Categories
कायदा

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा राज्यव्यापी अंमलबजावणी मोहिमेची उत्साहात सुरुवात

जून - २०१८

पहिला टप्पा – 1 ते 12 मे 2018

समाजसुधारकांचा वसा आणि वारसा जोपासणार्‍या महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी जे काही प्रयत्न झाले, त्यात ‘जातपंचायत’ व त्या आधारे दिले जाणारे न्यायनिवाडे यांना धक्का देण्याचा प्रयत्न किंवा त्याविरुद्ध बंड, मोर्चा, धरणे, आंदोलन, शासनाला निवेदन, जिल्हाधिकार्‍यांना घेराव असा प्रयत्न झाल्याचेही वाचनात नाही.

अशा पार्श्वभूमीवर 3 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शासनाकडून कायदा राजपत्रात प्रसिद्ध करवून घेणे हा क्षण अंनिसच्या 29 वर्षांच्या कारकिर्दीत नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा आहे. अर्थात, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ‘जातपंचायतीला मूठमाती अभियाना’चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, चळवळीतील वकिलांचा चमू या सर्वांचे अथक परिश्रम, दूरदर्शीपणा, चिकाटी, प्रकरण धसास लावण्याचे कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

महाराष्ट्र अंनिस ही कर्त्या सुधारकांची चळवळ असल्याने कायदा झाला. आता जातपंचायती कायद्याच्या कक्षेत येतील या भाबड्या आशेवर आपण निवांत थांबलो नाही. एका बाजूला कायदा पारीत केला म्हणून राज्य सरकारचे कौतुक, तर दुसर्‍या बाजूला कायदा अंमलबजावणीबाबत शासन वेळोवेळी दाखवत असलेली उदासीनता याची जाणीव चळवळीला होतीच. त्यामुळे कायदा पोचवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मअंनिसने 1 मे 2018 ते 1 मे 2019 पर्यंत सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा राज्यव्यापी मोहिमेचे आयोजन करत आहे.

उद्घाटन मोहिमेचे :-

मागासवर्गीय व उच्चभ्रू समाजातील पीडितांना नैतिक बळ देणार्‍या, त्यांचे जीवनमान उंचावणार्‍या या कायद्याच्या प्रचार मोहिमेचे उद्घाटन दि. 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हुतात्मा चौकात (फ्लोरा फाऊंटेन, मुंबई) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करून केले. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी उपस्थितांसमोर या कायद्याचा लढा व गरज याबाबत छोटेखानी भाषण केल्यानंतर “विवेकाचा आवाज बुलंद करूया” या घोषणांनी परिसर दुमदुमला. वाहिन्या व वर्तमानपत्रांच्या कॅमेर्‍यांनी हा उत्स्फूर्त क्षण कॅमेर्‍यात कैद केला.

दुतर्फा बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी पोस्टर्स व बॅनर्स वाचून मअंनिस आता ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ सोडून या प्रश्नांवर काय काम करणार आहे, अशा संभ्रमात दिसत होते. शेवटी ते आमच्या गटाकडे कूच करून आले व तुमचा प्रमुख कोण? अशी विचारणा केली. अविनाशभाईंनी सर्व समजावून दिल्यानंतरही त्यांच्या मनातील अंधश्रद्धांविषयीच्या चमत्कारसदृश घटना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. मी जे पाहिलंय तेच खरे-खुरे या आविर्भावात ते चमत्कारांच्या सुरस कथा सांगू लागले. मग काय? चमत्कार सादरीकरण हे चळवळीचे ‘ब्रेड अँड बटर’ आहे, असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत. त्याप्रमाणे प्रकाशन विभागाचे कार्यवाह प्रा. मच्छिंद्र मुंडे व राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी आपले हत्यार उपसले. दोघांचे चमत्कार सादरीकरण पाहून मुंबईच्या युनिटसाठी असा कार्यक्रम करूया म्हणत निरोप घेतला.

दरम्यान, ठीक नऊ वाजता कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रचार मोहिमेसाठी सजवलेल्या आर्टिगा गाडीला हिरवा झेंडा दाखवला. गाडी काही अंतर संथ गतीने चालवली. मीडियावाल्यांनी लखलखाट केला, शूटिंग केले, अविनाश व मुक्ता यांच्या बाईट्स घेतल्या, पुन्हा एकदा घोषणा, उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर समाधान, तर कामगार दिन असल्यामुळे विविध कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. अंनिसचे हे काय?

