Categories
कथा

घबाड किंवा लबाडांची युती

वार्षिकांक - २०१७

हरिशंकर परसाई

जैसे उनके दिन फिर गये’ हरिशंकर परसाई यांच्या हिंदी कथेचा स्वैर अनुवाद :

बुवाबाबा, राजकारण यांचे साटेलोटे हा प्रकार नवा नाही . जगभरचे राजेरजवाडे ते आजकालचे राजकारणी ! यांची पध्दतशीर युती समाजलुटीचे जाळे विणून भोळ्या जनांना लुबाडत समाजात उजळ माथ्याने कसे राज्य करते, याचे खमंग दर्शन आजच्या बुवाबाजीच्या धुमाकूळ घातलेल्या जमान्यात समर्थपणे या कथेतून होते ..

राजा-राणीच्या कथेतील एक राजा. राणीवशात अनेक राण्या होत्या. प्रथेप्रमाणे थोरल्या राणीच्या मुलांनी इतर राण्यांच्या मुलांना विष घालून मारले .सावत्र भावांचा आपोआप काटा काढून आपल्या मुलांनी राजगादीवर बसण्याचा मार्ग मोकळा केल्याचे पाहून राजाही मनोमन सुखावला होता.

चाणक्यनीतीचा तो भोक्ता होता. राजाने आपल्या मुलांना लांडग्याप्रमाणे समजावे : ते कधी लचके तोडण्यास येतील, याचा नेम नाही, हा चाणक्यसंदेश नीतिवान म्हणवणारा राजा पक्का जाणून होता. थोरल्या राणीचे चारही पुत्र राजा होण्यासाठी आतुर होते. पण हे कसे शक्य होणार! एक तर राजा म्हातारा झाल्यावर अथवा तो मरण पावल्यावर !

सध्या या दोन्ही पैकी काहीच शक्य नव्हते. पण राजा सावध होता.

एक दिवस राजाने दरबार भरवला. चौघा राजपुत्रांना बोलावून सांगितले, ‘हे पाहा, मी आता म्हातारा झालोय. तुमच्यापैकी एकाकडे राज्य कारभार सोपवून मी संन्यास घ्यावा म्हणतोय .तपस्या करून संन्याशी लोकांना सुधारवण्याचा विचार आहे माझा!’

पण अडचण अशी का राजा होण्यासाठी लायक कोण? हे कसे ठरवणार ?…. तर तुम्ही चौघेही चार दिशेला जा, एक वर्षानंतर परत या. एका वर्षात आपल्या हुशारीने जो कोणी जास्त धन कमावेल, तोच राजसिंहासनाचा वारसदार होईल .

चौघे राजपुत्र चार दिशेला निघाले.

बघता-बघता एक वर्ष संपले. पुन्हा दरबार भरला. सेनापती, मंत्री, चेले, विदूषक, भाट, दरबारी जमा झाले. सर्वजण उत्कंठतेने नवा राजा कोण होणार, याची वाट पाहू लागले .

‘होशियार,….. महाराज दरबारात येत आहेत,’ म्हणत कामकाज सुरू झाले.

‘मुलांनो, तुम्ही चारही जण जिवंत असल्याचे पाहून मला आनंद वाटतोय! ’तुमच्यापैकी कोणी रोगाने मेले नाही वा एकाने इतरांचा द्वेषाने काटा काढला नाही! हे पाहून! कारण तसे झाले असते तर माझे काम सोपे झाले असते!’

‘ठीक आहे, एक-एक करून आपले अनुभव सांगून संपत्ती दाखवा.’

मोठा राजपुत्र मंचावर आला, नमस्कार करत आपले अनुभव सांगू लागला.

‘महाराज, राजा होण्यासाठी मेहनत व इमानदारीची आवश्यकता असते. म्हणून मी परराज्यात गेल्यावर एका व्यापार्‍याकडे हमाल बनून राहिलो. पाठ तुटेपर्यंत मेहनत केली. गोण्या वाहून वा इमानदारीने जे कमावले त्यातून 100 सुवर्णमोहरा शिल्लक ठेवल्या हे पाहा’ .. असे म्हणत 100 मोहरा समोर ठेवल्या.

