र येऊन अशा विरोधी वातावरणाचा बीमोड करण्यासाठी समाजजागृतीचे प्रयत्न करतात. वारकरी संप्रदायाची स्थापनाही अशाच एका परिस्थितीत झाली. सध्याचे सामाजिक वातावरण असहिष्णू होण्याची कारणेही त्यांनी नमूद केली. कुणीतरी घरात मांस ठेवलं, कुणीतरी आमच्या विरोधात बोलतं म्हणून अशा लोकांना संपवण्याची भाषा बोलली जाते. त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ अफवा पसरवूनही असहिष्णुतामय वातावरण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे.
असाच कार्यक्रम सातशे वर्षांपूर्वीही होत होता. विठ्ठलपंतांची मुले म्हणजे संन्याशाची मुले म्हणून छळ नाही केला, तर गीतेतील तत्त्वज्ञान विठ्ठलपंतांचा मुलगा मराठीतून सांगतो म्हणून त्यांचा छळ केला गेला. त्यांच्या मुलांना पोरकं केलं गेलं. केवळ संन्याशाची मुले म्हणून ही मुले जन्मत:च मारून टाकली असती; पण तसे न करता, संत ज्ञानेश्वरांनी मराठीत गीता-तत्त्वज्ञान सांगितले म्हणून त्यांचा छळ केला गेला. ही मोठी असहिष्णुता त्यावेळीही होती.
पंढरपूरच्या वाळवंटात 29 किलोमीटर अंतरावर संत चोखोबांचे गाव आहे. चोखोबा पंढरपुरात जात. मंदिराच्या बाहेरून त्यांनी फेरी मारली म्हणून त्यांना मार-मार मारले. ही पराकोटीची असहिष्णुता होती.
पंढरपुरात ज्यावेळी विठ्ठल मंदिरातून बडवे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी चॅनलसमोर बोलताना बडव्यांचे प्रतिनिधी वा. ना. उपाध्ये यांनी असे सांगितले की, आम्ही कोणत्याही वारकर्याला कधीही विरोध केला नाही. कुणालाही कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. हजार वर्षांत असं कधी घडलं नाही.
तेव्हा स्वत: सोन्नर महाराजांनी त्यांना वस्तुनिष्ठ उत्तर दिले. सातशे वर्षांपूर्वीचा लेखी पुरावा त्यांनी चॅनलपुढे कथन केला. जेव्हा संत चोखोबाला असहिष्णू मंडळींनी जीवघेणा त्रास दिला, तेव्हा चोखोबांनी आपले गार्हाणे, आपली वेदना खुद्द विठ्ठलालाच प्रश्नातून विचारली-
‘धाव घाल विठू आता, चालू नको मंद,
बडवे मज मारिती, असा काय माझा अपराध?’
तरीही बडवे चोखोबाला हीन-दीन ठरवितात, ते विचारतात-
विठोबाचा हार तुझ्या कंठी कसा आला?
का रे म्हणसी महारा, देव बाटविला?
अशापक्रारचे असहिष्णू वातावरण त्यावेळी होते. असे सोन्नर महाराजांनी उपाध्येंना सांगितले. तेव्हा उपाध्ये निरुत्तर झाले. पुढे सोन्नर महाराजांनी हे कथन केल्याचे सांगितले की, पंढरपुरात वारकरी एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या पाया पडतात, परस्परांना हात उंचावून, वर करून आशीर्वाद देतात; पण अशा प्रकारची कृती बडव्यांनी कधीही केल्याचे दिसून येत नाही. कोणत्याही बडव्याने शूद्राच्या पाया पडल्याचे दिसले नाही. शूद्राने बडव्याला पाया पडून नमस्कार केला, तरीही बडव्याने आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला नाही.
