‘बहिष्कृत भारत’च्या १९ नोव्हेंबर १९२८ च्या अंकातील अग्रलेखात पेशवे आणि ब्रिटीश राजवट यांची तुलना करून काही निष्कर्ष मांडले आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादी दृष्टीची साक्ष देणारे आहेत. ‘हिंदूंपेक्षा इंग्रज बरे?’ या मथळ्याखाली लिहिलेल्या मजकुरात त्यांनी पेशवाईने दलितांवर लादलेल्या जुलुमाचे वर्णन करून म्हटले आहे- ‘‘त्या पेशवाईची जो अस्पृश्य अंग्लाईशी (इंग्रजांशी) तुलना करील त्याला एका संबंधाने द्वेष आणि दुसऱ्या संबंधाने प्रेम वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही,’’ असे नमूद करून त्यांनी या ठिकाणी शिबी राजाची गोष्ट सांगितली आहे. ‘‘ज्या प्रमाणे इथेन पक्षी (गरुड) मागे लागला असता, तो गरीब कपोत (कबूतर) जीव मुठीत घेऊन शिबीराजाला रक्ष रक्ष म्हणून शरण गेला, त्याचप्रमाणे अस्पृश्य जनताही स्पृश जनतेच्या अमानुष छळाला त्रासून इंग्रजप्रभूस शरण गेली असून त्यांच्या आश्रयाखाली दिवस काढीत आहे. अशा परिस्थितीत वाढलेली अस्पृश्य जनता शिबीचा आधार तुटला असताना इथेन पक्ष्याने जी कपोताची गत केली असती, तशीच इंग्रजांचा आधार तुटल्यानंतर स्पृश्य जनता आपली गत करील, या भयाने स्वराज्याच्या मागणीस बिचकली, तर तिला कोणी प्रामाणिक विचारवंत मनुष्य दोष देईल, असे आम्हास वाटत नाही.’’ अशी मांडणी करून ‘‘इंग्रज सरकारवर सर्वस्वी विसंबून राहणाऱ्या अस्पृश बंधूस आमचा इशारा आहे की, इंग्रज प्रभू खरोखरीच शिबीचा अवतार आहे का, याची खात्री करून घ्यावी. ज्या इंग्रजांवर तुम्ही अवलंबून आहात, ते शिबीचा अवतार नाहीत की, ज्याने शरण आलेल्या कपोत पक्ष्याच्या रक्षणासाठी आपला आत्मनाश ओढवून घेतला, इंग्रज या शिबी राजासारखे वर्तन करणार आहेत काय?’’ असा प्रश्न विचारून ‘‘इंग्रजांनी तुमच्यासाठी काहीच केलेले नाही,’’ असे सांगून इंग्रजांच्या नाकर्तेपणाचा, स्वार्थीपणाचा भांडाफोड केला आहे. या मथळ्याचा शेवट पुढील शब्दांत केला आहे. ‘‘यासाठी अस्पृश्यांनी स्वकल्याणाचे काम परक्यांवर सोपविण्याऐवजी स्वत:च हाती घेणे बरे, हिंदूंवर विश्वास ठेवून तुम्ही चालत नाहीत, ही शहाणपणाची गोष्ट होय; पण इंग्रजांवर विसंबून राहणे, ही काही शहाणपणाची गोष्ट नाही. खरा शहाणपणा कोणावर विश्वास न ठेवता स्वत:वर विश्वास ठेवणे, यातच आहे. दोघांच्याही सत्तेखाली उन्नती झाली नाही. झाली ती विटंबनाच झाली, म्हणून स्वावलंबन हेच अस्पृश्यांचे ध्येय असले पाहिजे.’’