प्रचारमोहीम टप्पा?

7 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे जी राज्यव्यापी अंमलबजावणी परिषद झाली, त्या परिषदेतच प्रचारमोहिमेचे टप्पे जाहीर करण्यात आले होते. संपूर्ण वर्षभराचे जिल्हावार नियोजन घोषित केले गेले. काही टप्प्यांत तीन जिल्हे, तर काही टप्प्यांत चार जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. एका जिल्ह्यात किमान तीन दिवस प्रचार यात्रा अशा प्रकारे एका टप्प्यात कमीतकमी नऊ दिवस तर जास्तीत जास्त 12 दिवस प्रचार यात्रा कार्यरत राहील.

नवी मुंबईतील बेलापूर येथील 29 व 30 रोजी झालेल्या प्रशिक्षणानंतर लगेचच 1 ते 9 मे असा पहिला टप्पा सुरू झाला. या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यांचा समावेश होता. पहिल्या टप्प्याची संपूर्ण जबाबदारी राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे व प्रकाशन विभागाचे कार्यवाह प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी स्वीकारली होती. या प्रचार दौर्‍यात लक्ष्य गट म्हणून पोलीस स्टेशन्स, पोलीस पाटील, वकील संघटना, पत्रकार संघ, आकाशवाणी, महाविद्यालये, वसतिगृहे, बचतगट, कामगार संघटना, मजुरांचे अड्डे, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, महिला मंडळे, जातींच्या वस्त्या, युवा गट आदी ठरले होते.

पहिला टप्पा सुरू असताना थोडी धाकधूक होती. कारण कार्यक्रमाचे एकही बुकिंग हातात नव्हते. कडक उन्हाळा, महाविद्यालये बंद, 50 ते 60% ठाणे, मुंबईकर गावाकडे, हुकमी कार्यकर्तेही गावाकडे, लग्नसराई, प्रशासनातले बहुतांश अधिकारी रजेवर, कार्यक्रम मिळवायचे कसे? करायचे कुणासाठी? याला कुठल्या उपनगरात न्यायचे? हे सगळे प्रश्न ‘आ’ वासून उभे; पण हार मानून थांबेल तो अंनिसचा कार्यकर्ता कसला? लक्ष्य तो हर पल पाना है। या उक्तीप्रमाणे “काट्यावरून जाता, मागे न पाय घेऊ!” आम्ही चालत गेलो, कार्यक्रम मिळत गेले.

बोहनीचा कार्यक्रम :-

उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून आमची सजवलेली गाडी नायगाव-दादरच्या दिशेने अगदी डौलात निघाली. कौतुकाच्या, कुतुहलाच्या, शंकेच्या नजरा गाडीवर खिळत होत्या. वेळेच्या आधीच आम्ही ‘विद्यार्थी मित्र समिती’ नायगाव-दादर येथे पोचलो. संस्थापक विद्याधर खंडे, त्यांच्या पत्नी पुष्पा खंडे यांनी स्वागत केले. भरचौकात छोटेखानी स्टेज उभारले होते. हाडाचे कार्यकर्ते राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या उत्साहाला उधाण आले. गाडीतले सर्व बॅनर उन्हाची तमा न बाळगता लावले व वातावरणनिर्मिती केली. लोक खुर्च्यांवर विसावू लागले. संख्या तुरळक होती; पण अनुभव सांगत होता, ‘तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर!” तसेच झाले. परिसर बहरू लागला आणि उन्हाच्या झळांचे रूपांतर गार झुळुकेत झालं. वाटसरू गाड्या पार्क करून थांबू लागले. कायद्याची पार्श्वभूमी, दिलेला लढा, भीषण वास्तव व कायद्यामुळे मिळणारा दिलासा हे सगळं मी बोलत असताना “या अशा जातपंचायती आपल्याकडे असतात?” असा भाव मला श्रोत्यांच्या चेहर्‍यांवर स्पष्ट दिसत होता. बावगे सरांनी केलेल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला होता.