खरे वारकरी नेहमीच म्हणत आले, ‘वर्ण, अभिमान विसरली याती।’ आणि त्यापुढील प्रक्रिया म्हणजे ‘एकमेका घालू लोटांगण।’
संत नामदेवांनी सहिष्णुतेचा झेंडा पंजाबपर्यंत नेला. जेव्हा ते आपल्या मूळ गावी आले, तेव्हा तेथे जवळच असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. कीर्तन सुरू केले; पण थोड्याच वेळात तेथे काही विशिष्ट वस्त्र धारण केलेले लोक तेथे आले आणि म्हणाले, “आमच्या देवाला नैवेद्य दाखविण्याची वेळ झाली आहे. आम्ही सोवळ्यात आहोत. तुमचा स्पर्श झाला, तर आम्हाला बाट लागेल. तुमचे कीर्तन थांबवा आणि निघा.”
संत नामदेवांचा नाईलाज झाला; पण आपल्या टाळकरी-वादक मंडळींना घेऊन संत नामदेवांनी तेथेच मंदिराच्या मागील बाजूस कीर्तन सुरू केले. पंजाबात राहून आल्याने हिंदी भाषेचा प्रभाव होता. त्यांनी अभंगातून पुढीलप्रमाणे हिंदीतून विठ्ठलाला प्रश्न विचारला-
‘हीन–दीन जात मोरी, पंढरी के राया। ऐसा नामा दर्जी, तुजे काहें को बनाया?’
स्त्री-समतेचा आणि समानतेचा कृतिशील विचार महाअंनिसने नेहमीच मांडला. नामदेवांच्या अनेक स्त्री-शिष्या होत्या. त्यातील एक होत्या संत सोयराबाई. त्यांना नामदेवांनी वाचन, लेखन शिकविले. सोयराबाईंनी गीता वाचायला सुरुवात केली. ‘मी चराचरांत भरलेलो आहे,’ असे सोयराबाईंनी गीतेत वाचले. हा भगवंत जर चराचरांत आहे, तर आम्हा स्त्रियांना एवढा त्रास का? हा त्रास भगवंत पाहतोच कसा? वाचनातून आत्मभान जागृत झालेल्या सोयराबाईंनी भेदभाव केल्याबद्दल केवळ प्रश्नच नाही भगवंताला विचारला, तर पुढील अभंगओळींतून त्याची लाज काढली.
‘आमुचि केली हीन याती। तुज ना कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुझ्या चित्ता॥’
भारतीय संविधानानेही हाच विचार स्त्री-समतेचा विचार स्वातंत्र्याचा, समानतेचा हक्क दिलेला आहे, जो संतांनी सातशे वर्षांपासून समाजात रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंनिसच्या माध्यमातून हाच विचार पुढे नेल्याचा प्रयत्न असा परिषदांतून आपण सर्व कार्यकर्ते करीत आहात, याचे सोन्नर महाराजांनी कौतुक केले, अभिनंदन केले.
समतेचा मंत्र समाजात रुजवणे अत्यंत आवश्यक आहे, असे जेव्हा निश्चित झाले, तेव्हा संत नामदेवांनी पुढाकार घेतला. त्यांनी त्यावेळच्या सर्व संतांना पंढरीत येण्याचा सांगावा दिला,
या रे या रे लहानथोर, याति भलते नारीनर।
हाच आजच्या आपल्या संविधानाचा मंत्र आहे. जो सातशे वर्षांपूर्वी संतपरंपरेने दिला आणि रुजविण्याचा प्रयत्न कीर्तन-प्रवचनांतून केला.
नारदीय कीर्तन परंपरेत डाव्या बाजूला पेटीवाला, उजव्या बाजूला तबलेवाला, मध्ये कीर्तनकार एकटाच असतो. तोच बोलत असतो. इतर सर्व फक्त ऐकत असतात. मध्येच कुणी प्रश्न विचारायला बंदी असते.
