Categories
कव्हर स्टोरी

रिंगणनाट्यातून दाभोलकरांना अभिवादन!

ऑक्टोबर - २०१४

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव आठवले की, त्यांचे अनेक पैलू नजरपटलावरून पुढे सरकतात. त्यापैकी महत्वाचा एक पैलू म्हणजे विधायक कृतीशिलता. अंनिसची कृतीशिलता डॉक्टरांनी अनेक छोट्या-मोठ्या विधायक उपक्रमातून महाराष्ट्राला दाखवून दिली. परंतु डॉक्टर नसताना ही कृतीशिलता टिकवणे-वाढवणे हे आव्हान असताना, कार्यकर्त्यांनी वर्षभर हे आव्हान स्वीकारून ते यशस्वी केले. या वर्षभरातील ‘रिंगणनाट्य’ हे तरूणांच्या-कार्यकर्त्यांच्या उर्जेला नवीन क्षेत्र देण्याचा आणि समाजातील दु:खाला कलेच्या माध्यमातून थेट भिडण्याचा असाच एक उपक्रम.

प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे आणि अंनिसचा साथीदार योगेश कुदळे यांच्या प्रयत्नामुळे हा उपक्रम प्रत्यक्ष आकाराला आला, फुलला आणि प्रचंड यशस्वी झाला. कल्पना अशी की, अंनिस शाखेच्या मदतीने स्थानिक तरूणांचे कार्यकर्त्यांच्या सहाय्याने गट तयार करायचे. त्यांची अतुल सरांनी कार्यशाळा घ्यायची आणि त्यातून तयार होणारे नाट्य हे स्थानिक पातळीवर सादर करायचे आणि 20 ऑगस्टला पुण्यात सलग या नाटकांचे प्रयोग करायचे. या नवीन प्रयोगाला अतुल सरांनी नाव दिले ‘अंनिस लोकरंगमंच रिंगण नाटक’ यात नाटक आलं, करणारी अंनिस आली, ज्यांच्यासाठी ती लोकं आली, जिथं करायचं ते रंगमंच आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार्वाकापासून डॉ. दाभोलकरांपर्यंतच प्रबोधनाचं न तुटणारं रिंगण आलं.

नाटकाच्या कार्यशाळा जोमाने सुरू झाल्या. अतुल सरांच्या सोबत राजू इनामदार आणि अश्विन फडके यांनी दगडात सुंदर शिल्प निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सांगली, कोल्हापूर, पुणे ते जळगावपर्यंत कार्यशाळा पार पडल्या. 50 वर्षांच्या अतुल सरांची ऊर्जा 25 वर्षांच्या तरूणांना लाजवणारी होती. कार्यशाळेत अनेक मरगळलेल्या जीवांना हीच ऊर्जा लाजवून पुन्हा कामाला लावत होती.

कार्यशाळेत जवळपास सर्वचजण नाटकाच्या क्षेत्रात नवीन होते. बहुतांशी अंनिसचेच जुने-नवे कार्यकर्ते होते. कार्यशाळेतच गट तयार होऊन नाटकाची स्क्रिप्ट, रोल सर्वच तयार होत होतं. काही महत्वाचे टिप्स अतुल सर आणि सहकारी देत होते. दुरूस्त्या सुचवून उत्तमतेकडे प्रवास करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु मुख्यत: नाटक हे त्यातील सहभागी कार्यकर्त्यांचीच नवनिर्मिती होती आणि या नवनिर्मितीचा-सृजनाचा आनंद न मोजता येणारा होता. अभिनेते-लेखक-दिग्दर्शक सारे गटातीलच.

कार्यशाळेनंतर प्रत्यक्ष तालीम करणे आणि ते नाटक सादर करणे हे एक आव्हान होते. वीस गटातील 250 कार्यकर्त्यांपैकी प्रत्यक्ष 16 गटातील 200 कार्यकर्त्यांनी नाटक 20 ऑगस्ट रोजी पुणे येथील मनोहर मंगल कार्यालयात सादर केले. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेधदिन म्हणून 20 ऑगस्ट रोजी सकाळी मोर्चा आणि दुपारपासून डॉ. दाभोलकरांना अभिवादन म्हणून सलग 6 तासांचा 200 स्थानिक कलाकारांचे रिंगट-नाट्याचे मनोहर मंगल कार्यालयात नियोजन होते. तत्पूर्वीच्या सातारा येथील अंतिम रिहर्सलला अतुल सरांना त्यांच्या तब्बेतीच्या त्रासामुळे येता आलं नाही. सातार्‍यात प्रत्येकाला त्याची उणीव जाणवत होती. काळजी वाटत होती. परंतु फोनवरून त्यांनी प्रत्येकाला चिअरअप केलंच.

