Categories
कथा

अर्जुना अंगात आला

वार्षिकांक - २०१७

गुढीपाडव्याचा दिवस होता. चिंचगावात वाजंत्री वाजत होती. ढोल, ताशा, पिपाणीने जोर धरला होता. हे सारं वाजंत्रं सखूच्या दारात गोंधळ घालत होतं. काही वर्षांपूर्वी तिचा नऊ-दहा वर्षांचा अर्जुन नावाचा मुलगा वारला होता. त्याचं गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर लग्न लावून त्याला कुठल्या तरी झाडाखाली स्थानबद्ध करायचं होतं .त्यासाठी सखूबाईनं एका लग्नाचा बाजार करून आणला होता. दोन दिवस चमचमीत जेवणावळ होणार होती. सारं गाव जेवायला येणार होतं. मेलेला अर्जुन परत येणार, तो कुणाच्या अंगात कुदणार, भरणार हे बघायला, सारं गाव बघ्याची भूमिका बजावायला येणार होतं. पै-पाहुणे जमा झालेले होते. सखूबाईचं घरदार भरून गेलं होतं. सारीकडे कसा आनंदवर्षाव साजरा होत होता. आपलं मेलेलं वासरू कुणाच्या तरी अंगात येऊन चार शब्द बोलणार, मला आई म्हणून मिठी मारणार या स्वप्नरुपी आशेने सखूबाईचं मन भरून आलं होतं.

वाजंत्री वाजत होती. गावातील प्रत्येक घरासमोर गुढी मोठ्या डौलानं ताठ मान करून उभी राहत होती. तिची पूजा-अर्चा होत होती. चारीबाजूंनी फटाकड्यांचा धुमधडाका सुरू होत होता. गुढीपाडव्यानिमित्त एकमेकांना मिठ्ठी मारून गावकरी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत होते. गावात आनंदोत्सव साजरा होत होता. गावातील लहान पोरं कुणाची गुढी सर्वांत उंच आहे, याची टेहळणी करत गल्लीबोळातून फिरत होती. त्यांच्याही आनंदाला उधाण आले होते. हळूहळू सर्व गावकरी गुढीची पूजा-अर्चा करत सखूबाईच्या घराच्या दिशेने पावले टाकू लागली. सखूबाईचा मेलेला मुलगा परत येणार, तो कुणाच्या अंगात येणार, हे बघण्यासाठी गावातील आया-बाया, चिल्लीपिल्ली, पोरं-बाळं, लहान-थोरांची बोटे धरून सखूबाईच्या घराच्या दिशेने येऊ लागले. गर्दी जमा झाली. गर्दी पाहून वाजंत्र्यांनाही हुरूप चढू लागला. तेही वाजंत्री जोरजोराने वाजवू लागले. ढोल वाजू लागले. आजूबाजूला गावात आवाज जाऊ लागला.

वाजंत्र्यांना आदेश मिळाला, ‘चला माळरानावर!’

माळरान हे गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. त्या माळरानावर एका गवताच्या सडात मेलेल्या अर्जुनाला लहानपणी गाडलं होतं. त्याला ज्या जागेवर गाडलं, माती दिली, त्या जागेवर एक दगड ठेवला होता. वाजंत्री ढोल-ताशा वाजवत गावाच्या वेशीतून माळरानाच्या दिशेने चालू लागले. वाजंत्र्यांच्या पाठोपाठ बुवाही होता. तोच बुवा मेलेल्या अर्जुनाला कुणाच्या तरी अंगात भरवणार होता. बुवांच्या पाठोपाठ सखूबाई, तिचे मुलगे, सुना, नातवंडे, लेकी असा गोतावळा निघाला होता. गावकरीही हातात हात घालून माळरानाची वाट चालत होते. बघता-बघता सर्व वर्‍हाड माळरानावर येऊन पोचले. त्या माळरानाला जणू जत्रेचं रूप प्राप्त झालं होतं. अर्जुनला जिथे गाडलं होतं, त्या दगडाजवळ लग्नाचा सारा बाजार ठेवला. बुवांनी घोंगडं अंथरलं…. त्या घोंगड्यावर वेगवेगळ्या देवाच्या नावाची पाने मांडली. त्याला ‘मांड’ म्हणतात. सर्वांत मोठे पान अर्जुनच्या नावाने मांडलं. त्या सर्व पानांवर पुरणपोळी, भात, भाजी असे अनेक नाना प्रकारचे पाच पक्वान्न ठेवले. लिंबू, नारळ यांची बाजूला रास पडली होती. त्यातील एक-एक लिंबू कापून तो बुवा चार दिशांना फेकत होता, नारळ फोडून फेकत होता, गुलाल उधळत होता. बुवाने घरातील सर्व मंडळींना त्या घातलेल्या मांडासमोर ओळीने उभे केले. घरातील एखादा माणूस चुकून कुठे राहिला का, याची विचारपूस केली. लगेच गार्‍हाणं घालायला सुरुवात केली.

