Categories
परिषद

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा औरंगाबाद येथे अंनिसची युवा संकल्प परिषद

जानेवारी - २०१५

ऑगस्ट २०१४ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटीत कामाला २५ वर्षे पूर्ण झाली. म्हणजे अं.नि.स. आता तरुण झाली आहे. संघटनेचे वय कितीही वाढले तरी संघटनेतल्या कार्यकर्त्यांचे वय मात्र वाढून चालत नाही. केवळ म्हाताऱ्या माणसांची संघटना असे संघटनेचे स्वरूप राहिले तर ती संघटना आणि तिची चळवळ लवकरच संपते. चळवळीतील वयस्कर कार्यकर्त्यांच्या जागी नवे तरुण कार्यकर्ते येणे आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे ही बाब संघटनेच्या आणि चळवळीच्या वाढीसाठी अत्यावश्यक असते. म्हणूनच डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरुवातीपासूनच चळवळ तरुणांच्या हातात राहील आणि तरुण नेतृत्व घडेल यासाठी प्रयत्न केले. योग्य वेळ येताच स्वतःचे पदही सोडले आणि लायक तरुण व्यक्तीकडे सोपवले. त्यामुळेच डॉक्टरांच्या खुनानंतरही अं.नि.स.ची चळवळ थांबली नाही, कोलमडली नाही. पूर्वी इतक्याच सक्षमतेने ती चालू राहिली. यापुढेही अं.नि.स.मध्ये नवीन तरुण कार्यकर्ते येत राहतील यासाठी अं.नि.स.चा युवा विभाग कृतीशील झाला आहे. याची सुरुवात २०१४ च्या मे महिन्यातील युवा संवाद शिबिरापासून झाली. यातील पुढचा टप्पा म्हणजे औरंगाबाद येथे पार पडलेली युवक परिषद. १ नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस. यापुढे अं.नि.स. हा दिवस युवा संकल्प दिन’ म्हणून साजरा करणार आहे. या वर्षी ‘अंधश्रद्धा निर्मुलनासाठी युवा’ हा विषय घेऊन पहिली युवा परिषद औरंगाबाद येथे १ व २ नोव्हेंबर २०१४ रोजी पार पडली.

उद्घाटन सत्र :
औरंगाबाद येथील सीमंत सभागृहात सकाळी साडे दहा वाजता परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की डॉक्टरांना त्यांच्या जन्मदिवसाचे काही अप्रूप नव्हते. परंतु त्यांच्या खुनानंतर त्यांचा जन्मदिवस त्यांच्या कामाला पुढे नेणारा आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित निर्धार करायला लावणारा दिवस म्हणून पाळण्याचे आपण ठरवले आहे. गेल्या चौदा महिन्यात अं.नि.स.च्या तरुणाईने ज्या पद्धतीने काम पुढे नेले आहे. त्यावरून असे दिसते की डॉक्टरांनी युवकांच्यात केलेली गुंतवणूक वाया गेलेली नाही. परिषदेचे उद्घाटन ‘फँड्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी नारळावर पाण्याचे थेंब सोडून अग्नी पेटवून परिषदेचे उद्घाटन केले. या उद्घाटन सत्राच्या प्रमुख पाहुण्या वर्षा ठाकूर (मुख्याधिकारी, म्हाडा, औरंगाबाद) होत्या व अविनाश पाटील (कार्याध्यक्ष, म.अं.नि.स.) हे अध्यक्ष होते. यावेळी विचारपिठावर डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, माधव बावगे, संजय बनसोडे, शहाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात नागराज मंजुळे म्हणाले की नारळावर पाणी सोडल्यावर नारळाने पेट घेतला. कारण नारळामध्ये सोडियम धातू लपवून ठेवला होता. लपवलेला सोडियम धातू ज्याप्रमाणे पाण्याच्या संपर्कात आल्यावर पेट घेतो, त्याप्रमाणे आज माणसांच्या मनांमध्ये स्फोटक विष पेरले जातेय आणि ते समाजाच्या काही घटकांच्या संपर्कात आल्यावर पेट घेतेय. पालकांच्यावर प्रेम करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्या विचारांना विरोध करणे ही वेगळी गोष्ट आहे. युवावर्गाने पालकांच्या प्रेमापोटी त्यांचे विचार मान्य केलेच पाहिजेत असे नाही.
प्रमुख पाहुण्या मा. वर्षा ठाकूर यांनी आपल्या भाषणात त्यांना प्रशासकीय सेवेत अंधश्रद्धेला तोंड द्यावे लागलेले प्रसंग सांगितले. त्या म्हणाल्या की १९९७ साली पैठणच्या तहसीलदार पदाचा चार्ज शनी अमावास्येला घ्यावा लागला. तिथे राहायला जी सरकारी खोली मिळाली तिच्याबद्दल महिनाभराने काही अफवा ऐकायला मिळाल्या. तिथे पूर्वी पोस्टमार्टेम केले जायचे, तिथे २-३ आत्महत्या झाल्या आहेत. तसेच रात्री हिरव्या साडीतील बाई येते व तिच्या पैंजण आणि बांगड्यांचा आवाज येतो असे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे मानसिकता कमजोर होत गेली आणि खरोखरच असे आवाज ऐकू येऊ लागले. पण सखोल विचार केल्यावर यामागच्या मानसिक कारणांचा शोध लागला. प्रबोधनासाठी सुद्धा आधुनिक माध्यमे वापरायला हवीत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतना अविनाश पाटील यांनी सांगितले की युवकांनी या परिषदेत मिळणारे विचारांचे बीज आपापल्या परिसरात नेऊन रुजवावे. अडचणी आणि संकटे अनेक आहेत. परंतु रडत बसणे हे तारुण्याचे लक्षण नाही हे लक्षात घ्यावे. पुढील दोन दशके भारताचे भवितव्य घडवणे युवकांच्या हातात आहे. म्हणून युवकांना दृष्टीकोन देणे, त्यांचा क्षमताविकास करणे, त्यांचे शक्तीसंवर्धन करणे यासाठी अंनिस भविष्यात काम करेल.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अजित खोजरे यांनी केले. तर आभार प्रा. क्षमा खोब्रागडे यांनी मानले.

