कालसर्प योग आणि नारायण नागबळी कर्मकांडाबद्दल झी-24 तास या वृत्तवाहिनीवर वाद-संवाद झाला. ही चर्चा या वाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घडवून आणली. चर्चेत सहभागी झाले होते.
(1) नंदकिशोर जकातदार(ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती) (2) राजेंद्र दिक्षीत(त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचे गुरूजी) (3) दा. कृ. सोमण(खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते) आणि (4) डॉ. कुमार सप्तर्षी(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
या वाद-संवादात प्रामुख्याने खालील मुद्द्याच्या आधारे वक्त्यांनी आपली मते व्यक्त केली.
(1) कालसर्पयोग आणि नारायण नागबळी यांना जुन्या धर्म-ग्रंथांचा आधार आहे काय?
(2) ज्योतिष क्षेत्रातील तज्ञांचे या कर्मकांडाबद्दल काय भूमिका आहे?
(3) कालसर्प योग आणि नारायण नागबळी विज्ञान आणि तर्काच्या कसोटीवर टिकते काय?
(4) या कर्मकांडांकडे वळणार्या लोकांची मानसिकता काय असते? भीतीपोटी ही कर्मकांडे केली जातात का?
उदय निरगुडकर यांनी राजेंद्र दिक्षीत यांना कालसर्प योगाला कोणत्या धर्मशास्त्रीय प्राचीन ग्रंथाचा आधार आहे असे विचारले असता प्राचीन ग्रंथात कालसर्प योगाचा उल्लेख नाही हे मान्य केले. जन्मसिंधू, निर्णयसिंधू, वराहमिहीर आणि पराशर या व अशाच मान्यताप्राप्त साहित्यात कालसर्प योगाचा उल्लेख नाही असे सांगताच दिक्षीत यांना हे मान्य करावे लागले. हे कर्मकांड त्र्यंबकेश्वर निर्मित आहे आणि हे धर्मशास्त्र संमत नाही हा मुद्दा यातून स्पष्ट झाला.
औरंगाबादच्या ज्योतिष संमेलनामध्ये कालसर्पयोग आणि नारायण नागबळी हे थोतांड आहे अशी ज्योतिषांनी भूमिका घेतली. या संदर्भात संपादकांनी जकातदारांना प्रश्न केला. जकातदारांनी ज्योतिषशास्त्रामध्ये व जुन्या ग्रंथात कालसर्पयोगाचा कुठेही उल्लेख नाही आणि त्यांचा या कर्मकांडाला विरोध असल्याचे ठाम प्रतिपादन केले. औरंगाबादला ज्योतिष संमेलनात कालसर्पयोग आणि नारायण नागबळी यावर श्रद्धाळूंनी विश्वास ठेवू नये असा ठराव त्यांनी केला.
खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी कालसर्पयोग आणि नारायण नागबळी हे नुसतं थोतांड नाही तर ही कर्मकांडे करणारे गुन्हेगार आहेत अशी जळजळीत टीका केली. झी-24 ने याबाबत लोकप्रबोधन करणारे चर्चासत्र घडवून आणल्याबद्दल निरगुडकरांचे अभिनंदन केले. सोमण यांच्या मते कालसर्पयोग आणि नारायण नागबळी हा अंधश्रद्धेचा बाजार आहे. ही समाजाची लूट आहे. ही लूट अगदी अलिकडच्या 50 वर्षांत सुरू झाली आहे. धोंडीराजशास्त्री दाते पंचांगमहर्षी आणि जयंत साळगावकर आणि इतरांनी एक लेख लिहून त्यातील निवेदनावर सह्याही केल्या होत्या. त्या लेखात ही कर्मकांडे लोकांना लुबाडण्याचे साधन आहे व यावर बंदी घालायला हवी असे म्हटले आहे.
दाते पंचांगकर्ते यांनी नारायण नागबळीला मान्यता दिली आहे असे दिक्षीतांनी समर्थन करताच निरगुडकर यांनी मोहन दाते यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत कालसर्पयोगाला कोणताही आधार नाही असे स्पष्ट सांगितल्याचा उल्लेख करून वरील लेखावर दातेंची सही असल्याचाही उल्लेख केला. एकूण हे विधी गेल्या 50 वर्षांत फोफावलेत हे निरगुडकरांनी स्पष्ट केले.
