“महाराज, तुम्हाला जाऊन यंदा 333 वर्षे लोटली. गुलामगिरीत पिचलेल्या बहुजन समाजाला हाताशी धरून तुम्ही सर्व जाती-धर्मियांचे स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य स्थापन केलेत. या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करुन बहुजनांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक मुक्ततेची ग्वाही फिरवण्याची जबाबदारी आपण विश्वासाने बहुजनांच्या पुढच्या पिढीवर निष्ठेने व विश्वासाने टाकलीत. पण माफ करा महाराज, अजूनही स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर आम्ही करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारणे कोणतीही असोत, तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीट चालू शकलो नाही, हेच प्रमुख कारण आहे असे आम्हास वाटते.
राजे, 400 वर्षांपूर्वी तुम्ही ‘वृक्षसंवर्धना’चे महत्त्व सांगितले. वाळलेली झाडे तोडून तेही झाडाच्या मालकाला योग्य मोबदला देऊन त्यांचा विनियोग राष्ट्रहितासाठी करताना तोडलेल्या झाडाच्या जागी नवीन वृक्ष लावावा, ही तुमची ‘शिवनीती’ आम्ही साफ विसरलो. काँक्रीटचे जंगल उभारताना हे मुख्य नैसर्गिक जंगल कापण्याची बुद्धीच आम्हाला झाली नाही. ‘विकासाचे डोंगर’ उभारताना शेकडो वर्षे वयाचे हे ‘बहुपयोगी जीव’ बळी देताना आम्ही कचरलो नाही.
महाराज, तुम्ही सर्व जाती-धर्माच्या गरीब रयतेच्या हाती स्वराज्याच्या उभारणीकरिता ‘शस्त्रे’ दिलीत. ती शस्त्रे अन्याय करणार्यांच्या विरोधातच चालवीत, यासाठी आदर्श प्रशासनाचा नमुना तुम्ही कृतिशीलपणे सादर केलात. स्वराज्य उभारणीत तुमच्या प्रेरणेने सर्व जाती-धर्माचे हात लागले अन् म्हणूनच ते ‘रयतेचे राज्य’ ठरले. तुमच्या मृत्यूनंतर 100 वर्षांतच पेशवाई आली अन् समाजाचा ‘लढाऊ हिस्सा’ अस्पृश्यतेच्या ‘घातक’ वरवंट्याखाली चिरडला गेला. म्हणून पेशवाई बुडताना कुणी रडलेही नाही अन् लढलेही नाही. आजसुद्धा ही ‘अमानुष पिसवाई’ विविध रुपात, विविध माध्यमातून बहुजनांना छळत असते.
राजे, युवराज संभाजीराजांच्या शिक्षणामध्ये तुम्ही संस्कृतचा समावेश केला. परिणामी संभाजी राजांनी अल्पवयात चार महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेत. शिक्षणाविषयीचा तुमचा हा दूरदृष्टीचा निर्णय बहुजनांनी वेळीच ओळखला असता, तर बहुजनांच्या अनेक पिढ्या लवकरच ‘शहाण्या’ झाल्या असत्या.
महाराज, जुन्या कालबाह्य प्रथा-परंपरा-रूढी मोडून त्याठिकाणी विकासानुरूप नवी परंपरा निर्माण केलीत. ‘समुद्रबंदीचा’ आदेश जुगारून तुम्ही सागरी आरमार उभे केलेत, ज्याचा उपयोग स्वराज्याच्या रक्षणाकरिता अग्रक्रमाने झाला हे इतिहासाचा दाखलाच सांगतो. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ ‘सती’ जाण्यासाठी निघाल्या, तेव्हा स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाची महत्ता पटवून देऊन त्यांना ‘सती’ निर्णयापासून परावृत्त केले. युवराज राजाराम ‘पालथे’ जन्मले, त्यावेळी पुरोहितांनी सांगितलेल्या कर्मकांडाला निश्चयपूर्वक नकार देताना “राजाराम पालथा जन्मला त्या अर्थी तो पातशाही पालथी घालेल,” असे दृढतापूर्वक सांगितलेत. महाराज, तुम्ही सच्चे अंधश्रद्धा निर्मूलक. समुद्रबंदी नाकारणारे, सतीप्रथेला विरोध करणारे, कर्मकांडाला थारा न देणारे सच्चे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी. महाराज, आपला हा आदर्श आमचे राज्यकर्ते उचलतील तो सुदिन. ‘शिवाजीचा महाराष्ट्र’ असं अभिमानाने सांगणार्या या राज्यात बहुजनांना व स्त्रियांना कालबाह्य कर्मकांडे व धार्मिक, मानसिक गुलामगिरीतून ‘मुक्त’ करू पाहणारा ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आमच्या ‘कार्यक्षम सरकार’नी पास करण्यासाठी 18 वर्षे लावली; ती पण कायद्यासाठी आग्रही असणार्या डॉ.दाभोलकरांचा खून झाल्यानंतरच.