‘हे अर्जुना, माय लेकरा, तुझ्या आईनं हा सारा बाजार करून आणला. तू रानोमाळी फिरतोस, उन्हात तापतोस, पावसात भिजतोस, या रानातून तुला गावात नेऊन… तेथे राहायला छोटंसं घर बांधून देणार. त्या आधी तुझं इथं लगीन करणार.. मगच तुला या रानाकडून घराकडे नेणार. माझं गार्‍हाणं ऐक अन् तू कुठे असशील तिथून ये…. या रांगेत उभ्या राहिलेल्या तुझ्या भावाच्या, बहिणीच्या, पुतण्याच्या, पुतणीच्या, भाच्याच्या, नाहीतर भावांच्या बायकांच्या अंगात ये… या रानातून भटकंतीतून तू मुक्त हो…. अर्जुना, तू लवकर ये… हर हर महादेव….’ म्हणत बुवाने गुलाल उधळला. थांबलेली वाजंत्री पुन्हा वाजू लागली. रान जागे झाले.

खूप वेळ झाला. रांगेत उभे असणार्‍यांचे पाय दुखू लागले. ते पाय वर-खाली करू लागले. बुवांचं गार्‍हाणं ऐकून अर्जुना कुणाच्याच अंगात येईना. बुवांचा चेहरा लाल झाला. अर्जुनाला कुणीतरी आपल्या बाहुपाशात बांधून ठेवलंय. त्याला मुक्त करायला पाहिजे, असे काहीतरी स्वत:शी बडबडत लिंबू कापून फेकत होता. गुलालाच्या मुठीच्या मुठी मारून फेकत होता. ‘अरे अर्जुना लवकर ये, आई-बाबा, भावांचा अंत पाहू नको. आलाऽऽ आला – तो बघ फणसाच्या झाडावर बसून मला खुणा करतोय – सखूबाई तुझा अर्जुन येतोय बघ….’ बुवा बडबडत होता.

गावकरी बुवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उगाच आंब्याच्या, फणसाच्या झाडाकडे बघू लागले. त्या झाडावर त्यांना कावळेच दिसू लागले.

गावातील एखादं चाप्टर पोरगं म्हणायचं, ‘व्हयं बुवा. त्या आंब्याच्या, फणसाच्या झाडावर कावळे बसलेत, तुमाला यांचा अर्जुना कुठे दिसतोय? डोकं-बिकं फिरलंय का तुमचं.”

‘अरं-त्या कावळ्यांतच अर्जुना हाय. माणूस मेला की कावळ्याच्या जन्माला जातोय. कावळा होऊन शेताशिवारात फिरतोय – तो बघ मोठा कावळा दिसतोय – तो अर्जुना हाय…. इकडे-तिकडे फेर्‍या मारतोय… कुणाच्या अंगात येतोय काय माहीत…? अजून निवदालाही स्पर्श करीना… काय चुकलं काय? चुकलं, तर माफ कर अर्जुना? असा रागास येऊन भुर्रकन उडून जाऊ नकोस? चुकलं-माकलं तर आपल्या पोटात घालायचं, शेवटी हे तुझंच नातं हाय…. उगाच यायला वेळ लावू नगंस. उन्हं लई तापायला लागलं. डोकं फुटंल…. लवकर ये… कुणाच्या तरी अंगात शिर रे बाबा….?

‘काय चुकलं का रे लेका. चुकलं तर पोटात घाल. मला माफ कर. मी तुझी आय हाय…. आयला माफ न्हाय करायचं, तरी कुणाला करायचं….? ही बघ तुझी भावंडं तुझी आतुरतेनं वाट बघत्यात…. हे बाबा ये… उगाच वेळ लावू नगंस….’ सखूबाई हात जोडून बोलत होती.

बुवांनी आपला ‘उद्योग’ सुरूच ठेवला होता. गुलाल उधळणं, लिंबू कापून टाकणं, चिरमुरं फेकणं हे सारं तो झकासपणे पार पाडत होता. मध्ये-मध्ये बोलताना चिरमुर्‍याची मूठ तोंडात टाकत होता. आपली भूक भागवत होता.