संत नामदेवांनी ही बंदी उठविली, प्रथा मोडीत काढली. त्यांच्या कीर्तनात, कीर्तनकारांच्या दोन्ही बाजूला दहा ते पंधरा टाळकरी, समोरच पखवाजवाले असतात, सर्वजण गातात, अभंग मधूनच कुणीही टाळकरी म्हणू शकतो. म्हणजे संत नामदेवांनी तेथे ‘सकळांस आहे अधिकार’ प्रस्थापित केला. असहिष्णुतेविरोधी हे नामदेवांचे बंड होते, असे सोन्नर महाराजांनी नमूद केले.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने कौरवांच्या बाजूने जे लढतात, ते गुरू, आप्त, सगेसोयरे असले तरी त्यांचा संहार कर, मरून टाक, अशी आज्ञा अर्जुनाला दिली आहे. म्हणजे दुष्टपणाला कायमचे संपविण्याची ही भाषा आहे. माणूस म्हणूनसुद्धा जगण्याचा अधिकार त्याला नाही, असा ध्वनी येथे निर्मित होतो; मात्र संत ज्ञानेश्वरांचे स्वत:चे संतपण जागे झाले, ज्यावेळी ते ज्ञानेश्वरीच्या रुपात गीतेचे मराठी भाष्य अनुवादित करीत होते. दुष्टपणा ही प्रवृत्ती आहे, ती नष्ट करणे; मात्र माणूस कुणीही असला, तरी त्याच्यावर प्रेमच केले पाहिजे, प्राणिमात्रांवरही तेवढेच प्रेम असावे-
‘जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढे, भूता परस्परें जडो, मैत्र जीवांचे।’
असे समर्पक उदाहरणही सोन्नर महाराजांनी दिले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जी करुणा जागविली, तोच विचार आपण पुढे नेत आहोत, हाच विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिला, असे ते म्हणाले.
म्हणून संतविचारांचा सतत आदरच करावयास हवा. गाथा, ज्ञानेश्वरी, संत नामदेवांचे अभंग यांचा आपण जेवढा आदर करतो, तेवढाच आदर आपण भारतीय संविधानाचा केला पाहिजे, असे सोन्नर महाराजांनी अगदी तळमळीने नमूद केले.
मात्र या तत्त्वज्ञानाला मुरड घालण्याचे काम काही व्यक्ती त्या-त्या काळातही करत होत्या. अगदी अलिकडचे उदाहरणही सोन्नर महाराजांनी दिले. ते म्हणाले, ‘वारकरी संप्रदायात/दिंडीत काही व्यक्ती नंग्या तलवारी घेऊन, विशिष्ट घोषणा देत होत्या. पोलिसांनाही जुमानत नव्हत्या. त्यांच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होत्या; परंतु राजाभाऊ चोपदारांनी हा अनिष्ट प्रकार हाणून पाडला; मात्र या धर्मांधांनी पाच ते साडेपाच हजार तरुणांना धर्मांच्या नावाखाली हिंसक बनविले. त्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या नावाने झालेले हे संस्कार लगेच जाणार नाहीत. त्यासाठी संत विचाराचा प्रचार-प्रसार आपणास गावोगावी, खेडोपाडी करावा लागेल, तरंच हे आपणास बदलता येईल.’
मागील काही दिवसांत एक धर्मांध व्यक्तीने कथन केले की, संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू दोन पावले पुढे होता. तो कोणकोणत्या बाबतीत पुढे होता, याबाबत वारकरी त्या व्यक्तीला विचारणा करीत नाहीत. कुणीही त्याबाबत बोलत नाहीत. वारकरी संप्रदायाच्या आसर्याने, धर्माच्या नावाने काही कीर्तनकार होतात, काही साधू होतात. समता, बंधुता, स्वातंत्र्य हा वारकरी संप्रदायाचा विचार बाजूला ठेवून धर्मातील अनिष्ट बाबींचा ते प्रचार, प्रसार करतात. काही दुष्टप्रवृत्तीच्या व्यक्ती मनूला पुढे करून, संतांना डावलण्याचा प्रयत्न करतात. त्याविरोधात तिथल्या तिथे विरोध व्हायला पाहिजे. वारकरी संप्रदायाची ही खरी कसोटी आहे. मला कुणीही त्याबाबत ‘ब्र’ शब्द काढत नाही. हे बघून, दिल्लीमध्ये जंतर-मंतर कॅमेर्यासमोर भारतीय घटना दहन करण्यापर्यंत या विध्वंसक शक्तींची मजल जाते; मात्र तरीही तातडीने त्यावर कडक कारवाई होत नाही.
