8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रियांच्या हक्कासाठी, अन्यायाविरोधात संघटितपणे करण्यात आलेल्या संघर्षाची सुरवात. कामाचे ठराविक तास व योग्य मोबदला यासाठी कारखान्यातील महिलांनी सुरू केलेला एल्गार. याला आज किती वर्षे झाली, परिस्थितीत किती बदल झाला. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले का. त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार थांबले का, स्त्रिया शोषणमुक्त झाल्या का, निर्भयपणे व सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य व वातावरण प्राप्त झाले का? अशा अनेक बाबींवर चिंतन करण्याचा दिवस. खरे तर हा एक प्रातिनिधीक दिवस. हे चिंतन सतत करणे व नेहमीकरिता यावर कृतिशील असणे हे जास्त महत्वाचे.
यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जाणीवपूर्वक व सातत्याने कृतीशील आहे. माणूस म्हणून बाईचे जगणे संकुचित करणार्या अनेक अंधश्रद्धा, त्यातून तिचे होणारे शोषण यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी, याबाबत त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी मअंनिसने सतत पुढाकार घेतला आहे. 1999 मध्ये “स्त्रिया आणि अंधश्रद्धा : स्वरूप, कारणे व उपाय” या विषयावर सोलापूर येथे महिला परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र राज्यातून मोठा प्रतिसाद या परिषदेस मिळाला. त्यानंतर 2004 मध्ये याच विषयावर राज्यव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन महिला जाहीरनामा परिषद लातूर येथे घेण्यात आली. आणि राज्यभर अंधश्रद्धा निर्मूलन महिला जाहीरनामा संकल्प यात्रा काढण्यात आली. त्यात ठिकठिकाणी स्त्री-पुरूष संवाद सभा, महिलांची संवाद सभा, संकल्प मेळावे घेण्यात आले.
मराठवाड्यात प्रामुख्याने जास्त प्रमाण असणार्या ‘भानामती’ विरोधात धडक मोहीम राबविली गेली. तसेच आदिवासी समाजातील डाकीण या दुष्ट प्रथेच्या समूळ उच्चाटनासाठी नंदूरबार येथे 2006 मध्ये डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन मोहीम-संकल्प परिषद घेण्यात आली.
3 ते 12 जानेवारी 2015 या दरम्यान “महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन-अभियान” राज्यभर घेण्यात आले.
‘आपण सारे बोलू या-बेडी अंधश्रद्धेची तोडू या’ हा संवाद मेळावा राज्यातील सर्व महसूल विभागात मोठ्या प्रमाणात घेण्यात आला. संपूर्ण राज्यात 100 पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आणि 25000 पेक्षा जास्त महिलांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश पोचविण्यास आला. यावेळी सर्व ठिकाणी महिलांकडून संकल्पपत्रे भरून घेण्यात आले.
1) मी दैववाद नाकारेन, प्रयत्नवाद स्वीकारेन, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरीन.
2) मी कोणत्याही कारणांसाठी मांत्रिक, बाबा-बुवाकडे जाणार नाही.
3) मी कर्मकांडे, व्रतवैकल्यांचा अवलंब नाकारून माझा वेळ, श्रम, पैसा, बुद्धी कुटुंबाच्या, स्वत:च्या व समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणीन.
4) मी माझ्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेईन.
5) मी साध्या, कमी खर्चाच्या विवाहाचा पुरस्कार करीन.
वरील संकल्प गांभीर्यपूर्वक स्वीकारून पार पाडण्याविषयीचे संकल्प पत्र अनेक महिलांनी भरून दिले. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, व तो कृतीत आणणे याबद्दल महिलांमध्ये जाणीवजागृती करण्यात आली.