दा.कृ.सोमण यांनी नारायण नागबळी विधीमध्ये डॉक्टरांप्रमाणे कट प्रॅक्टीस कसं चालतं यावर प्रकाश टाकला. एखाद्या ज्योतिषानं एखादं गिर्हाईक त्र्यंबकेश्वराला पाठवलं तर त्याला त्यातलं काही पर्सेंटेज दिलं जातं. नारायण नागबळी करून जर कोणी पवित्र व पुण्यवान होत असेल तर त्र्यंबकेश्वरचे पुरोहितही पवित्र व्हायला हवेत. पण त्यांच्यात व्यसनाधिनता वाढलेली आढळते. मार्केटिंग जोरात असल्याने बक्कळ पैसा मिळायला लागल्याने हे घडत आहे. येणार्या सिंहस्थ मेळाव्यात हा बाजार अधिक वाढणार आहे म्हणून लोकांना सावध करायला हवे.
नारायण नागबळी सारखे विधी करून भविष्य बदलता येईल काय?
या प्रश्नाला जकातदारांनी नकारार्थी उत्तर दिले व याबाबत ज्योतिषांनी मांडलेली भूमिका स्पष्ट केली. 2006 साली महाबळेश्वराच्या अधिवेशनात कालसर्पयोग, साडेसाती, वास्तुदोष, मंगळदोष अशा शांती प्रकारांचे ज्योतिषांनी कुंडामध्ये दान केलं होतं. कुठलीही शांती माणसाचे भविष्य बदलू शकत नाही हा ज्योतिषांचा दावा आहे. ज्योतिष हे जीवनाला दिशा देतं. जीवनातील पुढे येणार्या घटना शांती करून बदलू शकत नाही.
मूल होत नसेल तर नारायण नागबळी विधीने पुत्रप्राप्ती होऊ शकते म्हणजेच व्यक्तीचे भविष्य बदलते असा दावा दिक्षीत यांनी केला. अनेक जोडपी पुत्रप्राप्तीसाठी हा विधी करून घेतात. यावर द.कृ.सोमण यांनी दिक्षीत गुरूजींना तुकारामाच्या नवसे पुत्रप्राप्ती तर का करणे लागे पती? हा अभंग वाचण्याची सूचना केली. गावोगावची आय.बी.एफ.सेंटर्स बंद करावी काय? वैज्ञानिक युगामध्ये अशा अफवा पसरवणे बरोबर नाही असा खेद व्यक्त करून सोमण यांनी दिक्षीत गुरूजींना अंधश्रद्धेला वाढवू नका अशी कळकळ व्यक्त केली.
एकीकडे आपला समाज विज्ञानवादी समजायचा तर दुसरीकडे नारायण नागबळीसारखी अवैज्ञानिक कर्मकांडे करायची हे कसं घडतं हा प्रश्न निरगुडकरांनी कुमार सप्तर्षींना विचारला. कुमार सप्तर्षी म्हणाले-
पाणी शंभर डिग्रीला उकळतं असं म्हणायचं असेल तर त्यासाठीचा पुरावा हवा. तो वैश्विक हवा. म्हणजे ते अफ्रिकेत, रशियात तसेच भारतात कोठेही 1000 लाच उकळले पाहिजे. हे स्थल कालसापेक्ष नको. तसेच मानवी इच्छेच्या निरपेक्ष हवे. या निकषावर नारायण नागबळी सारखे विधी टिकणारे नाहीत.
यातूनच पुढे आला तो प्रश्न म्हणजे कर्मकांड करण्याच्या मानसिकतेचा. नारायण नागबळीची इंडस्ट्री कोट्यवधीची उलाढाल करते. याचा उगम माणसाच्या कुठल्या भावनेत आहे? निरगुडकरांच्या या प्रश्नाला कुमार सप्तर्षींनी ही भावना म्हणजे भीती असे उत्तर दिले. ते म्हणाले –
माणसाला निसर्गानेच उपजत जाणीव दिली आहे की, मी मरणार आहे. इतर प्राण्यांना ही जाणीव नसते. ही जाणीव त्यांच्याप्रमाणे माणसांना नसती तर कर्मकांडाचा प्रश्नच आला नसता. मला मरण आहे. ते नको आहे मग ते टाळता येईल काय आणि यासाठी कोणी देवाचे प्रतिनिधी पुरोहित मंत्र म्हणून मला मदत करून मला वाचवतील या दोन्हीही अंधश्रद्धा आहेत. याचं मूळ मरणाची भीती हेच आहे.
