Categories
अफवा

अफवांनी निर्माण केले अंधश्रध्देचे देऊळ

मे - २०१८

सोमवार, दिनांक 16 एप्रिल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी जवळील कन्हेरवाडीच्या शिवारात परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम चालू असताना मुरुम खोदकामाच्या ठिकाणी कथित ‘कुबेर देवते’ची नागराजाने फणा काढून वेटोळे घातल्याची मूर्ती सापडल्याची अफवा ‘फोर-जी’ च्या गतीने काही मिनिटांतच महाराष्ट्रभर पसरली. तसेच काही प्रसारमाध्यमांनीही ‘चमत्कार-चमत्कार’चा जप केल्याने एका दिवसातच त्या ठिकाणी अंधश्रध्देचं देऊळं उदयाला आलं.

खरं तर परळी व अंबाजोगाई तालुक्यात मूर्ती सापडणं एवढ्या चर्चेचा विषय होऊ शकत नाही. अंबाजोगाईमध्ये सध्या उत्खनन चालू असून त्या ठिकाणी भव्य अशी तीन देवळे सापडली आहेत. तरीही तिकडे कुणी जास्त फिरकताना दिसत नाही. परळी तालुक्यातील ऐतिहासिक धर्मापुरी या गावांत व शिवारात देवतांच्या मूर्ती इतक्या सापडतात की त्यांची अनास्था होते. गावांत नाल्याच्या कडेला, शेतीच्या कुंपणालाही अशा मूर्ती पूर्वी दिसत होत्या. आता तेथील युवकांनी एका देवळाच्या परिसरात जमा केलेल्या आहेत. तर काही पुरातत्व खात्याने नेल्या आहेत. इतिहासप्रेमी मंडळी या परिसरातील लोकांच्या अशा अनास्थेविषयी नेहमी चिंता करत असताना कन्हेरवाडी शिवारातील कथित मूर्ती सापडल्याची व भव्य देऊळ बांधण्याची बातमी लोकांनी एवढी मनावर का घेतली ?

देव आणि धर्म हे आपल्या देशातील अतिशय संवेदनशील विषय आहेत. त्यांची चिकित्सा करायला कोणीही धजावत नाही. अशी चिकित्सा करणार्‍या संतांचा छळ झाल्याचे व समाज सुधारकांचे खून पडल्याचा इतिहास आहे. हा विषय लोकांच्या श्रध्देचा असतो; परंतु या श्रध्देला चमत्काराची फोडणी देऊन तिचा व्यापार करणारे सामान्य जनतेला फसवून दुकानदारी करतात. असे लोक प्रत्येक ठिकाणी आढळतात. मग असे लोक कन्हेरवाडीत नसतील तर नवलच होईल ! कन्हेरवाडी शिवारात सापडेल्या मूर्तीपेक्षा या मूर्तीच्या चमत्काराची जी कहाणी पसरविली, ती अफवाच प्रसिध्दीस कारणीभूत आहे.

या कथित सापडलेल्या मूर्तीच्या संरक्षणासाठी साक्षात नागराज फणा काढून बसले आहेत, म्हटल्यास भक्तांच्या झुंडीच्या झुंडी कन्हेरवाडीकडे दर्शनासाठी वळल्या. येथे चमत्काराला नमस्कार करण्याची समाजाची मानसिकता दिसून आली.

अफवा पसरवणे, चमत्काराचा दावा करणे, लोकांना भावनिक आवाहन करून त्यांचे शोषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु या ठिकाणच्या गुन्हेगारांनी देवाधर्माच्या नावाखाली झूल पांघरलेली असल्यामुळे समाज या घटनेचा कार्यकारण भाव तपासून चिकित्सा करण्याऐवजी त्यांना संरक्षण देत होता व त्यांच्या अफवांना बळी पडत होता. ज्या ठिकाणी मूर्ती सापडली ती जागा परळी येथील जाफर नावाच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीची आहे. मूर्तिपूजेला महापाप मानणारी व्यक्तीही आपली काही जागा देवळासाठी दान करायला तयार झाल्याने या जागेचे व मूर्तीचे महात्म्य अजून वाढले. आपणही देवळासाठी दान करायला मागे नाहीत, हे सिध्द करण्यासाठी भक्तांच्या रांगा दिवसागणिक वाढतच गेल्या. या संधीचा लाभ घेण्यासाठी लगेचच अखंड हरिनाम सप्ताहाची घोषणा करण्यात आली. ज्या कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी परवानगी घ्यावी लागते, ज्यांची तारीख सहज मिळत नाही, असे कीर्तनकार सहजच उपलब्ध झाले. बहुतेक कीर्तनकार कन्हेरवाडीच्या पंचक्रोशीतील लोकांच्या पुण्याईमुळेच या ठिकाणी भगवान विष्णू मूर्तीस्वरुपात प्रकट झाल्याचे कथन करू लागले. त्यामुळे त्यांचे देऊळ बांधून लोकांनी विष्णूच्या ऋणातून मुक्त होण्याचे आवाहन करू लागले. महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भावनेच्या आहारी जाऊन लोकही लाखो रुपयांचे दान करू लागले. काल्याच्या कीर्तनात एकट्या ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या किर्तनात दहा लाख रुपयांच्यावर देणगी जमा झाल्याचे कीर्तनातच ढोक महाराजांनी सांगितले.

