Categories
बुवाबाजी

किशोर बाळसराफ भोंदू बाबा महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने पोलिसांच्या अटकेत

मार्च - २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा शाखेच्या पुढाकाराने उमरा, ता.समुद्रपूर, जि.वर्धा पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे अंतर्गत येणार्‍या गावातील किशोर रमेश बाळसराफ वय 28 वर्षेया तरूण भोंदूबाबाला दि.3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्य प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी मा.मनिष बन्सोड(ए.पी.आय.) यांनी रंगेहाथ पकडले. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. गजेंद्र सुरकार यांनी याबाबत तक्रार दाखल केली.

किशोर रमेश बाळसराफ हा मॅट्रीक नापास असलेला भोंदू बाबा माझ्या अंगात शनिवारी व मंगळवारी हनुमान येतो असे सांगू लागला. घरच्या लोकांनी या गोष्टीचा प्रचार सुरू केला. या बाबाच्या दैवी उपायाने हमखास आराम पडतो, फायदा होतो. संकटे दूर होतात तो घरात ठेवलेल्या वस्तू कुठे आहेत हे बरोबर सांगतो, मनातील ओळखतो. करणी, जादूटोणा कोणी केला आहे हे सांगून तो दूर करतो, मुले नसणार्‍या दांपत्यांना मुलं-बाळं देतो. कोणाचीही अडचण संकट दूर करतो अशी ख्याती या ढोंगी बाबाची होती. त्यासाठी तो जळता कापूर हातावर खेळवून तोंडात गिळणे हा चमत्कार दाखवून धाक, भीती दाखवून ठेवलेल्या दानपेटीत पैसे टाकण्यास प्रवृत्त करायचा. या बाबाने मागील वर्षी वर्ध्यातील रामनगर भागातील भगतसिंग चौकातील एका 21 वर्षीय मुलीला जादूटोणाच्या कारणातून आपल्या नादी लावले होते. तर स्वत:च्या वहिनीवर(भावाची बायको) या ढोंगी बाबाची नजर होती. त्याने अनेकदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला ती स्त्री बळी पडली नाही. त्यामुळे या बाबाने माझ्या भावाला तू व तुझ्या आजोबांनी करणी जादूटोणा केला असे म्हणून घराबाहेर काढले. नंतर भावाच्या मनातही भरवून या महिलेला टाकून देण्यास सांगितले. तसे भावाने केले ही महिला आता एकटी जीवन जगत आहे. तिची तक्रार गजेंद्र सुरकार यांच्याकडे आल्याने त्यांनी मंगेश शेंडे व श्रेया गोडे या कार्यकर्त्यांना पाठवून शहानिशा केली.

दि.3 जानेवारीला रात्री पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पोलिसांना घेऊन घटनास्थळी उमरा येथे दरबार भरलेला असताना व बाबाच्या अंगात हनुमान आलेला असताना भरत कोकापार, सुधाकर मिसाळ, श्रेया गोडे, अनिल मुरडिव, प्रका कांबळे, दीपक बारापात्रे व नरेंद्र कांबळे या बाबाच्या दरबारात गेले. बाबाला दहा रूपयांच्या नोटेचा नंबर सांग, पोलीस व अंनिसचे कार्यकर्तेदरबारात आले आहेत. हे तुला कसे कळले नाही अशा प्रश्नांचा भडीमार करताच बाबा भांबावला. पोलीस स्टेशनला येताच माझ्या अंगात येत नाही असे सांगू लागला. यावेळी दरबारात बाबा करत असलेला कापूर हातात जाळण्याचा चमत्कार गजेंद्र सुरकार यांनी करून दाखविला व बाबा कसा खोटा आहे हे उपस्थित भक्तांना पटवून सांगितले.

गजेंद्र सुरकार, वर्धा