‘राजा होण्यासाठी मी एकदम लायक आहे महाराज, माझा विचार राजगादीसाठी व्हावा.’

राजाने दुसर्‍या पुत्राकडे इशारा केला. दुसरा राजपुत्र सांगू लागला, ‘महाराज, आपण क्षत्रिय, लढणे वा समोरच्याला आपल्या सामर्थ्याने समोरच्याला हरविणे, हाच आपला धर्म’

‘एका गुंडाच्या टोळीत सामील झालो वा पुढे त्याच टोळीचा नायक झालो .अनेक ठिकाणी दरोडे टाकले, लूटमार केली . त्या राज्यातील सरकारी कर्मचारीही या लुटीला मदत करायचे.चांगली लूट मिळायची. मोठा भाऊ काम करत होता त्या व्यापार्‍याकडेही दोन वेळा डाका घातला .या वर्षभरात 5 लाखाची कमाई केलीय. ही पाहा !’

‘धाडस व बळजबरीने धन जमा करण्याचे माझे कौशल्य पाहून मीच राजा होऊ शकतो.’

पाच लाख सुवर्णमुद्रा पाहून सर्वजण खूष झाले.

आता तिसरा राजकुमार बोलू लागला, ‘महाराज, मी शेजारच्या राज्यात जाऊन व्यापार सुरू केला. हेराफेरी अन् भेसळ करण्यात पारंगत झालो. तुपात गोडेतेल, साखरेत गारगोटी पावडर, धान्यात गवत, बिया मिसळून विकले. राजापासून गरिबापर्यंत सर्वांना हा भेसळीचा माल विकला. मोठा भाऊ काम करत असलेल्या ठिकाणी तर नेहमीच भेसळवाला माल जायचा! डाकूंच्या टोळीसाठी भेसळयुक्त तुपाचे डबे तर नेहमीच जायचे! एकदा तर राजाने चौकशी केली की, ही साखर पांढरी खरखरीत कशी काय?’

मी सांगितले, ‘राजे, खास परदेशी खाणीतून मागवली आहे ही साखर! फारच आरोग्यदायी आहे!’ प्रचंड नफा मिळवला .10 लाखांची बचत झाली ती ही पाहा .. धूर्त व बेईमानी केल्याशिवाय कोणता राजा यशस्वी झालाय? तेव्हा मीच राजा होणार, यात शंका नाही.

10 लाख मोहरांचा ढीग पाहून लोक चकित झाले. हाच राजा होणार बहुतेक! लोक कुजबुजू लागले.

आता चौथा व सर्वांत लहान भाऊ समोर आला.

शांत भाव, साधे कपडे, राजबिंडा अवतार, आदबीनं पावलं टाकत आलेला राजपुत्र मधुर आवाजात बोलू लागला.

‘महाराज, मी शेजारच्या राज्यात गेलो, तेव्हा काय करावे हे मलाच समाजात नव्हते. एक महिना अर्धपोटी वणवण भटकलो ना धड अन्न, ना पाणी.. अखेर थकून-भागून एका आश्रमाजवळ पोहोचलो. बाहेर पाटी लागली. पोटभर जेवलो. मग जरा आत डोकावलो तर! माझे डोळे गरागरा फिरू लागले, असं चित्र दिसलं. एका ठिकाणी 4 ते 5 माणसे ढीगभर सोने-चांदी, मोहरा मोजत बसलेले दिसले.कित्येक लाख असतील. मी आयुष्यात प्रथमच इतके धन पाहिले असेल!’

मी जवळ जाऊन त्या सेवाभावी लोकांना विचारले, ‘बंधू आपला धंदा काय आहे?…..’

प्रथम त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर मला म्हणाले, ‘ए, चल पळ, उगा चौकशा कशाला?……’

मीही घोरपडीप्रमाणे चिवट. मी विचारले, ‘हा ‘सेवा आणि त्याग’ हे आपल्या आश्रमाचे ब्रीद आहे ना? यात धंदा कुठून आला?’

