तीन मुलांची आई असलेल्या शांताबाईचे पती मारुती यांचा खून झाला तो २००६ मध्ये. गोरख व सिकंदर या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. २०१२ मध्ये हे दोघेही आरोपी कोर्टाने निर्दोष सोडले.
शांताबाई मारूती शिंदे वैदू समाजाची. आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडले असले तरीही भारतीय न्यायव्यवस्थेत समांतर न्याय व्यवस्था उभी करणाऱ्या जात पंचाचे मात्र समाधान होत नाही. त्यांनी शांताबाई, गोरख व सिकंदर यांचे विरोधात पुन्हा फर्मान काढले. एप्रिल २०१२ मध्ये लोणी (ता. रहाता) येथे जातपंचायत बसली. शांताबाई व अन्य दोघांनी कोपरगावचे देवीचे मंदिरात यायचे ठरले. देवीचे मंदिरात शांताबाईस संपूर्ण नग्न होऊन आंघोळ करून देवीचे दर्शन घेणेस सांगितले. त्यानंतर शांताबाई, गोरख व सिकंदर या तिघानांही प्रत्येकी मुठभर तांदूळ चावणेस दिले. तिघांचेही तोंडातील तांदूळ थुंकण्यास सांगितले. तांदूळ कोरडे निघाले म्हणून तिघांनाही मारुतीच्या खुनाबाबत दोषी ठरविण्यात आले. लोणीला पुन्हा जात पंचायत बसली. शांताबाई व या दोघांनाही प्रत्येकी दोन लाख तीस हजार दंड आकारणेत आला व वसूलही केला गेला.
सध्या शांताबाईचा मोठा मुलगा सुनिल २३ वर्षांचा, अविनाश २१ वर्षांचा तर निलेश १९ वर्षाचा आहे. मुलांच्या लग्नासाठी शांताबाई मुली शोधायला लागल्यावर पंचांनी जातीत त्यांच्या विरोधात फर्मान काढले. दि. १०/१२/२०१४ रोजी मी, शांताबाई व तिचे मुलांसह एस. पी. अहमदनगर यांचीही भेट घेतली. त्यांनीही ‘पाहू, करतो’ असे, उत्तर दिले. अद्याप आरोपी, पंच मोकाटच आहेत. दरम्यानचे काळात वैदू समाजातील अनेक लोक भेटायला आले. तुम्ही खूप चांगले काम करत आहात, असेही म्हणाले. तसेच पंचाच्या अनेक करामती, स्त्रियांचे लैंगिक शोषण, समाजाची आर्थिक पिळवणूक, गुंडगिरी, दहशत, बेकायदेशीर धंदे याबद्दल भरभरून बोलले. परंतू पंचाच्या दहशतीमुळे उघड-उघड समोर घेऊन बोलण्यास मात्र कुणीही तयार नाही. भारतीय न्यायव्यवस्थेत समांतर न्याय व्यवस्था उभी करू पहाणे, व समाजात दहशत निर्माण करणे, तेढ निर्माण करणे, समाजाची पिळवणूक करणे हे प्रकार कधी थांबणार? खरं तर जातपंचायती विरोधात स्वतंत्र कायद्याची गरज आहे. सर्व पंच हे आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत. त्यांचे राजकीय लागेबांधेही आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे पंचाविरोधात कारवाई होत नाही असे अनेक प्रकरणांमध्ये लक्षात आले. जातपंचायती विरोधात कायदा करा! ही भुमिका घेऊनच आता लढावे लागेल.
अॅड. रंजना पगार-गवांदे, संगमनेर
संपर्क : मोबा. ९८५०४९१६११