बरं झालं यार ‘डार्विन’ !
तू भारतात जन्म घेतला नाहीस…
नाहीतर तुझ्यातील शास्त्रज्ञ
तेव्हाच मारला असता आम्ही माकडांनी…
तुझ्या मनावर परंपरेचं ओझं देऊन…
तुझे सिद्धांत आम्ही बुडवले असते
इंद्रायणीच्या पात्रात…
नाहीतर तुझ्या शोधावर
अग्नीसंस्कार तरी केला असता…
तुझ्या उत्क्रांतीचे रहस्य
तुलाच सांगता आले नसते रे…
तुझ्याप्रमाणेच तुझी प्रयोगशाळा
उध्वस्त केली असती… माकडचेष्टा करून…
माहिती आहे, तू जिद्दी होतास…
इतके सांगूनही तू ऐकणारा नव्हता…
मग, आम्ही तुलाही घ्यायला
धाडलेच असते पुष्पक विमान….
केली असती तरतूद सदेह वैकुंठाची….
आणि अडगळीत फेकले असते
तुझे ‘ओरिजीन ऑफ स्पेसीज’…
लाल कापडात गुंडाळून…
कारण, इथेही जिवंत होते
आणि आहेतच तुझ्या सिद्धांताला
खोटं ठरवणारे विल्बर फोर्स, बिशप…
बरं झालं यार डार्विन….बरं झालं…
– वैभव अनिलराव भिवरकर, कारंजा लाड