कोणत्याही विकास प्रक्रियेत अंधश्रद्धा हा मोठा अडथळा आहे. विशेषत: स्त्रियांच्या विकासात अंधश्रद्धेचा अडसर खूप मोठा आहे. कारण अंधश्रद्धेचा सर्वाधिक त्रास होतो महिलांना. त्या अंधश्रद्धेच्या सर्वाधिक बळी आहेत आणि तरीही त्या अंधश्रद्धेच्या वाहकही आहेत. आयुष्यात येणारी अनेक संकटे, अपयश, वैफल्य यातून येणारी मानसिक, भावनिक अगतिकता, हतबलता आणि यातून सुटण्यासाठी घेतला जाणारा अंधश्रद्धेचा आधार याचे प्रमाण वाढते आहे. धार्मिक दंगली, हिंसाचार, दोन देशांमधील युद्ध, आतंकवादी हल्ले असोत किंवा जादूटोणा, नरबळी, निपुत्रिक असणे, करणी, भानामती, चेटूक, डाकीण प्रथा, बलात्कार, जातपंचायतीचे भीषण फतवे, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह अशा सर्व घटनांमध्ये बळी जाते ती महिलाच.
या देशात बाईला एक जीवनव्यापी गौणत्व लाभलेले आहे. 21 व्या शतकामध्ये ही समाजातील पुरूषप्रधान व्यवस्था प्रखर आहे. या देशातील अनेक संतांनी व समाजसुधारकांनी संतुलित व विकसित, समताधिष्ठीत समाजव्यवस्थेसाठी स्त्रियांचे स्थान महत्वाचे असल्याचे ठळकपणे अधोरेखित केले आहे.
आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा झाला तरी आजही अनेक मुली शाळेत प्रवेश घेऊ शकत नाहीत व घेतला तर पुढे अनेक कारणांनी गळती होते. आजच्या काळासाठी आवश्यक कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव त्यामुळे नोकरी नाही. लवकर लग्न होणं, त्यानंतर मूल न होणं, मुलगाच न होणं, नवर्याचे प्रेम नसणं, सासूचा छळ असणं, कौटुंबिक, लैंगिक छळ असणं, कुटुंबात मान्यता नसणं, प्रतिष्ठेचा अभाव असणं, पती-पत्नीमधील विसंवाद असणं, लैंगिक असमाधान असणं, सततचे आजारपण असणं, आर्थिक स्वातंत्र्य नसणं, निर्णयप्रक्रियेतील सहभागाची संधी, अधिकार न मिळणं अशा अनेकविध कारणांमुळे स्त्रिया अंधश्रद्धेकडे ढकलल्या जातात. परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता तिच्यामध्ये रूजवण्यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न कुटुंबातून क्वचित घडतात. त्यामुळे स्त्रिया अंधश्रद्धेच्या बळीही ठरतात व एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे त्याचे वहनही करतात. हे अत्यंत विदारक चित्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि स्वातंत्र्याच्या साठीनंतरही दिसते.
या व अशा त्रासातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा उपवास, व्रतवैकल्ये, कर्मकांड यांचा आधार घेतला जातो. कोणीतरी करणी केली असे समजून बाबा-बुवा, भगत यांचे उपचार सुरू होतात. बाईच्या अंगात येणं सुरू होतं. कधी देवीचा संचार होतो तर कधी भूताने झपाटले जाते. बाई तासन्तास घुमू लागते. तिची शारीरिक वेदनांची जाण बोथट होते, कधी अनोळखी भाषा बोलते. यामधून अंधश्रद्धा वाढतच जाते. करणी, भानामतीचे प्रकार घडतात. अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उमटणं, कपडे फाटणं, कपडे जळणं, घरातील वस्तू, पैसे गायब होणं, घरातील वस्तू आपोआप हलणं, अन्नात घाण मिसळणं, घरावर दगड पडणं, कडब्याच्या गंजीने आपोआप पेट घेणे, असे विविध प्रकार घडतात. मराठवाड्यात 400 च्या वर अशी भानामतीची प्रकरणे मअंनिसने हाताळली आहे. वैफल्यग्रस्त आणि विसंवादी मानसिकता असणार्या स्त्रियांमध्ये हे जास्त आढळते.