पुरस्कार वितरण :
सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी अं.नि.स. काही पुरस्कार देते. अं.नि.स. ने सुधाकर आठल्ये यांच्या देणगीतून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यकर्ता पुरस्कार’ आणि साथी निळूभाऊ फुले सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रेरणा पुरस्कार’ असे दोन पुरस्कार नव्यानेच सुरु केले आहेत. हे दोन्ही पुरस्कार या सत्रात दिले गेले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यकर्ता पुरस्कारासाठी यावर्षी अहमदनगरच्या नागेश कुसळे आणि नाशिकच्या कृष्णा चांदगुडे यांची निवड करण्यात आली होती. तर पहिल्या साथी निळूभाऊ फुले सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रेरणा पुरस्कारासाठी पुरंदर तालुक्यातील राजू इनामदार यांची निवड करण्यात आली होती. नागेश कुसळे यांना डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला. त्यांच्या मानपत्राचे वाचन अ‍ॅॅड. मनीषा महाजन यांनी केले. अं.नि.स.चे जातपंचायतीला मूठमाती’ अभियान राज्यभर राबवणारे आणि अनेक जातपंचायती बंद करण्यासाठी पुढाकार घेतलेले कृष्णा चांदगुडे यांना नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुरस्कार दिला. त्यांच्या मानपत्राचे वाचन सम्यक विमल मसू यांनी केले. नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांच्या सोबत महाराष्ट्र अं.नि.स. लोकरंगमंचाच्या माध्यमातून रिंगणनाट्याच्या २० टीम उभ्या करण्यात मोलाचा वाटा उचलणारे राजू इनामदार यांना साथी निळूभाऊ फुले सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रेरणा पुरस्कार नागराज मंजुळे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांच्या मानपत्राचे वाचन कृतार्थ शेवगावकर यांनी केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कृष्णा चांदगुडे यांनी त्यांचा जातपंचायातीशी लढा कसा सुरु झाला ते सांगितले. जातपंचायतीच्या बाबतीतील अंगावर शहारे आणणाऱ्या घटना सांगितल्या. ते म्हणाले की महाराष्ट्र अं.नि.स. जात हीच एक अंधश्रद्धा आहे असे मानते. आणि जातपंचायतीच्या प्रथा- परंपरा मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. म्हणून अं.नि.स. जातपंचायतीच्या विरोधात संघर्ष करत आहे.