‘अंनिवा’च्या सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी काही निवडक कलमं व शिक्षेच्या तरतुदी सांगून पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन केले. भर उन्हात उभे असलेल्या श्रोत्यांचे आभार मानून आम्ही कार्यक्रम संपवला. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते यांना कळलं की, मअंनिसवाले आले आहेत. ते खास आम्हाला भेटायला आले. गप्पा झाल्या, मुंबईत काही मदत हवी असल्यास जरूर कळवा, असे सांगून निघून गेले. 1 मे हा विद्यार्थी मित्र समितीचा वर्धापन दिन असल्याने मअंनिससारख्या मातब्बर संघटनेचा प्रबोधनाचा कार्यक्रम; तोही हाऊसफुल्ल झाल्याने मंडळाचे कार्यकर्ते खूश झाले व आग्रहाने आम्हाला जेऊ घालत होते.

यानंतर आमची गाडी पवईच्या दिशेने निघाली. वाटेत परेल, भोईवाडा स्टेशन लागले. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कायद्याची प्रत दिली. त्यांनीही पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रम लावण्याचे आश्वासन दिले. आरे कॉलनीत जाण्यापूर्वी वाटेत गोरेगाव लागले. चहाची तलफ सर्वांनाच आली होती. गोरेगावहून जाताना ज्येष्ठ, उत्साही कार्यकर्त्यांना भेटून जायचं ठरलं. प्रभाताईंनी थंड व गरम चहा देऊन उबदार स्वागत केलं. यात्रेची गाडी पाहून पुरोहित कुटुंबीय खूश झाले.

अंनिसच्या शिरस्त्याप्रमाणे वेळेपूर्वी पवईत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. कार्यक्रमाला तब्बल दीड तास विलंब. एरव्ही घाई करणारे मुंडे सरही शांत बसले होते. ‘श्रमिकराज जनरल कामगार संघटने’च्या वतीने अंनिसचे कार्यकर्ते देविदास पंडागळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी व मुक्ता कायद्यासंदर्भात बोललो, तर मुंडे सरांनी ‘हाथ की सफाई’ केली.

कार्यक्रम संपवताना ‘काही शंका?’ असे विचारल्यावर कदम नावाचा दापोली, रत्नागिरीचा युवक उभा राहिला व जातपंचायतीचा तो शिकार असल्याचे त्याने सांगितले. निव्वळ सहज काम करताना ऑफीसमध्ये आपल्या मुस्लिम मालकाची टोपी स्वत:च्या डोक्यावर घातली म्हणून ‘बौद्ध समाज पंचायत’ गावकीने धर्माच्या मुद्द्यावरून त्याला बहिष्कृत केले होते.

2 मे रोजी आम्ही कल्याण व ठाणे तालुक्यातील महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला भेटी देण्याचा सपाटा लावला. कारण कायदा पोचवण्यासाठी ही माध्यमं उपयोगी ठरणारी होती. मी, मुंडे सर, उत्तम जोगदंड, सुरेखा भापकर व विनोद शेलोरे असे सर्वजण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा. गोविंद बोडके, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सरकटे सर, शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जे. जे. तडवी इत्यादी मंडळींना भेटलो आणि प्रशासनातले अधिकारी रूक्ष असतात, हा गैरसमज दूर झाला. जुलैमध्ये शिक्षण विभागातर्फे कार्यक्रम लावण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले.

विशेष म्हणजे प्रशासकीय इमारतींच्या आवारात बाहेरच्या गाड्यांना मज्जाव होता; मात्र गाडीवरच्या बॅनर्सनी आमचं काम सोपं केलं आणि विवेकाचा आवाज बुलंद होण्यास मदत झाली. कल्याणहून आम्ही निघालो ते थेट ठाणे जिल्हाधिकारी, दंडाधिकारी इमारतीच्या गेटपाशी. मोर्चा वळवला समाजकल्याण कार्यालयात. मा. उज्ज्वला सपकाळे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, ठाणे यांना भेटलो. त्या म्हणाल्या की, सध्या पालघर जिल्हा पोटनिवडणुका असल्याने आपले कार्यालय व्यस्त आहे; मात्र उचित प्रसंगी आपण कायद्याचा सेमिनार जरूर लावू, अशा आश्वासक संवादाने आम्ही मार्गस्थ झालो.

यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर यांना पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण लावण्याचा प्रस्ताव सादर केला. संबंधित अधिकारी कार्यालयात नव्हते. मात्र त्यांच्या पी.ए.ने म्हणणे ऐकून घेतले व पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे ग्रामीण यांची भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत कदम यांची भेट घेतली. भेटीचा हेतू समजल्यावर असे जातपंचायतींचे प्रकार ठाणे जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात नाही, असे म्हणाले; मग काही दाखले दिले. मग विषय चमत्कारांवर आला, मुंडे सर तत्परच होते. त्यांनी नोटांचा पाऊस पाडून दाखवला. मग साईबाबा पाण्याने दिवे कसा पेटवायचा, यावर चर्चा. जवळपास 40 मिनिटे विविध विषयांवर चर्चा करत आमच्या कुवतीचा अंदाज घेत, “आमच्या ठाणे जिल्हा युनिटसाठी कायदा व चमत्काराचे एक सत्र घ्या”, असं त्यांच्याकडून वदवून घेऊनच आम्ही उठलो, बाहेर येऊन पाहिलं, तर भेटणार्‍यांची रांग खोळंबलेली होती.

यानंतर अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात डांगेसाहेबांची भेट घेतली. अंनिसच्या कार्डवर हमखास प्रवेश मिळत होता. त्यांनी योग्य ती दखल घेतली व जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व प्रकल्प अधिकार्‍यांसाठी पत्रक काढून सर्व शासकीय वसतिगृहांत कार्यक्रम लावतो. अशी एकूण 72 वसतिगृहे व 180 आश्रमशाळा असल्याचे ते म्हणाले. या सर्व भेटीतून आम्ही बी पेरण्याचे काम करत होतो. कायदा पुस्तिका, पोस्टर्स, स्टिकर्स प्रत्येक अधिकार्‍याला देत होतो. जातपंचायतींच्या भीषण वास्तवांचे दाखले देत होतो. भेटीगाठीत बर्‍याचदा बाहेर बाकड्यावर 30-40 मिनिटे बसण्याचा कंटाळा येई; पण लगेचच जादूटोणाविरोधी कायदा 2013 व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 16 मंजूर करवून घेताना डॉ. नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील, कृष्णा चांदगुडे या मंडळींनी दाखवलेली कमालीची चिकाटी, सातत्य, संयम यांची आठवण होई.

4 मे रोजी रामभाऊ भिसे विद्यालय, निळजे, कल्याण येथे मअंनिसच्या डोंबिवली शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या अध्यक्षा या अंनिसच्या हितचिंतक आहेत. त्यांच्या शाळेत आपले विविध उपक्रम होत असतात. त्यामुळे त्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना नावाने व कामाने ओळखत होत्या. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी कायदा, जातपंचायतींची व्याख्या आदी स्पष्ट केले. मी भीषण दाहकता, अंनिसचा लढा, या कायद्यामुळे होणारे फायदे यावर भाष्य केले. बर्‍याच शिक्षकांना जातपंचायतींचा महाराष्ट्रातील ‘पराक्रम’ माहीत नव्हता; पण प्रसारमाध्यमांतून पुढे आलेली कंजारभाट समाजातील भीषण ‘कौमार्य चाचणी’ मात्र माहीत होती. पुस्तक खरेदीसाठी केलेल्या आवाहनाला या शाळेत शिक्षकांनी छान प्रतिसाद दिला. तसेच जातपंचायतीवरील गीतावर शाहीर शिंदेंना शाबासकी द्यायला भिसे विद्यालयातील शिक्षक विसरले नाहीत.

कार्यक्रम संपवून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन कल्याणला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची भेट घेऊन पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण लावण्यासंबंधी चर्चा केली. त्यांनीही सूचना अमलात आणण्याचे मान्य केले.

तालुक्यातील तहसीलदार हा तालुक्यात घडणार्‍या घटनांना जबाबदार असतो. ठरवलं तर हस्तक्षेप करू शकतो, या उद्देशाने आम्ही विशाल इंदूलकर, नायब तहसीलदार, कल्याण यांची भेट घेतली. सुरुवातीलाच ‘असं काही आपल्याकडं घडत नाही हो’, असं ऐकवलं. मग मुंडे सरांनी काही दाखले दिले व ‘आवश्यक तिथे जरूर दखल घेईल, चळवळीचे काम महान आहे,’ हे सांगायला तहसीलदार विसरले नाहीत. खरंच आपल्या चळवळीला सनातन्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘घरघर’ लागली नाही, तर चळवळ ‘हर घर-घर’ पोचलेली आहे, याचा प्रत्यय ठिकठिकाणी येत होता.

