वास्तव जगात वावरताना आपणास अनेक प्रश्नांना आणि संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण संभ्रमित होतो, मन:शांती ढळते, काय करावे समजत नाही. जगावे की मरावे असा प्रश्न विचारणार्या हॅम्लेटसारखी आपली स्थिती होते. या परिस्थितीला आपणास धैर्याने तोंड देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. आपली बुद्धी पणाला लावून आपले प्रश्न सोडविता येतात. विवेकाचा वापर करून जीवनाची वाटचाल करता येते. पण काही जणांना हे जमत नाही. अशा मंडळींना वास्तवापलिकडच्या जगात घेऊन जाणारे विविध कल्ट (पंथ) निर्माण होतात. ‘शिफू सनकृती’ हा असाच एक पंथ. या पंथाचा प्रमुख सुनील कुलकर्णी यास नुकतीच अटक झाली आहे. त्याच्यावर लैंगिक अनाचाराचा आरोप आहे.
‘शिफू सनकृती’ पंथासारखे विविध पंथ जगभरात आढळतात. ओम शिनरिको या जपानी पंथाने रेल्वेत स्फोट घडवून अनेकांना ठार केले. ‘ऑर्डर ऑफ दि सोलर टेंपल’ आणि असलेच हिंसक अध्यात्मवादी पंथ का निर्माण होतात? लोक अशा पंथात का सामील होतात? त्यांना मन:शांती लाभते का?
ओम शिनरिको पंथाने भीती घातली होती की, दुसर्या महायुद्धात अवघं जग नष्ट होईल; पण त्यांचे अनुयायीच फक्त वाचतील. हेवन्स गेट कल्टच्या प्रमुखाने ‘हेल बॉप’ नामक धूमकेतुच्या शेपटीत उडती तबकडी आहे. या तबकडीतील देवमानव पृथ्वीवरील मानवांना स्वर्गात घेऊन जाणार, असे सांगत असे. इथं सगळीकडे संकट आणि दु:खच भरलेले. पण स्वर्गात सगळे सुखच सुख आणि आनंद. हा आनंद घेण्यासाठी ‘हेवन्स गेट’च्या 39 अनुयायांनी सामुदायिक आत्महत्या केल्या.
जगात धर्माची सत्ता यावी म्हणजे जग सुखी होईल अशा घोषणा अनेक कल्ट करीत असतात. भारत हिंदू राष्ट्र व्हावं म्हणजे सर्वांना सुखशांती मिळेल, अशी घोषणा एका हिंदू कल्टने केली आहे. अशा मोहमयी घोषणांना कमकुवत मनाची मंडळी बळी पडतात. ती अशा कल्टच्या आश्रमात जातात तेथे संमोहन व ब्रेन वॉश करणारी औषधे यांच्या प्रभावाखाली बुद्धिहीन होतात; प्रसंगी दुष्कृत्ये करण्यास धजावतात. यांना हिंसा वर्ज्य नसते. ‘ऑर्डर ऑफ दि सोलर टेंपल’ नावाचा कल्टचा प्रमुख डाय मँब्रो यानं अनेकांच्या हत्या घडवून आणल्या.
काही कल्ट फसव्या विज्ञानाचा आधार घेऊन तरुणाईला भुरळ पाडतात. ‘शिफू सनकृती’चे हेच तंत्र अवलंबले. शिफू ‘न्यूरोप्लास्टिसिटी रेसिलियन्स’ शिकवतो. म्हणजे काय? एन्डोक्रिनल ग्लांडमध्ये रासायनिक ऊर्जा विद्युतउर्जेशी जोडतो. त्यामुळे आपण आपल्याशी जोडले जातो. यासाठी नागवे व्हायचे. स्वत:कडे पाहायचे; स्वत:शी मैत्री करायची. मग आपलं मन नग्न होतं आणि आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होते. अशी भाषा विविध पंथात वापरली जाते. शब्द वेगळे असतील, प्रतीके वेगळी असतील; पण उद्देश एकच. दुर्बल मानसिकतेचा गैरफायदा घेऊन स्वर्ग सुखाचे आमिष दाखवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढणे. त्यासाठी हे कल्टवाले आश्रम काढतील, क्लब काढतील, भांग, चरस, अफू आणि मेंदू बधीर करणारी औषधे वापरतील. संभोगातून समाधीकडे कसं जायचं ते सांगतील. कल्टचे प्रमुख शिष्यगणांना बुद्धीचा वापर करण्यास मज्जाव करतात. इथेच ही मंडळी फसतात. स्वत:चा उद्धार स्वत:च्या बुद्धीने करावयाचा असतो, अशा कल्टवाल्या भ्रम राक्षसापासून नव्हे, हे त्यांना समजावून कसे द्यायचे, हा खरा प्रश्न आहे.