‘अरं यांचा अर्जुना मेला, तो दिसायला कसा होता? गोरा, काळा, सावळा, उंच की ठेंगणा…? जर तो गोरा, काळा, सावळा असेल, तर कावळा बनून येईल. म्हणजे यांचा अर्जुन कावळाच होता का? ते आंब्याच्या, फणसाच्या झाडावरील कावळे…. या रांगेत उभा राहिलेल्या माणसा-बायकांच्या अंगात शिरणार… कसे काय शिरतील…. हा बुवा काय? येडाबिडा नाय ना? काय पण उगाच तोंडाला येईल ते बडबडतोय?” पोरांची कुजबूज सुरू झाली.

‘ते जाऊ दे रे, बघू या ना, अर्जुना कुणाच्या अंगात येतोय. कुदतोय ते बघायला नको का? उगाच बडबड कशाला?’

पोरांची कुजबूज रंगात येत होती.

बुवाही गुलाल उधळून, लिंबू कापून टाकून, चिरमुरे फेकून दमला. त्याला घाम फुटला. एका हाताने घाम पुसत म्हणू लागला, ‘अर्जुना काय चुकलं बाबा, उशीर लावू नकोस. माणसं जेवायची आहेत. तू अंगात नाय आलास, तर ही माणसं दिवसभर उपाशी राहतील. त्यांचा अंत तू पाहू नकोस. तू कुठंही लपून बस, मी तुला शोधून आणणारच!’

‘अरे, हा बुवा म्हणतोय तू कुठंही लपून बस, मी तुला शोधून आणणार…. पण त्यो का शोधून आणत नाय, येडा बनवतोय का आम्हाला….? हरामखोर कुठला भोंदूबुवा… सारखं फुकटचा मिळालेला गुलाल, चिरमुरे, लिंबू उधळतोय, टाकतोय. ही सखूबाई काय येडी हाय का? मेलेला माणूस कधी परत येतो का? जर मेलेली माणसं परत आली असती, तर या भूमीवर माणसाला उभे राहायला जागा उरली नसती. कित्येक माणसं मेलीत…. काय हा खुळचटपणा म्हणायचा?’ एक शिकलेला तरुण बडबडला, तसा बुवा भानावर आला.

‘अरं बालका, तू शिकला-सवरलेला, तुला न्हाय कळायचं. प्रत्येक मेलेला माणूस पुन्हा जन्माला येतोय, कधी पाखरांच्या जन्माला, कधी कावळ्याच्या, तर कधी म्हैस, बैल, गायीच्या. अशा अनेक प्राण्यांचा जन्म माणूस घेतो…. तुला न्हाय कळायचं. बाळा, तू लहान हायेस. तुला पुस्तकी ज्ञान माहीत, इतर न्हाय. यांचा अर्जुन कावळ्याच्या जन्मास गेलाय…. तू फक्त बघत राहा, बघता बघता कोणाच्या तरी अंगात शिरणार तो…’ बुवा म्हणाला.

‘अव्हं बुवांनो, कावळा माणसाच्या अंगात शिरेल कसा? दाखवा बघू शिरवून. काय पण बोलू नका बुवांनो, आम्ही काय येडे दिसतोय?’

‘अरे अंगात शिरणार म्हणजे तो उभा राहिलेल्याच्या कुणाच्या तरी डोईवर जोरात चोच मारणार अन् उडून जाणार. ज्यांच्या डोईवर चोच मारेल त्याच्या अंगात तो येणार, हात हालवून कुदणार तू बघत राहा. मला नको ते प्रश्न करू नकोस.’ बुवा रागात आला होता.

‘माझ्या अंगात कुदवा ना?’

‘अरे बाबा, तू काय त्याचा नातेवाईक आहेस का?’ दात-ओठ दाबत बुवा वदला.

कावळ्यांचा कावऽऽ काव आंब्या-फणसाच्या झाडावर जोरात सुरू होता. बुवांचा चेहरा लाल झाला होता. अर्जुना कुणाच्या अंगात येतो की नाही, हा प्रश्न त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. बुवांचा चेहरा काळा पडला होता. जर अर्जुना अंगात नाही, आला तर सारा बट्ट्याबोळ…..

‘सखूबाई! तुझा अर्जुना का येत नाही? तुझ्यावर त्याचं प्रेम नव्हतं का? काय घोळ हाय ते कळत नाही. कित्येक मेलेली पोरं मी एका हाकेवर बोलावून कुदवल्यात; पण तुझा हा अर्जुना, यायलाच तयार नाही. नेमकं काय चुकलं, ते कळत नाही?’ बुवा बडबडला.