पुण्यातील महर्षी शिंदे पुलावरून निघालेल्या मोर्चानंतर महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून आलेल्या 200 स्थानिक कलाकारांनी वेगवेगळ्या ज्वलंत विषयावर तयार केलेल्या सलग 6 तासांच्या नाटकाच्या अभिनव प्रयोगाला सुरवात प्रसिद्ध रंगकर्मी आणि सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते नसरूद्दिन शहा यांच्या हस्ते घंटा वाजवून सुरवात झाली. साधारणपणे प्रत्येक नाटकाच्या 3 घंटा वाजवून सुरवात केली जाते परंतु ‘अंनिस लोकरंगमंच रिंगण नाटकाची’ सुरवात 4 घंटा वाजवून झाली. पहिली घंटा बुद्धिवंतांना जागे करण्यासाठी व लेखकांना हातात लेखणी धरण्यासाठी दुसरी घंटा मराठी रंगभुमीतील कलाकारांनी उठावे यासाठी. तिसरी घंटा वंचीत-पिडीत व स्त्रियांना जागे करण्यासाठी व चौथी घंटा मारेकर्‍यांना हा इशारा देण्यासाठी की तुमची एक गोळी तर आमचे एक गाणे-एक नाटक-एक कादंबरी असणार आहे हे सांगण्यासाठी.

नसरूद्दिन शहा सोबत ‘फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ असा विश्वास देण्यासाठी साहित्य-मिडिया-चित्रपट क्षेत्रातील सेलेब्रिटी आणि चळवळीतील ज्येष्ठ साथी उपस्थित होते. यामध्ये रत्ना पाठक, सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, अमोल पालेकर, सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, श्रीराम लागू, आनंद पटवर्धन, आशिष खेतान, प्रा.सदानंद मोरे, अनंत दिक्षीत, सुभाष वारे, ओंकार गोवर्धन, अलोक राजवाडे, पर्ण पेठे, मकरंद साठे, चित्रा पालेकर, मुक्ता मनोहर, विद्या बाळ, बाबा आढाव, उल्का महाजन इ.उपस्थित होते.

पुण्याच्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या दमदार नाटकाने ‘रिंगण नाट्याला’ सुरवात झाली. गाणी, संगीत, दमदार संवाद, उत्कृष्ट अभिनव आणि कलाकारांचा ताळमेळ इ.मुळे नाटक किती परिणाम करू शकते. याची प्रचितीच या नाटकामुळे येत होती. शहरी आणि आध्यात्मिक बुवाबाजीवर 350 वर्षांपूर्वीचा तुकोबांचा आसूड आजदेखील कसा लागू होतो याची सुंदर मांडणी या नाटकातून केली गेली.

कर्नाटकच्या अस्लमबाबाने कर्नाटकसह महाराष्ट्राला अंनिसने हस्तक्षेप करूपर्यंत कसे मजबूत लुटले. अगतिकतेमुळे माणूस अंधश्रद्धाळू कसा बनतो याचे उत्तम सादरीकरण पिंपरी चिंचवड गटाने ‘बोटाने शस्त्रक्रिया’ या नाटकातून केले.

ज्योतिषी-भविष्याच्या नावावर आजदेखील आपण कसे गुलाम होत आहोत याची मांडणी मोहोळ गटाने ‘ज्योतिषी-भविष्य’ या नाटकातून केली.

हास्य-टाळ्या-आश्चर्य-वेदना-करूणा अशा अनेक भावरसाने उपस्थित प्रेक्षकवर्ग न्हाऊन निघत होता. कलाकारांना दाद देत होता. प्रोत्साहन देत देत नाटके पुढे सरकत होती.

अंधश्रद्धेतून सर्वसामान्यांचं होणारं शोषण हे किती भयानक असतं हे आपण जाणतोच. त्याची विविध प्रकरणे प्रसार माध्यमातून आणि अंनिसच्या वार्तापत्रातून उघडकीस येत असतातच परंतु या अंधश्रद्धेची बळी स्त्री असेल आणि त्यात ती मतीमंद असेल तर काय घडतं? याचं सादरीकरण सोलापूर गटानं ‘मतीमंद मुलगी आणि शोषण’ या नाटकातून केलं. मतीमंदाच्या आधारे स्त्रीचं शोषण आणि समाजाचं शोषण असं दुहेरी शोषण घडतं.

