Categories
व्यक्तिविशेष

सत्यपालांच्या सत्यवाणीने श्रोते भारावले

सत्र 4 थे
जून – २०१६

सांगली येथील ‘अंनिवा साहित्य संमेलना’त सायंकाळी 7 वाजताच्या चौथ्या सत्रात सत्यपाल महाराज यांचे पुरोगामी कीर्तन झाले.

खरे तर कीर्तन हा लोकपरंपरेतील चालत आलेला एक अत्यंत प्रभावी, सामर्थ्यवान आणि अमूल्य असा ठेवा. कीर्तन, अभंग यांच्या माध्यमांतून शेकडो वर्षांपासून समाजपरिवर्तनाचे काम महाराष्ट्रातील अनेक संतांनी खुबीने केले. जनतेनेही ते सकारात्मक पद्धतीने स्वीकारले. याच परंपरेतील कीर्तन हे माध्यम परिवर्तनासाठी आजही उपयुक्त असल्याची जाणीव सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून स्पष्टपणे होते.

पुरोगामी संदेश आणि नादमयी खंजिरीची साथ आणि असा सुंदर मिलाफ या सत्रात सर्व कार्यकर्त्यांनी अनुभवला.

अल्प परिचय – सत्यपाल महाराज हे अकोट, जि. अकोला येथील रहिवासी असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य आहेत. तसेच सप्तखंजिरी वादक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

पार्श्वभूमी :- चौथीच्या वर्गात असताना खंजिरी वादनाचा महाराजांना नाद लागला. गेली 40 वर्षेहा छंद त्यांनी जोपासला आहे. या छंदाला त्यांनी पुरोगामी कीर्तनाची जोड देऊन अजोड रंजकता आणली आहे. तीन-तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता महाराजांनी साध्य केली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांत ठिकठिकाणी 13 हजारपेक्षा जास्त त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत.

पुरोगामी विचार केवळ उच्चारातून नव्हे, तर आचरणात देखील हे आणताना दिसतात. त्यांच्या परिवारात जवळजवळ सर्व मुलांचे विवाह हे सामुदायिक विवाह पद्धतीनेच झाले आहेत. इतकेच नव्हे, तर 36 वर्षांपूर्वी स्वत:चा विवाह देखील सामुदायिक विवाह पद्धतीनेच केला आहे.

कालौघात एका अपघातात पत्नीचे दु:खद निधन झाले असता, त्यांचा देह मेडिकल कॉलेजला दान करून त्यांनी स्वत:सुद्धा देहदानाचा संकल्प केला. या निर्णयामुळे काही नातेवाईक/परिचितांच्या रोषाला देखील सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली; मात्र या सर्व अडचणींवर समर्थपणे मात करत आपला निश्चय राखला.

कीर्तनाच्या माध्यमातून महाराज अनेक विषय हाताळतात. जसे की, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, भ्रष्टाचार, राजकारण, सामाजिक विषमता, पाणी अडवा, पाणी जिरवा, पर्यावरण रक्षण इत्यादी. या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव देखील झाला आहे. यात महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) या पुरस्काराचा देखील समावेश आहे.

कीर्तनाची शैली :- महाराजांची कीर्तनाची शैली अत्यंत प्रभावी आणि खास वाखणण्यासारखी आहे. यात प्रेक्षकांना उत्स्फूर्त वातावरणात, मनोवेधक पद्धतीने एकाग्र करणे, विषयाशी एकरूप करणे आणि गंभीर संदेश देखील हसत-खेळत सांगणे, समाजातील कटू गोष्टी रंजकपणे सांगणे म्हणजे अगदी कडू औषध गोड मधातून दिल्याप्रमाणे वाटले. महाराजांची भाषा अगदी सामान्य माणसाला सुद्धा कळेल, समजेल, आपलीशी वाटेल अशीच होती. कीर्तन सुरू असतानाच प्रेक्षकांना साधे-सोपे प्रश्न विचारून त्यांच्याकडून योग्य उत्तर आल्यास महाराजांनी पुस्तके, साडी, शाल आणि अशा तत्सम चीजवस्तूंचे बक्षीस म्हणून वाटप केले, ही अनपेक्षित भेट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील, अशीच आहे.

सत्यपाल महाराज योग्य त्या जागी चालू घडामोडी, चित्रपट, कविता, शायरी असे अनेक संदर्भ देत होते, ज्यायोगे प्रेक्षकांतील सर्व गट त्या कीर्तनाशी मनाने जोडले जात होते. महाराजांनी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या वैयक्तिक, सामाजिक कार्याचा देखील नामोल्लेख करून त्यांची योग्य ती प्रशंसा केली, त्यांना प्रोत्साहन दिले. काही कार्यकर्त्यांचा सत्कार अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते घेण्यात आला.

अनेक ठिकाणी महाराजांनी केलेल्या नर्मविनोदाची पेरणी तर अगदी चपखल होती. प्रेक्षक/कार्यकर्ते दिलखुलास दाद देत होतेच आणि विनोदातील गंभीर संदेश देखील सहज समजून घेत होते.

जोषपूर्ण सादरीकरण, उत्तम संदेश आणि समर्पक वाद्यवृंदांची/वादकांची साथ, यामुळे कार्यक्रमाची रंगत काही औरच ठरली.

थोडक्यात, कीर्तन हे माध्यम आजही परिवर्तनाच्या चळवळीसाठी कशा पद्धतीने आपण उपयोगात आणू शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ व प्रत्यक्ष उदाहरणच महाराजांनी आपल्याला स्वत:च्या उक्ती व कृतीतून दाखवून दिले आहे. खरोखरीच ‘सत्यपाल की सत्यवाणी’ हा कार्यक्रम ‘याचि देही, याचि डोळा’ असा जिवंत अनुभव अविस्मरणीय राहिला.