‘बुवांनो! खरं सांगू, माझ्या अर्जुनाचं माझ्यावर खूप प्रेम होतं. नदीवर जरी गेला, तरी येताना मुठीत एक तरी मासळी मारून घेऊन यायचा. आई, तू भाजून खा! म्हणायचा. माझा अर्जुना लई-लई गुणांचा. त्याचे किती गुण सांगू. पण माझ्यावर जीव लावून गेला, अचानक भरल्या घरातून उडून गेला?’ सखूबाई डोळ्यांत आसवं आणून बोलली.

‘याला कुणी बंदिवासात बंदिस्त तर केलं नाही ना? आता मला ते बघायलाच हवं?’ बुवा चरचरा लिंबू कापू लागला. लिंबू कापताना त्याच्या चेहर्‍यावर राग, क्रोध जाणवत होता.

गावचे गाव बुवाचा हा तमाशा पाहत होता. अर्जुना कुणाच्या अंगात येणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते, तर काही सुशिक्षित तरुण हा खुळचटपणा, अंधश्रद्धा आहे, असं आपापसांत बोलत होते. वाजंत्रीवालेही दमले होते. तेही जरा जमिनीला टेकून बसले होते. मांड सारा भरला होता. अर्जुनाच्या नावाचा नैवेद्य कोणताच कावळा चोच मारून खात नव्हता. बुवा, सखूबाई सर्वजण चिंतेत पडले होते. इतक्यात फणसाच्या झाडावरून एक कावळा वेगात भरारी घेऊन मांडाकडे आला. अर्जुनाच्या नावाने ठेवलेल्या नैवेद्याला चोच मारून गेला. बुवा, सखूबाई, गावकरी आनंदले. अर्जुनाला हा मांड मान्य आहे. आता तो कुणाच्या तरी अंगात भरणार, रांगेत उभा असणार्‍या अर्जुनाच्या नातेवाईकांकडे गावकरी टकामका बघू लागले.

‘सखूबाई, खरंच तुझ्या पोराची तुझ्यावर खूप माया आहे. बघ बघता-बघता झाडावरून उतरून प्रसादाला शिवून गेला.’ बुवा चेहर्‍यावर प्रसन्नता आणून बोलला. त्याला खूप समाधान वाटले. आता तो दक्षिणेचा हक्कदार झाला होता.

‘होय की बुवा, गायीचं वासरू गायीकडेच येणार आता. बघते माझं वासरू कोणाच्या अंगात येतंय ते!’ सखूबाई बोलली.

रांगेत उभे असणार्‍या सर्वांच्या अंगावर बुवा गुलाल, चिरमुरे उधळू लागला. गुलाल उधळत असताना ‘हर हर महादेव’ म्हणून डोक्यावर आंब्याच्या फांद्या मारू लागला. आता बुवाला खूप हुरूप चढला होता. कावळ्यांनी नैवेद्याला स्पर्श केल्यामुळे अर्जुना अंगात येणार आहे, हा बुवाचा आत्मविश्वास वाढला. ‘चल बाबा, लवकर ये.’ रांगेतील प्रत्येकाच्या डोक्यावर गुलाल उधळत म्हणत होता. ‘येळ नको, दुपार झाली. सूर्य तळपतोय! सारं गाव तुझी वाट बघत बसलंय, प्रत्येकाच्या पोटात कालवाकालव होतेय…. ये….. अर्जुना धावत ये, हर हर महादेव.’

काही वेळ असाच निघून गेला. वार्‍याची थंड झुळूक अंगाला येऊन झोंबली. रांगेत उभा असणारा गणू ‘हूँ ऽऽ हूँ’ करून नाचू लागला. बुवांनी किंकाळी फोडली…. ‘अरं अर्जुना आला ऽ ऽ अर्जुना आला.’ सार्‍यांचं लक्ष त्या गणूकडे गेलं. गणू हा अर्जुनाचा दोन नंबरचा भाऊ…. अर्जुना सर्वांत लहान होता. बुवांनी गणूला पकडून मांडाच्या समोर आणलं. त्याच्या कपाळावर गुलाल, कुंकू लावले. रांगेत उभे असणारे सर्व नातेवाईक खाली बसले. बुवा गणूला प्रश्न करू लागला. पण गणू ‘हूँ ऽ ऽ हूँ’ केल्याशिवाय काहीच बोलत नव्हता.