समाज बिघडवणार्या अशा प्रवृत्तींना सतत विरोध करायला लागेल आणि याचे वैचारिक साधन आहे, संत विचार! संतसाहित्यावर, संतविचारांवर आणि शब्दांवर महाराष्ट्राचा विश्वास आहे. ‘इट का जबाब इट’ आणि ‘गोली का उत्तर गोली से’ देण्याची भाषा आपणाला वापरता येणार नाही. त्याला उत्तर म्हणून संतांचे अभंग, संतविचारच जनसामान्यांपर्यंत नेणे इष्ट ठरेल, असे सोन्नर महाराजांचे प्रतिपादन होते.
सोन्नर महाराजांनी लिहिलेल्या “उजळावया वाटा आलो” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्याचा संदर्भ देऊन, महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायानं समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, स्त्री-सक्षमीकरणाचा, पर्यावरणाचा विचार या पुस्तकात मांडला आहे.
लोक विचारतात, ‘तुम्ही हिंदू नाही का?’ वारकरी संप्रदाय हा कोणत्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचाही नाही. कारण सर्व संत हे विविध जाती-धर्माचे होते, ते सर्व संप्रदायात येत होते. त्यांच्यामुळेच संप्रदाय टिकून राहिला. जसे – काही संत जन्माने हिंदू होते, तसे – काही संत जसे – कबीर, मोमीन, लतीफा हे मुस्लिम होते. वारकरी संप्रदायात त्यांचेही विचार सांगितले जातात, गायिले जातात. सर्वांना सोबत घेऊन वारकरी संप्रदाय पुढे-पुढे जात राहिला-
हिंदू नाही, ना मुसलमान ना कुण्या जातीचा।
समतेसाठी लढतो मी वारकरी निधड्या छातीचा।
शेतकर्याचा पुत्र असे मी डावा, उजवा नाही,
भाळावरती टिळा लावितो मायमराठी मातीचा॥
हे त्याचे उत्तर असल्याचे सोन्नर महाराजांनी सांगितले.
सोन्नर महाराजांनी आपल्या विनम्र, लाघवी भाषेत करीत असलेल्या भाषणाचा समारोप, एका अतिशय समर्पक, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित, प्रेरित करणार्या चिऊताईच्या गोष्टीने केला. एका मोठ्या जंगलाला एका बाजूने आग लागली, तरी त्याची दखल जंगलातील प्राणिमात्रांनी घेतली नाही. ते आपापसांत भांडत राहिले. हल्ले करीत राहिले; मात्र जेव्हा जंगलाची आग अगदी त्यांच्या समीप आली, तेव्हा ती विझवण्यासाठी जो-तो आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. हत्तीने सोंडेने पाणी वाहणे सुरू केले. वाघाने तोंडात पाणी भरून आणले आणि आगीवर शिंपडू लागला, तेव्हा एक चिमणी ही आपल्या चोचीत पाणी घेऊन येत होती आणि आग विझवण्याचा प्रयत्न करीत होती. हत्तीच्या लक्षात ही बाब आली. तेव्हा त्याने हिनवत विचारले की, जंगलाला एवढी मोठी आग लागली आहे, तुझी चोच इवलुशी! तिच्यात कितीक पाणी मावते. जंगलाच्या आगीवर त्याने काय फरक पडणार? तेव्हा चिमणी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली की, ‘मला माहीत आहे, माझ्या चोचीतून आणलेल्या इवल्याशा पाण्याने आग विझणार नाही; पण मी प्रयत्न केलाच नाही, असे मला वाटणार नाही आणि जेव्हा-केव्हा या जंगलाला लागलेल्या या आगीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आग लावणार्यांच्या नव्हे, तर आग विझवणार्यांच्या यादीत माझे नावी असेल.’ सोन्नर महाराजांच्या – या विचारसन्मुख आणि कृतिप्रवण करणार्या गोष्टीला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांनी भरभरून दाद दिली. धन्यवाद!