राजे, “वैर राज्याशी, राज्यकर्त्याच्या धर्माशी नव्हे” हा विवेकी विचार तुम्ही आजन्म जगत आलात. म्हणूनच मुस्लिमधर्मीय राज्यकर्त्यांशी संघर्ष करताना आपल्या पदरी मुस्लिम सैनिक ठेवताना तुम्ही संकोचला नाहीत. उलट महत्त्वाच्या जागेवर त्यांची नेमणूक करून स्वराज्याच्या सेवेची संधी त्याला उपलब्ध करून दिलीत. 700 पठाणांची टोळी म्हणूनच तुमच्यापुढे स्वेच्छेने, विश्वासाने पुढे आली. लढाईच्या वेळी रणांगणावर पडलेले ‘कुराण’ सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम सैनिकाकडे देणारे तुम्ही जगावेगळे ‘धर्मनिरपेक्ष राजे.’ हिंदू सैनिकांसाठी जगदिश्वराचे मंदिर बांधताना आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी मशिदीची उभारणी करणारेही तुम्हीच. राज्याला धर्माची मर्यादा नसावी, हा लोकशाहीचा संकेत तुम्ही आपल्या जीवनकार्यातून सातत्याने दाखवून दिलात. पण राजे आम्ही इतके करंटे निघालो की, लोकशाहीच्या राज्यात तुमच्याच नावाचा जयघोष करून आमच्या बांधवांनी ‘बाबरीपतन’ केले. या कृत्याचा अभिमान आहे, असंही बिनदिक्कत बोलू लागले. राजे, तुमचा वारसा माणसातील पशुपण जागं करण्याचा, हा फरक बहुजनांनी वेळीच ओळखायला हवा.
‘मरणानंतर वैर संपते’ असा बहुमोल संदेश अफझलखान वधानंतर तुम्ही दिलात. आपल्या जीवावर उठलेल्या शत्रूलाही त्याच्या मृत्यूनंतर अत्यंत सन्मानाने वागवून अखिल जगताला आदर्शाचा नवा वस्तुपाठ तुम्ही घालून दिलात. ‘वैर माणसाशी नव्हे, त्याच्यातील घातक प्रवृत्तीशी’ हेच तुमचे जीवनसूत्र होते. आमच्या धर्मबांधवांनी हे ‘जीवनसूत्र’ पायदळी तुडवले व अफझलखानाचा पिच्छा त्याच्या मरणानंतरही सोडला नाही. इतिहास मांडताना आपल्या सोयीचाच मांडून आपल्या स्वजातीय राष्ट्रद्रोही बांधवांना दुर्लक्षित ठेवून आपल्या हितसंबंधाचे रक्षण केले. म्हणूनच अफझलखान वधाचा इतिहास सांगताना तुम्ही स्वहस्ते मारलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जाणीवपूर्वक लपवला गेला. ‘ब्रह्महत्या पाप आहे’ हे मनुस्मृतीचे वचन आपल्या धाडसी कृतीने आपण मोडलेत. पण धर्मांधांनी व इतिहास आपल्या हितसंबंधांसाठी मांडणार्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तींनी कृष्णाजी कुलकर्णी लपवला व अफझलखान चित्रात पुढे केला. याच अफझलखान वधाच्या घटनेचा ‘गोबेल्स’ नीतीने प्रचार करून हिंदू-मुस्लिम समाजात ‘तेढ’ निर्माण केली. आपल्या स्वराज्य उभारणीतील मुस्लिम समाजाचे बलिदान विसरले गेले. याचाच परिणाम कुलवाडीभूषण शिवाजीराजा हा ‘बहुजन प्रतिपालक’ न ठरता ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणजेच केवळ ‘हिंदूचा राजा’ ठरवला गेला. आपल्या ‘परधर्मसहिष्णुतेची’ अशी वाट आमच्याच बांधवांनी केली, हे खेदपूर्वक राजे, तुम्हाला सांगावेच लागेल.
संख्या आणि बळाने तुलनेने गब्बर असणार्या मोगल शत्रूंना ‘गनिमी कावा’ या शिवतंत्राने तुम्ही नामोहरम केलेत. पुढे मराठे हे ‘शिवतंत्र’ विसरले आणि परिणाम ‘पानिपत’च्या रुपाने समोर आला. तुम्हाला विसरणं म्हणजे पराभव ठरलेलाच.
