या चराचर सृष्टीत ईश्वराचे अस्तित्व ओतप्रोत भरले आहे, असे सांगणार्या धर्मांनी त्या ईश्वराला मंदिर, मठ-पीठ, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा या चौकटीत बंदिस्त केले. ही सर्व त्या-त्या धर्माची प्रार्थनास्थळे म्हणून निर्माण झाली असली, तरी कालांतराने त्या व्यवस्थेत अनेक विकृती निर्माण होऊन ही ठिकाणे पुरोहित-पुजारी, मठाधीश, पाद्री, मुल्ला-मौलवी यांची सत्ताकेंद्रे बनली. जिथे विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली जायची, त्या केंद्रांतून मानवतेला गुलाम बनवून तिची विटंबना करण्याचेच दुष्कर्म पुरोहित वर्गाने चालविले. अशा पुरोहित व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी त्याविरोधात दंड थोपटून बंड करण्याचे धाडस काही क्रांतिपुरुषांनी केले, त्यात महामानव बसवण्णा अग्रस्थानी होते. महामानव बसवण्णांनी पुरोहितांचे आश्रयस्थान बनलेल्या देवालय संस्कृतीवर पहिला हल्ला केला आणि आपले देहच देवालय असल्याची शिकवण समाजमनात रुजविली. बसवण्णांनी देहालय संस्कृतीचे शब्दशिल्प किती मनोज्ञपणे वचनरुपात मांडले आहे, पाहा :
सधन बांधिती शिवालय,
देवा गरीब मी करू काय?
देहचि माझे देवालय,
देवळाचे खांब माझे पाय,
मस्तक हे सुवर्ण कलश.
स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश,
कूडलसंगमदेवा, ऐका हो
(ब.व.क्र. 821)
बसवण्णांनी पुरोहितांच्या स्थावर झालेल्या देवालय संस्कृतीला पर्यायी संस्कृती म्हणून जंगमरूप (चलनशील) देहालय संस्कृती अस्तित्वात आणली. बसवण्णांनी देवालय आणि पुरोहितरुपी दलाल नाकारला. ही व्यवस्था नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या देहावरच इष्टलिंग बांधले. ज्या इष्टलिंगामुळे जात, वर्ण, वर्ग, वंश नि लिंग भेद नाहीसा होऊन सर्वजण समान झाले. त्यांचे देहच चालते-फिरते देवालय झाले. बसवण्णांचे हे आंदोलन म्हणजे देवालय संस्कृती व त्यावर जगणारी बांडगुळे यांना दिलेले कडवे आव्हानच होते. अनुभव मंटपाचे अध्यक्ष अल्लमप्रभू आपल्या एका वचनात देवालय संस्कृतीचा खरपूस समाचार घेताना म्हणतात.
देहामध्येच देवालय असता
अन्य देवालयाची काय आवश्यकता?
प्रयोजन नाहीच द्वयाचे.
गुहेश्वरा, तू स्वयं दगड असल्यास
मी काय आहे?
(अल्लमप्रभू व. क्र. 213)
पुरोहित वर्गाने आपल्या स्वार्थासाठी देवालये निर्माण करून, त्यात दगडी देवाची स्थापना करून त्याच्या नावावर स्वत:चे पोट भरण्यासाठी त्रिकाल पूजा-आरती, अभिषेक, नैवेद्य, महापूजा, उत्सव, दान-दक्षिणा देणे, अशा धार्मिक प्रथा आपल्या धर्मग्रंथांतून प्रसारित केल्या. देवालये म्हणजे बहुजन समाजाच्या शोषणाचे केंद्रस्थानं बनली, पुरोहितांची दुकानदारी बनली. याही पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरे आपल्या एका पुस्तकात लिहितात, “देवालय म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद पसरविणार्या ब्राह्मणांचे अड्डे होत.” हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठीच महात्मा बसवण्णा अत्यंत मार्मिकपणे त्या व्यवस्थेला प्रश्न करतात :
आपले रतिसुख, आपले भोजन आपुलिया हस्ते,
कैसे परहस्ते केले जाय?
तैसे लिंगार्चन आपुलिया हस्ते,
कैसे परहस्ते केले जाय?
(ब.व.क्र. 183)
आपल्या देहाच्या माध्यमातून सुखलोलुप जीवन उपभोगणार्या सनातनवाद्यांनी हा देह अपवित्र, अमंगळ म्हणून त्याची निर्भत्सना केली आहे; परंतु बसवादी शरणांनी मात्र देहालाच कैलास मानले आहे. एवढेच नाही, तर शरणांनी देहाशी संबंधित क्रिया निसर्गत: समजून त्याबद्दल गौरवभान व्यक्त केले आहे. देह तिरस्कृत न मानता त्याला ‘प्रसादकाया’ संबोधून; उपवास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, देहदंडन करून त्या प्रसादकायेची हेळसांड करू नये, अशी बसवण्णांची शिकवण आहे. या देहाचे महत्त्व सांगताना शरण सकलेश मादरस म्हणतात.
शरीरामुळेच गुरू लाभला,
शरीरामुळेच लिंग लाभले,
शरीरामुळेच जंगमाची कृपा झाली,
शरीरामुळेच प्रसाद मिळाला.
शरीराने सकलेश्वर देवाची पूजा करताना
उच्च साधना शक्य झाली.
(संकीर्ण वचन संपुट – 4, व. क्र.413)
शरीरामुळेच गुरू लाभला म्हणजे ज्ञान प्राप्त करणे शक्य झाले. शरीरामुळे लिंग लाभले म्हणजे परमात्म्याची कृपा संपादन करता आली. शरीरामुळेच जंगमस्वरुपी समाजाची सेवा करता आली. शरीरामुळेच ज्ञान व सेवेचे फळ प्रसादरुपात मिळाले. तात्पर्य, व्यक्ती, समाज व राष्ट्राचा विकास करण्यासाठी सशक्त नि निरोगी शरीर संपादन केलेल्या प्रजेची गरज आहे, असा शरणांचा विश्वास होता. या विश्वासातून शरणांनी देहालय संस्कृतीच्या माध्यमातूनच पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करता येतो, असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला आहे.
आज आपल्या देशाची वास्तविकता अत्यंत भयावह आहे. स्वत:च्या देहापेक्षा देवालयेच लोकांच्या श्रद्धेचा विषय बनवून मंदिर-मस्जिदसाठी रक्त सांडले जात आहे. आज आमचा देश भूकबळी, कुपोषण, अनारोग्य नि झोपडपट्टी अशा समस्यांनी त्रस्त असताना, दुसरीकडे देवा-धर्माच्या नावावर लाखो-करोडो रुपये गुलाल-बुक्क्याप्रमाणे उधळले जात आहेत. ज्या देशातील माणसांना लाज लपविण्याएवढे पुरेसे वस्त्र मिळत नाही, त्या देशातील देवालयांवर सुवर्णाचा साज आहे. लाखो लोकांना अजूनही घरं नसताना देवालये महालासारखी सजलेली आहेत. अशा श्रीमंत देवांच्या देशात गरीब माणसे राहतात, ही स्वातंत्र्योत्तर भारताची खरी शोकांतिका आहे. ही शोकांतिका दूर करायची असेल, तर आपण देवालय संस्कृतीकडून देहालय संस्कृतीकडे वळले पाहिजे. देवालयांना दिली जाणारी देणगी शिक्षण, आरोग्य, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी दिली जावी, तशी विवेकबुद्धी आपणा सर्वांच्या ठायी येवो, हीच अपेक्षा.
– राजू ब. जुबरे
मोबा. 08904638908