कराड तालुक्यातील पाटील मळा(ओंड) येथील महादेव मंदिरात येणार्या भाविकांना देवऋषीपणा व जादूटोणाच्या नावाखाली अंगाला भस्म लावून, तुमच्या सर्व समस्या दूर होतील असे सांगून, व शापाची भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी रंजना संजय पवार(वय 38 वर्षे, रा पाटील मळा, ओंड, ता.कराड, जि.सातारा, हल्ली रा.संत तुकाराम हायस्कूलजवळ, कराड, जि.सातारा) या मांत्रिक महिलेविरूद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. (कलम-जादूटोणा 3(1)(2) प्रमाणे व भा.द.वि.420, 506)
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा शाखा यांनी कराडचे उपअधिक्षक मितेश यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस व समितीचे कार्यकर्ते यांनी सदर मांत्रिक महिलेचे पितळ उघडे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समितीचे कार्यकर्ते सीताराम चाळके, योगेश जगताप, छकुताई देठे, संध्या जाधव, भगवान रणदिवे व प्रशांत पोतदार यांनी ओंड येथील महादेव मंदिरात सापळा रचून तेथे सुरू असलेल्या प्रकाराचे संपूर्ण छायाचित्रण केले. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरात लोकांची मोठी गर्दी झाली होती. देवळात असलेली देवऋषी महिला रंजना पवार ही येणार्या भाविकांकडे नारळ अथवा ओवाळणी टाकणार्यांनाच देवळात येण्याचा आदेश देत महिलांना प्रवेश नाकारत असत. ज्यांनी नारळ अथवा ओवाळणी आणली नाही. त्यांच्यावर ती रागावत असे. ती देवळातील महादेवाच्या पिंडीजवळ बसून, अंगात आल्यासारखे करून जमलेल्या लोकांचे भविष्य सांगत असे. त्यानंतर पैसे देणार्या लोकांना भस्म लावून, भस्माच्या पुड्या देऊन इडा, पिडा दूर करण्यासाठी व पैसे न देणार्यास शाप देण्याची भाषा करून रागवत असे. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. कराड तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश गर्जे, हवालदार संजय राक्षे, संजय पंडीत, कॉ.सचिन साळुंखे, महिला कॉ.नीता पळे यांनी कारवाईत भाग घेतला. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी करत आहेत.
–प्रशांत पोतदार, सातारा