वर्षानुवर्षे चालू असणार्‍या डाकीण प्रथेवर सर्वप्रथम प्रभावीपणे प्रकाश टाकला तो अंनिसने. फक्त प्रकाश टाकून ती थांबली नाही तर त्याचे निर्मूलन करण्याची जबाबदारी कृतीशीलपणे उचलली. ‘डाकीण निर्मूलन’ हा विषय शहादा-तळोदा गटाने सादर करून आता डॉक्टरांच्यामुळे डाकीण निर्मूलनासाठी कायद्याचे बळ मिळणार असल्याने प्रथा बंद होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

डॉ.दाभोलकर नेहमी म्हणत, जात ही सर्वात खतरनाक अंधश्रद्धा आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘स्त्री ही जातीचे प्रवेशद्वार आहे’ म्हणूनच ज्यांचा जाती टिकवण्यातच हितसंबंध आहे ते आंतरजातीय विवाहाला प्राणपणाने विरोध करतात आणि आता तर ब्राम्हणी फॅसिझमच्या काळात आंतरधर्मीय विवाहाला ‘लव्ह-जिहाद’ नावाने विकृतीकरण-ध्रुवीकरण करण्यात येत आहे. जाती जातीत धर्मा-धर्मात सलोखा-एकोपा ज्यांना नको आहे द्वेष हाच ज्यांचा मुलाधार आहे त्यांनी याविरूद्ध मोहीम उघडली आहे. म्हणून अंनिस जाहीरपणे माणून बनण्यासाठी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन-पाठींबा-मदत देते ‘आंतरजातीय विवाह’ या विषयाचे सादरीकरण लातूर आणि भुसावळ-फैजपूर गटाने तर ‘आंतरधर्मीय विवाह’ या विषयाचे सादरीकरण कोल्हापूर ‘अ’ गटाने अत्यंत प्रभावीपणे केले. नाटकाची ताकद समाजबदलात किती महत्वपूर्ण असू शकते याची जाणीव वरील नाटक बघताना प्रत्येकाला होत होती. अत्यंत संवेदनशील विषयाची मांडणी तितक्याच संवेदनशीलपणे मनाला भिडत होती. नाटक संपताना अश्रू पुसण्यासाठी अनेक रूमाल डोळ्यांवर फिरत होते. हीच या नाटकांची पावती होती.

बुवाबाजी आणि हितसंबंध, बुवा आणि बाया यांचा परस्परसंबंध सिद्ध सत्य आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की, विवेक संपतो आणि विवेक नसणारा माणूस बुवाच्या हातातील कसा बाहुला होतो. परंतु प्रबोधनामुळे हाच माणूस पुन्हा ताळ्यावर येऊ शकतो याचं सादरीकरण तासगाव-आटपाडी गटानं ग्रामीण-खुमासदार शैलीत करून दाखवलं.

डॉक्टरांच्या बलिदानामुळे जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. या कायद्याची कलमं आणि त्याचा प्रत्यक्ष जनतेच्या जीवनाशी संबंध याचं जोशपूर्ण सादरीकरण सातार्‍याच्या तरूणाईनं ‘जादूटोणा विरोधी कायदा’ या गटानं केलं.

‘व्यसन आणि नैराश्य’ हे दोन 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वात मोठे रोग असतील असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. अंनिस ही ‘सावध ऐका पुढल्या हाका’ अशी पुढल्या हाका रोखणारी संघटना असल्याने गेल्या 3 वर्षांपासून मानसमित्र ही संकल्पना चालवते. या ‘मानसमित्राचे महत्व’ चाळीसगाव गटाने अधोरेखित केले.

‘भयमुक्त चित्त जेथे’ हे शिरगाव(जि.सिंधुदूर्ग) गटाचे नाटक विशेषत: कोकणातील अंधश्रद्धेवर भाष्य करणारे होते. भीतीतून अंधश्रद्धा निर्माण होतात. अजूनही आजारी पडल्यानंतर रूग्णाला दवाखान्यात न नेता भगताकडे नेलं जातं. याला प्रबोधन आणि कायद्यामुळे कसा पायबंद घालता येतो हे शिरगाव गटानं सादर केलं.

