Categories
कायदा

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

जून - २०१८

राज्यस्तरीय पहिली कार्यशाळा संपन्न

3 जुलै 2017 पासून सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा अंमल सुरू झाला. आपल्या देशात असंख्य कायदे आहेत; परंतु त्यांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी प्रभावीपणे न झाल्याने कायद्यामागचा उद्देश सफल होत नाही. जादूटोणा विरोधी कायदा; तसेच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा हे दोन्ही कायदे महाराष्ट्र अंनिसच्या चळवळीच्या रेट्यातून व गरजेतून झाले आहेत. या कायद्याच्या प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अंनिसनेच शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता आपले काम सुरू केले आहे. जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसारासाठी अंनिस कार्यकर्त्यांनी 34 जिल्ह्यांत 85 दिवस प्रबोधन यात्रा केली.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी राज्य परिषद 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिष्ठानच्या नरीमन पॉईंट येथील सभागृहात झाली. त्या नंतरचा कायदा अंमलबजावणीतला प्रमुख टप्पा म्हणजे कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दि. 29 व 30 रोजी नवी मुंबईतील आग्रोळी गावात कॉम्रेड बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालयात झाले. सकाळी 9.30 वाजता नोंदणी सुरू झाली. राज्यभरातील 75 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. त्यातील 7 वकील, 5 पीडित व अन्य अंनिस कार्यकर्ते, बार्टी समतादूत व काही शासकीय अधिकारीही होते. 10 वाजता चळवळीची गाणी सुरू झाली. त्यानंतर 11 वाजता सुरू झाले ते उद्घाटनाचे सत्र. या सत्रात विचारमंचावर महा.अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे व कायदा विभाग कार्यवाह अ‍ॅड. मनीषा महाजन उपस्थित होत्या.

आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे स्वागत नवी मुंबई शाखेचे सचिव सुहास शिंगारे यांनी केले. त्यानंतर अंनिसच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्यांनी कायद्याची पार्श्वभूमी, इतिहास, विविध बहिष्कार प्रकरणे व जातपंचायत बरखास्ती यासंबंधी माहिती दिली. जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा हे दोनही कायदे चळवळीच्या परिश्रमातून, प्रयत्नातून झाले आहेत. ते चळवळीच्या इतिहासातील सुवर्णपान आहेत, असे त्या म्हणाल्या. या सत्राचे मुख्य भाषण महा. अंनिसचे कार्यवाह अविनाश पाटील यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी यापूर्वी झालेला जादूटोणाविरोधी कायदा लोकांपर्यंत पोचवण्यास शासन अपयशी ठरले; परंतु महा. अंनिसने या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी महाराष्ट्रभर यात्रा काढली. एक लाख कायदा पुस्तिका वाटल्या. कार्यकर्त्यांनी 10 हजार भाषणे केली आणि 450 केसेस या कायद्यान्वये दाखल झालेल्या आहेत. 20 केसेसमध्ये शिक्षा झाल्या. त्यामुळे अंमलबजावणीबाबतचे सर्व आक्षेप गळून पडल्याचे सांगितले. अविनाशभाईंनी चळवळीचे टप्पे, त्यात मिळालेले यश, चळवळीचे व्यवस्थापरिवर्तनाच्या दिशेने चाललेले काम यांचा आढावा घेतला. जातपंचायत मूठमाती अभियान या विषयावर अविनाशभाईंनी प्रश्न, स्वरूप व व्याप्तीचा दृष्टिकोन या विषयावर विस्तृत विवेचन केले. जातीची उतरंड, त्यातून होणारे शोषण, मूकपणे सहन करणारे पीडित व आवाज न उठवणारा समाज हे सांगतानाच कायदा समजून घेणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे, अंमलबजावणी करणे, जिल्हा पातळीवर प्रशिक्षण आयोजित करून प्रबोधन करावे, असे सुचविले. तसेच कायदा हे या समस्येवर अंतिम उत्तर नाही; ते एक शस्त्र आहे, त्याचा उपयोग करा. जात वास्तव व जातपंचायतीच्या माध्यमातून होणार्‍या शोषणाची जाणीव समाजातल्या बोलक्या वर्गाला करून देणे आवश्यक आहे. धर्माची जागा संविधानाने घेतली पाहिजे. हे आव्हानात्मक काम आहे. कायदा झाला, त्याची नियमावलीही अंनिसने ‘बार्टी’च्या सोबत तयार केली आहे. आता कायदा झाला, आपले काम संपले, मोहीम बंद असे समजू नये. तसेच हा कायदा जातपंचायतीच्या विरोधी नाही; त्यांच्या शोषक न्यायनिवाड्याच्या विरोधी आहे. पुढील काळात बाधित लोकांनी मोहीम चालवावी, त्यांची यंत्रणा उभी करावी, त्यांना दिशा द्यावी व संविधानाला अभिप्रेत अशी जात-धर्मविरहित व्यवस्था निर्माण करूया. आपण या विषयाचे ‘पायोनिअर’ आहोत, असे सांगून माध्यमांचे व बाधितांचे भरीव योगदान यांचा उल्लेख अविनाश पाटील यांनी केला.

