Categories
उपक्रम

जटामुक्तीचा ध्यास घेतलेली नंदिनी

फेब्रुवारी - २०१८

‘केसात जट आली’ तर देवीचं बोलावणं आलं, असं समजून मुलाला किंवा मुलीला देवीला सोडण्याचा प्रकार अनेक वर्षे सुरू होता. सीमाभागात – कोल्हापूर-निपाणी-बेळगाव-सांगली या भागात या प्रथेचे प्राबल्य होते. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी गडहिंग्लजच्या विठ्ठल बन्ने यांनी याविरोधात मोहीम उघडली. त्यांनी या भागात कार्यकर्ते तयार केले.

यल्लम्मादेवीचा प्रभावही प्रचंड! देवीचा कोप झाला, तर ती ‘बाईचा बापय करती आन् बाप्याला लुगडं नेशिवती,’ अशी दहशत होती. या दहशतीमुळे एखाद्याच्या केसात थोडासा गुंता झाला, कंगवा पुढे सरकेनासा झाला की, भीतीची लहर शरीरातून जायची! पोरांच्या आईच्या काळजात चर्र्र्र् व्हायचं! पण सांगणार कुणाला? दारात यल्लम्माची जोगतीण आली, तर तिच्याकडे आई मन मोकळं करायची! उपाय विचारायची आणि अलगद जाळ्यात सापडायची. “गुंत्याला हात लावू नगंस! त्येच्यावर वडाचा चीक लाव! हळद-कुंकू लाव आनी पाया पड!” असा दम मिळायचा! मग मुलाला-मुलीला देवीला सोडणे, जोगती करणे, तिच्या हाती जग देणे, आयुष्याचं वाटोळं करणं आणि देवी बसवण्यासाठी आपणही कर्जबाजारी होणे, असे चक्र पूर्ण होई!

गारगोटी, कोल्हापूर, सांगली या भागात या विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचार केला. एकेकाळी प्रत्येक गल्लीत दिसणार्‍या जटवाल्या महिला आणि पुरुष मुक्त झाले. हा प्रकार फुटकळ प्रमाणात आजही दिसून येतो. पुणेही याला अपवाद नाही.

पण पुण्यातल्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. अंनिसच्या पुण्याच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी मोहीमच उघडली. गेल्या चार वर्षांत त्यांनी 43 महिलांना जटामुक्त केले आहे. सध्या वीस महिला त्यांच्या रडारवर आहेत.

नंदिनी जाधव कोल्हापूरच्या. उत्तम क्रीडापट्टू, त्यामुळे चिकाटी अंगात मुरलेली. विवाहानंतर त्या पुणेकर बनल्या. मेकअप आर्टिस्ट झाल्या. लंडनच्या सिडास्कोमधून त्यांनी ब्युटिशिअन्सचे शिक्षण घेतले. बी.ए.नंतर एम.एस.डब्ल्यू. केल्यापासून समाजकार्यात रमल्या. विधवांना, परित्यक्तांना त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये तयार करून स्वत:च्या पायावर उभे केले. शाळा-शाळांमध्ये जाऊन मुलींना लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले. अंध, अपंग, अनाथ मुलांना क्रॅफ्टचे शिक्षण दिले. रेडलाईट एरियामध्येही त्यांनी काही काळ काम केले आहे. 2016 पासून त्या अंनिसच्या कामाशी जोडल्या गेल्या.

2013 साली डॉ. दाभोलकरांचा खून झाला. डॉक्टरांना मारले की, अंनिसचे काम संपेल; मग सामान्य जनतेस लुबाडण्याचा परवाना आपल्याच हाती, अशा मनसुब्यात रमलेल्या भोंदू सनातन्यांचा अपेक्षाभंग झाला. गावागावातले कार्यकर्ते पेटून उठले. 18 वर्षे रखडलेला कायदा सहा महिन्यांत मंजूर करायला लावला. दोन वर्षांत जातपंचायतीच्या मनमानीला चाप लावणारा कायदा करायला भाग पाडले. खुनानंतर शाखांची संख्या दुपटीने वाढली; कार्यकर्ते तिपटीने, तर मदतीचा ओघ चौपट झाला. एका राज्यातल्या काही जिल्ह्यांत असलेली अंनिस आठ राज्यांत पोचली.

क्रांतीचा जयजयकार करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात –

“सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालामधुनी भावी क्रांतीचे नेते” डॉक्टरांच्या खुनानंतर ‘आम्ही सारे दाभोलकर’ ही घोषणा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात आणली. पुण्याच्या अंनिस कार्यकर्त्यांनी नंदिनी जाधव यांना साथ दिली.

