र. धों. कर्वे यांनी लैंगिक शिक्षणाच्या हेतूने चालविलेल्या समाजस्वास्थ्य या मासिकास तत्कालीन परंपरावादी व सनातनी मंडळींनी विरोध केला. त्यासाठी र. धों.वर अश्लीलतेचा आरोप करून तीन वेळा खटले भरले. एका खटल्यात र. धों. ची बाजू डॉ. आंबेडकर यांनी मांडली होती. आजच्या काळात तर त्यांचे विचार मोकळे आणि प्रागतिक असल्याचे दिसून येते.
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी र. धों.च्या या तीन खटल्यावर आधारित समाजस्वास्थ्य नावाचे नाटक बसविले आहे. त्याचे जोरदार दौरे महाराष्ट्रभर होत आहेत. या निमित्ताने अंनिवाच्या वाचकांसाठी या नाटकाचा परिचय व र. धों. चे कार्य पुन्हा अधोरेखित करण्यासाठी हा नाट्यविशेषांक आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.
“अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूंचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणार्याच्या मेंदूचा गुण होय. – र. धों. कर्वे”
इतरांचा मेंदू ताब्यात ठेवू पाहणारा वर्ग नेहमीच परंपरेचे जोखड अधिक मजबूत करू पाहत असतो. अशावेळी परंपरेने चालत आलेल्या रूढी-रीतिरिवाज यांच्या आहारी गेलेला समाज आपली विवेकबुद्धी अधिकाधिक हरवून बसण्याची शक्यता राहते. ही अविवेकाची परंपरा चुकीच्या धर्मसंस्कारांतून येते. तशी ती हा धर्मसंस्कार इतरांच्या मेंदूवर बिंबवू पाहणार्या आणि आपले वर्चस्व समाजावर दरपिढीत पुनरुज्जीवित करू पाहणार्या व्यक्तींच्या कटकारस्थानी वृत्तीतून अधिक घट्ट होत जाते. अर्थात ती द्रष्टे समाजसुधारक र. धों. कर्वेंच्या पूर्वी होती आणि र.धों.नंतर व आताच्याही काळात सुरू राहिलेली आहे. त्यामुळे समाज फक्त मागे जात नाही, तर एकूण समाजाचे स्वास्थ्यच बिघडते. त्यामुळे समाजस्वास्थ्य राखण्यासाठी र. धों. कर्वेंसारख्या व्यक्तीला काम करावे लागते. तरीही ठराविक काळानंतर अविवेकी परंपरेचा पाया मजबूत करणारा एक वर्ग पुनः पुन्हा तयार होत असतो. तेव्हा-तेव्हा विवेकाच्या जागराचा उद्घोष करण्यासाठी नव्या समाजपुरुषांना काम करावे लागतेच. अशावेळी अपयशाला सामोरे जाऊन आपला बळी गेला, तरी समाजाचा विवेक शाबूत ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहावे लागते.
या पार्श्वभूमीवर अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित र. धों. कर्वे यांच्या विवेकी कार्यकर्तृत्वावरील ‘समाजस्वास्थ्य’ नाटक 1930-40 च्या स्मृती जागृत करीत असले, तरी ते नेमके आजच्या अविवेकी काळाचे भान देऊ पाहते. तसेच आजच्या काळासंदर्भातही काही प्रश्न उपस्थित करू पाहते. त्यामुळेच आजच्या काळातही कर्मठ सनातन विचारांविरुद्धचे एक शस्त्र म्हणूनही त्याचा योग्य प्रकारे वापर करणे शक्य आहे. किंबहुना अतुल पेठेंसारख्या कला ही ज्ञानासाठी आणि ज्ञान हे विवेकासाठीच प्राप्त करायचे असते, असा कलेचा तत्त्वविचार मांडणार्या दिग्दर्शकाला याचसाठी तर ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाचा रंगमंचीय आविष्कार घडवावासा वाटला असण्याची शक्यताच जास्त आहे. पेठे हे समाजचिंतक दिग्दर्शक आहेत. त्यांचा आजवरचा नाट्यप्रवास लक्षात घेतल्यावर आणि दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांनी केलेल्या ‘रिंगणनाट्य’ प्रयोगशीलतेतून याची थेट प्रचिती आली आहे. र. धों. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाद्वारे संततीनियमनाची चळवळ उभारली. तिला अनिष्ट परंपरेच्या समर्थकांनी, स्त्रीचे स्वातंत्र्य अमान्य करणार्या वर्गाने कडवा विरोध केला. झुंडशाहीचा एक गट त्या विरोधात सतत कार्यरत राहिला. त्यांना वाटत होते, ‘समाजस्वास्थ्य’मधून संततीनियमनाच्या जागृतीसाठी येणारे लेखन अश्लील आहे, स्त्रीच्या व्यभिचाराला उत्तेजन देते. त्यामुळे कर्वेंवर वारंवार त्या विरोधात खटले भरले गेले. त्या खटल्यांचे नाट्यरुप या नाटकातून मांडले गेले असले, तरी फक्त ‘कोर्टरूम ड्रामा’ म्हणून हे नाटक प्रेक्षकांसमोर येत नाही, तर त्यातून कर्मठ विचार धर्मबुरख्याआड आपले जात-धर्म वर्चस्व ठेवू पाहणार्यांच्या डोक्यातील सनातनी मळमळ दिसत राहते. त्यामुळेच हे नाटक आजच्या काळातील सनातन वर्चस्व ठेवू पाहणार्या प्रश्नांना भिडू पाहत असल्याचे जाणवत राहते. नाटक तीस-चाळीस सालच्या समाजप्रश्नांवर भाष्य करते. म्हणजे सुमारे पाऊण शतकापूर्वीचे समाजजीवन या नाटकातून प्रेक्षकांसमोर येत असले, तरी तो काळ आणि आताच्या काळातील समाजाच्या आतील रुपात फारसा फरक नाही. काळाबरोबर प्रश्न बदलत गेले, तरी मूळ मानसिकतेत बदल झालेला नाही. उलट आता अशा मानसिकतेतून राज्यसत्तेकडे जाता येत असल्याने तिला खतपाणी घालून ती अधिक बळकट करण्याची आणि विशेष म्हणजे तिचे खुलेआम पालकत्वच स्वीकारण्याची चढाओढ लागली असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले आहेच. हे पालकत्व स्वीकारणार्या संस्थांचे आणि राज्यसत्तेवर आरूढ झालेल्या राजकीय व्यवस्थेचे लागेबांधे असतील, तर मग समाजप्रबोधकांच्या विचाराला आळा घालण्याची एक खेळी खेळली जाते. ती म्हणजे प्रबोधनकारी व्यक्तीच्या, चळवळीच्या विरोधात न्यायव्यवस्था उभी करण्याची. आजही समाजप्रबोधकांना कायमच त्यांच्या विरोधातल्या खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हाही कर्वेंना ‘समाजस्वास्थ्य’मधील लेखनासाठी वारंवार कोर्टकचेर्या कराव्या लागल्या. खटल्यांचे निकाल कायमच त्यांच्या विरोधात जाऊनही एका व्रताप्रमाणे कर्वे मासिक चालवित राहिले. आंबेडकरांना तर र. धों. कर्वेंच्या संततीनियमनाच्या कामाबद्दल कमालीची उत्सुकता होती. बाबासाहेबांनी स्वतःहून कर्वेंना चहाचे निमंत्रण दिले होते. पुढे तर कर्वे पहिला खटला हरल्यानंतर बाबासाहेबांनीच त्यांचे वकीलपत्र घेतले. अर्थात तोही खटला कर्वे हरलेच. पण त्यानंतरच्या स्वतःच बाजू मांडलेल्या खटल्यात तांत्रिक मुद्द्याच्या आधारे ते सुटत असले, तरी पुन्हा त्यांच्यावर खटला दाखल होतो. तेव्हा ते हयातच नसल्याचे सरकारलाही माहीत नसते. संपूर्ण नाटकातून पेठे रूढी परंपरेच्या दबावाखाली दबल्या गेलेल्या वर्गाच्या हातात विवेकाचाच दिवा देऊ पाहताना त्या विरोधातल्या राजसत्तेसह सगळ्यांच्या विरोधातले एक ठाम विधान करू पाहतात. कर्वे म्हणतात, रुढी परंपरेचे दुकान भावनेच्या आधारे चालते. तिथे बुद्धीचा वापर करणार्यांना प्रवेश नाही. अशा लोकांची सत्ता असते, तेव्हा ज्याची सत्ता त्याचा न्याय. तर आंबेडकर म्हणतात, पुराणातील कल्पित गोष्टींना इतिहास समजणे हे राजकारणच आहे. ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाच्या अनुषंगाने कर्वे आणि आंबेडकरांचे हे उद्गार समजून घेतले की, या नाटकाचा अन्वयार्थ आजच्या राजकीय उन्मादाशी कसा लावता येईल, याचे आपल्याला भान येते. अर्थात ‘देऊळ’वाल्या गिरीष कुलकर्णी आणि त्यांच्या इतर सहकारी कलाकारांनी ‘समाजस्वास्थ्य’चा असा आशय आपल्या संयत अभिनयाने अधिक गहिरा केला आहे. तरी बाबासाहेब आणि कर्वेंसारख्या दोन विचारवंतांमधील संवाद लेखक अजित दळवी यांनी बौद्धिक चर्चेच्या अनुषंगाने वाढविले असते, तर त्या दोघांच्या भेटीच्या प्रसंगाला अधिक नाट्यरुपता आली असती. अर्थात एकूण नाटकावर त्याचा काही परिणाम होत नाही.
अतुल पेठे यांचे नाट्य अवकाश वेगळे आहे. ते कृतिशील नाट्यकर्मी आहेत हे या नाटकामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा नाटककार प्रत्येक भाषेच्या रंगभूमीवर वाढत जातो, तेव्हा तो रंगभूमीच्या दिग्गजांच्या नाट्यसमजालाच आव्हान देत असतो.