Categories
महिला

पनवेल येथे कोकण विभागीय ‘महिला संवाद मेळावा’ संपन्न

स्त्री-पुरुष समता प्रबोधन अभियान
फेब्रुवारी – २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेच्या संयोजनातून 10 जानेवारी 2016 रोजी पनवेल येथे कोकण विभागीय ‘संवाद मेळावा’ संपन्न झाला. दु. 2 ते 6 या वेळेत तीन सत्रांमध्ये मेळावा घेण्यात आला. उद्घाटन सत्रामध्ये राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे, राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशीलकर, सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दिन शेख, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर हे होते. उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. मान्यवरांनी तरुण-तरुणींच्या हाती संविधानाची प्रत दिली. हे संविधान घेऊन या तरुण-तरुणींनी लिंगभेद, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, जातपंचायत, व्रतवैकल्ये यात गुरफटलेल्या तरुणींच्या एक-एक गाठी सोडून तिला बंधनांतून मुक्त केले व तिच्या हाती संविधानाची प्रत दिली. यातून शोषणमुक्त समाजाची निर्मिती सांवैधानिक मूल्यांतून होऊ शकते, हा संदेश दिला.

या सत्रामध्ये सुरेखा भापकर यांनी (कार्याध्यक्ष, ठाणे) ‘लढा जातपंचायतविरोधी’ या विषयाची मांडणी केली. या मांडणीतून सर्वांनाच जातपंचायतीच्या भयानक दहशतीची जाणीव झाली. मेळाव्याचे दुसरे सत्रही वेगळे ठरले. या सत्रात लिंगभेदावर आधारित प्रश्नांवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी मांडणी केली. सहेली संस्था व बुधवार पेठ देवदासी संस्था या सेक्सवर्करसाठी काम करणार्‍या संस्थांचा कार्यकर्ता सचिन थिटे (अंनिस मुंबई सचिव) याने सेक्स वर्करच्या प्रश्नांची मांडणी केली. समर्थ सेवा प्रतिष्ठान या एच.आय.व्ही. व एड्स बाधित रुग्णांसाठी काम करणार्‍या संस्थेचा कार्यकर्ता अरविंद पाटील याने या आजारामुळे महिलांना उपेक्षेला कसे तोंड द्यावे लागते, हे प्रभावीपणे मांडले. पी.बी.मंडलिक ट्रस्ट व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते अल्लाउद्दिन शेख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सर्वत्र महिलांच्या दुय्यमत्वाला पुरुषप्रधान संस्कृतीने कसे खतपाणी घातले आहे, याची सोदाहरण मांडणी केली.

तिसर्‍या समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या मा.वृषाली मगदूम उपस्थित होत्या. उपस्थित तरुणींनी ‘महिला जाहीरनाम्याचे’ वाचन केले. मेळाव्याला संबोधित करताना वृषाली मगदूम यांनी, स्त्रियांच्या हक्कांसाठी, कायद्यांसाठी कसे संघर्ष करावे लागले हे मांडले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या कायदे व दृष्टिकोनातल्या बदलांचा आलेख मांडला.

मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. वेगवेगळ्या सत्रांतील स्वागत, आभाराचे काम सुकेशिनी शिंदे, मोहन भोईर, निमा शिंगारे, तुषार शिंदे यांनी केले. मनस्वी पाटेकर, सुलभा देशपांडे यांनी चळवळीची बहारदार गाणी सादर केली.कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन महेंद्र नाईक यांनी केले.

मेळाव्यात ग्राममित्र, प्रेरणासंस्था, समर्थ सामाजिक संस्था, ग्रामसंस्था, भारतीय विद्यार्थी संघ, जनवादी महिला संघटना इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.

आरती नाईक, पनवेल