याच सत्रात कृष्णा चांदगुडे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, “जातपंचायतीची दहशत, त्याला बळी पडलेले सुधारक, धर्मगुरू, बळी पडत असलेले राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, खेळाडू, गिर्यारोहक ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी गावकी, भावकी, आदिवासी, भटका समाज व अन्य जातसमूह यांच्यात असलेल्या शोषक प्रथा त्यांनी मांडल्या. बाहेरच्या राज्यातील खापपंचायतीचा बोलबाला ‘सत्यमेव जयते’मध्ये झालेला पाहताना नाशिकमध्ये घडलेल्या प्रमिला कुंभारकरचे प्रकरण पुढे आले. बापानेच 9 महिन्यांच्या गरोदर मुलीचा गळा घोटला. खोलात गेल्यावर समजले की, हे सर्व घडले ते जातपंचायतीच्या दबावामुळे. त्यानंतर महाराष्ट्रातली अनेक भयानक प्रकरणे समोर आली व जातपंचायत मूठमाती अभियानाला सुरुवात झाली. चांदगुडे यांनी जातपंचायतीच्या मनमानीची अंगावर शहारे आणणारी अनेक प्रकरणे सांगितली. अंनिसने केलेला पाठपुरावा, जातपंचायत मूठमाती अभियानांतर्गत घेतलेल्या परिषदा, कोर्टात गेलेली प्रकरणे, कोर्टाचा कायदा करण्याबाबतचा शासनाला केलेला आदेश, माध्यमांचा पाठिंबा, कार्यकर्त्यांचे कष्ट व चिकाटी या सर्व घडामोडींतून सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अस्तित्वात येण्यापर्यंतचा इतिहास कृष्णा चांदगुडे यांनी कथन केला.

दुपारी 1.30 ते 2.30 जेवणाची वेळ. नवी मुंबईकरांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वांची छान बडदास्त ठेवली होती. साधे-सुटसुटीत रूचकर भोजनानंतर 2.30 वाजता पुन्हा चळवळीचे गीत झाले. गीतानंतर अ‍ॅड. मनीषा महाजन यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा-परिचय व स्वरूप अनुसूचीसह समजावून सांगितला. प्रत्येक कलमाचा अर्थ सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितला, तर अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत केस दाखल करताना उपयुक्त पूरक कायद्यावर सविस्तर चर्चा केली. अ‍ॅड. पाटील यांनी भारतीय दंडविधान संहिता, पॉक्सो, अ‍ॅट्रॉसिटी या व अन्य पूरक कायद्यामधील कलमे कशी व कधी लागू होतात, याचे विवेचन केले.