‘काय चुकलं का? बोल अर्जुना, हे आम्ही सर्व पोटाचा आटापिटा करून केलं, हे तुला मान्य नाही का? काय चुकलं तर पोटात घाल. माणसाकडून चुका होतात. आम्ही तुझे रक्ताचे नातेवाईक आहोत. सर्व सांभाळून घे. मी तर तुझी आई आहे. जन्म देऊन वाढवणारी….. ही बघ, तुझी भावंडं दादा, भाऊ, वहिनी, चिल्ली-पिल्ली पोरं तो बघ तुझा नावकरी…’ सखूबाई गणूच्या पाया पडू लागली. गणू हा सखूबाईचा दोन नंबरचा मुलगा. आळीपाळीनं सर्व नातेवाईक गणूच्या पाया पडू लागले. अर्जुना त्याच्या अंगात आला आहे, असे समजून त्याला देवपण देऊ लागले. पण एकटी नवंती नावाची त्याची भावजय पाया पडायला गेेली नाही. ती बसल्या ठिकाणी घट्ट झाली होती, डोळे गरागरा फिरवत होती, मुठी आवळत होती, दात-ओठ कराकरा खात होती. गणू ‘हूँ ऽ ऽ हूँ’ करत होता आणि नवंती हात-पाय जमिनीवर बडवत होती. बुवाला प्रश्न पडला, अर्जुना नेमका कुणाच्या अंगात आला. गावकरीही चकित झाले. सुशिक्षित तरुण म्हणू लागले, ‘हा काय प्रकार आहे म्हणायचं. नवंती हातपाय बडवते, दात-ओठ खाते. हे ढोंग तर नाही का?’ सुशिक्षित तरुणांच्या डोक्यात विचार फिरू लागले.

‘तुमच्या दोघांपैकी अर्जुन कोण ते बघा- नाही तर बाहेरची वंशावळ आली असेल, तर चाबकानं बडवून काढतो, बांधून ठेवतो, बोला?’ बुवा लिंबू फेकत… गुलाल उधळत म्हणाला.

बराच वेळ गणू ‘हूँ ऽ ऽ हूँ’ म्हणत होता, हात-वारे घालत होता. नवंती दात-ओठ खात, हातपाय जमिनीवर आपटत होती. काही वेळ सर्वजण स्तब्ध होऊन हा प्रकार पाहत होते. इतक्यात वाजंत्र्यांनी वाजंत्री वाजवायला सुरुवात केली. ढोल-ताशा वाजवू लागले. तशी अचानक बसल्या जागेवरून वार्‍यासारखी नवंती उठली अन् हातपाय हलवत, हातवारे करत, नाचत, उड्या मारत, कुदत मांडापुढे येऊन धिंगाणा घालू लागली. तसा गणूही ‘हूँ ऽ ऽ हूँ’ करून नाचू लागला. दोघांमध्ये नाचण्याची स्पर्धा सुरू झाली. नाचण्याच्या या स्पर्धेत कोण हरतंय, कोण जिंकतंय, याकडे सर्व गावकर्‍यांचे लक्ष लागले. वाजंत्री वाजल्यामुळे यांना कुदायला जोर चढला.

नवंती ओरडून-ओरडून सांगू लागली,

‘मी अर्जुना आहे ऽ ऽ ’ सखूबाईकडे नवंती बघत म्हणाली, ‘आई, मला ओळखलं नाहीस. मी तुझा अर्जुना हाय. हा कोण मला माहीत नाय?’ नवंती सखूबाईला मिठी मारायला पुढे होऊ लागली.

‘ये तू तेथेच थांब, तुझे नाटक खूप झाले, तुम्हा दोघांमधला खरा अर्जुना कोण ते ठरवा?’ बुवा म्हणाला.

‘अरे अर्जुना, पर पुरुष या कुजक्या, वाईट प्रवृत्तीच्या बाईच्या अंगात कसा काय येतोय? ही बाई नाटकं करत नाही ना? मला तर वाटते हे नाटक आहे. नाटक करण्यात ती बाई पटाईत आहे. या बाईच्या नाटकामुळेच, तर त्यांच्या घराची वाट लागली आहे. चालते घर मोडले आहे. ही बाई अव्वल चाप्टर, चलाख आहे.’ गावातील जाणता-जुणता माणूस बोलला.

‘ये गणूला वाईट म्हणतोय रे, मी वाईट आहे, कोण म्हणतंय, तुझी आई वाईट, तुझी बायको चाप्टर….?’ नवंती कुदता-कुदता बडबडली.