भीतीबरोबरच कुणी लग्न होत नाही म्हणून, तर कोणी बायको सुखानं नांदत नाही म्हणून, कोणी नोकरीत प्रमोशन मिळावं म्हणून तर कोणी धंद्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून असे विधी करतात हा सगळा श्रद्धेचा बाजारच आहे.
ज्योतिषांनी सांगितले म्हणून नारायण नागबळी विधीपासून लोक परावृत्त होतील का? लोकांची भीती प्रबोधनाने नष्ट होईल का? असे प्रश्न या वाद संवादाच्या अखेरच्या टप्प्यात निरगुडकरांनी उपस्थित केले.
दिक्षीत गुरूजींनी हिंदू धर्मातील विधी हे भयापोटी आहेत हा सिद्धांत अमान्य केला. भौतिक उपाय कमी पडले की माणूस धर्माकडे जातो. भौतिक उपाय करून थकलेले लोक आमच्याकडे येतात. त्यांना गुण येतो हा आमचा अनुभव आहे. आम्हाला गुण येतो अशी पत्रे मिळविता येतात. हे सांगोवांगी पुरावे विश्वसनीय नसतात. कुमार सप्तर्षी यांनी याबाबतचे वैज्ञानिक निकष स्पष्ट केले. औषधाच्या एखाद्या गोळीच्या अनेक ट्रायल्स घ्याव्या लागतात.(त्यासाठी डबल ब्लार्ईंड चाचणी असते) हजार हजार लोकांवर त्याचा प्रयोग होतो. आपण असं बघू या की, शंभर पेशंट ज्यांना मुलं होत नाहीत आणि ज्यांनी नागबळी विधी केलाय त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचा. त्यांचा सर्पकाऊंट वाढतो का हे तपासायचे. आणि जोडीला शंभर पेशंट फर्टिलीटी सेंटरला पाठवायचे. त्यांचे रिझल्टस् व नागबळीचे रिझल्टस् तपासायचे. अमक्या अमक्याला मूल झालं असं सांगोवांगी म्हणणं स्वीकारणं बरोबर नाही. माझ्याकडे कॅन्सरचा पेशंट बरा झाला असं सांगणारे खूप निघतात. त्याची चिकित्सा कोणी करत नाही. म्हणून ऐकीव गोष्टीचा प्रसार करणं हे मार्केटिंगच आहे.
संवादाच्या शेवटी टी.व्ही.वरील या कार्यक्रमाचा श्रोत्यांवर व नागबळीच्या बाजारावर कसा परिणाम होईल असा प्रश्न संपादकांनी उपस्थित केला. निरगुडकरांनी नारायण नागबळीचे मार्केट या चर्चेमुळे अधिक वाढेल अशी भीती व्यक्त केली.
यावर दा.कृ.सोमण म्हणाले- कदाचित तसं होईलही. पण ज्योतिषांनी संमेलनात नारायण नागबळी विरोधात ठराव केला आहे. त्यामुळे अनेकजणांना हा विधी थोतांड आहे हेही माहीत होईल. त्यामुळे असे लोक या अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत. पुढे येणार्या कुंभमेळ्यात हे दुकान जास्त वाढेल. श्रद्धेचा बाजार होणे बरोबर नाही. समाजाला फसवून मिळवलेला पैसा कधीही चांगला नसतो. म्हणून दिक्षीत गुरूजींनी याबाबत विचार करावा. अती पैशाने मन:स्वास्थ्य बिघडलेली त्र्यंबकेश्वरमधील तरूण मंडळी व्यसनाधिनतकडे वळत आहेत. लोकांच्या श्रद्धेचे गैरफायदा घेणे थांबविले पाहिजे. निरगुडकरांनी या वादसंवादाचा समारोप खालील शब्दात केला.
