Categories
कविता चळवळ

गाजलेले कविसंमेलन

सत्र 3 रे
जून – २०१६

‘सावध हो देवा, बघ राधे माँ आली’

उपरोधिक आणि अस्वस्थ शब्दांनी

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विचारवंत कवी श्यामसुंदर सोन्नर महाराजांच्या अध्यक्षतेखाली व नीलम माणगावे यांच्या सूत्रसंचालनाने काव्यसंमेलनास बहर आला. मनोहर जायभाये (अंबाजोगाई) यांनी श्यामसुंदर सोन्नर महाराजांची ओळख करून दिली.

कृष्णात कोरे (कोल्हापूर) यांच्या ‘डॉक्टर पुन्हा एकदा वीस तारीख आली’ या कवितेने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर अस्वस्थ झालेल्या अंनिस कार्यकर्त्यांच्या भावना सभागृहासमोर मांडल्या. त्याला जोडूनच उपरोधाच्या अंगाने सोन्नर महाराजांनी ‘सावध हो देवा, बघ राधे माँ आली’ ही कविता सादर करत भोंदूगिरीवरच आसूड ओढले. हमीद तांबोळी (धुळे) यांनीही डॉ. दाभोलकरांवर कविता सादर केली.

देशातील सांप्रत स्थितीबाबत भाष्य करणारी ‘बापू, आपल्या देशात नथुराम राहत आहे’ ही कविता आदिनाथ इंगोले (नांदेड) यांनी सादर केली. याला साथ देत सुभाष वाघमारे (लोणंद) यांनी ‘संविधानासारखा आता माझा गाव होवो’ ही कविता सादर केली.

त्रिशला शहा यांनी ‘भुताची बाधा झाली’ व अनिता खेबुडकर (सांगली) यांनी ‘जात’ ही कविता सादर केली. सुनीला बुद्धिसागर (पिंपरी) यांनी ‘पूर्वी होते मी जिजामाता’ ही स्त्रीमुक्तीवरील कविता म्हटली.

नास्तिकांची भूमिका मांडत महेंद्र पाटेकर यांनी ‘मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा’ ही कविता सादर केली; तर दादासाहेब पोवार यांनी आतापर्यंत झालेल्या विविध भोंदूबाबा-मातांचा समाचार घेणारी ‘सार्‍या या जगात’ कविता गायली.

तरुण कवी राहुल काकडे यांनी ‘बस्स झाले!’ ही जहाल शब्दांची पेरणी करणारी व पुरोगामी नेत्यांच्या खूनसत्राबाबत प्रश्न विचारणारी कविता सादर केली. त्याला जोडून निशांत शिंदे (कोल्हापूर) यांनी ‘अपराजित कलम’ कविता म्हटली.

आताच्या स्त्रियांनी अंधश्रद्धा व अत्याचाराला बळी पडू नये, यासाठी समतादूत नितीन हांडे यांनी ‘सावित्रीची लेक शिकली शाळा’ ही कविता गायली. अभिजित पाटील यांनी पत्रिका जुळवण्याच्या थोतांडाचा समाचार घेणारी कविता सादर केली.

अनिल करवीर यांच्या ‘100 टक्के’ या कवितेने गणेशोत्सवातील बीभत्सेवर बोट ठेवत विनोदी मांडणी करत वाहवा मिळवली. भानुदास पाटील यांनी ‘शाहू, फुले, आंबेडकरांनी दिला इशारा’ ही कविता रांगड्या अंदाजात मांडली.

रोहिदास कावळे यांनी प्रतिगाम्यांना खडा सवाल करणारी ‘माझ्या देशात दोन देश’ कविता सादर केली. रवींद्र कांबळे यांनी टिटवी व सटवीची मार्मिक तुलना मांडली. संतोष काळे यांनी ‘घे निशाण पुन्हा एकदा’ ही कविता मांडली. प्रतिभा जगदाळेताईंनी स्त्रियांना प्रश्न विचारणारी कविता मांडली.

विनय वर्षा यांनी ‘जात’, हिम्मत पाटील यांनी ‘जुने झाले पुराण’, नितीनकुमार यांनी ‘डावे उजवे करता करता’ या कविता सादर केल्या. चंद्रकांत वंजाळे यांनी ‘शेतकर्‍यांची व्यथा;’ तर नीलम माणगावे यांनी ‘शब्दांची ताकद’ कवितेतून मांडली.

सीमा पाटील (कोल्हापूर) यांनी ‘मला मास्तरीण व्हायचंय’ हे कथाकथन सादरीकरण उत्कट भावाविष्कारातून सादर करत सभागृह जिंकले.

श्यामसुंदर सोन्नर महाराजांनी विवेकाची मशाल घेऊन लढणार्‍या विवेकसाथींना अभिवादन केले. त्यांनी प्रतिगामी शक्तींचा विरोध करत वारकरी व अंनिस कार्यकर्त्यांचा संगम विवेकी समाज निर्माण करेल, अशा आशावाद मांडला. ‘चिमणी’ व ‘वणवा’ ही बोधकथा सांगितली व ‘उजाड राने उदास चेहरे’ ही दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडणारी कविता सादर केली.

राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांनी आभार मानले व कविसंमेलनाची सांगता केली.