‘अरे ही तर शिव्यागाळी करते, हिच्या अंगात अर्जुना कुदत नाही, हिचे ढोंग आहे. बुवा हिला घ्या वठणीवर हीं उगाच नाटक करून नाचते आहे. ही बाई मुळातच ढोंगी आहे, बेकार आहे.’ सुशिक्षित तरुण बोलला.

‘मी बेकार, वाईट, इकडे ये रे, तुझ्या कानाखाली जाळ काढतो?’ नवंती नाचत बोलत होती. पाय वर-खाली सारखी करून माकडासारखी नाचू लागली. तमाशात कशी बाई नाचते, तशी ती नाचू लागली. सगळ्यांचं लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घेऊ लागली.

बुवापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. अर्जुना नेमका कोणाच्या अंगात आलाय? गणूच्या की नवंतीच्या, या प्रश्नात बुवा अडकून गेला. नवंती चलाख होती, ती जीव तोडून सांगत होती. ‘मी अर्जुना आहे.’ तशी बोलबच्चन, फेकाफेक करण्यात नवंती हुशार होती. गणू मात्र ‘हूँ ऽ ऽ हूँ’ करून काहीच न बोलता घुम्यासारखा बसून होता. याचा गैरफायदा नाटक करणारी नवंती घेत होती.

गावातील हुशार मुलांनी गणू व नवंतीसमोर वेगवेगळ्या देवाच्या नावाने सात फुले ठेवली. कोणतं फूल कोणत्या देवाच्या नावाने ठेवलं आहे, हे जर या दोघांपैकी कोणी एकाने खरं सांगितलं तर त्याच्या अंगात अर्जुना आला आहे, असे गृहीत धरायचे, असे ज्ञानी मुलांनी बुवाला सांगून फुले ठेवली. बुवालाही हा उपाय योग्य वाटला. तसा तो कात्रीत सापडला होता.

नवंती झटपट फुले उचलत होती. भलत्याच देवाचे नाव सांगत होती. गणूला तिने फुले उचलायला संधीच दिली नाही. जसे मेलेल्या जनावरावर गिधडाने तुटून पडावे अन् त्याच्या शरीराच्या चिंध्या कराव्यात, तशा नवंतीनं त्या फुलांच्या नको त्या देवांची नावे सांगून चिंध्या केल्या. दोघांच्याही अंगात अर्जुना आला नाही. हे सिद्ध झाले असतानाही नवंती माझ्याच अंगात अर्जुन आला आहे, हे सिद्ध करण्यासाठी मांडलेल्या मांडासभोवती गोल-गोल नाचत कुदत फिरू लागली. किंचाळू लागली. छातीवर बडवून घेऊ लागली.

‘या मांडावर माझा अधिकार आहे. हा मांड फक्त माझा आहे. माझ्या आईनं मला खायला काय-काय आणलं, काय खाऊ अन् काय नको, हे सारे पदार्थ बघून माझं पोट भरलंय. किती माझ्या आईची माझ्यावर माया, मी मेलोय, तरी माझी आई माझ्यावर प्रेम करते?’ – नवंती कुदत बोलत होती.

‘खरंच तू अर्जुना आहेस?’ सुशिक्षित तरुण बोलला.

‘मी अर्जुना नाही, तर तू आहेस?’ नवंती म्हणाली.

‘मग तू देवाच्या नावाने ठेवलेली फुले बरोबर का नाही ओळखलीस?’

‘ह्यो काय प्रश्न झाला? सर्वच फुले देवांना आवडत्यात. देवानंच निर्माण केल्यात ती! तू त्या गावड्याच्या तुक्याचा मुलगा ना? एक दिवस तुला बघतेच, चार पुस्तके शिकलास, लई मोठा झालास? मघापासून बघतेय तुझं भुंकणं चालू आहे. गप्प गुमान बस की, गप्प बसायला काय झालंय तुला…’ नवंती कुदत-कुदत म्हणत होती. लावणीनृत्य सादर करत होती.

‘अरे, ही बाई खूपच चाप्टर दिसते, मला बघीन म्हणते. आजपर्यंत हिने मला पाहिले नाही का?’

नवंती नाचून-नाचून दमली आणि जमिनीवर गडागडा लोळायला लागली. छातीवर हात बडवून घेऊ लागली. ‘मीच अर्जुना आहे. मी अर्जुना आहे,’ असे बडबडत रडू लागली; पण डोळ्यातून अश्रूचा थेंबही बाहेर पडत नव्हता. नुसतं ढोंग सुरू होतं.

‘आई ऽ ऽ आई मला ओळखलंस नाहीस, तू नाही ओळखलीस, तर कोणच ओळखणार नाही?’ सखूबाईचे पाय धरत नवंती वदली.