राजू इनामदार म्हणाले की माझ्या कला जीवनात ज्यांच्या आवाजाची मिमिक्री केली त्या निळूभाऊ फुलेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद होतोय. आजूबाजूला कॉर्पोरेट, प्रसारमाध्यमे, धर्मांधता, जातीयता यांची गटारे आहेत. आणि त्यांत माणसे गुदमरत आहेत. अं.नि.स. सारख्या बागा या समाजात फार कमी आहेत. आपण अशा बागा फुलवत जाऊया असे आवाहनही त्यांनी जमलेल्या युवकांना केले.
डॉ.शैला दाभोलकर पुरस्कार विजेत्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून म्हणाल्या की, आपली वाटचाल धडासाकडून निर्भयतेकडे असायला हवी पुढे त्या म्हणाल्या की, कार्यकर्ता ही जगातील सर्वात मोठी पदवी आहे आणि कार्यकर्त्याला त्याचा सार्थ अभिमान असायला हवा.
पुरस्कार वितरणाच्या या सत्राचे आभार निलेश कुडाळकर यांनी मानले.

बीजभाषण :
भोजन अवकाशानंतर महाराष्ट्र अं. नि. स. च्या युवा विभागाचे कार्यवाह कृष्णात कोरे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी? कशा प्रकारे ?’ या विषयावर मुलभूत मांडणी करणारे बीजभाषण झाले. ते म्हणाले की अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारणभावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव. अंधश्रद्धा चिकित्सेला नकार देते. अघटिताची भीती, मोह यांमुळे अंधश्रद्धा वाढीस लागतात. अंधश्रध्दा या विकासविरोधी असतात. अंधश्रद्धेमुळे समाजाचा वेळ, पैसा चुकीच्या गोष्टींसाठी खर्च होतो. म्हणून आपली संघटना अंधश्रद्धा निर्मूलनाचा आग्रह धरते. अंधश्रद्धेतून आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होते. अशा अंधश्रद्धांविरुद्ध अं.नि.स. आपल्या चतुःसुत्रीच्या आधारे लढते. अं.नि.स.चे विसर्जित गणपती दान करा, निर्माल्याचे खत करा, होळीची पोळी दान करा, फटाकेमुक्त दिवाळी आदि उपक्रम आज समाजाने स्वीकारले आहेत. एके काळी अं.नि.स.च्या शनीशिंगणापूरच्या सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या भा.ज.पा.च्या महिला कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात महिलांना महालक्ष्मी मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन केले. हा अं.नि.स.चा विजयच आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाकडून विवेकवादाकडे अं.नि.स.चा प्रवास सुरु आहे. कार्यकर्ता असणाऱ्या युवकांनी आपले कुटुंब, करिअर यानंतर अं. नि. स. च्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
या सत्राचे अध्यक्ष मा. माधव बावगे हे होते. तुमचा भविष्यकाळ उज्वल व्हावा यासाठी डॉक्टरांची धडपड होती. याची जाण तुम्ही ठेवावी असे आवाहन माधव बावगे यांनी युवकांना केले.
एस. बी. गायकवाड यांनी या सत्राचे आभार मानले.

युवकांच्या गटचर्चा :
यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनातील अडथळे व पर्याय’ या विषयावर गटचर्चा झाली. राज्यभरातून आलेल्या युवकांचे सहा गट करण्यात आले होते. युवकांनी आपापल्या गटात चर्चा करून निष्कर्ष काढले. गटचर्चेनंतर अमित जोजारे, अक्षय धावडीकर, जावेद शहा, संतोष बाबळे, सूरज बायस, सुरेश वानखेडे या युवकांनी आपल्या गटाच्या गटचर्चेचा अहवाल सादर केला. युवकांना करावयाच्या कामाचे आणि त्यासाठी योजावयाच्या कृतीकार्यक्रमाचे योग्य भान येण्यास या गटचर्चेमुळे निश्चितच मदत झाली. गटचर्चेच्या अहवाल सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी कुलकर्णी हिने केले.
रिंगणनाट्य :
संध्याकाळी ६ तर ८:३० या वेळेत महाराष्ट्र अं.नि.स. लोकरंगमंचाद्वारा निर्मित रिंगण नाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांमध्ये ऐसे कैसे झाले भोंदू (पुणे गट), अस्लम बाबा (पिंपरी चिंचवड गट), आंतरजातीय विवाह (लातूर गट) व सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम (इस्लामपूर गट) ही चार रिंगणनाट्ये सादर करण्यात आली. अंधश्रद्धेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
रात्री जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांनी आपले कलागुण सादर केले.

