शहादा शहरातील विजयनगर परिसरात नंदीबैल घेऊन एका टोळीने सकाळी दहाच्या सुमारास आगमन केले. अंनिस कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येताच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. टोळीतील दोघांनी विजयनगरमधील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. तेथे आपली कला दाखवत त्यांनी भविष्यकथन केले आणि घरातील अशांती दूर करण्याच्या नावाखाली पूजाविधी केला. त्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. भाविक महिलेने आंधळ्या श्रद्धेपोटी दोन हजार रुपये दिले. पैसे घेऊन पुढील सावज शोधण्यासाठी ही टोळी पुढील चौकात उभी राहिली.
दरम्यान, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, विपुले रोकडे यांनी या फसवणुकीची माहिती संबंधित घरातून मिळवली. त्यानंतर या टोळीला गाठत त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडिमार केला. बीड जिल्ह्यातून आलेल्या या टोळीचा म्होरक्या बाळू भिसे याने आधी ‘आम्ही भविष्य सांगत नाही, कोणाला फसवित नाही,’ असा दावा केला आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा हिसका दाखविल्यावर मात्र दोन हजार रुपये घेतल्याची कबुली दिली. ‘पोलीस ठाण्यात चला, गुन्हा दाखल होणार,’ असे म्हणताच पैसे परत करीत, माफी मागून पलायन केले. यापुढे आम्ही तुम्हाला दिसणार नाही, असे म्हणत काही क्षणातच पळ काढला.
नंदीबैलाचा खेळ दाखवून पैसे अथवा धान्य घेऊन मनोरंजन करण्यास अंनिसचा विरोध नाही; मात्र भविष्य सांगण्याचा दावा करीत, भीती घालून आर्थिक फसवणुकीस मात्र विरोध आहे. कारण असे करणे जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असून सहा महिन्यापासून ते सात वर्षांपर्यंत यात शिक्षेची तरतूद आहे.
यात पोलीस यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असून त्याबाबत अधिक जागृत राहण्याची गरज आहे. नंदीबैल अथवा तत्सम खेळ दाखवून पोट भरणार्या भटक्या लोकांचे स्वतंत्र रजिस्टर पोलीस ठाण्यात असते. त्यात अशांची पूर्व तपशिलात नोंद घेणे अपेक्षित असते. पण अनेकदा. अशा व्यक्ती नोंद करण्यात टाळाटाळ करतात किंवा पोलीस यंत्रणेचेही कार्यबाहुल्यामुळे दुर्लक्ष होते. त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेतात. म्हणून अंनिसच्या वतीने याबाबत लवकर जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्रक देऊन अशांची नीट नोंद ठेवून त्यांना समज देण्याची मागणी करणार आहे.
–विनायक सावळे, शहादा, जि. नंदुरबार