महाराज, प्रबळ मोगली सत्तेला रोखण्यासाठी आपण 361 किल्ल्यांची तटबंदी मजबूत केलीत. याचा परिणाम म्हणूनच ‘स्वराज्य’ गिळू पाहणारा ‘शहेनशहा’ या मराठी मातीतच गाडला गेला. पण दुर्दैव असं की या किल्ल्यांचे महत्त्व आमच्या मायबाप सरकारला पटतच नाही अन् म्हणूनच कुंभमेळा आणि हज यात्रेला, शिखांच्या गुरूद्वाराला शासन भरभरून पैसा खर्च करते, परंतु ज्या किल्ल्यांच्या मजबूत तटबंदीने सह्याद्री आणि हिमालयाची मान सतत उंच केली, त्या किल्ल्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा. साधी डागडुजी करण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. महाराज कुठे तुमचे स्वराज्य अन् कुठे आमचं हे मुर्दाड राज्य, अन् राज्यकर्ते.
राजे, तुम्हाला किती अन् काय सांगावं? जो ‘अंत:स्थ हेतू’ तुमच्या मनी स्वराज्य उभारताना होता, तो आज 400 वर्षांनीसुद्धा आम्हाला साध्य करता आला नाही, ही कबुली द्यावीच लागेल. महाराज, तुम्हाला ‘आयकॉन’ म्हणून सार्या जाती-धर्माने स्वीकारलं हे खरं; परंतु हा स्वीकार आपापल्या ‘सोयीनेच’ झाला. शिवरायांचा विचार व आचार आपल्या जीवनात उतरवावा, हे कठीण कार्य आपणाला झेपणार नाही, अशी सर्वसामान्य गैरसमजूत. म्हणूनच ‘शिवाजी जन्मावा; पण शेजारच्या घरात’ अशी वाक्ये सतत कानावर पडतात. तेव्हा राजे, मन खवळतंच. या सर्वसामान्यांना दोष देताना अधिक दोष आमच्यासारख्या सुशिक्षितांवर येतोय. महाराज, तुम्ही इतिहास घडवलात; पण तो पूर्वग्रहविरहीत, शास्त्रीय पद्धतीने, जसा घडला तसाच लिहिला गेला नाही. परिणामी ‘बहुजनप्रतिपालक’ शिवरायाचे ‘गो-ब्राह्मणप्रतिपालक’ शिवाजी असंच आम्ही वाचलं. अफझलखान फाडणारा व शाहिस्तेखान छाटणारा युद्धवीर शिवाजी आम्हाला कळाला; परंतु बलात्कारी रांझ्याच्या पाटलाला आणि प्रत्यक्ष तुमच्या वरच ‘वार’ करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आमच्यापर्यंत दीर्घकाळ पोहोचलाच नाही. तुमचं ‘स्वयंभू’ वीरत्व नाकारून तुमच्या गुरूपदी, रामदास व दादोजी कोंडदेव बसवण्याचे डावपेच रचले गेले. आम्हीसुद्धा काही काळ या बनावटीला भुललो. तुमच्या अफाट अलौकिक कार्यामागे तुळजाभवानीने तुम्हाला भवानी तलवार दिली. त्यामुळे हे दैवी कार्य शक्य झाले, अशा अफवांची रचना इथे पद्धतशीरपणे केली गेली. तुमच्या रायगडावरील समाधीसमोरच इतिहासात कोणताही अधिकृत दाखला नसता ‘वाघ्या’ कुत्रा बसवला गेला. इतिहासाची ही केवढी मोडतोड!
पण महाराज, तुमची शपथ घेऊन सांगतो. आता हा शिवरायांच्या विचारांचा ‘मावळा’ स्वस्थ बसणार नाही. जागरूक बनलेली बहुजनांची पोरं आता तुमचा ‘खरा इतिहास’ लिहितील. तो इतिहास समजून घेऊन त्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही रात्र-दिवस एक करू. राजे, ‘इतिहास माणसाला शहाणपण प्राप्त करून देणारा विषय आहे,’ असे एका विचारवंताचे बोल आहेत. तुमच्या इतिहासातून माणसाचे मन, मेंदू व मनगट बळकट करणारे ‘मानवविकासाचे शास्त्र’ या देशातील तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही कृतिशीलपणे घेऊ.
तूर्त राजे क्षमा असावी.
–उमेश मुरलीधर सूर्यवंशी
एक शिवप्रेमी
मोबा.9922784065