देणगी देणारे कसे पुण्यवान आहेत, या देणगीमुळे देवासाठी घर होत आहे. त्यामुळे देणगी देणार्‍यांचे कल्याण होईल. तसेच देणगी न देणारे लोक कसे कृपण आहेत, याच्या कथा कीर्तनकार मंडळी रंगवून सांगू लागली. देणगी न दिल्यामुळे पाप लागण्याची भीती व देणगी दिल्यामुळे पुण्य मिळण्याच्या आमिषाला सामान्य नागरिकच नाहीतर उच्च शिक्षित, उच्च पदस्थ नागरिकही बळी पडू लागले. प्रा. मनोहर जायभाये व प्रा. दशरथ रोडे यांनी डॉ. हमीद दाभोलकर यांच्या सूचनेवरून व माधव बावगे सरांच्या मार्गदर्शनात दोन वेळा घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, श्रध्देच्या नावाने भाविकांच्या भक्तीचा होणारा व्यापार पाहिला व एक अफवा अंधश्रध्देतून देवळाची निर्मिती कशी करते, याची प्रत्यक्षानुभूती घेतली. सापडलेली मूर्ती ही कुबेर देवतेची असून ती धनाची देवता आहे. त्या ठिकाणी धनाचा साठा असावा व त्याच्या संरक्षणासाठीच नाग त्या मूर्तीला कथितरित्या संरक्षण देत असल्याचे फोटो प्रसिध्द झाले होते. परंतु मीडियाने हा नाग तेथीलच काही लोक मूर्तीवर सोडत असल्याचा व्हिडीओ दाखवल्यामुळे त्यांची भोंदूगिरी उघड झाली होती. तरीही तेथील संयोजक गणेश महाराज कन्हेरवाडीकर यांनी मीडिया आम्हालाच बदनाम करत आहे, असा आरोप केला. साप खरोखरचं त्या मूर्तीचे सरंक्षण करत होता, हेच पालुपद येणार्‍या-जाणार्‍याला सांगत होते.

पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी ती मूर्ती कुबेर किंवा विष्णूची नसून सूर्यदेवतेची आहे. हे सिध्द केल्यानंतर तेथील मंडळी या मूर्तीला तुम्ही कोणाचीही मूर्ती म्हणा; आम्ही विष्णूचीच मूर्ती मानणार व विष्णूचेच मंदिर बांधणार, असे सांगत होते. आम्हाला त्या ठिकाणी असे दिसून आले की, सापांविषयी लोकांमध्ये प्रचंड अंधश्रध्दा असल्यामुळेच असे भोंदू लोक त्याचा गैरफायदा घेतात. दोन महिन्यांपासून ज्या ठिकाणी जे.सी.बी. व पोकलँडच्या सहाय्याने प्रचंड खोदकाम चालू आहे. त्या ठिकाणी, उन्हामध्ये दगडाच्या मूर्तीवर साप थांबूच शकत नाही; परंतु पराकोटीच्या अंधश्रध्देपोटी लोक त्याचा विचार करत नाहीत.

धर्मशास्त्रानुसार तुटलेली, भंगलेली मूर्ती कधीच पुजनीय नसते. तिचे विसर्जन केले पाहिजे, असे असतानाही ‘अभ्यासू’ किर्तनकार मंडळी फुटलेल्या मूर्तीचे देऊळ बांधण्याचे लोकांना का आवाहन करत होते? मूर्तीचे संरक्षण करणारा साप आता कोठे गेला ? प्रशासनाने ही मूर्ती ताब्यात का घेतली नाही ? प्राचीन ऐतिहासिक ठेव्याचे संशोधन करण्याऐवजी ती मूर्ती तिथेच ठेवण्यात प्रशासनाचा काय हेतू आहे? संबंधित व्यक्तीवर अफवा पसरविणे, चमत्काराचा दावा करून लोकांची आर्थिक लूट करणे या गुन्ह्यांसाठी जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मागणी करत आहे. या आशयाचे निवेदन म.अ.नि.स. शाखा परळीच्या वतीने परळी उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस उपनिरीक्षक तथा दक्षता अधिकारी परळी शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी शाखा अध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, अशोक मुंडे, प्रा. विलास रोडे, प्रा. सिध्दार्थ तायडे, रानबा गायकवाड, संजय पाडमुखे, प्रेमनाथ कदम, श्रीहरी कवडेकर, अनंत सोळंके, विकास वाघमारे, राहुल केंद्रे इत्यादी कार्यकर्त्यांनी बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. मनोहर जायभाये यांच्या समवेत दिले.