वरील मांडणीत बाबासाहेबांचा इंग्रज राजवटीसंदर्भातील दृष्टिकोन विषद केला आहे. बऱ्याच लोकांना फुले-आंबेडकर हे ब्रिटिशांचे हस्तक वाटत असत आणि भीमा-कोरेगावच्या लढाईच्या संदर्भात ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या महार सैनिकांनी जणू राष्ट्रद्रोह केला आहे, अशी मांडणी आजचे आधुनिक ब्राह्मण्यवादी करीत आहेत. यामुळे पेशवे, इंग्रज, स्पृश्य हिंदू, स्वराज्य या संदर्भातील बाबासाहेबांची मते वरील उताऱ्यात स्पष्टपणे आली आहेत, ती पुढे आणणे गरजेचे आहे. फुले-आंबेडकरांनी कधीही ब्रिटिशांची वकिली केलेली नाही की, चिपळूणकरांसारखे ब्रिटीश सत्तेला ‘ईश्वरी वरदान’ म्हटलेले नाही. ब्रिटिशांना जेथे हाणले पाहिजे तेथे व्यवस्थित हाणले आहे. त्यामुळे भीमा-कोरेगावच्या लढाईचे उदाहरण देऊन फुलेआंबेडकरी चळवळ राष्ट्रद्रोही ठरविण्याचा ब्राह्मण्यवादी शक्तींचा कांगावा, स्वत:च्या राष्ट्रद्रोही, ब्रिटीशधार्जिण्या कारवायांवर पांघरूण घालण्यासाठी आहे.
जगाच्या पाठीवर जेव्हा-जेव्हा दडपलेल्या, शोषित जनतेने बंडाचा झेंडा उभारला तेव्हा-तेव्हा त्यांनी आपली मुळे शोधण्याचा प्रयत्न करून लढाऊ प्रतीके समोर आणली आहेत. शूद्रातिशूद्र, स्त्रीमुक्तीसाठी पुकारलेल्या मुक्तिलढ्यात फुले-आंबेडकरांना अर्थातच, या जनतेच्या इतिहासाची गरज होती. हे दास्य, ही गुलामी या जनतेच्या वाट्याला का आली, याचा शोध त्यांना घेणे चळवळीसाठी गरजेचे होते. महात्मा फुले यांनी इतिहासविषयक एक दृष्टी पुढे आणली ती, शूद्रातिशूद्र, स्त्रिया ही बहुजन जनताच या भूमीची मालक आहे. आर्य, भटांनी कपटाने या जनतेला जिंकून गुलाम बनविले. महात्मा फुले यांची ही दृष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिवैभव पणाला लावीत ‘‘शूद्र पूर्वी कोण होते?’’ ‘‘अस्पृश्य पूर्वी कोण होते, ते अस्पृश्य कसे झाले?’’ या संदर्भात मूलगामी संशोधन केले आहे. भीमा-कोरेगावची लढाई त्यांच्यासाठी गुलामगिरीत पिचलेल्या, स्वत्व विसरलेल्या, अस्पृश्य समाजाला त्यांच्या पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देऊन त्यांच्यात शौर्य जागविण्यासाठी उपयोगी पडली; शिवाय ही शौर्यगाथा केवळ दंतकथा नव्हती, खरीखुरी हाडामांसाची कथा होती, जी भीमा-कोरेगावच्या विजय स्तंभावर कोरली आहे.
सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या विचारधन (बंच ऑफ थॉट) या पुस्तकात भीमा-कोरेगावच्या लढाईबद्दल लिहिले आहे. त्यात आपले लोक परकियांच्या बाजूने आपल्याच लोकांविरुद्ध लढले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘स्वकियां’च्या विरुद्ध लढल्याचा अभिमान वाटतो, अशा आशयाची मांडणी केली आहे. त्याला उत्तर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्वकीय कोण?’ असा प्रश्न उपस्थित करून यासाठी तुमचा धर्म, संस्कृती, तुमची वागणूक जबाबदार आहे,’ अशा आशयाचे ठोस उत्तर दिले आहे. भीमा-कोरेगावच्या लढाईचा जातीसंदर्भ टाळून विचार केला, तर गोळवलकर म्हणतात, तसा निष्कर्ष काढता येईल; पण जातीसंदर्भात खासकरून पेशवाईत अस्पृश्यांना जिचे वर्णन करता येणार नाही, अशी अमानुष वागणूक मिळाली; ज्याचे वर्णन क्रांतिज्योती सावित्राबाईंच्या शिष्या मुक्ता साळवे यांनी करून ठेवले आहे. ते पाहता कुठल्याही शहाण्या माणसाला सत्यस्थिती लक्षात येऊ शकेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मताशी