भीमा-कोरेगाव मधील नियोजित हिंसक घटना ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रावरील कलंक आहे. या घटनेने समाज, सत्ता आणि माध्यमे यांचे खरे रूप आपल्यासमोर ठेवले आहे. आधुनिक युगात वावरताना जातीय अहंगंडातून युवक किती हिंसक आणि अविवेकी होऊ शकतो, याचं भयावह चित्र या घटनेने दाखवलंय. विकासाच्या वाटा दाखवणारे पक्ष आतून मात्र ही हिंसक घटना घडवून आणणाऱ्या अतिरेकी संघटनांना पाठीशी घालत आहेत की काय, अशी शंका येण्यास या घटनेने पुरेसा वाव निर्माण केला आहे. ‘भीमा कोरेगाव’ जळत असताना त्याला दोन गटातील दगडफेक दाखवणं, जातवास्तवाकडे डोळेझाक करत गुंडांना महात्म्यांच्या रूपात
दाखवण्याचा ‘प्रताप’ काही माध्यमांनी करून माध्यमांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करून घेतले आहे.
भीमा कोरेगावचा नेमका इतिहास काय? हे दलित अस्मितेचे प्रतीक का आहे? नेमकी भीमा कोरेगावची दंगल का उसळली? त्याला कोण जबाबदार असू शकतं? आणि पुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून काय? अशा प्रश्नांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते, पण हा शोध आपण आपल्या जातीचे आवरण दूर ठेवून घेतला पाहिजे.
भारत हे राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत अजूनही आहे. एकाच भूमीवरील संस्थाने एकमेकांशी त्वेषाने जेव्हा लढत होती आणि हीच संस्थाने परकीय शक्तींना आपल्याच भूमीवरील संस्थानांशी लढण्यास मदत करत होती, याचा अर्थ स्पष्टच आहे की, आपण तेव्हा राष्ट्र म्हणून विकसित झालेले नव्हतो, केवळ विखुरलेले संस्थाने होतो. त्यामुळे टिपू सुलतानचे म्हैसूर; तसेच बाजीरावची पेशवाई, यात राष्ट्र नावाची कोणतीही धारणा नाही; उलट सामाजिक विषमताच अधिक!
भारतीय भूमीतील लोकांमध्ये राष्ट्र असल्याची भावना नसल्यानेच सन १८१८ पर्यंत कंपनी सरकारने भारतीय भूमीवरील अनेक संस्थाने युद्ध न करता कूटनीतीने खालसा केली, काही युद्ध करून साम्राज्याचा भाग करवून घेतली. या काळात पेशवाई पूर्णपणे कमकुवत झालेली होती. बाजीराव दुसरा पुणे सोडून पळून गेला होता. त्याच्याकडे केवळ २० हजार घोडदळ आणि ८ हजार पायदळ होतं. त्यातील २ हजार पायदळ तुकडीच्या सहाय्याने पुण्याबाहेरून कंपनी सरकारवर हल्ला करण्याची तयारी बाजीराव दुसरा याने केली. पेशव्यांच्या पायदळाच्या तीन तुकड्या भीमा कोरेगाव येथे कंपनी सरकारशी लढल्या. कंपनी सरकारकडे बॉम्बे नेटिव्ह इनफंटरी बटालियन, १७ पुणे औक्झिलरी होर्स आणि मद्रास आर्टिलरी डीटॅचमेंट अशा तीन तुकड्या होत्या. त्यातील पहिल्या बटालियन मधील ५०० सैनिक पेशवाईच्या सैन्याशी लढले. या लढाईने पेशवाईचा
अस्त झाला. शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकला. या लढाईने पेशवाई संपून कंपनी सरकार अधिक मजबूत झाले. त्यामुळे कंपनी सरकारसाठी हा विजयाचा क्षण होता. त्या निमित्ताने या लढाईमध्ये
वीरगतीस मिळालेल्या ४९ सैनिकांची नावे विजयस्तंभ उभारून त्या खाली कोरण्यात आली. त्यापैकी २५ सैनिकांच्या नावात ‘नाक’ असा उल्लेख असल्याने ते जातीने महार असल्याची ओळख पटते. सिदनाक हा त्यांचा प्रमुख असावा, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध होते.
१८५७ च्या उठावास कंपनी सरकार प्रशासन जबाबदार आहे व निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने भारतीय भूमी ही थेट ब्रिटीश प्रशासनाने साम्राज्याचा भाग
बनवली. परिणामी सैन्यात अनेक बाबींवर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून महारांची सैन्य भरती बंद करण्यात आली. सन १८९३ रोजी गोपालबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि रामजी आंबेडकर यांनी महारांची सैन्यबंदी उठवण्यासाठी ब्रिटीश सरकारला निवेदने सादर केली. त्यात त्यांनी महार जातीच्या लढाऊ बाण्याचा पुरावा म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईचा दाखला दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिली होती; मात्र ते प्रत्येक वर्षी तिकडे जात
नसत.
