Categories
उपक्रम

ये हौसला कैसे रुके, ये आरजू कैसे झुके

फेब्रुवारी – २०१६

15 जानेवारी 2016 रोजी अलिबाग येथे बालाजी नाका व प्रशांत नाईक मित्रमंडळ या दोन तरुण मंडळांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर पथनाट्य स्पर्धा आयोजित केलेली होती. या कार्यक्रमासाठी त्यांनी मला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. यापैकी बालाजी मित्रमंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज मुळे, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस श्री.नितीन राऊत यांच्या संपर्कातील हितचिंतक कार्यकर्ते आहेत व प्रशांत नाईक मित्र मंडळाचे श्री. प्रशांत नाईक हे अलिबागचे नगराध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ते वेळोवेळी मदत करतात. बहुसंख्य तरुण मंडळांप्रमाणे, ही दोन तरुण मंडळेही वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. ज्या दिवशी या मंडळांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती, त्याच दिवशी सकाळी त्यांनी सत्यनारायणाची पूजा देखील आयोजित केलेली होती. हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे कार्यक्रम होते. त्यांच्या वेळा, त्यासाठी बोलावलेले पाहुणे, असे त्यांच्या नियोजनाचे सर्व तपशील वेगवेगळे होते. तरुण मंडळाच्या कोणा उत्साही कार्यकर्त्याने एकाच फलकावर या दोन्ही कार्यक्रमांचा उल्लेख केला आणि नंतर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या असलेल्या मुक्ता दाभोलकर या सत्यनारायणाच्या पूजेला कशा जातात’? याच्यावर सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली. सोशल मीडियात तत्पर वावर असलेल्या विनायक होगाडे या इचलकरंजीच्या तरूण कार्यकर्त्याने त्या चर्चेची उत्तम दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका स्पष्ट करणारी पोस्ट सोशल मीडियात टाकली.

दैनिक सनातन प्रभात या वर्तमानपत्रात http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2016/01/blog-postš6168.html या लिंक वर या कार्यक्रमाचा वृत्तांत आला आहे. त्यात असे म्हटले आहे की मुक्ता दाभोलकर या हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करतात. त्यामुळे हा कार्यक्रम रहित करावा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन अधिवक्ता श्री. जयंत चेऊलकर, श्रीराम ठोसर यांनी इतर अधिवक्ता मित्रांसह; तसेच संघ परिवाराचे श्री. रघुजी आंग्रे, बजरंग दलाचे संयोजक श्री. विशाल पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. हेमंत दांडेकर यांनी अलिबाग पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व संयोजकांना दिले होते. संयोजकांनी मला नंतर सांगितले की कार्यक्रमात कोणीही देवाबद्दल बोलणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. संयोजकांना दर अर्ध्या तासाने फोन यायचा व ‘तुम्ही त्यांना बोलावलतच कसं?’ अशा अर्थाची विचारणा व्हायची. एका बाजूला मंदिर, दुसर्‍या बाजूला दर्गा व एका कोपर्‍यात सकाळी घातलेली सत्यनारायणाची पूजा असलेल्या चौकात अंधश्रद्धा निर्मूलनावरील पथनाट्ये सादर करणार्‍या आणि त्यांना भरभरून प्रतिसाद देणार्‍या सामान्य प्रेक्षकांच्या मनात मात्र अंनिसच्या देवधर्म विषयक भूमिकेसंदर्भात जराही संदेह नव्हता.

प्रत्यक्ष कार्यक्रमात काय काय झाले? सुमारे 9-10 संघांच्या सहभागाने संध्याकाळी सातच्या सुमारास, पथनाट्य स्पर्धा सुरू झाल्या. सरासरी वीस वर्षे वय असलेल्या तरुण मुलामुलींच्या गटांनी सदर केलेल्या पथनाट्यामध्ये त्यांच्या वयाला साजेसा जोष तर होताच परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ किती विविध अंगाने त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे, हे त्यांनी केलेल्या मांडणीतील विविधतेवरून जाणवले. बुवाबाजीपुरते मर्यादित न राहता, फलज्योतिष, व्रतवैकल्ये, आत्मा, कर्मकांडे, नवससायास, पुनर्जन्म, दुष्काळाचे उत्तर दैववादी पद्धतीने शोधणे, शब्दप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य मानण्यास नकार, वैज्ञानिकांचा छळ, जात, माणूस मारून विचार संपत नाही असे अनेकानेक विषय मुलांनी स्वतः लिहिलेल्या संवादातून आणि गाण्यांतून जोरकसपणे मांडले. मासिक पाळी व पावित्र्याच्या चुकीच्या कल्पना याविषयी मुले आणि मुली स्वतःच्या गावाच्या चौकात उभे राहून निर्भीडपणे, स्पष्टतेने, तपशीलवार बोलल्या आणि 400-500 च्या समूहाने त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला. मला वाटलं फेसबुकवरून happy to bleed म्हणण्यापेक्षादेखील असं स्वतःच्या गावातील चौकात उभं राहून पाळीचा रक्तस्त्राव का होतो, याविषयी स्वतःचे मत सडेतोडपणे व्यक्त करणे अधिक कठीण आहे. मुले फक्त समस्या मांडून थांबली नाहीत किंवा अंनिसने यावे व या संदर्भात काही तरी करावे असे देखील म्हटली नाहीत. अंधश्रद्धेतून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे, विवेकाची कास धरणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला अंनिसची साथ असणार आहे, अशी एकूण मांडणी होती. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या देव व धर्माच्या उपासनेच्या स्वातंत्र्याचा अंनिस संपूर्ण आदर करते, याची त्यांना व सामान्य प्रेक्षकांना खात्री होती. अंनिस देवाच्या विरोधी आहे असे म्हणणारे त्यांचा अपप्रचार थांबवतील आणि अंनिस पुरेशी पुरोगामी नाही, दुटप्पी आहे, असे म्हणणारे सर्वजणदेखील ही भूमिका समजून घेतील, अशी अपेक्षा बाळगूया. मी दहा मिनिटं भाषण केले, भाषणाच्या शेवटी विवेकाचा आवाज बुलंद करूया’ ही घोषणा आम्ही सर्वांनी मिळून दिली आणि मनातल्या मनात मी डॉक्टर दाभोलकरांना उद्देशून म्हटलं, सामान्य माणसे त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये चळवळीचा विचार नेमकेपणाने मांडताहेत डॉक्टर, लढेंगे, जितेंगे!’

मुक्ता दाभोलकर,

संपर्क : 9423297969