स्वत:ला सद्गुरू तुकाराम महाराज म्हणवून घेणारा भोंदू तुकाराम मुकिंदा बाड, दर्याबाचा माळ पर्यंती, ता. माण, जि. सातारा येथील रहिवासी. हा भोंदू स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे सांगून भूत उतरविणे, पितर काढणे, करणी सोडवणे, शरीराचे सर्व असाध्य रोग बरे करणे, दारू सोडवणे इत्यादींवर दैवी उपचार करून भक्तांची आर्थिक व मानसिक फसवणूक गेली 3 वर्षांपासून करत होता. प्रत्यक्ष फसवणूक झालेले अंबादास बाबा नरळे वय 42 वर्षे राहणार पर्यंती यांनी याबाबत सातारा अंनिसकडे तक्रार केली. त्याची खातरजमा करून अंनिस टीमने या भोंदूचा पर्दाफाश करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अ.क्र.89 तसेच आय.पी.सी.420, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
अंबादास बाबा नरळे यांच्या भावाची दारू सोडविण्यासाठी भोंदू महाराजाने 22 हजार रूपये रोख घेऊन संत्रा दारू मंतरलेला अंगारा त्यात टाकून प्यायला लावली. घराच्या दक्षिणेस पितर काढण्यासाठी आणखी पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास तेच पितर परत घरात सोडून घरातील एकही माणूस जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली.
दत्तू रामा नरळे यांचेकडून 45 हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या सर्व प्रकाराची अतिशय गंभीर दखल सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घेतली व म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम.कोरे यांना कारवाईचे आदेश दिले.
या पर्दाफाश मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष सचिव भगवान रणदिवे, सिताराम चाळके, शंकर कणसे, सुनिल रणदिवे, ननावरे, पोलीस कॉन्स्टेबल, मल्हार हंगे, पोलीस हवालदार, ए.वाय.जगताप, पोलीस नाईक कांबळे आर.पी. व पोलीस नाईक डी.बी.परिहार यांनी सहकार्य केले.