पेशवाईचा काळ हा एकूणच शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्याकरिता अंधारयुग म्हणावा असाच होता. याबाबत अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अतिशूद्र असलेल्या सर्व जातींना गळ्यात मडके आणि कमरेला झाडू लावावा लागत असे, मोठ्याप्रमाणावर अस्पृश्यता आणि हेळसांड या जातींच्या वाट्याला आलेली होती. अतिशूद्रांचं
जगणं अप्रतिष्ठित करून टाकलेलं होतं. थोडक्यात, माणूस म्हणून जगणं नाकारलेलं होतं, इतिहासातून ओळख पुसून टाकली गेली होती. वरवर पाहता हा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ पेशवाईचा अंत किंवा ब्रिटिशांचा विजय वाटत असला तरी तो या दोन्हीमुळे दलित अस्मितेचे प्रतीक बनत नाही, हा स्तंभ अस्मितेचे प्रतीक बनतो, तो
दलितांच्या इतिहासामधील ठळक शौर्याच्या नोंदीमुळे!
दलितांची अस्मिता असलेल्या या स्तंभाबाबत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी प्रकाश टाकत चिकित्सा करणारा एक लेख ‘द वायर’ या वेबमाध्यमाकरिता लिहिला आहे. त्यांचे पुढील मत विचारात घेणे आवश्यक वाटते. ते मत असे की, ‘बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव लढाईला पेशवाईने चालवलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात महार सैनिकांनी दिलेला लढा असा रंग दिला, तेव्हा त्यांनी जणू एक मिथकच घडवले होते, चळवळी उभारण्याकरिता अशा मिथकांची गरज असते. कदाचित त्यांना त्याकाळी अशा मिथकांची निकड जाणवली असावी. परंतु, एका शतकानंतर अशी घटना जेव्हा आभासी इतिहासाचा एक भाग
होऊन जाते आणि जर ती दलितांना अस्मितेच्या दलदलीत ढकलत असेल, तर मग ती खरोखरच चिंतनीय बाब ठरते.’ या लेखात तेलतुंबडे मिथकांचा उलटा परिणाम घडण्याची शक्यता विचारात घेत त्याच्या अस्मितांच्या प्रवृतींच्या सीमांच्या पलिकडे जाण्याबाबत सूचित करतात. आंबेडकरी चळवळीकरिता दलित अस्मितेची
चिकित्सा करत नवीन मांडणी करण्याचा अवकाश या विचारमंथनाने खुला केला आहे.
दुसऱ्या बाजूला, भीमा-कोरेगावमध्ये नियोजितपणे घडवून आणलेल्या हिंसाचाराची पोर्शभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण होणार म्हणून महाराष्ट्रातील आंबेडकरी संघटनांच्या सोबत इतर पुरोगामी पक्ष व संघटना नव्या पेशवाईविरुद्ध एल्गार करणार होत्या; तर
महाराष्ट्र शासनाने देखील शौर्य दिनाचे औचित्य साधून त्याला उत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरविले होते. त्यामुळे साहजिकच आंबेडकरी जनतेसह इतर बहुजन वर्ग देखील मोठ्या संख्येने १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमला होता. सकाळी १० ते ११ च्या सुमारास भीमा कोरेगाव येथे दूरून मोठ्या प्रमाणावर धुरांचे लोट उठताना दिसू लागले. समूहाने ते कुठे तरी आग लागली असेल म्हणून दुर्लक्ष केले, मात्र काही वेळाने दगडांचा वर्षाव होऊ लागला. पाहतापाहता लोणी काळभोर, सणसवाडी, वढू गावापर्यंत दगडफेक आणि गाड्या जाळण्याचे सत्र सुरू झाले. पण ही सूत्रबद्ध घटनांची मालिका आहे.
