सध्या मुक्ता दाभोलकर आणि सत्यनारायण पूजा यासंबंधी एका कार्यक्रमाच्या पोस्टरचा फोटो सगळीकडे पसरताना दिसतोय…अनेक लोक तो ‘शेअर’ करून आपापले सोयीस्कर अर्थ काढून नेहमीप्रमाणे गैरसमजाला खतपाणी घालत आहेत…
साधारण त्यांचा फोटो ‘शेअर’ करून बोलण्याचा मानस हां दिसतोय की ,‘बघा, हे कसे ढोंगी आहेत…चालले ना सत्यनारायणाला..? हे कसले पुरोगामी..?’
‘पोस्ट’ थोडी मोठी आहे; पण वाचाच..!
आता सदरचा कार्यक्रम बालाजी नाका व प्रशांत नाईक मित्रमंडळ, अलिबाग तर्फे ‘अंधश्रद्धा विरोधी पथनाट्य’ हा आहे. ‘मिलींद मुळे’ या कार्यकर्त्याने त्यांच्या 45 वर्षे जुन्या मंडळाला वरील उपक्रम करण्यास समजावले व मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. मुक्ता दाभोलकर या स्पर्धेसाठी पाहुण्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील पुस्तक ‘पृथ्वी मोलाचा माणूस’ चे रायगड मधील लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम जनजागृतीचा आहे. याच मंडळातर्फे तिथल्या लोकांसाठी दरवर्षीप्रमाणे ‘सत्यनारायण पूजा’ ही आयोजित केली आहे..! त्यांनी ठेवलेल्या पथनाट्य स्पर्धासाठी मुक्ताताईंना बोलावले आहे. ’सत्यनारायण पूजेला बोलावले नाही व त्या जाणारही नाहीत ! त्यांना या पुजेसंबंधी कल्पनादेखील नव्हती..! मग असे पोस्टर छापण्यामागे एकतर चूक किंवा अनभिज्ञता असू शकते… चौकशीअंती असे आढळते की, मंडळाच्या एका उत्साही कार्यकर्त्याने या दोन्ही कार्यक्रमाचे एक छोटे पोस्टर लावले… आणि काहींनी त्याचा फोटो काढून ‘मअंनिस’ विषयी बुद्धिभेद आणि नेहमीप्रमाणे बेमुर्वतखोरपणे खोटा प्रचार करण्यासाठी केला…! असो..!
आता ‘मअंनिस’ची देवधर्मविषयक भूमिका पुन्हा एकदा….
महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री….
1) शोषण आणि फसवणूक करणार्या अंधश्रद्धांना विरोध.. 2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार आणि अंगीकार… 3) धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा… 4) समविचारी संघटनाना जोडून घेणे…
या भूमिकेच्या आड कधीच ’देव मानावा किंवा न मानावा..?’ ही अडचण येत नाही…वा आजवरच्या कामात कधी आली नाही..! ‘नास्तिक व्हा आणि मगच संघटनेत या…’ अशी कधीच संघटनेची भूमिका नाही… पण ‘मअंनिस’ संघटना म्हणून कोणत्याच धर्माच्या कोणत्याही धार्मिक कृत्यात सहभागी होत नाही…
अनेक आस्तिक कार्यकर्ते या समितीत अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने करत आहेत..! अंनिसचा देव-धर्म मानण्याला विरोध नाही तर देवा-धर्माच्या नावावर चालू असलेल्या अनैतिक गोष्टींना आहे….
डॉ.दाभोलकर आपल्या भाषणात नेहमी सांगायचे की…. अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे..! घटनेच्या चौकटीत राहून काम करणारी ही संघटना आजवर अनेक महत्त्वाचे बदल राबवण्यात यशस्वी झाली आहे… आणि इथून पुढेही समाजमानसात नक्कीच चांगलं परिवर्तन करेल, यात शंका नाही…
समितीचे कार्यकर्ते चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम करतात… ‘रिंगणनाट्या’च्या माध्यमातून समितीच्या भूमिकेला धरून असणारी ‘अंधश्रद्धा निर्मूलन… वैज्ञानिक दृष्टिकोन… विवेकवाद’ यावर नाटक सादर करतात… व्याख्याने देतात… शाळाशाळात… वस्त्यांमध्ये जातात… त्याचप्रमाणे…
गणेशोत्सव…नवरात्र…या आणि अशा उत्सवातही अनेक मंडळे समितीचे हे कार्यक्रम स्वतःहुन ठेवतात…कार्यकर्ते अशा ठिकाणी जाऊन ही विवेकाचा जागर करतात… गाडगेबाबांसारखा संत माणूस आयुष्यभर देवाच्या दारात ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असं म्हणत हाच विचार लोकांना सांगत राहिला… तुकाराम महाराजांसारखा व्यक्ती विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन विद्रोही विचार मांडून लोकांना कर्मकांडाविरहित नीतिमूल्याधिष्ठित धर्म सांगू पाहत होते… आम्ही यांचेच वारस आहोत…
दाभोलकर म्हणत असत की आमची भूमिका ही ‘या संतसमाजसुधारकांकडे जाणारी आणि जगातील इतर विवेकवाद्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाणारी आहे…!’ नक्कीच…हे वाचून आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील…की जे आजवर वैचारिक विरोधकांनी पसरवलेल्या खोटारड्या प्रचाराच्या गर्तेत सापडले आहेत… या प्रश्नाचे निरसन आणि समितीची विस्तृत भूमिका जाणून घेण्यासाठी नरेंद्र दाभोलकर लिखित ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हे पुस्तक जरूर वाचावे…!
मित्रांनो…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्याशी विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधू इच्छिते…!
विचार तर कराल..?
आपलाच विवेकसाथी,
विनायक होगाडे
संपर्क : 9011560460