दुसरा दिवसः
२ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत सर्व कार्यकर्त्यांनी सफाईसाठी श्रमदान केले. या श्रमदानातून औरंगाबाद शहरातील एक वॉर्ड झाडून स्वच्छ केला.
९ वाजता चळवळीच्या स्फुर्तीगीतांनी कार्यक्रमांची सुरुवात झाली.

परिसंवाद :
९:३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा संकल्प’ या विषयावरील परिसंवादाला सुरुवात झाली. या सुरुवातीला ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या विषयावर वाघेश साळुंखे यांनी आपले विचार मांडले. त्यामध्ये त्यांनी व्यसनांची सुरुवात, वाढ, दुष्परिणाम, उपाय – उपचार व अं.नि.स.ची याबाबतची भूमिका या मुद्द्यांची चर्चा केली. व्यसन बंद करेल असे कोणतेही खात्रीशीर औषध उपलब्ध नाही. व्यसनाची इच्छा काही प्रमाणत कमी करणारी औषधे उपलब्ध आहेत. व्यसन सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तीला औषधांच्या बरोबरीने काही कौशल्येही शिकवावी लागतात. अशी कौशल्ये व्यसनमुक्तीचा दावा करणाऱ्या बुवा-बाबांकडून शिकवली जात नाहीत. त्यामुळे त्यांचे व्यसनमुक्तीचे उपचार परिणामकारक ठरत नाहीत. अंधश्रद्धांप्रमाणेच व्यसने सुद्धा माणसाचा विवेक नाहीसा करतात. त्यामुळे अं.नि.स.चा व्यसनांना विरोध आहे. शासनाने महसूल विभागाला मादक पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचे लक्ष्य टप्प्याटप्प्याने कमी करत न्यावे. वेगवेगळ्या माध्यमांतून व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा थांबवली पाहिजे. त्यासाठी युवकांनी चला व्यसनाला बदनाम करूया’ मोहिमेत भाग घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर कुणाल शिरसाठे यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तीच्या दिसण्यावरून ती व्यक्ती आवडत असेल तर ते प्रेम नव्हे. यातून खरे प्रेम फुलण्याची शक्यता कमी असते. जी व्यक्ती हुंडा घेणार नाही त्याच्याशीच विवाह करण्याचा निश्चय मुलींनी करावा. जात न पाहता लग्न करण्याचा निश्चय करावा. जबाबदारी घेण्याची तयारी असेल तरच लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. जोडीदाराच्या नोकरी, सांपत्तिक स्थिती, व्यसनाधीनता, आरोग्य या बाबी नीट तपासून घ्याव्यात. आवडीनिवडी, स्वभावगुण-दोष यांबाबत दोघांची कितपत तडजोडीची तयारी आहे, याचा विचार करावा.
विनायक सावळे यांनी ‘विवेकी व्यक्तिमत्व विकास’ या विषयाची प्रभावी मांडणी केली. ते म्हणाले की आपण एखाद्या प्रसंगाला कशी प्रतिक्रिया देतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरते. प्रतिक्रियेची बालक वृत्ती, पालक वृत्ती व प्रौढ वृत्ती असे तीन प्रकार पडतात. लोकशाहीला समृध्द करणारा नागरिक तयार करणे याचा अर्थ प्रौढ वृत्ती वाढवणे. प्रौढ वृत्ती वाढण्यासाठी माणसाच्या मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाचा(निओ कॉर्टेक्सचा वापर वाढवायला हवा. भावनेच्या भरात निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कोणत्याही ताणतणावावर आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे हत्या हाही कोणत्याच समस्येवर उपाय होऊ शकत नाही. मनाच्या अशा व्यायामाने माणसाचे विवेकी व्यक्तिमत्व आकाराला येते. जीवनाचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी रोज प्रयत्नशील राहिले पाहिजे असे विनायक सावळे यांनी सांगितले.
परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आभार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंगेश घोडके यांनी मानले.