बाजूलाच अ‍ॅड. तृप्ती पाटील यांचे कार्यक्षेत्र कल्याण कोर्ट होते. तिथे कल्याण कोर्टाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट सुपरिंटेडेंट ऑफ लीगल एडचे अजित डाफळे, ज्युडिशिअल प्रथम वर्ग मॅजिस्ट्रेट कुलकर्णी यांची भेट घेतली. छान चर्चा झाली. ते म्हणाले, हा कायदा अंनिसच नाही, तर खर्‍या अर्थाने समाजकार्य करणार्‍या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांसाठी हे लढाईचे हत्यार आहे. कायद्यातील जजमेंट्सवर कायद्याचे अमेंडमेंट्स अवलंबून असतात. याचे दाखले देताना त्यांनी पी.सी.पी.एन.डी.टी. व आर.टी.आय.मध्ये तर आता पीडितांनाच आरोपी केलं जात आहे. सा.ब.वि.का. हा नवीन असल्यामुळे बाल्यावस्थेत आहे, तेव्हा येणार्‍या निकालांचा सखोल अभ्यास कार्यकर्ता व तज्ज्ञांकडून होणे फार गरजेचे आहे, असा इशारा देतानाच माझ्या मर्यादा जाणून या कामी मी तुमची मदत करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. या परिसरात पोलीस निरीक्षक, वकील, जजेस अनेकांना भेटत असताना, “या, बसा, कधी आलं हे बिल? आमच्या ऑफीसला याची प्रत नाही आली,” असाच सूर होता. तेव्हा प्रचार मोहीम ही महत्त्वाचीच आहे, हे जाणवत होते.

6 मे रोजी उरणहून मी व मुंडे सरांनी अंबरनाथ गाठले. ‘संडे वंदना’ यानिमित्ताने धम्मदीप बौद्ध विहार, अंबरनाथ पूर्व येथे जमलेल्या बंधू-भगिनींसमोर अंबरनाथचे सुधाकर बर्वे यांनी कार्यक्रम लावला. अंनिसचा कार्यकर्ता इतका रुळलेला असतो की कोणी “या, बसा” म्हणायची वाट न पाहता कामाला लागतो. डॉ. जाधव, मुंडे सर, अमोल चौगुले, राजू निरभवणे यांनी फटाफट बॅनर्स लावले. खिडक्या बंद केल्या, प्रोजेक्टर जोडला, विहारात काळोख होईलसे पाहिले. सगळेच कार्यकर्ते जणू सगळ्या कामात तज्ज्ञ. या दौर्‍यात प्रथमच आम्ही जातपंचायतीवर भाष्य करणारी “तोलक” व दुर्गा गुडूलूची बी.बी.सी.न्यूज दाखवली. फिल्म दाखवल्यावर तुमच्याकडे असं घडतं का? हे माहीत होतं का? कायदा आलाय हे ऐकलं होतं का? अंबरनाथला कंजारभाट समाजातील लोकांची वस्ती आहे, याची कल्पना आहे? सर्वांची उत्तरे ‘नाही’ मिळाली. लढाई किती अवघड आहे, याची ही नांदीच होती. कल्पनेने आम्हीच आमचे हात-हातात घेतले व पुटपुटलो, “युग बदलेगा चारों ओरऽऽऽ एक दिन.”

आमची गाडी एक झोकदार वळण घेऊन अंबरनाथ पोलीस स्टेशन पूर्व येथे आवारात सावलीत विसावली. काही करारी नजरांचा सामना करत आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बाळकृष्ण वाघ यांना भेटलो. सुधाकर बर्वे यांनी तशी फिल्डिंग लावलेलीच होती. आपल्या कामाचे ते पाठीराखेच होते. असिस्टंटला बोलावून लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे 7 मे ला प्रशिक्षण लावलं. चहा घेऊन नंतर अंबरनाथ पश्चिमेच्या पोलीस स्टेशनला आलो. गुन्हे शाखा अधिकारी मा. जाधव यांची भेट घेतली. ‘अंनिसचे काम लक्षणीय आहे; परंतु तुम्ही आमच्या सीनिअर साहेबांना उद्या भेटा नक्की पोलीस प्रशिक्षण लावू’, असे आश्वासन घेऊन डॉ. जाधव यांच्या घरी किरण जाधवने बनवलेल्या मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतला. दौर्‍यात रोजच उरण-ठाणे जिल्हा ते उरण असा जाऊन-येऊन सहा तासांचा प्रवास होत होता. रात्री 12 च्या आसपासच आम्ही दोघं घरी पोचत होतो व सकाळी 6 वाजताच्या उरण-मुंबई बोटीने प्रवास सुरू व्हायचा; पण कधीही थकल्याची जाणीव होत नव्हती. मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, स्थानिक कार्यकर्त्यांची तळमळ, जिव्हाळा, प्रेम सगळंच आम्हाला ताजं, टवटवीत ठेवत होतं.

