Categories
कविता

। पोवाडा दाभोलकरांचा।

ऑगस्ट - २०१७

दाभोलकर विवेकसूर्य दिले त्यांनी धैर्य, गाजवू आम्ही शौर्य!

महाराष्ट्र भूमी संतांची,

सुधारकांची, विचारवंतांची,

ज्यांनी कृतीचा मार्ग दाविला – (2)

मानवा शोषणमुक्त केला – (2)

जागविली समतेची ती जाण – (2)

सर्वांना दिला आत्मसन्मान – (2)

धर्म मानवकेंद्री करून जी… जी, जी

वंदन करू बुद्धाला ….(2),

चार्वाकाला, बसवण्णांना,

संत कबीराला (2)

तुकाराम, गाडगेबाबांच्या शिकवणुकीला जी रं हा जा जी ॥

अभिवादन शिवाजी राजाला (2),

जोतिरावांना, आगरकरांना, शाहू राजाला, बाबासाहेबांना, गांधी, अण्णा भाऊंना, मानवतेच्या सेवेकर्‍यांना,

दाभोलकरांच्या पूर्वसूरींना,

ज्यांनी चिकित्सेचा मार्ग दाविला,

दाभोलकरांच्या गातो पोवाड्याला

जी रं हा, जी, जी ॥

संतांनी केली मशागत…(2)

या समाजात, बदल घडवण्यात

अंधश्रद्धांना दूर करण्यास,

सुधारकांनी चाल दिली त्यास,

सत्यशोधनाची धरली त्यांनी कास जी…जी,जी॥

समाज होता नाडलेला …(2)

कर्मकांड आणि बुवांनी पिडलेला,

करणी, भानामतीचा त्रास,

भूत, पिशाच्याचा होई भास

खोटी भीती वाटे लोकांस जी….जी,जी॥

क्रांती केली दाभोलकरांनी …(2)

लोकांच्या मनी, चेतविला अग्नी,

संघटित केले विचारी जनांस,

कृतिशील बदल घडवून आणण्यास,

स्थापन केली मअंनिस जी…जी,जी॥

समाजातील बुवाबाजीला …(2)

उखडून टाकण्याला, संघर्ष हो केला,

गावागावात फिरूनि खास,

विद्यार्थी, शिक्षक घेऊन सहाय्यास

शहाणे केले जनांस जी…जी,जी॥

(चाल बदल)

क्रोधापेक्षा करुणा, जोडीला आपुलकी

मंत्र डॉक्टरांनी दिला जी

लोकांत जाऊन, त्यांच्याशी बोलून

संवाद सुरू त्यांनी केला जी

वैज्ञानिक दृष्टिकोन, कार्यकारणभाव

समाजात रुजविला जी

चमत्काराला सिद्ध करायला,

आव्हान उभे त्यांनी केले जी॥

विज्ञानच खरा, प्रगतीचा झरा

समजून घे नरा

रं जी रं हा जी रं रं जी

अंधश्रध्दांचा, कर्मकांडाचा

महिलाच ठरते बळी जी

संस्कार मानून, समाजा घाबरून

वाहकही बनते नारी जी॥

अंगात येणं, भूतबाधा होणं

मनाचा रोग असे खरा जी

व्रतांच्या मागं, धावून तू गं

बनून राहिलीस अबला जी॥

सावित्रीमाईचा, स्त्री शिक्षणाचा

मार्ग ओळख खरा जी

बंध झुगारून, स्वतंत्र होऊन

पुकार आता तरी लढा जी॥

विज्ञानच खरी, प्रगतीची दोरी

समजून घे नारी

गं जी रं हा जी रं रं जी॥

(चाल बदल)

अंधश्रद्धेचा तोडण्या फास…(2)

कायदा करण्याचा घेऊनिया ध्यास

व्यवस्था नवी उभी करण्यास

आवाहन त्यांनी केले शासनास

अठरा वर्षांचा लढाऊ प्रवास

जी…जी, जी॥

समाजाच्या अंधश्रद्धेत

आणि अज्ञानात …(2)