त्यातील महत्त्वाची घटना म्हणजे ३१ डिसेंबर २०१७ आधी वढू बुद्रुक या गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाला अग्नि देणाऱ्या गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरून वादाला सुरवात झाली. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की, संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे हे औरंगजेबाच्या सैनिकांनी नदीत फेकून दिले आणि
त्याकाळी औरंगजेबाच्या दहशतीमुळे त्या देहाच्या तुकड्याला कोणीच हात लावेना, तेव्हा पैलवान गोविंद गायकवाड; जो जातीने महार असल्याचा उल्लेख केला जातो, त्याने संभाजी महाराजांच्या देहाचे
तुकडे एकत्र करून त्यांचा अंत्यविधी केला. या गोविंद गायकवाड यांची समाधी ही वढू बुद्रुकमध्ये आहे. या समाधीला काही वर्षांपूर्वी त्यांच्या वंशजांनी पत्र्याचे शेड केले आणि त्याठिकाणी एक माहितीचा फलक उभा केला. वढू येथे राणी येसूबाई यांची समाधी आहे व तुळापूर येथे संभाजी महाराजांची. ही दोन्ही गावे आजूबाजूला आहेत. संभाजी महाराजांना हिंदुत्वाभिमानी अशा चौकटीत अडकवून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी आजूबाजूच्या गावात बहुजन युवकांना संभाजी महाराजांच्या विषयी वेगळा इतिहास सांगायला सुरवात केली; ज्यात ते सांगत की, संभाजी महाराजांच्या देहाचा अंत्यविधी हा शिवले
यांनी केला, त्यांचे आधीचे नाव शिर्के. त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे शिवले म्हणून त्यांचे नाव शिर्केचे शिवले झाले. त्यांचा हेतू हा गोविंद गायकवाड यांच्या समाधीच्या माध्यमातून दलित अस्मितेला रोखणे असा होता, त्यासाठी त्यांनी खूप आटापिटा केला. असे गावातील लोक बोलतात. खरे तर मध्ययुगीन इतिहास
तपासायला सध्या विेशासनीय असे खूप कमी पुरावे उपलब्ध आहेत. पण इतिहासाची मोडतोड करत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे चालवत तिथल्या बहुजन तरुणांची माथी भडकवण्याचे काम भिडे-एकबोटे ही मंडळी गेली काही वर्षे या भागात करत आली आहेत, असे गावकरी मंडळी सांगतात. त्यातूनच गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे
शेड आणि फलक काढून टाकल्याने वादाला सुरुवात झाली. गावातील काही पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला. त्याचा राग मनात ठेवून भीमा-कोरेगावच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे गावकऱ्यांनी ठरवले, त्यामुळे १ जानेवारीला हॉटेल, दुकाने बंद होती. वढू गावातील सवर्ण लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संभाजी भिडे येणार असल्याचे मेसेज फिरविल्याचे समोर आले आहे. हा मोर्चा पुढे हिंसक बनला, त्यातून भीमा कोरेगावला आलेल्या आंबेडकरी जनतेवर इमारतींवरून दगडफेक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात गाड्या पेटवल्या गेल्या.
एकूण सर्व घटनाक्रम पाहता छोट्या घटनेच्या मागे मोठा नियोजित कट रचण्यात आल्याचे स्पष्ट होते. अशी सर्व माहिती पत्रकार दत्ता कानवटे यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना व ही हिंसा घडवून आणणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी करत ३ जानेवारी २०१८ ला महाराष्ट्र बंदची हाक दिली. भीमा कोरेगावबाबत मुख्य प्रवाहातील काही माध्यमांनी घटनेचे व्यवस्थित विश्लेषण आणि रिपोर्टिंग केले नाही. घटनेच्या मुळाशी
जाण्याचे धाडस न दाखवता गुंडांना वाहिन्यांवर आणून त्यांचे माहात्म्य सांगण्यात त्यांनी धन्यता मानली, ज्यामुळे माध्यमांच्या नि:पक्षपातीपणा आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शेवटी प्रश्न उपस्थित होतो की पुढे काय?
१) भीमा कोरेगाव दंगलीचा सखोल तपास करून दंगल घडवणाऱ्या आणि घडवून आणणाऱ्या दोन्ही हातांना बेड्या घालण्यासाठी शासनावर दबाव कायम ठेवला पाहिजे.
२) भीमा कोरेगाव दंगलीत जखमी आणि मृत व्यक्तींना तातडीची सरकारी मदत मिळाली पाहिजे.
३) दंगलीत नुकसान झालेल्या आणि मारहाण झालेल्या लोकांना गुन्हा नोंद करण्यासाठी वकिली मदत दिली गेली पाहिजे.
४)समाजात जातीय विद्वेष नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सलोखा मेळावे, सद्भावना मार्च यांचे आयोजन करणे आवश्यक आहे.
५) चुकीचा इतिहास सांगणाऱ्या शक्तींविरोधात लढण्याकरिता खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याकरिता अभियान किंवा मोहिमा चालविणे.
६) जातीच्या किंवा अस्मितेच्या चळवळींना खतपाणी न घालता जास्तीत जास्त भौतिक प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांचे पाठीराखे बनणे आवश्यक आहे.
थोडक्यात, भीमा कोरेगावला घडवण्यात आलेली नियोजित हिंसा ही दलित अस्मितेवर केलेला हिंदुत्ववादी हल्ला आहे. वर्षानुवर्षे दाबून ठेवलेला दलित समाज आंबेडकरी चळवळीमुळे भौतिकदृष्ट्या प्रगत होत, संवैधानिक मार्गाने पुढे चालला असताना नवी पेशवाई त्याला पुन्हा मनुयुगात ढकलू पाहत आहे. (उदा. आरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने बंद करणे, रोहित वेमुला प्रकरण, उना प्रकरण, सहारनपूर प्रकरण) अशा वेळी सर्वांनीच एकजुटीने माणूस म्हणून उभे राहत लोकशाही मार्गाने संघर्षशील होण्याची गरज आहे.
लेखक संपर्क : kunalshirsathe@gmail.com
Categories