7 मे ला आम्ही सहाय्यक आयुक्त सुनील पाटील, अंबरनाथ (प.) यांची भेट घेतली. सोबत कंजारभाट समाजातील पीडित विवेक तमाईचिकर; जे अंबरनाथ कंजारभाट वस्तीत राहणारे, त्यांनी 12 मे रोजी आपल्या विवाहानंतर कौमार्य चाचणीला विरोध केल्याने पंचायत आक्रमक होऊ शकते, असे सांगितल्यावर त्यांनी एक ‘इंटिमेशन’ अर्ज देण्यास सुचविले व निर्धात राहा, असा दिलासा दिला. तो दिवस अंनिससाठी विशेष होता. कारण राज्यातील पहिले पोलीस प्रशिक्षण त्या दिवशी होणार होते. आम्ही पोचलो तर पोलीस मंडळी आमची वाटच पाहत होती. ‘तोलक’ फिल्म, कायदा, तरतुदी सांगितल्यावर विवेक तमाईचिकर यांनी पंचायत कशी आपल्याला त्रास देते, हे सांगितले व कार्यक्रम संपल्यावर चहा पिताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांनी कंजारभाट समाजातील या अनिष्ट प्रथेविरोधात अथवा अंबरनाथमधील मुजोर पंचाविरोधात तक्रार मिळताच कारवाई करणार असल्याचे सांगितले. विवेकचा नंबर घेऊन विवाह झाल्यावर प्रत्यक्ष येऊन भेटू, असे सांगितले.

या पोलीस स्टेशनमध्ये वाघ साहेबांनी डॉ. दाभोलकरांची एक हृद्य आठवण सांगितली, वाघसाहेब काही वर्षांपूर्वी मंत्रालयात ड्युटीवर होंते. ते म्हणाले, “हा माणूस अनेकदा मंत्रालयात यायचा, भर उन्हाचा, घाम पुशीत मंत्रालयात प्रवेश करताना दिसायचा. शांत, निग्रही चेहरा, खिशाला निळं टोपण असलेलं साधं बॉलपेन, खादीचे साधे-स्वच्छ कपडे, इतक्या वेळा पाहिलं; पण कधीही पायात नवीन चकचकीत बूट नाही, त्याच त्या धुळीने माखलेल्या चपला. भालदार-चोपदार अडवायचे; पण कधीही तंटा नाही, लोकांच्या नजरा अशा की, कशाला हा माणूस फेर्‍या मारतो? का तासन्तास पुस्तकात डोकं घालून बाकड्यावर बसतो? याच्या एकट्याच्या रेट्याने काय कायदा होणार आहे?”

पुढे ते म्हणाले, “पण या माणसाची ताकद माझ्यासारख्या संवेदनशील मनाला माहीत होती. माझ्या वर्दीतल्या मर्यादा मला स्तब्ध ठेवत होत्या.” डॉक्टरांच्या आठवणीने थोडी कालवाकालव झाली; पण लगेच सावरलो. वाघसाहेबांनी मला 500 रुपये दिले. मी कायद्याच्या 17 प्रती त्यांच्या टेबलावर ठेवल्या.

काल जाधवसाहेब, गुन्हे शाखा, अंबरनाथ यांनी काहीही झाले, तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले सरांना भेटाच, असे सांगितले. भेटलो. अंबरनाथ शाखेचे जाधव दांपत्य, बर्वे हे नेहमीच बरोबर असायचे. भेटीत श्याम मानव यांनी दिलेले प्रशिक्षण, किस्से या विषयावर बोलू लागले. मग मी सार्वजनिक बहिष्कारविरोधी कायदा माहीत असणं कसं गरजेचं आहे, हे पटवून देताच त्यांनी 12 मे रोजी याच इमारतीत प्रशिक्षणाचे आयोजन करूया, असे सांगून सोबत असलेले प्रचार साहित्य देऊन निरोप घेतला.

