Categories
अभिवादन

मअंनिसचे कार्यकर्ते दत्तराव जाधव यांना विनम्र अभिवादन

वार्षिकांक - २०१७

बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील प्रसिद्ध कापड व्यापारी, जाधव साडी सेंटरचे संचालक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोरी शाखेचे संस्थापक-अध्यक्ष दत्तराव साहेबराव जाधव यांचे 1 ऑक्टोबर 2017 रोजी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. विवेकी बाण्याने समाजात पुरोगामी विचार रुजविणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

वीस ते बावीस वर्षांपूर्वी परभणी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोहन मावलगे यांच्या संपर्कात आले होते. सारासार विचार, विवेक यामुळे डॉ. मावलगे आणि दत्तराव जाधव यांचे संबंध आणखी घट्ट झाले होते. अंनिसच्या चळवळीत मग ते आले. डॉ. मोहन मावलगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या गावात तांदूळवाडी येथे अंनिसची शाखा स्थापन केली होती. तांदुळवाडीतील ग्रामस्थांना त्यांनी एकत्र करून विवेकी विचार समजावून सांगितले आणि मग गावकर्‍यांनीही त्यांना व त्यांच्या विचाराला चांगली साथ दिली. एका कार्यक्रमासाठी तांदूळवाडी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आले होते. त्यांचे कार्य पाहून तेही भारावून गेले. एका छोट्याशा गावात आपले विचार समाजात रुजविणारा एक सच्चा कार्यकर्ता आम्हाला दत्तराव जाधव यांच्या रुपाने मिळाला, असे उद्गार त्यांनी आपल्या भाषणात काढले होते आणि त्या दिवसापासून दत्तराव जाधव आणखीच प्रेरित झाले आणि त्यांनी या चळवळीसाठी स्वत:ला झोकून दिले. आपला व्यवसाय सांभाळून, लोकांची मने राखून त्यांनी अंनिसचे काम शेवटपर्यंत केले. गेल्या वीस वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या दिवाळी अंकाला दत्तराव जाधव जाहिराती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. या कामासाठी त्यांना अंनिसच्या वतीने गौरविण्यात आले होते. अंनिसचे वार्षिक अधिवेशन असो की, जिल्हा अधिवेशन असो की, शिबीर असो; त्या कार्यक्रमाला आवर्जून ते हजर राहायचे. त्यामुळे दत्तराव जाधव आणि अंनिस ही नाळ जोडली गेली होती. बोरीतही त्यांनी सर्व समाजातील सर्व व्यवसायातील नागरिकांना सोबत घेऊन तेथे अंनिसची शाखा स्थापन केली. शाखा स्थापनेपासून तेच या संघटनेचे अध्यक्ष होते. 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोरीच्या बाजार मैदानावर सलग तीन वर्षेजाहीर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात दत्तराव जाधव यांचा सिंहाचा वाटा होता. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील एका कार्यक्रमाला आले होते. बर्‍याच शाळांमधून त्यांनी अंनिसचे विचार मांडले. अनेक बाबांचा भांडाफोड करण्यातही दत्तराव जाधव हिरिरीने भाग घेत होते. बोरीत मला चांगली टीम मिळाली, असं ते नेहमी म्हणायचे. कारण बोरी शाखेच्या कार्यकारिणीत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांना खूप आनंद वाटत होता.

वास्तव जगात वावरताना आपणास अनेक प्रश्नांना आणि संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण संभ्रमित होतो, मन:शांती ढळते, काय करावे समजत नाही. या परिस्थितीला आपणास धैर्याने तोंड देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. आपली बुद्धी पणाला लावून आपले प्रश्न सोडविता येतात. विवेकाचा वापर करून जीवनाची वाटचाल करता येते, हे दत्तराव जाधव यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. त्यांच्या या विवेकी बाण्याला आमचा सलाम….!

नेमिनाथ जैन