ते सहमत होतील; शिवाय स्वकीय-परकीय हे शब्द आज आपण ज्या अर्थाने वापरतो, ते त्या काळात तसेच वापरले जात होते काय? १८५७ च्या काळातील ‘‘माझा प्रवास’’ हे गोडसे भटजींचे आत्मचरित्र उपलब्ध आहे. ते अलिबागवरून उत्तरेकडे प्रवासाला निघतात, त्याचे वर्णन ते ‘परदेशी’ निघालो आहे, असे करतात. याच पुस्तकात गोडसे भटजींनी दक्षिणेकडील ब्राह्मण पुजाऱ्यांचा वापर ब्रिटिशांनी हेरगिरीसाठी कसा केला, याचे वर्णन आहे. हिंदू राजाकडे हे दक्षिणी ब्राह्मण पुजारी म्हणून जात आणि तेथील इत्यंभूत माहिती ब्रिटिशांना पुरवित. हे आज घडेल काय? मग त्या काळी कसे घडले? त्या काळी राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती काय? राष्ट्र ही भांडवलशाहीने आणलेली, तिला गरजेची असणारी आधुनिक संकल्पना आहे. सरंजामशाहीत राष्ट्र नसते, तर राजाचे राज्य असते. पेशव्यांचे राज्य, मराठ्यांचे राज्य वगैरे वगैरे. राष्ट्र ही संकल्पना आपल्याकडे आली, ती १८५७ नंतर, भांडवलशाहीच्या उदयानंतर. भांडवलशाहीच्या वाढीबरोबरच ती विकसित होत गेली. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी आपण केली, ती १९३५ ला. तोपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणीही आपण करू शकलो नव्हतो.
त्यामुळे ब्रिटिशांना सहकार्य करणारे, ब्रिटीश फौजेत असणारे सगळे देशद्रोही होते काय? अगदी बंडखोरांनी दिल्ली जिंकल्यानंतर १८५७ साली दिल्लीच्या लढाईत, अगदी निर्णायक लढाईत फौजेत लढणारे ५७ हजार राजपूत, तर २३ हजार ब्राह्मण सैनिक होते. कारण देश नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. निष्ठा देशाशी नव्हे, तर राजाशी, पुढे इंग्लंडच्या राणीशी होती.
भारतातील या परिस्थितीचे वर्णन १८५३ साली मार्क्स यांनी त्यांच्या हिंदुस्थानवरील लेखात केले आहे. मार्क्स म्हणतात, ‘‘फोडा आणि झोडा या रोमन राज्यनीतीचा अवलंब करून ग्रेट ब्रिटनने हिंदुस्थानावर राज्य केले. निरनिराळे वंश, टोळ्या, जाती, धर्म, पंथ व सार्वभौम सत्ता यांच्या समुच्चयाला हिंदुस्थान हे भौगोलिक नाव दिले जाते आणि त्यांच्यातील विरोध हेच ब्रिटीश वर्चस्वाचे मुख्य केंद्रीय तत्त्व आहे.’’ इंग्लंड भारतावर इतकी वर्षे राज्य का करू शकले, याचे नेमके इंगित मार्क्स यांनी मांडले आहे. त्यामुळे भाजप-आर.एस.एस. वाले म्हणतात त्याप्रमाणे ‘‘आम्ही हजारो वर्षे राष्ट्र आहोत,’’ हे वस्तुस्थितीला धरून नाही. तो त्यांच्या अनेक जुमल्यांसारखा एक जुमला आहे. ज्या पेशवाईने- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैन्यात महार सैनिकांची मोठ्या प्रमाणात भरती केली- ती परंपरा मोडीत काढली आणि महारांना भिकेस लावले आणि आज नाक वर करून त्यांचे वारस विचारतात की, महार ब्रिटिशांच्या बाजूने लढले. त्यांना ‘स्वकीय’ मानले असते, तर ते तुमच्याही बाजूने लढले असते, यात शंकाच नाही. आजही आपण राष्ट्र म्हणून पूर्णत्वाला गेलेलो नाही. दलित-आदिवासी जनतेवरील वाढते अमानुष स्वरुपाचे अत्याचार, त्यांना सर्रास न्याय नाकारला जाणे, या गोष्टी त्यांच्यासमोर ‘स्वकीय कोण?’ हा प्रश्न उभा करणाऱ्या आहेत. ज्याची उत्तरे देण्याऐवजी आजही त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचली जात आहेत. त्यांना पुन्हा गुलामीत ढकलण्याची स्वप्ने ब्राह्मण्यवादी पाहत आहेत.
लेखक संपर्क : ९८६९३९२१५७