‘नाही म्हणजे, मला समजून ज्ञान वाढवायचे आहे म्हणून म्हणतो! माझी आदबीची भाषा पाहून त्यातील एकजण जवळ आला व माझी दया येऊन म्हणाला, ‘हाच धंदा आहे मित्रा! जर तुला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर तुला काही काळ आमची सेवा करावी लागेल. आश्रमातले नियम समजून घ्यावे लागतील, तरच तुला आम्ही हा गुरुमंत्र देऊ. तुझी इच्छा व मेहनत पाहूनच तुला आम्ही शिकवू.’

‘पिताजी, मी त्या आश्रमात बरंच काही शिकलो. राजेशाही थाटात राहणं, संथ सुरात बोलणं, सुंदर वेशभूषा, धूर्त नजर ठेवून बोलणं, शेवटच्या दिवशी आश्रमातील प्रमुख स्वामींनी मला कानमंत्र दिला, ‘वत्सा, भगवान का नाम लेकर कार्य प्रारंभ कर दे, तुझे सफलता जरूर मिलेगी.’ दोन जाडे-भरडे कपड्यांचे जोडही दिले … ‘हे कपडे जनमानसात वावरताना वापरायचे. ही तुझी सुरक्षा कवच आहेत! कोणत्याही गैरप्रसंगात हीच तुला वाचवतील!.. जा आता, तथास्तु.’

मी तिथून बाहेर पडलो. एका डोंगरावरची निवांत सार्वजनिक जागा निवडली अन् छोटासा आश्रम उभारला, नाव दिले, मानव सेवाश्रम.

प्रचार सुरू केला,’जगाच्या कल्याणा, मानवाच्या उद्धारासाठी, अध्यात्मिक उन्नतीसाठी अवतारी बाबा’.

पुण्य कमाईचा मार्ग खरा, गरिबांची सेवा करा!

‘समाजाचे हित हीच देशाची प्रगती! आपल्या योगदानाची गरज आहे. दान हेच पुण्य! दान करा पुण्य कमवा. या जन्मी दान अन् याच जन्मी पुण्य!

आपल्या देशातील लोक फार भोळे आहेत हो. पुण्य म्हटलं की, लोक धावाधाव करत जातात, हळूहळू गर्दी सुरु झाली, दान मिळू लागले. या व्यापारी भावानेही दान दिले मला ! लुटीचे पैसे तर 4 ते 5 वेळा या दुसर्‍या भावाने टाकले दान पेटीत. एकदा राजाचे सैनिक मागे लागले. चोर शोधताना तर हा दरोडेखोर भाऊ आठ दिवस लपून होता माझ्या मानवसेवाश्रमात! ही पण मानवसेवाच होती ना!’

राजा, राजाचे सेनापती, सारे यायचे दर्शनाला अन् दान द्यायला. दुसरीकडून लुटलेले धन लपवण्याचा राजमार्ग हाच. हे मी कित्येक जणांना पटवून सांगितले .

एका वर्षात मी जवळजवळ 20 लाख सुवर्णमुद्रा जमा केल्यात ..आणि हा ओघ चालूच आहे.

कोणताही रक्तपात न करता, धूर्तपणे धन जमा करणे, वर पुण्याचं काम करणे असं कौशल्य कोणाला जमलंय!

त्यामुळे आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ राजा कोण ठरेल?

..20 लाख मोहरांचा प्रचंड ढीग पाहून सर्वजण अवाक् झाले.

राजाने मंत्रिगटाला विचारले, ‘तुमचा निर्णय काय आहे?’

सर्व मंत्री एका सुरात म्हणाले, ‘हातच्या काकणाला आरसा कशाला?’

जो राजपुत्र धूर्त आहे, मेहनती, व्यापारी, लुटेरे; इतकंच काय, राजाकडूनही न भांडता, न रक्तपात करता धन कमावतो. वर बदनाम न होता समाजात उजळ माथ्याने वावरतो, तोच सर्वांत धाकटा पुत्र राजा होण्याच्या लायकीचा आहे.

दुसर्‍या दिवशी चौथ्या राजपुत्राचा राज्याभिषेक झाला.

यथावकाश सुंदर राजकन्येशी विवाह झाला अन् असेच राजे मग पुन्हा निवडले गेले. जसे त्या राजपुत्राचे दिवस फिरले तसे आपलेही फिरावेत, हीच आपली इच्छा असणारच!

अनुवाद : अण्णा कडलासकर, पालघर

संपर्क : 9420170406