खरं तर नियोजित पहिला टप्पा कागदोपत्री संपला होता. सजवलेल्या गाडीचं बुकिंगही संपलं होतं; पण चळवळीचं काम हे तारीख उलटली की, संपलं असं होत नाही. 10 मे रोजी सकाळीच अप्पर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण मा. प्रशांत कदम सरांचा फोन आला. “आज वेळ आहे का? आमच्या ठाणे ग्रामीण मधील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसाठी दोन सत्रं घ्याल का? चमत्कार सादरीकरण व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा.” मी लगेच होकार दिला. उरण-ठाणे तीन तास लागतात. दोन मे रोजी त्यांच्या कार्यालयातच ते आठ दिवसांत प्रशिक्षण घेतो, असे म्हणाले होते. त्यांनी आपला शब्द पाळला होता. आम्हीही प्रचार साहित्य, चमत्काराच्या साहित्याची पोतडी घेऊन बरोबर 1 वाजता वितक हॉल, नवीन कमिशनर ऑफीस गाठले. हॉलचे दार किलकिले करून पाहताच, सरांनी आत येऊन बसायला सांगितले. सगळं चकाचक, गार हवेत अधिकार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन चालले होते. सव्वाएकला त्यांचे सत्र संपून आमचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला भूमिका, लढा सांगून कायद्याची पीपीटी दाखवली. नंतर सूत्रे मुंडेसरांकडे दिली. पोलीस अधिकारी इतका वेळ बांधून ठेवल्यासारखे वाटत होते, ते चमत्कारमागून चमत्कार पाहताना सैल होऊ लागले. हजेरी घेणारे अधीक्षकही उत्तम दाद देत होते. मोकळ्या वातावरणात कार्यक्रम संपला. आमचे आभार मानले. एकूण 42 अधिकारी होते. कायदा सांगताना प्रत्येकाच्या हातात आम्ही चित्रमय पुस्तिका दिली होती. विशेष म्हणजे गेटबाहेर पडताना एक अधिकारी मुंडे सरांजवळ आला, थोडे इकडे-तिकडे पाहिले व म्हणाला, “काय, खरं खरं सांगितलं हो तुम्ही, हे भगत असेच लुटतात. अहो, पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी मी गावाकडे एका भगताकडे बिचार्‍या गरीब भक्तांनी आणून दिलेले कोंबडे कापायचे काम करायचो.” थोडा हशा पिकला, तिथून बाहेर पडलो.

12 मे रोजी पुन्हा शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ पूर्व येथे आमचा फौजफाटा निघाला. दुपारचे साडेबारा वाजले होते. ऊन चांगलंच तळपत होतं; पण आम्ही चांदण्यात फिरत असल्यासारखे स्टेशन गाठलं. सोबत जाधव दांपत्य, अ‍ॅड. तृप्ती, सुरेखा भापकर, गणेश शेलार, सुधाकर बर्वे इत्यादी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. डॉ. जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ‘तोलक’ दुर्गाची बीबीसी न्यूज, कायदा, तक्रार कशी घ्यायची इत्यादी मार्गदर्शन करून शंका असल्यास विचारू शकता, असं सांगितल्यावर गुन्हे शाखेच्या जाधवसाहेबांनी बर्‍याच शंका विचारल्या. दिलेल्या दाखल्यांचे संदर्भ विचारले व आमच्या परिसरात जर का जातपंचायतीची तक्रार आली, तर आम्ही जातीने लक्ष घालू, असे म्हणाले. आणि हो, आभाराच्या भाषणात ‘तोलक’ फिल्म पाहून अस्वस्थ झालेले जाधव सर म्हणाले, “त्या लायनार्‍या (व्हीलन) ला जाऊन चार-पाच फाईट माराव्यात, असं वाटलं.” फिल्म पाहतानाची संवेदनशीलता जवळपास सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होती.

या 1 ते 12 मे पर्यंतच्या दौर्‍यात एकूण 9 हजार रुपयांची पुस्तके संपली. पुढील दौरा 1 ते 9 जून या कालावधीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार. या कालावधीत सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा; प्रचार व अंमलबजावणी मोहिमेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करू इच्छिणार्‍यांनी स्थानिक जिल्हा कार्याध्यक्ष, राज्य सरचिटणीस नितीन राऊत व राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांना संपर्क करावा.

–सुशीला मुंडे (राज्य प्रधान सचिव, मअंनिस)

संपर्क : 9969551050/022-27233865