2013 साल. पुण्यातल्या जनवाडी भागातल्या एका मुलीच्या डोक्यात जट दिसली. शाळेत जाणारी सोळा वर्षांची मुलगी! तिची शाळा बंद झाली. आता कर्नाटकात, सौंदत्तीला जाऊन मुलीला देवदासी केल्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबीय हवालदिल झालेले. मैत्रिणी अंनिसपर्यंत पोचल्या. कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. जट कशी येते, त्यात देवीचा काही संबंध नाही इत्यादी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर मिळाले – “ही देवीची जट हाय. हिला कोन हात लावलं, तर हात झडतील, कात्री लावली, तर रक्ताची दार लागलं.” पण कार्यकर्ते मागे हटले नाहीत. ती जट सोडवून मुलीला आणि कुटुंबियांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून त्यांनी वाचवलेच; पण आजपर्यंत अशा अनेक जटा सोडवल्या. काही वर्षांनी जटांमध्ये तर सगळेच केस गुंतलेले असतात. त्यांचे वजन आठ किलो, दहा किलो होत असे! नंदिनी जाधव सांगतात – “आजपर्यंत 43 जटा सोडवल्या; पण माझे हात काही झडले नाहीत. जटा कापल्या; पण रक्ताचा लोंढा कधी लागला नाही. हं! काही जटांमधून पसाभर उवा मात्र बाहेर पडल्या!” एका जटेत तर एक पाल सहकुटुंब राहत होती. त्वचेला अनेक जखमा झालेल्या होत्या.

ऐकतानाच एवढी किळस येते, तर प्रत्यक्ष काम करणार्‍यांचे काय होत असेल? त्या दिवशीच्या संध्याकाळी पोटात अन्न जाणे अवघड होते आणि अशी घाण वर्षानुवर्षे डोक्यावर वागवणार्‍या, ‘जग’ घेऊन ‘आक्कुली जोगवा’ म्हणत पोट भरत राहतात. ‘जग’ म्हणजे देवीचा मुखवटा, कवड्यांची माळ घातलेली छोटी परडी, बांगड्या, हळद-कुंकू, तांदूळ इत्यादी व्यवस्थित मांडून ठेवलेली मोठी बुट्टी.

जटा होण्याचे कारण काय? वेळेवर केस विंचरले नाहीत, तर त्यांचा गुंता होतो. गुंता लगेच सोडवला तर बरे, नाहीतर त्यावर धूळ साचते, कचरा, माती, गवत अडकते, कधी पिठाचा हात लागतो, केस एकत्र चिकटतात. कामाच्या रगाड्यातून केसाची निगा राखायला, वेळेवर तेल-पाणी करायला वेळ मिळत नाही. जट वाढत जाते. जटेसंबंधीचे ‘तथाकथित आध्यात्मिक ज्ञान’ आसपासच्या महिलांना असतेच! त्या मुलीला लवकरात लवकर देवीपर्यंत पोचवतात. देवाची मूर्ती किंवा निर्माल्य पाण्यात विसर्जित करण्याची कुप्रथा आहे. काही वेळा, जटाही पाण्यात विसर्जित करण्याचा आग्रह भाविक धरतात. त्यांचे प्रबोधन करून आणि थोड्या चढ्या आवाजाने पाणी प्रदूषण टाळावे लागते.

एखाद्याला जट आली की, त्यांना देवी बनवले जाते. विचित्र नजरा, पाया पडणारे भाविक, चुकचुकणार्‍या आया-बाया, यातून दैवी शक्तीचा भ्रम, भीती, नैराश्य, तुटलेपणा अशा अनेक भावनांना सामोरे जाणार्‍या महिलेच्या काही वेळा अंगातही येऊ लागते.

अशिक्षितांमध्ये जटांचे प्रमाण अधिक आहे; पण काही वेळेला शिक्षित आणि उच्चशिक्षितही अपवादाने आढळतात. जट आली म्हणून एक बँक मॅनेजर सात वर्षे बायकोच्या जवळ यायला घाबरत होता. अंनिसच्या संपर्कात आल्यावर त्याची ‘मुक्ती’ झाली.

जट असलेल्या महिलेला व तिच्या कुटुंबियांना नीट समजावून सांगितले जाते. काही वेळा यासाठी काही महिने जातात. पूर्ण मानसिक तयारी झाल्यावर, त्यांच्याकडून लेखी विनंतीपत्र घेतल्यानंतरच जट सोडवतात. नंदिनीताई यासाठी शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवार निवडतात. देवीचा वार असल्याने भीती कमी होते.

जटा निर्मूलनाबरोबर पुण्यातील अंनिसतर्फे इतरही विविध उपक्रम घेतले जातात. नंदिनी जाधव म्हणतात, ‘आजपर्यंत पन्नासच्यावर बाबा-बुवा आणि बोगस डॉक्टरांना आपण पकडले असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रसारासाठी सत्तावीस जिल्ह्यांतून बाराशेच्यावर व्याख्याने दिली आहेत. सलग एकोणपन्नास दिवसांचा दौराच केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. राज्य महिला आयोगाने ‘मॅक्स महाराष्ट्र’ पुरस्कार दिला आहे.

त्यांनी दरमहा लाखभर उत्पन्न देणारे ब्युटीपार्लर बंद केले आणि पूर्णवेळ कार्यकर्त्या बनल्या. स्त्रियांच्या बाह्य सौंदर्यापेक्षा बौद्धिक आणि भावनिक सौंदर्य खुलवण्याच्या अंनिसच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. आज त्या उच्चस्वरात म्हणतात – “फुले, शाहू, आंबेडकर- आम्ही सारे दाभोलकर.”

नंदिनी जाधव संपर्क : 9422305929