अविवाहित तरूणाचा अकाली मृत्यू झाला तर त्याचे लग्न रूईच्या झाडाशी लावण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात आजदेखील आहे. या प्रथेचा फोलपणा यामुळे कुटुंबाची होणारी फरफट इ. सादर करण्याचा प्रयत्न कोल्हापूर ‘ब’ गटाने ‘रूईशी लग्न – एक अंधश्रद्धा’ या नाटकात केला. विशेष म्हणजे एका स्त्री कार्यकर्तीच्याच घरातील हा मेलेल्याचा जिवंत अनुभव समाजासमोर त्यांनी मांडला.

डॉ.दाभोलकरांचा मारेकरी शोधण्यासाठी पुणे पोलीस प्रमुख गुलाबराव पोळांनी प्लँचेटचा पांचटपणा करून अख्ख्या महाराष्ट्र पोलिस कर्तृत्वालाच पोळण्याचा चावटपणा केला. हाच विषय घेऊन पोलीसातील अंधश्रद्धा आणि प्लँचेटचा पांचटपणा सोलापूर गटाने आपल्या ‘आधुनिक अंधश्रद्धा’ या नाटकातून मांडला.

इस्लामपूर आणि जळगाव विद्यापीठ गटाने प्रसंगोचित्त नाटके सादर केली. यामध्ये डॉ.दाभोलकरांच्या खुनावर भाष्य करण्यात आले होते. जळगाव विद्यापीठ गटाने ‘समाजसुधारकाचा खून’ या नाटकाद्वारे डॉ. दाभोलकरांचा खून म्हणजे एका समाज सुधारकाचा खून असून तो पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असल्याचा संदेश दिला.

अंनिस शाखा इस्लामपूर-महाराष्ट्रातील एक लिड शाखा. प्रबोधनाची विविध हत्यारे प्रभावीपणे वापरणारी गेल्या 15 वर्षांपासून सडकनाट्याचा प्रभावीपणे वापर प्रबोधनासाठी करणारी राज्यकार्यकारिणीतील 3 सदस्य याच शाखेतले. त्यामुळे इस्लामपूरकडे विशेष अपेक्षा या रिंगण नाटकात होती. त्यांनी ती खरी केली. आपल्या प्रसंगोचित्त ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाट्य सर्वात शेवटी सादर करून. डॉ. दाभोलकरांच्या खुनाला वर्ष होतेय अजून खुनी सापडत नाही ही वेदना आहेच परंतु डॉक्टरांचा विचार मरणार नाही, तो आम्ही मरू देणार नाही हा निर्धार यापेक्षा मोठा आहे.

डॉक्टरांचा खुनी कोण? हा प्रश्न विचारला जातोय. ज्या व्यवस्थेने तुकोबांना संपविले. ज्या व्यवस्थेने सॉक्रेटिसला विषाचा प्याला पाजला ती व्यवस्थाच त्यांची खुनी आहे. ती बहुजन समाजाने ओळखली पाहिजे. नाटक संपताना उपस्थितांच्या अश्रूंचा बांध आता फुटतोय की काय? रडण्याचा आक्रोश हॉलभर पसरतोय की काय? असे वाटत असतानाच, आता रडणार नाही लढणार! आणि ही जिद्द डॉक्टरांनीच आम्हाला दिली आहे असा आशावाद जोर धरू लागतो. सकाळी मोर्चातील लढेंगे-जितेंगेचा विश्वास आणि आता ‘संकटे दाही दिशा- जरी घावांनी विद्ध-तरी लढण्याची जिद्द’ हा आत्मविश्वास रिंगणनाटक संपता संपता द़ृढ होतो.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश भाई, शैलाताई-मुक्ता-हमीद, संजय बनसोडे, मिलिंद देशमुख, योगेश कुदळे, अतुल पेठे, राजू इनामदार, अश्विन फडके या सेनापतींच्या आघाडीमुळे आणि प्रत्यक्षातील समतेच्या युद्धातील 200 नौजवानामुळे ‘रिंगण नाटक’ नावाच्या नवीन लढाईला सुरवात झाली. तरूण-तरूणी, प्रौढ-वृद्ध या रिंगणात येत आहेत. आपापल्या परिने सहभाग देत आहेत. नाटकाचे प्रयोग कमी किंवा जास्त काहीतरी होतील. पण…. चार्वाक-तुकोबा, फुले-शाहू-आंबेडकर ते दाभोलकर ही परंपरा युवक गतीमान करतील. एका विवेकी समाजासाठी-निकोप भारतासाठी हे मात्र नक्की.

-फारूक गवंडी

संपर्क : 7875769563