हा धंदा बंद होऊ शकतो की, नाही हे मला माहीत नाही. परंतु या ज्योतिष संमेलनानं मात्र अशा प्रकारच्या गोष्टी उघड केल्या त्याबद्दल ज्योतिष संमेलनाच्या नंदकिशोर जकातदार आणि त्यांच्यासोबत सर्व सहभागी ज्योतिषांना मी धन्यवाद देतो, त्यांनी ते धाडस दाखवलं. अनेक वर्षांपूर्वी ज्योतिषशास्त्री दाते यांनी देखील ते दाखवलं नव्हतं. हे बरोबर की, चूक हे सांगायचा माझा दावा नाही. परंतु कालसर्प योग हा आत्ताच नेमका कसा आला याचा काल संदर्भ नेमका आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याची सगळी उत्पत्ती-विपत्ती ती त्र्यंबकेश्वरीच का निर्माण होते. जुन्या धार्मिक ग्रंथांमध्ये कालसर्पयोगाला कुठलंही स्थान नाही हे यापूर्वी अनेकांनी सिद्ध केलेलं आहे. माणसाच्या मनात सतत आपल्या अभ्युदयाची जशी भावना असते तशीच भीतीचीपण भावना देखील अत्यंत सखोलपणे असते. काहीजण या भीतीच्या भावनेचा वापर करत आपल्या अंधश्रद्धेचं मार्केट श्रद्धेच्या आवरणाखाली प्रचंड मोठ्या वेगानं फोफावत असतात आणि म्हणूनच एखाद्या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त होत असलं तरी धर्मशास्त्राला मात्र गटार गंगेचंच स्वरूप येत असतं. तेच नेमकं आज आपल्या समोर आलं. हा बाजार साफ होऊन श्रद्धा नावाची ताकत देणारी गोष्ट निर्माण व्हावी याकरिता आम्ही हा कार्यक्रम केला.
कालसर्पयोग : पंचांगकर्त्यांची दहशत निर्मितीची भन्नाट कल्पना
नेते मंडळी आणि चित्रपट कलाकारांनी अडचणीच्या वेळी धसका घेतलेला तसेच लग्नात अडथळा ठरणारा हा योग. निर्मात्याने नाव पण वेचकच निवडलेले आहे. ज्याला मानवप्राणी जास्त भितो तो साप. आणि त्यात काल. मग विधी करण्यास विलंब लावण्याचे व्यक्तीचे धाडस होईल का? कालसर्पयोगबाधित व्यक्तीचे लग्न ठरण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे यातून सुटका करण्यासाठी तो नारायणनागबली विधीच्या मागे लागतो.

कालसर्पयोग आहे असे सांगितल्यानंतर व्यक्ती हा योग कसा असतो हे विचारण्यापेक्षा तो निवारण्यासाठी काय केले पाहिजे याची विचारपूस करते. एड्सग्रस्त व्यक्तीपेक्षा कालसर्पयोगग्रस्त व्यक्ती जास्त विवंचनेत राहते. राहू आणि केतू हे दोन पंचांगकर्त्यांचे ग्रह. प्रत्यक्षात विज्ञानाच्या दृष्टीने अवकाशातील काल्पनिक छेदनबिंदू. पंचांगकर्त्यांनी राक्षस म्हणून यांना संबोधले. राहू ते केतू हा मोठा साप आहे असे ते समजतात. त्यापैकी राहू हे सापाचे तोंड आणि केतू हे शेपूट.
पत्रिकेमधील सर्व ग्रह, राहू आणि केतुच्या एकाच बाजूला आले तर कालसर्पयोग. हा साप त्या पत्रिकावाल्याला सोडत नाही, वेटोळा घालून घट्ट बसलेला असतो असे ज्योतिषवाल्यांचे प्रतिपादन. मग या कालसर्पयोगबाधित व्यक्तीचे सुटकेसाठी सुरू होतात शांतीचे उपाय. त्यासाठी आहे नारायण नागबळी विधी.
त्र्यंबकेश्वर किंवा नरसिंहवाडी येथे जाऊन नारायण नागबली विधीअंतर्गत जप, तप व नागाची सोन्याची मूर्ती दान केल्यास सापाचा विळखा सुटतो. काय शक्कल आहे पंचांगनिर्मात्याची! योग निर्माण करणारा तोच आणि सोडवणाराही तोच. फक्त नाडवले जाणारे आपण. हा योग आपल्या नावावरून बेतलेला आहे हे जर नाग आणि समस्त सर्पजातीला कळाले तर बदनामीसाठी केवळ आम्हीच दिसलो का? असं म्हणून पंचांगकर्त्याला सोडणार नाहीत हे नक्कीच. पण जिथे, शिकलेल्या मानवी प्राण्यास हे समजलेले नाही तिथे त्या सापांचे काय चालणार म्हणा!
–डॉ.नितीन शिंदे, खगोल अभ्यासक