सखूबाईलाही नेमका अर्जुना कोणाच्या अंगात आला आहे, हे समजेना. गणू की नवंती….. गणू गप्प, तर नवंती बडबडत होती. सखूबाईलाही राहवेना. आपला मुलगा अर्जुना नवंतीच्या अंगात आला असावा. इतका तो मला आळाविळा करतोय म्हणजे नवंतीच्या अंगात अर्जुनाच आलाय. सखूबाईने नवंतीला ‘अर्जुना ऽ ऽ’ म्हणून मिठी मारली.

‘रडू नकोस माझ्या पोरा. मी तुला विसरले नाय रे. इतके दिवस कुठे फिरत होतास, काय खात होतास?’ कंठ दाटून सखू बोलली.

‘आई, मी इथंच फिरत होतो शेता-शिवारात. या झाडावरून त्या झाडावर… या झाडाची पाने खा… त्या झाडाची पाने खा, असे करत जगत होतो. बरं झालं, आई तू मला ओळखलंस? माझा भटकंतीचा प्रश्न संपला?’ नवंती बोलली.

‘नाही लेका, आता तू कुठेच फिरणार नाही. पावसात भिजणार नाही, उन्हात भाजणार नाहीस, थंडीत कुडकुडणार नाहीस, तुला लहानसं घर बांधून देतो?’ सखूबाई.

‘आई, या बुवाला सांग ना! आता मी अर्जुनाच आहे. हे सगळे गावकरी माझ्याकडे संशयाने बघतात. हा आगाव गावड्यांच्या तुकड्याचं पोर माझी चेष्टामस्करी करतंय, त्याला एक दिवस बघून घेते?’

नवंतीच्या अंगात अर्जुना आलाय, असे गृहीत धरून बुवांनी कार्य पुढे चालू ठेवले. गणू मात्र ‘हूँ ऽ ऽ हूँ’ करून दमला. त्याच्याकडे कुणीच लक्ष देईना. कुदणार्‍या नवंतीनं आपल्याकडे सार्‍यांचं लक्ष केंद्रित करून घेतलं होतं. आळीपाळीने कुदत-कुदत नवंती सार्‍यांना भेटू लागली. सर्वांना भेटून झाल्यावर मांडलेल्या मांडापुढे फतकल मारून बसली.

‘आई मला कपडे काय-काय आणलीस? दे मला बी, नागडाचं आहे, नागडाचं आजपर्यंत फिरतोय!’ बरंच झालं तुम्हाला आठवण झाली. येथून पुढं आंगमांस झाकायला कपडा मिळेल!’ नवंती वदली.

सखूबाईने पांढराशुभ्र शर्ट पीस अन् काळा पँट पीस नवंतीकडे पुढे केला. ते कपडे बघताच नवंतीने सखूबाईच्या हातावर हात मारत कपडे दूर फेकले.

‘आई असले कपडे मला, मी आता पँट-शर्ट घालत नाही. मला साडी-चोळी पाहिजे!’

‘काय साडी-चोळी! डोकं फिरलंय का या बाईचं’ सुशिक्षित तरूण बोलला.

‘आई मला साडी-चोळी नको; माझ्या भक्ताला दे, माझा भक्त कोण माहीत आहे का तुला? जिच्या अंगात मी आलोय तोच माझा भक्त आहे. प्रत्येक वर्षी मला म्हणजे भक्ताला साडी-चोळी दे, माझ्या नावानं एक जमिनीचा वाफा काढ आणि तो माझ्या भक्ताला दे…?’ नवंती कुदत-कुदत गावाची वाट चालू लागली. वाजंत्री वाजत होती. त्यामुळे जास्त जोर येत होता. नवंती पुढे, वाजंत्री, बुवा, सखूबाई, गावकरी अशी जत्रा पुन्हा गावच्या दिशेने जाऊ लागली. शेता-शिवारात काम करणार्‍या आया-बहिणी नाचणार्‍या नवंतीकडे बघू लागल्या अन् म्हणू लागल्या, ‘अगं बाई, अर्जुना नवंतीच्या अंगात आला, मला तर वाटत नाही. अर्जुना किती चांगला पोरगा होता. या कुजक्या, वाईट प्रवृत्तीच्या अंगात तो कधीच येणार नाही. अर्जुनाच्या नावाने जमीन मिळविण्यासाठी काही तरी हे सोंग, ढोंग केलंय. ढोंग करण्यात ही बाई लई पटाईत. चालतं घर मोडलंय… हिच्या अंगात अर्जुना येणं शक्य नाही!’

