लोकविज्ञान संघटनेचे आधारस्तंभ असलेले, वयाच्या 82 व्या वर्षीही प्रचंड उत्साहाने विज्ञान-प्रसाराचे काम करणारे श्रीकृष्ण गुत्तीकर यांच्या अचानक जाण्याने लोकविज्ञान संघटनेत तर मोठी पोकळी झाली आहेच; पण विज्ञान चळवळीतील निरनिराळे प्रवाह आणि कार्यकर्तेयांच्यातील एक महत्त्वाचा दुवाही निखळला आहे. पक्का विज्ञानवादी, पुरोगामी असा हा हाडाचा कार्यकर्ता दिलदारपणे सर्वांशी संवाद साधणारा आणि जीवनावर सर्वांगाने प्रेम करणाराही होता. अनेकांना त्यांच्या नकळत विज्ञान-प्रसाराच्या कामात ओढणार्या या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची समाजमानसात नीट नोंद व्हायला हवी.
घरच्या परिस्थितीमुळे विज्ञानाची पदवी न घेताच ते नोकरीला लागले. विषाणूजन्य आजार पसरवणार्या निरनिराळ्या रक्तपिती डासांचे व संबंधित कीटक, पक्षी, प्राणी यांचे सर्वेक्षण करणार्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेतील चमूत ते होते. या सर्वेक्षणाच्या कामाकडे केवळ नोकरीतील एक काम असे न बघता ते एक आव्हान म्हणून बघत. हिमालयापासून ते दक्षिणेतील शिमोगाच्या घनदाट जंगलांमध्ये निरनिराळ्या परिस्थितीत संबंधित निरीक्षणे नोंदवण्याचे चिकाटीचे, मेहनतीचे काम उत्साहाने गुत्तीकर करत होतेच; पण शिवाय संबंधित प्राण्यांच्या वागणुकीबाबत काही वैज्ञानिक अनुमाने बांधून त्याचा प्रसंगी धोका पत्करून पाठपुरावा ते करत. स्थानिक रहिवाशांमध्ये मिसळून, त्यांच्याशी मैत्री करून त्यांचे सहकार्य या सर्वेक्षणात ते सहजतेने मिळवत. कामाबद्दल त्यांची बांधिलकी, विलक्षण उत्साह; तसेच निरीक्षण व अनुमान क्षमता अशा निरनिराळ्या चतुरस्त्र गुणांमुळे लवकरच ते सहकार्यांमध्ये आदरणीय व प्रिय झाले. 1980 मध्ये स्थापन झालेल्या लोकविज्ञान संघटनेच्या कामाशी त्यांची ओळख झाल्यावर त्यांनी लोकविज्ञान संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून दिले. कारण त्यांची वैज्ञानिक, मानवतावादी ऊर्मी, त्यांचा चतुरस्त्रपणा, लोकसंग्रह इत्यादी गुणांना तिथे पूर्ण वाव होता. विशेषत: वंचित समाजामध्ये विज्ञान रुजवण्याचे काम लोकविज्ञान संघटना करत होती, याचे गुत्तीकरांना खास आकर्षण होते. तसेच लोकविज्ञान संघटनेच्या कामात केवळ वैज्ञानिक माहिती देण्यावर भर नव्हता तर निरनिराळ्या विज्ञान-शाखांना समाईक अशी वैज्ञानिक विचारपद्धती रुजवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निरनिराळ्या विज्ञान-शाखेतील तज्ज्ञांच्या मदतीने आयोजित केलेल्या ‘लोकविज्ञान’च्या सर्व कार्यक्रमात ते उत्साहाने भाग घेत.
विज्ञान, प्रबोधन चळवळीतील महाराष्ट्रभरच्या संस्था, संघटना आणि व्यक्ती यांच्याशी गुत्तीकरांचे संबंध वाढत गेले ते लोकविज्ञान दिनदर्शिकेमुळे. ही अभिनव दिनदर्शिका प्रसिध्द करून तिचे महाराष्ट्रभर वितरण करणे हे त्यांचे मिशनच बनले होते. ही दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यामागे विचार आहे की विज्ञान, वैज्ञानिक, वैज्ञानिक शोध हे लोकांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा, विचारविश्वाचा, भावविश्वाचा भाग बनावे. तिच्या प्रत्येक पानावर एका पथदर्शी वैज्ञानिकाचा फोटो असतो; तसेच त्याचे काम व वैयक्तिक जीवन याबद्दल सुबोध माहिती आणि इतर उद्बोधक विज्ञान-टिपणे असतात. गेली 29 वर्षेलोकविज्ञान दिनदर्शिका प्रसिध्द होते आहे. आमचा इतर काही जणांचा सहभाग फारच थोडा होता. महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे कार्यकर्तेअगदी आवर्जून वर्षानुवर्षे50, 100, 200 दिनदर्शिकांची मागणी नोंदवत. त्या सर्वांशी गुत्तीकरांचा छान संवाद असायचा. दिनदर्शिका कमी किमतीत देता यावी म्हणून बरेचसे जाहिरातदार आपणहून देणगीवजा जाहिरात देत. गुत्तीकरांच्या प्रयत्नाने महिनाभरात 7-8 हजार दिनदर्शिका हातोहात विकल्या जात. एकूणच माणसांवर विलक्षण लोभ अशा त्यांच्या स्वभावामुळे सर्वांना ते आपले वाटत. त्यांच्या पत्नी, मुले, जावई सर्वांचे ‘लोकविज्ञान’च्या कामात सहकार्य असल्याने सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या घरी स्वागत असे. कारण त्यांचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यात फारकत नव्हती. अशा या जगन्मित्र, अजातशत्रू, जिंदादिल गुत्तीकरांची परंपरा चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल!
– डॉ. अनंत फडके