Categories
मुलाखत

चांगल्या लोकांनी चांगले विचार मांडत राहिले पाहिजे!

मे - २०१७

माणसांचं कामजीवन आणि लैंगिक शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यावर बोलणं हे आजही आणि सत्तर वर्षांपूर्वीही असभ्य आणि असंस्कृत समजलं होतं. पण अशाही परिस्थितीतही र. धों. कर्वे या आधुनिक समाजसेवकाने त्यावर बोलण्याबरोबरच सामाजिक शिक्षण व्हावं या हेतूने ‘समाजस्वास्थ्य’ नावाचं नियतकालिकही चालवलं. हे करत असताना र. धों. कर्वे यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. त्यात त्यांच्यावर तीन न्यायालयीन खटले भरण्यात आले. या खटल्यांना उत्तरे देताना र. धों. कर्वे यांची जी कोंडी झाली आणि त्यांनी लैंगिकतेबाबतीत जी मतं मांडली, याचाच उलगडा सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकातून करण्यात आलाय. हे नाटक ज्येष्ठ नाटककार अजित दळवी यांनी लिहिलंय. त्यांच्याशी केलेली बातचीत.

आजच्या सामाजिक परिस्थितीत र. धों. च्या जीवनातील या घटनांवर आधारित हे नाटक का लिहावंसं वाटलं ?

काही वर्षांपूर्वी अमोल पालेकरांनी र. धों. च्या आयुष्यावर ‘ध्यासपर्व’ हा चित्रपट काढला होता. या चित्रपटाच्या पटकथा आणि संवादलेखनात माझा सहभाग होता. त्यात र. धों. हा माझ्या आवडीचा विषय.. महाराष्ट्रात स्वतंत्र विचार करणारे आणि त्याची कोणतीही किंमत मोजणारे काही मोजके विचारवंत होते त्यात र. धों. हे एक आहेत. र. धों. यांच्या विचारांमध्ये संततीनियमन आणि लैंगिक शिक्षण हे दोन महत्त्वाचे विषय होते. ‘ध्यासपर्व’ या चित्रपटात ‘संतती नियमन’ या विषयाला महत्त्व देण्यात आलं होतं. पण त्यांच्या इतर कामाचा परिचय या चित्रपटातून होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याचं आकर्षण माझ्या मनात होतंच. माझे मित्र जयंत पवार मला एकदा म्हणाले की तुम्ही का लिहीत नाही या विषयावर? त्यामुळे पुन्हा या विषयावर लिहावंसं वाटलं. त्यातच आपल्या आसपास अशा काही घटना घडत होत्या, आजही घडतायेत. विचार न करता भावनेच्या आधारावर झुंडशाही वाढतेय. त्यातच आपण पाहिलं की, दाभोलकर-पानसरेंचं काय झालं. त्यामुळे आपल्याला अघोषित सेन्सॉरशिपला सामोरं जावं लागतंय, विचार करणार्‍या माणसांची कोंडी सध्या समाजात वाढतेय. आजच्या परिस्थितीत कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकत नाही, तर र. धों. च्या काळात ही परिस्थिती किती गंभीर असेल, त्या परिस्थितीत र. धों. ची किती कोंडी झाली असेल, त्याला त्यानी कसे तोंड दिले असेल, असा विचार मनात येतो. त्याला तोंड देत र. धों. नी कैक वर्षं ‘समाजस्वास्थ्य’ हे नियतकालिक चालवलं, त्यातून ‘कामजीवना’बद्दल मांडणी करत राहिले. दहा वर्षांच्या कालावधीत र. धों.वर तीन खटले लादण्यात आले आणि या सर्व खटल्यात र. धों.वर चुकीचे आरोप ठेवले गेले त्याला र. धों. नी ज्या पद्धतीने तोंड दिलं, खटल्याला जी उत्तरे दिली त्यातून जी वैचारिक घुसमट झाली, लैंगिक स्वातंत्र्याची चर्चा झाली आणि हे सगळं करत असताना र. धों. चा जो कोंडमारा झाला, तो आजच्याही स्थितीत मला जसाच्या तसा महत्त्वाचा वाटला म्हणून मी हे नाटक लिहायला घेतलं..

नाटक लिहिण्याची नेमकी प्रक्रिया कशी होती?

नाटक लिहिण्याचा विचार जसा मनात आला, तसे मी र. धों.च्यावरचे खंड वाचायला घेतले. र. धों. तसे माझ्या आवडीचे असल्याने पूर्वीपासून मला त्याबाबत माहिती होती. नाटक लिहीत असताना मी सुरुवातीला दोन ड्राफ्ट तयार केले. एक विवेकी र. धों. आणि दुसरं म्हणजे लोकशाहीवादी र. धों.; पण नंतर मला आणि अतुल पेठेंना वाटलं की, र. धों. वर ज्या तीन कोर्ट केसेस चालल्या त्या कोर्ट ट्रायल्सवर जर आपण नाटक केंद्रित केलं, तर विचारी माणसांची जी कोंडी होते त्याचं प्रतिबिंब निर्माण करता येईल. आणि मग त्या पद्धतीने मांडणीला सुरुवात केली. र. धों. चं आयुष्य हे सर्वव्यापी आहे. पण लैंगिक शिक्षणाच्या कार्यात त्यांची जी कोंडी झाली, ती मांडण्याचा प्रयत्न या नाटकात झालाय. र. धों. चं बाकी आयुष्य मात्र यात काही मांडलं नाही. या नाटकात केसेससंबंधीची माहिती घेण्यात आली आहे, त्यामुळे हे नाटक पहिल्या काही वेळात कोर्टात जातं आणि फाईटला सुरुवात होते. त्यावेळचे र. धों. चे जे काही विरोधक होते, त्यांचाही अभ्यास करावा लागला आणि दोन्ही बाजू समजून घेऊन र. धों. ची झालेली कोंडी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मी स्वतः नाट्यमय संवाद लिहिण्यापेक्षा र. धों. च्या भाषेत संवाद लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलाय. त्यामुळे हे नाटक अधिक वास्तववादी बनलंय.

नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं?

नाटकाचा प्रयोग बघून कसं वाटलं, हे सांगण्यापेक्षा या नाटकाची बसवण्याची जी प्रक्रिया होती, ती मला खूप महत्त्वाची वाटते. हे नाटक अतुल पेठेंनी ज्या कल्पकतेने बसवलंय, त्याबाबत मी जास्त समाधानी आहे. या आधीच्या नाटकाचे जे दिग्दर्शक होते. त्यांच्या डोळ्यांसमोर ते नाटक असायचं आणि ते फटाफट बसवत जायचे; पण अतुल पेठे मात्र नाटक बसविण्याच्या प्रक्रियेतच नाटक उलगडत जातात. इतर नाटकांची दीड-एक महिन्याच्या वर तालीम कधीच चालत नाही. कारण ते कुणाला परवडतच नाही. कारण कुणाला सीरियल करायच्या असतात, कुणाला चित्रपट, कुणाला आणखी काही; पण या नाटकाची बसवण्याची प्रक्रिया मात्र चार-साडेचार महिने चालली. या नाटकात कलावंतही त्यांनी फार कुठे न अडकलेले घेतले. त्यात आमचा लेखक मित्र आहे धनंजय सरदेशपांडे, राजश्री सावंत जिला खूप अनुभव आहे. गिरीष आहे त्याच्या अनुभवाचा तर काही प्रश्नच नाही. पण या व्यतिरिक्त जे कलावंत आहेत त्यांना मात्र अतुल पेठेंनी स्वतःच्या मुशीतून तयार केलेलं आहे. त्यामुळे र. धों. ची जी कोंडी आहे, ती मांडण्यापर्यंत हे नाटक गेलेलं आहे. साडेचार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे दोन तास 12 मिनिटांचं नाटक तयार झालं. हे नाटक म्हणजे बसविण्याची निव्वळ एक प्रक्रिया नव्हती, तर या कलाकारांचीही मानसिक तयारी करून घेण्यात आली होती. यासाठी त्यांना काही पुस्तकं वाचायला देण्यात आली. त्यांच्यासाठी एक शिबीर घेण्यात आलं. यात स्त्री-पुरुष यांचे गुप्त समजले जाणारे अवयव इथपासून सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. या सगळ्यातून हे कलाकार तयार झाले आणि त्यानंतर हे नाटक उत्तम पद्धतीने वठलेलं आहे. त्यामुळे ही सगळी जी प्रोसेस होती ती मला लेखक म्हणून खूप वेगळी आणि महत्त्वाची वाटते.

या नाटकाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे?

या नाटकाला मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. पहिला प्रयोग पुण्यात विनोद दोशी फेस्टिव्हलमध्ये झाला. त्यानंतर मुंबईत झाला. अशा तीन-चार प्रयोगांना मी स्वतः उपस्थित होतो. या सर्व ठिकाणी नाटक संपल्यानंतर उभं राहून मानवंदना दिली. ही बाब माझ्यासाठी खूप आनंददायक होती. हे नाटक पाहताना प्रेक्षकांना सतत वाटत राहतं की, हे नाटक 30-40 च्या दशकातलं नाही, तर ते आजचंच आहे. आज आम्हाला जे आजूबाजूला पाहायला मिळतंय, त्याचीच ही एक प्रतिक्रिया आहे.

या नाटकाचं फलित काय असेल असं तुम्हाला वाटतं?

नाही. या नाटकाचं फलित असं नाही सांगता येणार. ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा!’ हे नाटक मी लिहिलं आणि ते गाजलं तेव्हा लगेच मेडिकल प्रोफेशन सुधारलं असं होत नाही किंवा ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा!’ हे नाटक दहा वर्षांनंतर दुसर्‍यांदा बसवलं गेलं तेव्हा एका टी.व्ही. मुलाखतीत विचारलं गेलं कसं वाटतंय, तेव्हा मी उतर दिलं होतं की, लेखक म्हणून बरं वाटतंय की आपलं नाटक पुन्हा बसवलं जातंय वगैरे. पुन्हा दुःख याचं वाटतं की, समस्या आजही तिथेच आहे. अगदी तसं र. धों. नी सांगितलं म्हणून समाज बदलला का, तर नाही. पण चांगल्या लोकांनी चांगले विचार मांडत राहिले पाहिजे. जे सत्य आणि जे असत्य आहे, ते समाजात सांगायला पाहिजे आणि ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे, असं मी मानतो आणि त्यामुळे मी हे नाटक लिहिलेलं आहे.

मुलाखतकार :- दत्ता कानवटे, पत्रकार, औरंगाबाद.