Categories
संपादकीय

स्तुत्य निर्णय पण…?

जानेवारी - २०१८

धर्म श्रेष्ठ की समाजहित, या प्रश्नाचं प्रामाणिक विवेकी उत्तर आहे समाजहित श्रेष्ठ. कोणताही सुबुद्ध माणूस किंवा राजकीय प्रणाली असो, त्यांना समाजहिताचा योग्य निर्णय घेताना धार्मिक अवडंबर बाजूला सारावेच लागते. पंढरपूरच्या यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांची विठ्ठलावर कितीही श्रद्धा असली आणि तोच माझा रक्षणकर्ता असे म्हणून जर आषाढी यात्रेला जाताना ‘कॉलऱ्याची लस मी टोचून घेणार नाही,’ असा हट्ट तो धरत असेल, तर त्याला सक्तीने लस टोचण्यात समाजहित आहे, हे आपणास मान्य करावे लागते. म्हणून धर्म श्रेष्ठ की समाजहित याबाबत भारतीय राज्यघटनेने धर्माचे अनिर्बंध स्वातंत्र्य लोकांना दिलेले नाही. हे आज परत सांगण्याचे कारण म्हणजे हज यात्रेसाठीचे अनुदान क्रमाक्रमाने बंद करणार असल्याचा भारत सरकारचा निर्णय. आपल्या वैयक्तिक मुक्तीचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीने धर्मकृत्य करावे, यासाठी कुणाचा आक्षेप येण्याचे कारण नाही; पण कररुपाने जमा झालेला सरकारचा पैसा वैयक्तिक लाभासाठी प्रजेला सरकारने वाटावा, हे अयोग्य आहे. म्हणूनच हजला दिले जाणारे अनुदान मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी वळवावे, हा निर्णय स्तुत्यच आहे. पण….?
गतवर्षी नाशिकला झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी महाराष्ट्र सरकारने जी भूमिका घेतली, ती विचारात घेतली, तर सरकारी धोरणातील दुटप्पीपणा लक्षात येतो. कुंभमेळ्यात गोदावरी नदीत भाविकांना आणि साधूंना अंघोळ करून मुक्ती मिळवता यावी आणि अपराधांचे प्रायश्चित्त घेता यावे म्हणून धरणातील पाणी गोदावरीत सोडले गेले. इकडे जायकवाडी धरणाच्या क्षेत्रातील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याची गरज असलेल्या मराठवाड्यातील जनतेचे पाणी नदीत वाहून देऊन महाराष्ट्र सरकारने काय साधले? आणि लाखो लोक या पाण्यात अंघोळ करून ते पाणी प्रदूषित करतात, त्याचं काय? येथे धर्म की समाजहित याला योग्य न्याय का दिला जात नाही? हा दुटप्पीपणा कशासाठी?
डॉ. दाभोलकरांच्या खुनाबद्दल ज्याच्यावर आरोपपत्र दाखल आहे, अशा एका माथेफिरूने ‘लई पापे केली आता कुंभमेळ्यात जाऊन नदीत डुबकी मारून येतो,’ असे निलाजरे वक्तव्य केले होते. अशा अतिरेक्यांचे पापविमोचनातून समाजहित साधले जाणार की समाजपुरुषाचा घात? कुंभमेळ्यातून कोणते सामाजिक हित साधले जाते? कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी पण महाराष्ट्र सरकारने केली, हाच पैसा वापरून एखादे नवीन धरण बांधता आले असते किंवा जनआरोग्याच्या योजनांना हातभार लावता आला नसता का? म्हणूनच आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कारटं, ही भूमिका सर्वस्वी शहाणपणाची नाही. त्यातून सामाजिक सलोख्याऐवजी परधर्मद्वेषाला उत्तेजन मिळण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून विवेकनिष्ठता ही सर्व धर्मांना सारख्याच पद्धतीने लागू करायला हवी.
धार्मिक आचरण ही खाजगी बाब असेल, तर त्यासाठी सामाजिक शक्तीचा अपव्यय होऊ नये, यासाठी विविध धर्मांतील जत्रा, यात्रा, उत्सव यासाठी त्या-त्या समाजाने स्वत:च आर्थिक व्यवस्था करायला हवी; पण अशा उत्सवात धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कृत्यांनाही लगाम घालायला हवा. काही दिवसांपूर्वी वाईजवळच्या काळूबाईच्या यात्रेत मंदिराशेजारच्या असंख्य झाडांवर काळ्या बाहुल्या लटकावल्या गेल्या. त्या झाडांना खिळे ठोकून त्यांना ‘शत्रूचा नायनाट कर,’ अशा अर्थाच्या चिठ्ठ्या अडकवलेल्या आढळल्या. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या बाहुल्या व खिळे गोळा करून पर्यावरणरक्षणाची भूमिका घेतली. त्यांचे अभिनंदन करूया; पण या अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी सरकारने कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. हजचे अनुदान मुस्लिम मुलींसाठी खर्च करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना, हीच भूमिका सर्व धर्मांबाबत व्यापक केली जावी, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.