आजही रूढी परंपरेच्या जोखडात स्त्रिया बंदिस्त आहेत. अनेक ठिकाणी एक आयुष्य एकमेकांबरोबर काढणे कठीण असतानाही हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून वटसावित्री पौर्णिमेचे व्रतही केले जाते. व्यसनी, जुगारी, व्याभिचारी, कर्तृत्वहीन, मानसिक, लैंगिक छळ करणारा पती असला तरी आमची परंपरा या नावाखाली हे चालूच असते. त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन तपासला जात नाही. प्रश्न विचारले जात नाहीत. कारण तशी मुभा या व्यवस्थेत स्त्रियांसाठी नसते. बाईच्या जातीने जास्त बोलायचे नाही, प्रश्न तर विचारायचेच नाहीत. आणि हे आमच्या पुरूषप्रधान असणार्या कुटुंबव्यवस्थेत, शिक्षणव्यवस्थेत वर्षानुवर्षे चालू आहे. मनातले मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. जिथे प्रश्न नसतात तिथे नवनिर्मिती होत नाही. आणि म्हणून अशा सतत मानसिक, भावनिक रित्या दडपलेल्या स्त्रिया अंधश्रद्धेकडे वळतात, त्यांची बुद्धी गहाण पडते व विवेकाशी फारकत होते.
खरे तर दु:ख प्रत्येकाच्या घरात असते. ते वास्तव स्वीकारले पाहिजे, नाकारून चालणार नाही. दु:खाने गलितगात्र होणे, बाबापुढे डोके टेकणे आणि जिज्ञासेने प्रश्न विचारणे या दोन गोेटी वेगळ्या आहेत. आपण माणसं आहोत. बुद्धी, विवेक, भावबळ हे माणसाकडे असते. महिलांनी ते जाणीवपूर्वक वापरायचे असते. अंधश्रद्ध व्हायचे नसते. माणसं दु:खाच्या भीतीने जगणं संकुचित करतात आणि अंधश्रद्धेच्या मागे लागतात. त्यासाठी फक्त शिक्षण नव्हे तर त्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. आमच्या कुटुंबव्यवस्थेतून, बालसंगोपनातून, शिक्षणव्यवस्थेतून शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यामधून जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याची गरज आहे. आजच्या मुलींना दुसर्यांचा मान राखून स्वत:च्या मुूल्यांची ठामपणे जोपासना करण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. आपापसातील विवेकाधिष्ठीत मानवी संबंध जोपासणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसांमधील समृद्ध भावना व कृतिशील विवेक ही बाईच्याच पर्यायाने समाजाच्या सक्षमीकरणासाठी नितांत आवश्यक आहे.
महिला अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा ठरविणारा महिला अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा लातूर येथे झालेल्या राज्यव्यापी महिला परिषदेत प्रकाशित करण्यात आला.
1) स्त्रीला साक्षर करणे, स्वतंत्र विचार करायला शिकविणे महत्वाचे आहे. तिच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याची गरज आहे.
2) स्त्रीला प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायला शिकविणे. त्यायोगे विशेषत: कौटुंबिक पातळीवरील रूढी, परंपरा, व्रतवैकल्ये, कर्मकांडे यांची चिकित्सा करून, योग्य ते स्वीकारून, अयोग्य ते नाकारण्याचा धीटपणा तिच्यात आणणे आवश्यक आहे.
3) समाजातील स्त्री-पुरूष असमानता दूर करण्यासाठी, स्त्रीने स्वत:ला हीन लेखणे सोडून देऊन, स्वत:च्या बुद्धीचा व कलागुणांचा विकास केला पाहिजे.
4) स्त्री पुरूष असमानता दूर करण्यासाठी घरामध्ये मुलींना व मुलांना समान वागणूक दिली पाहिजे. ज्यामुळे मुलांमध्ये अहंभाव व मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही.
5) देवाधर्माचे कारण सांगून, स्त्रीला अपवित्र समजून अनेक कार्यात वगळले जाते. त्याचा निषेध करून ही गोष्ट बंद केली पाहिजे.
6) एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात स्वतंत्र स्थान दिले पाहिजे, पुरूषाच्या संदर्भातच तिचे महत्व हे बंद झाले पाहिजे.