समारोप :
यानंतर या दीड दिवशीय परिषदेच्या समारोपाचा कार्यक्रम सुरु झाला. यात सुरुवातीला या परिषदेतून व्यक्त झालेले संकल्प मांडले गेले. अवधूत कांबळे, मनिषा महाजन, बाबा हलकुडे, खंडू घोडे, निलेश राऊत यांनी या संकल्पांचे वाचन केले. नंतर युवा विभागाचे कार्यवाह कृष्णात कोरे यांनी परिषदेचा अहवाल थोडक्यात सादर केला. त्यानंतर कु.गंगासागर बीजे, महादेव घोरपडे, रविंद्र अवचार, सागर सूर्यवंशी या युवा कार्यकर्त्यांनी परिषदेबाबतची आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. डी. आर. माने (कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) यांनी अं.नि.स.च्या कामाचे कौतुक केले. आपण डॉ. नरेंद्र दाभोलकर व माधव बावगे यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच डॉक्टरांनी मराठवाड्यात केलेल्या कामांची आठवणही सांगितली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ राजकीय नेते डॉ. भालचंद्र कांगो आपल्या भाषणात म्हणाले की हल्ली शिक्षणाचा, आधुनिकीकरणाचा खूप प्रसार झाला आहे. अनेक चांगल्या गोष्टी आल्या आहेत. परंतु आधुनिक विचारला विरोध करणाऱ्या शक्तीही वाढल्या आहेत. अलीकडे समाजबदलासाठी बोलणेही अवघड झाले आहे. तरूण चांगल्या कामाला प्रतिसाद देतात. परंतु बदलत्या राजकारणाचा विचार करणेही आवश्यक आहे. नेहरू – आंबेडकर यांच्याकडे आयकॉन म्हणून बघताना राज्यघटना डोळ्यांसमोर येते. म्हणून त्यांना शह देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना हायजॅक’ केले जात आहे. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांना राज्यघटना मान्य होती. त्यांनी रा. स्व. संघाला गांधीहत्येसाठी जबाबदार धरले होते, हे आपण लोकांना सांगणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म.गांधी यांचे अनेक प्रश्नांवर मतभेद होते, पण आंतरजातीय विवाहाबाबत मात्र एकमत होते. अं.नि.स.ने ही आंतरजातीय विवाहाची चळवळ वाढवावी. सुशासनाचे वचन देऊन सत्तेवर आलेल्या भा.ज.पा. सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून आपल्या सुशासनाचा परिचय करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
अध्यक्षीय भाषण करताना मा. अविनाश पाटील म्हणाले की, या परिषदेतून विचारांचे बाळकडू देण्याचा प्रयत्न केला आहे. संघटना आणि चळवळ समर्थपणे पुढे नेण्यास युवा कार्यकर्ते तयार आहेत हा आशावाद या परिषदेतून मिळाला. तरीही समाजवास्तव विसरून चालणार नाही. वंचितांच्यावरील अन्याय-अत्याचार सुरूच आहेत. राजकारण उलट्या दिशेने चालले आहे. जाती-धर्म, धर्मश्रद्धा यांचा राजकारणासाठी कच्चा माल म्हणून वापर केला जातोय. चळवळीबाहेर उभा राहून चळवळीची पाठराखण करणारा मध्यमवर्ग आता राहिला नाही. या वर्गाला आता अधिकाधिक श्रीमंत होण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे वाटचाल खडतर आहेच. परंतु आपल्याला भारतीय संविधान आणि समाजसुधारकांचा वारसा यांचे पाठबळ आहे. त्या जोरावर आपण वाटचाल करणार आहोत. बुवाबाजीचा भांडाफोड, चमत्काराला-ज्योतिषी- वास्तुशास्त्र्यांना आव्हान देणे, भूत, भानामती इ. जुन्या अंधश्रद्धांबाबत प्रबोधन सुरु राहीलच. परंतु पुढील दशकाचा कार्यक्रम म्हणून आणखी चार मुद्द्यांवर अं.नि.स. काम करणार आहे. ते म्हणजे मानसिक आजार, जातवास्तवाला आव्हान देणे, अध्यात्मिक संप्रदायांना आव्हान देणे आणि भारतीय संविधानाचा मूल्यआशय व त्याबाबतची बांधिलकी नागरिकांपर्यंत पोचवणे. त्यासाठी या परिषदेतून प्रेरणा घेऊन युवकांनी स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन अविनाश पाटील यांनी केले.
समारोप सत्राचे सूत्रसंचालन योगेश कुदळे यांनी केले. शहाजी भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
समारोप सत्र संपल्यानंतर ‘हम होंगे कामयाब’ या गीताने परिषदेची सांगता झाली.
राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शहाजी भोसले, कृष्णात कोरे (राज्य कार्यवाह, युवा विभाग, म.अं.नि.स.) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद, शहादा येथील
कार्यकर्त्यांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
या परिषदेतून महाराष्ट्र अं.नि.स.च्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्रातील युवकांच्या समोर कृतिशीलतेचा एक विधायक पर्याय म्हणून महाराष्ट्र म.अं.नि.स. पुढे येईल असा विश्वास या परिषदेने दिला असे निश्चितपणे म्हणता येईल.

