Categories
बुवाबाजी

हजरत आब्दुल्ला गारीशा कादरी बनवडी शरीफ या प्रसिद्ध दर्ग्यातील भोंदूमांत्रिक गजाआड

सप्टेंबर - २०१८

गेली 7 वर्षे बनवडी, ता. कराड जि. सातारा येथील प्रसिद्ध दर्ग्यामध्ये स्वत:कडे असलेल्या दैवीशक्तीच्या आधारे भलामोठा जाड जवळपास 80 किलो वजनाचा लोखंडी लंगर उचलण्याच्या चमत्काराचा बहाणा करून अनेक भाविकांना आपल्या जाळ्यात ओढून एखाद्या डॉक्टरप्रमाणे डिस्क्रिप्शन चिठ्ठी लिहून 25 लिंबे, गोडेतेल व शुद्ध पाण्याची बिसलरी बाटली व त्याखाली देणगीची रक्कम लिहून देणारा भोंदू मांत्रिक सद्रुद्दीन सल्लाउद्दीन मुल्ला उर्फ सुफिबाबा अंनिस व पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात सापडला.

11 ऑगस्ट 2018 हा अमावस्येचा दिवस उजाडला आणि सातारा अंनिसच्या टीमने सकाळी 7 वाजताच दर्ग्याकडे कूच केले. 10 ते 11 दरम्यान दर्ग्यात थांबून संपूर्ण टेहळणी करून लक्षात आले की, मांत्रिकाकडे बरेच भक्तगण आलेले आहेत आणि त्यांना मंत्रोपचार करून दैवी उपाय देण्याचे काम चालू आहे. त्यानंतर आम्ही कराडचे ऊधडझ नवनाथ ढवळे यांचे कार्यालय गाठले. दर्ग्यामध्ये चालणार्‍या जादूटोण्याच्या प्रकाराबाबत शफीउल्ला शौकत मुल्ला यांचा आलेला तक्रार अर्ज व महा.अंनिसचा अर्ज सादर केला. सातारचे डझ मा. संदीप पाटील यांच्याशी पूर्वीच आम्ही या विषयावर चर्चा केली, तेव्हा त्यांनी ढवळे साहेबांना फोन करून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होतेच. ढवळेसाहेब, त्यांचे सहकारी व अंनिस कार्यकर्ते यांच्या ट्रॅप लावण्याबाबतचा संपूर्ण प्लॅन साहेबांच्या केबिनमध्ये ठरला. भगवान रणदिवे यांना वडिलांची भूमिका, तर पोलिस कॉन्स्टेबल ईम्रान पटेल यांना जावई असल्याचे मांत्रिकास सांगण्याचे ठरले. शीतलला बाहेरची बाधा झाली आहे, असे सांगून मांत्रिकाच्या हालचाली व चमत्कार सुरू होताच, पोलिसांच्या दुसर्‍या टीमला फोन करून बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना बोलवायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे हुबेहूब पात्र व अ‍ॅक्टिंग झाली आणि इशारा मिळताच स्वत: ऊधडझ ढवळे साहेब, त्यांचे सहकारी दर्ग्यात आले आणि मांत्रिकाची बोबडीच वळली.

मूल होत नसेल, करणी, भानामती, भूतबाधा; तसेच सर्वच घरगुती उपायांवर बिनधास्तपणे अघोरी उपाय सांगणार्‍या बाबाने चक्क पोलिस कॉन्स्टेबलला बाथरूमला गेल्यावर गुप्तांगाद्वारे बाहेरची बाधा झाल्याचे सांगून महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या डोळ्यात अंजनासारखे पाणी टाकून व कानात फुंकर मारून; तसेच 25 लिंबे क्रमश: एकेक हातात घेऊन म्हणून 100 टक्के भूतबाधा काढण्याचा बहाणा केला होता. चिठ्ठीवर 25 लिंबे, 1 किलो गोडेतेल, बिसलरी पाण्याची बाटली व 251 रुपये देणगी असा स्पष्ट उल्लेखही केला होता. या ठिकाणी असलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या सर्व भाविकांना तो करत असलेली भोंदूगिरी पोलिसांसमक्ष नजरेस आणून दिली. मांत्रिकासह त्याचे सर्व साहित्य ताब्यात घेऊन पोलिस गाडीतून त्याला कराड शहर पोलिस स्टेशनला आणले व जादूटोणाविरोधी कायद्यान्वये सेक्शन 3 अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला 2 दिवसांची पोलिस कस्टडीही मिळाली आहे. पुढील तपास चालू आहेच.

सकाळी 7 ते रात्री 9 (घरी पोचेपर्यंत 11) एकूण 16 तास चाललेले हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केवळ हिंदूंचेच बाबा पकडता या आरोपाला हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 5 वर्षे पूर्ण झाली तरीही त्यांचे मारेकरी व सूत्रधार अजून मोकाट आहेत. सातारा अंनिसने डॉक्टरांना खर्‍या अर्थाने कृतिशील अभिवादन केले आहे.

या संपूर्ण मोहिमेत कराडचे DYSP नवनाथ ढवळे, शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलिस नाईक राजू इनामदार, प्रवीण पवार, पोलिस कॉन्स्टेबल इम्रान पटेल, सौ. आशा ओंबासे, सागर बर्गे, रवींद्र चव्हाण, चालक दिनेश घाडगे, तसेच महा.अंनिसचे बुवाबाजी संघर्षविरोधी कार्यवाह भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, मुराद पटेल, सीताराम चाळके, मारुती थोरात, प्रशांत पोतदार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

प्रशांत पोतदार, सातारा