7) मुलांबाळांच्या व पतीच्या आरोग्याइतकेच स्त्रीने स्वत:च्या आरोग्याला महत्व दिले पाहिजे, सकस आहार, स्वच्छता, योग्य वेळी लसीकरण, औषधोपचार व आवश्यक ती विश्रांती या उपायांनी स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य राखले पाहिजे.
8) स्वत:च्या शारीरिक, मानसिक व आर्थिक शक्तींचा विचार करून किती मुलांना जन्म द्यावा याचा अधिकार स्त्रीलाच असला पाहिजे. इतरांच्या दडपणाला तिने ठामपणे नकार दिला पाहिजे.
9) दु:खाला शरण न जाता स्त्रीने ह्याला सामोरे गेले पाहिजे. सुख, दु:ख पेलण्याची ताकद वाढविली तर खोटे आधार शोधण्याची गरज राहणार नाही.
10) वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, चित्रपट अशा प्रसारमाध्यमातून होणारा अंधश्रद्धेचा फैलाव व स्त्री प्रतिमेचा गैरवापर याचा निषेध केला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर हे बंद करणे हे आपल्या हातात आहे याचे भान ठेवले पाहिजे.
11) मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्यावर विवेकी मुल्यात्मक संस्कार केले पाहिजेत, ज्यामुळे भावी समाज निर्भय, निर्भिड व शोषणमुक्त होईल.
कृति–कार्यक्रम–
महिलाच्या विविध संघटनांनी आणि परिवर्तनवादी सर्वच चळवळींनी आपापल्या कार्यक्षेत्रात अन्य कामाबरोबर पुढीलपैकी शक्य ते आग्रह धरावेत असे आवाहन या जाहिरनाम्यामध्ये करण्यात आले आहे.
1) बुवाबाजी, भानामती, करणी, चेटूक, शकून-अपशकुन पाहणे, चमत्कार, अंगात येणे या स्वरूपाच्या सर्व अंधश्रद्धांना थेट व स्पष्ट विरोध करावा.
2) विवाह हुंडा नाकारून, भपकेबाजपणा टाळून करण्यात यावेत. पुरोहित व मुहूर्त नाकारून, महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी पद्धतीने वा नोंदणी पद्धतीने करावेत.
3) स्त्रियांना समान कामाला समान दाम मिळावे, त्यांना सर्व प्रकारच्या मालमत्तेत अर्धा वाटा मिळावा.
4) सर्व धर्माच्या पलीकडे जाणारा समतेवर आधारीत असा नवा कौटुंबिक कायदा करण्यात यावा.
5) शिक्षणातील मुलींची गळती थांबवावी, त्यांनी शिकावे यासाठी सर्व शक्य ते उपाय करावेत.
6) सती, देवदासी, बालविवाह या स्त्रीच्या माणूसपणाला कमीपणा असणार्या सर्व रूढी, प्रथांना कसून विरोध करावा.
7) गर्भ लिंग चिकित्सा व नंतर गर्भपात तसेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या स्त्री प्रतिमेचा व्यापारी वापर या सर्वांच्या विरोधात प्रखर जनमत तयार करावे.
8) जात पंचायतीच्या जुलुमामध्ये महिला आणि मुलांवर जे अन्याय होतात ह्या महिलांना संरक्षण दिले जावे. झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई दिली जावी व त्वरीत वैद्यकीय चाचणी करावी.
9) महिलांवर होणार्या अमानुष अन्याय व लैंगिक अत्याचार, हिंसाचार विरोधात व कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागरण करावे.
10) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणार्या महिला, मुली यांना पोलीस यंत्रणा/सरकारी यंत्रणेकडून संरक्षण मिळावे.
शहीद डॉ.दाभोलकरांच्या बलिदानानंतर या पुरोगामी महाराष्ट्रात मंजूर झालेला जादूटोणाविरोधी कायदा याची प्रभावी अंमलबजावणी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे साधन आहे.
– प्राचार्या सविता शेटे, बीड.
संपर्क : 9422243236