यानंतर सहभागी कार्यकर्ते, पीडित यांच्या शंका, प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. कार्यकर्ते, पीडित-प्रशिक्षणार्थींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना व शंकांना उत्तर देत कायद्यातील पळवाटा, त्रुटी व त्यावरचे उपाय यावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत उत्तर देण्यासाठी अ‍ॅड. रमेश महाजन, अ‍ॅड. गोविंद पाटील, अ‍ॅड. तृप्ती पाटील, अ‍ॅड. मनीषा महाजन, अ‍ॅड. रंजना गवांदे सहभागी झाल्या होत्या. याच दिवसाच्या शेवटच्या सत्रात अविनाश पाटील यांनी कायदा अंमलबजावणी आराखडा मांडला. 1 मे 2018 पासून वर्षभर राज्यात अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगून मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. या अंमलबजावणी मोहिमेत पोस्टर्स, पुस्तक, पी.पी.टी. व्याख्यान, चळवळीचे गीत, लघुपट, पीडितांचे अनुभवकथन, या माध्यमांचा उपयोग केला जाणार आहे. या कायद्याचा प्रचार-प्रसार भटके-विमुक्त, आदिवासी बहुजनांमधील जाती-जमाती संस्था यांच्यामध्ये करायचा आहेच; परंतु शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, वकील संघटना, पत्रकार, समविचारी संघटना यांच्या पर्यंत पोचून कायदा अंमलबजावणीसाठी समाजातील या महत्त्वाच्या घटकांना सोबत घेण्याची आवश्यकता भासली असल्याचे त्यांनी सुचविले. त्यानंतर ‘तोलक’ या जातपंचायतीचे भयाण वास्तव दर्शविणारा व अस्वस्थ करणारा लघुपट दाखविण्यात आला.

दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता दुसर्‍या सत्राची सुरुवात चळवळीच्या गीतांनी झाली. त्यानंतर प्रथम सत्रात अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अंमलबजावणी; तरतुदी व उपाययोजना यावर विस्तृत विवेचन केले. विविध प्रकरणांची उदाहरणे देऊन कोणकोणत्या अडचणी येतात, याविषयी माहिती दिली. पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणेलाही कायदा माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कायदा प्रचार-प्रसारासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, पेशन्स ठेवून प्रकरणांचा पाठपुरावा करावा लागेल. पाठपुरावा करूनही पोलीस केस दाखल करून घेण्यास नकार देत असतील, तर कोर्टात केस दाखल करता येईल. केस कशी दाखल करावी, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्ता म्हणून आपला कस लागणार असून चिवटपणे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पीडित कोमल वर्दे यांनी काशीकापडी समाज जातपंचायत व त्यांच्याकडून होणारे शोषण याबाबत आपले अनुभव मांडले. नंतर अविनाशभाईंनी अ‍ॅड. भूपेश सावंत यांचा परिचय करून दिला. त्यांनी ‘कायदा अंमलबजावणीतील अडथळे, अडचणी व पर्याय’ या विषयावर बोलताना कायदा व त्यातील काही त्रुटी यांचे विश्लेषण केले. केस दाखल करताना घ्यायची काळजी, यावर मार्गदर्शन केले. केस विरोधात गेल्यास जातपंचांना बळ मिळेल. म्हणून गुन्हा सिद्ध करण्यासाठी घ्यायची काळजी याचीही माहिती दिली. या कायद्याबरोबरच काही दिवाणी स्वरुपाच्या नुकसानभरपाई सारख्या तरतुदींचाही उपयोग करता येईल, असे सांगितले. अ‍ॅड. सावंत यांच्या मार्गदर्शनानंतर चळवळीचे कार्यकर्ते असलेले माजी न्यायाधीश अ‍ॅड. तिडके यांनी कायदा व धोका याबाबत मार्गदर्शन करताना केस दाखल करताना घ्यायची काळजी याविषयी माहिती सांगितली. उपस्थित असलेल्या पीडितांचे अनुभवकथन झाले. या पीडितांमध्ये पुण्याहून अलेल्या कृष्णा इंद्रिकरांच्या बहिणीने; तसेच पांडुरंग चौगुले व कृष्णा इंद्रिकार या पीडितांनी अनुभवकथन केले.

अविनाशभाईंनी कायदा अंमलबजावणीविषयी ऊहापोह केला. उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आपल्या प्रतिक्रिया देताना कायदा अंमलबजावणी मार्गदर्शिका तयार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कायदा अंमलबजावणीबाबत पुन्हा विस्तृत चर्चा, शंका व प्रश्न-उत्तर झाले. शेवटी हम होंगे कामयाब! या गीताने प्रशिक्षण वर्गाची सांगता झाली.

संपर्क : 9850491611