वाघेश साळुंखे, विटा
संपर्क : मोबा. ९९६०६०६०४४

युवा संकल्प

अंनिसच्या औरंगाबाद येथील राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेत खालील संकल्प सादर केले-
१) शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी व त्यामागील हस्तक यांचा तपास लागेपर्यंत चिकाटीने पाठपुरावा करणे.

२) नगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा येथील अमानुष दलित हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आग्रही व कृतीशील राहणे.

३) शासनाच्या व्यसनाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाचा विरोध व व्यसनाला बदनाम करणे.

४) जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार, प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही राहणे.

वेधक-वेचक

  • प्रत्येक सत्रासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत फुले किंवा हार-तुरे न देता भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन करण्यात आले.
  • राजू इनामदार यांनी सांगितले की अतुल पेठेंच्या शिबिरात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी स्वतः सर्व कृती मनापासून केल्या होत्या. आम्ही शिबिरात डॉक्टरांना नाचतानाही पहिले असे त्यांनी सांगितले.
  • २ नोव्हेंबर रोजी श्रमदानातून शहरात स्वच्छता केल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की माझ्या ३५ वर्षाच्या सेवेत असे काम करणारे लोक पहिल्यांदाच पाहिले. अनेकजण येतात आणि फोटो काढण्यापुरते झाडू हातात घेतात. तुमच्या कार्यकर्त्यांनी मात्र खरोखर मनापासून काम करून एक संपूर्ण वॉर्ड स्वच्छ केला.
  • १ नोव्हेंबर रोजी इस्लामपूर शाखेच्या सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकाचा प्रयोग औरंगाबाद येथील हर्सल कारागृहात झाला. नाटक संपल्यावर कारागृहातील कैदीही भावूक झाले.
  • प्रत्येक सत्राची सुरुवात चळवळीची गाणी गाऊन होत होती.
  • जितके शिक्षण वाढत आहे, तितकीच कट्टरता वाढत आहे. – नागराज मंजुळे
  • महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेतल्याशिवाय लिहिता येणार नाही. – राजू इनामदार
  • शासकीय कार्यालयात व बसमध्ये देवाचे फोटो लावायचे नाहीत, शासकीय कार्यालयात सत्यनारायण घालायचा नाही या मागणीसाठी आम्ही आंदोलने केली तरी आम्हाला लोक मारायचे नाहीत, उलट प्रतिसाद द्यायचे. – भालचंद्र कांगो
  • डार्विनचा सिद्धांत हा बाजारपेठेचा सिद्धांत नाही, उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. त्यामुळे त्याचा आधार घेऊन खुल्या स्पर्धेचे समर्थन करणे चुकीचे आहे.- भालचंद्र कांगो
  • राजकारणाकडे दुर्लक्ष करून समाजबदलाची लढाई लढणे अशक्य आहे. – भालचंद्र कांगो
  • आमच्या संघटनेत तीन गोष्टी आवश्यक होत्या- १. रक्तदान २ – श्रमदान ३ – आंतरजातीय विवाह – भालचंद्र कांगो
  • जगामध्ये भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेले आणि वैचारिकदृष्ट्या व्यापक भूमिका घेऊन काम करणारे म. अं.नि.स. हे एकमेव संघटन आहे. -अविनाश पाटील.