नवंती सुसाट एकटीच पळत होती. घरातील माणसांना धावाधाव करायला लावत तिची ही पळापळीची शर्यत झाडे, वेली, रस्ता, दगड, गोटे, रान, पाखरांसह निसर्ग पाहत होता. त्यालाही कदाचित प्रश्न पडत असावा. ही बाई येड्यासारखी अशी काय हलत-डुलत पळत आहे अन् हिच्या मागे हा सर्व गाव…. नवंती पळत होती. शेतात असणारी कुत्री तिला भुंकत होती. कुत्र्यांना बघून पळताना दचकून थांबत होती.

नवंती गावच्या ग्रामदेवतेला वळसा घालून, गल्लीबोळ फिरून गावाच्या बाहेर असणार्‍या पटकीतील फणसाखाली जाऊन बसली. बसल्या ठिकाणी आपल्या साडीचा पदर हातात घेऊन वारा घेऊ लागली. शेता-शिवारातून धावपळ करून तिला खूपच घाम आला होता. इतरांच्या नजरा चुकवत हळूच पदरानं घाम पुसत होती.

सखूबाई, बुवा, नातेवाईक, गावकरी त्या फणसाच्या झाडाजवळ येऊन उभे राहिले. फणसाचं झाड बरंच चांगलं दिसत होतं. तेच चांगलं झाड नवंतीनं निवडलं होतं.

‘आई, मला घर या फणसाच्या झाडाखाली बांध….’ नवंती म्हणाली.

‘होय रं लेका, तुला घर बांधून देते?’

काही वेळ नवंती कुद-कुद कुदली अन् अचानक कुदायची थांबली. गप्पगार झाली. अर्जुना तिच्या अंगातून निघून गेला.

‘अर्जुना गेला वाटतंय?’ बुवा बोलला.

नवंतीनं अर्जुनाला राहण्यासाठी फणसाचं झाड निवडलं.

सखूबाईनं अनुभवानं तेथे चार दगड ठेवले.

‘सखूबाई, येथे लहानसं तुझ्या पोरासाठी थडगं बांध.’ बुवा वदला.

‘होय बुवा, त्यासाठीच एवढा खर्च केलाय. उद्यापासून थडगं बांधायला सुरुवात करते!’

सखूबाई, बुवा नवंतीसह सर्व गावकरी जेवण करायला सखूबाईच्या घराकडे निघाले. अर्जुना अंगात आला. त्यामुळे सखूबाई, बुवा खूष झाले होते. गावकरी चिंताग्रस्त होते. तरुण सुशिक्षित मुले अंधश्रद्धेचं खूळ म्हणत बोलत चालली होती. दुपार पालटत होती.

नवंती आपल्या नवर्‍याला-दामूला-घरातील खोलीच्या एका कोपर्‍यात घेऊन सांगत होती, ‘बघितलं का, कसं नाटक केलं?’ ‘म्हणजे हे नाटक होतं. अर्जुना तुझ्या अंगात आला नव्हता?’ दामू म्हणाला. ‘कुठला अर्जुना-अन् कुठलं काय? मेलेलं माणूस कधी कुणाच्या अंगात येतंय का?’ हे मी नाटक केलं व्हतं. मला एका जमिनीचा वाफा मिळाला. तेवढा तरी फायदा- सगळी मेलेली माणसं माझ्या अंगात यायाला…. मी काय देवबाई हाय… नाटक केलं नाटक…. या नाटकानं बुवाही थरथरला… बघितलं न्हवं. सारं गाव, भाऊ-बहीण, आई माझ्या मागं पळत होती…’

‘आता एकाएकाला बघून घेते. तुझे भाऊ माझ्या पायाखाली लोळत राहतील. या अर्जुनाच्या नावाने सगळ्यांना खेळवते बघा. मी करते तसे तुम्ही करत राहा?’

हे नवंती आणि दामूचं कुजबुजणं गावातील एका पोरानं ऐकलं.

गल्लीत जेवणाच्या पंगती बसल्या. चिंचगावमधील सर्व गावकरी जेवायला बसले. जेवताना ते तरुण पोरगं म्हणू लागलं, ‘नाटक का असेना, नव्या वर्षाची सुरुवात बरी झाली. जेवा रे जेवा…. अर्जुना अंगात आला ऽ ऽ….’

अर्जुन विष्णू जाधव (ठाणे)

मोबा. 7506070459

मु.केंचेवाडी, पो.आमरोळी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.