ज्यांचे होते हित,

राहिले उभे हो विरोध करण्यास,

खोटी बदनामी त्यांची करण्यास

फर्मावती हात-पाय

तोडण्यास जी…जी,जी॥

विरोधकांनी यत्न केले नाना…(2)

तरी सोडला नाही खेळाडू बाणा

संवाद मार्ग त्यांचा तो खास,

नैतिक आचरण करणार्‍यास

जोडून घेतले परिवर्तनास जी..जी,जी॥

जातीमुक्त समाजरचनेचा …(2)

मार्ग समतेचा, विवेकवादाचा

आणला समाजात घडवून,

मिश्र विवाहांना बळ देऊन,

जातीच्या पंचायती

नाकारून जी…जी,जी॥

मानवतेचे असे पाईक …(2)

अन्य कित्येक, साथी अनेक

विवेकाची वाट सदा चालणार,

कुटुंबाचा नाही केला विचार,

तयांना साकृनि चा आधार जी..जी,जी॥

व्यसनमुक्तीचा दिला त्यांनी नारा…(2)

दिला नाही जरा, व्यसनाला थारा

व्यसन अविवेकाचे घर,

कुटुंब उद्ध्वस्त करणार,

परिवर्तनाचे उघडले द्वार जी..जी, जी॥

संपादन करून साधना….(2)

तुम्ही लोकांना बालकुमारांना,

दिले नवे साहित्य वाचाया,

संघटन सूत्रबद्ध कराया,

लेखनाचा घातला पाया जी…जी,जी

शाहू, फुले आणि आंबेडकर …(2)

अनुसरणार,डॉक्टर दाभोलकर

अंधश्रद्धा मुक्त समाज करण्यास,

वैज्ञानिक दृष्टीची धरुनि कास,

विधायक चिकित्सा करण्यास,

व्यापक परिवर्तनाचा ध्यास जी…जी,जी॥

(चाल बदल)

साधाच राहणारा, वक्तशीर वागणारा,

कामात दिसणारा, नेता हा

लोकांना जोडणारा, कृतिशील राहणारा

संवाद साधणारा, नेता हा

शत्रूला भिडणारा, अनुयायी जपणारा

समन्वय साधणारा, नेता हा

विज्ञान जाणणारा, निर्भयतेने मांडणारा

नीतीने वागणारा, नेता हा

डॉक्टरच खरा,

डॉक्टरच खरा, माणूस भला

रं जी रं हा जी रं रं जी… जी जी॥

20 ऑगस्टची सकाळ …(2)

साधली त्यांनी वेळ, काढला हो पळ

सनातनी मेंदूंनी सडल्या,

मागूनि गोळ्या की हो झाडल्या

रक्तातूनि ज्वाला तुमच्या फुलल्या जी…जी,जी॥

गोळी झाडली दाभोलकरांवर …(2)

विचारांचा वारसा नाही संपणार

हजारो दाभोलकर घडले,

विचारांचे युद्ध आता पेटले,

दाभोलकर अमरच राहिले जी…जी,जी

आता वर्षे पूर्ण झाली चार …(2)

मोकाट सूत्रधार, निकम्मे सरकार

आजही मागतो आम्ही जबाब,

तुम्हा ही लाजिरवाणी बाब,

वर्दीचा राखा तुम्ही जरा आब

जी… जी,जी॥

अजून दाभोलकर किती करणार?

कलबुर्गी, पानसरेंनाही मारणार

तरीही फौज नवी तैयार

शेवटी मानवताच जिंकणार

जी…जी, जी॥

पृथ्वीमोलाचा हा माणूस

एन. डी. सर बोलले तुम्हा हो खास

नाही दुसरी उपमा सरस

जी… जी, जी॥

दाभोलकर विवेकसूर्य …(2)

दिले त्यांनी धैर्य, गाजवू आम्ही शौर्य

विवेकाचा आवाज बुलंद करणार,

मानवतेची पताका फडकणार,

दाभोलकर नाव अमर राहणार

जी …जी,जी

कृष्णात स्वाती

संपर्क : 8600230660