Categories
अभिवादन

निळूभाऊंच्या स्मृतीनिमित्ताने निळू फुले फिल्म क्लब सुरू करण्याचे मअंनिसचे आवाहन

जून – २०१७

13 जुलै 2009 साली सुप्रसिद्ध कलावंत निळूभाऊ फुले आपल्यातून गेले.

ते केवळ सिने व नाट्य कलावंत नव्हते, तर एक सच्चा माणूस म्हणून त्यांचे जगणे होते. पुरोगामी चळवळीशी त्यांची अखेरपर्यंत सक्रिय बांधिलकी होती. स्वातंत्र्य चळवळीच्या समाजवादी पार्श्वभूमीतील राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून ते कलावंत म्हणून पुढे आले होते. त्यानंतर त्यांनी मराठी व हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून विशेष नाम कमावले.

कसदार अभिनयासह संवेदनशील मनाचा कार्यकर्ता म्हणून देखील त्यांची ओळख परिवर्तनवादी समविचारींमध्ये राहिली आहे. महाराष्ट्र अंनिसशी त्यांची अधिक जवळीक होती. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर अनेक दौरे, मोहिमा व चळवळीमध्ये ते सहभागी होत. ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध जाहीर कार्यक्रमांमधून गर्दी जमविण्यासाठी माझा ढोलकीसारखा वापर करून घ्या,’ असे ते नेहमी आम्हाला सांगत. अत्यंत संकोची वर्तन व साधेपणाचा व्यवहार असलेल्या निळूभाऊंचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान मिळालेले आहे. त्यांची स्मृती जपताना त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र अंनिसतर्फे ‘निळू फुले फिल्म क्लब’ सुरू करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या स्वरुपाचा फिल्म क्लब इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे महाराष्ट्र अंनिस व राष्ट्रसेवा दलाच्या शाखांनी संयुक्तपणे सुरू केलेला आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अशा कार्यकर्ता- कलावंताची स्मृती महाराष्ट्र अंनिसच्या सर्व शाखांमध्ये रिंगणनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यवाचन, काव्यवाचन, फिल्म आदी स्वरुपाचे सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरी केली जावी, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.