Categories
चळवळ

मअंनिसच्या वेबसाईटचे दिल्लीत अनावरण

ऑक्टोबर – २०१६

महाराष्ट्र अंनिसच्या इंग्रजी, हिंदी व मराठी संकेतस्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. यशपाल यांच्या हस्ते दिल्लीत 20 सप्टेंबर रोजी झाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 27 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम महाराष्ट्र राज्यात अत्यंत प्रभावीपणे करीत आहे. महाराष्ट्र राज्यातून सर्व 36 जिल्ह्यांतून तीनशेपेक्षा जास्त शाखा असलेल्या संघटनेच्या इंग्रजी, हिंदी व मराठी संकेतस्थळाचे उद्घाटन भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक व शैक्षणिक क्षेत्राचे पितामह मार्गदर्शक प्रा. यशपाल यांच्या हस्ते दिल्लीतील महात्मा गांधी शांती केंद्र, नवी दिल्ली येथील सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आहे. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, गांधीवादी कार्यकर्ते सुब्बाराव, महाराष्ट्र परिचय केंद्र दिल्लीचे संचालक दयानंद कांबळे, वेबसाईट निर्माते गिरीष लाड, दिपक गिरमे, माधव बावगे, योगेश कुदळे, केशव कुदळे इत्यादी उपस्थित होते.

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार सतत 30 वर्षेकरीत असताना शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वात सतत 24 वर्षे समितीने स्वयंसेवी पद्धतीने, लोकाधारित असे संघटित कार्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून उभे केले. त्यामध्ये हजारो कार्यकर्तेआज कार्यरत आहोत. चमत्काराला विरोध व त्याचा दावा करणार्‍या बाबा-बुवा-मांत्रिक-देवऋषी-माता-भगत आदींच्या बुवाबाजीचा भांडाफोड करण्यापासून सुरू झालेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार, अंगीकार करण्याचा आग्रह समाजात निर्माण करीत आहे. त्यासाठी शोषण, दिशाभूल करणार्‍या कालबाह्य रुढी, प्रथा, परंपरांना विरोध करीत असतानाच त्याला कालसुसंगत विधायक पर्याय देण्याचा प्रयत्न देखील परिणामकारकपणे राबविला जात आहे. विविधांगाने समाजाला विवेकी बनविण्याच्या प्रयत्नातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या योगदानाची माहिती जगाला करून देण्याच्या दृष्टीने संकेतस्थळाच्या माध्यमाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी इंग्रजीमधील www.antisuperstition.org हिंदीमधील www.mahaanis.com आणि मराठीमधील www.mahaanis.org

अशा तीन संकेस्थळांची सुरुवात दि. 20 सप्टेंबर 2016 रोजी विख्यात ज्येष्ठ वैज्ञानिक व शैक्षणिक सल्लागार प्रोफेसर यशपाल यांच्या हस्ते करण्यात आली.

– माधव बावगे