Categories
निषेध

20 ऑगस्टला पुण्यात भव्य मोर्चा व निषेध सभा

ऑक्टोबर - २०१४

आम्ही प्रकाशबीजे, रूजवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या, रूळवीत चाललो॥
जे शिल्पकार सारे, येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी, जागवीत चाललो॥

हे अंनिस लोकरंगमंचाचे गीत सकाळी 7 वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकसाथ हजारो कार्यकर्तेगात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनास एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त राज्यातील हजारो कार्यकर्तेएकत्र येऊन डॉक्टरांना आदरांजली वाहत होते. त्यांना सामाजिक कार्यकर्ते, सिने, नाट्य कलावंतही साथ देत होते. चळवळीची विविध गाणी सादर करून डॉक्टरांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुलावरून भव्य मोर्चास सुरवात झाली. या मोर्च्यामध्ये डॉ.बाबा आढाव, सदानंद मोरे, सुभाष वारे, विद्याताई बाळ, सिनेअभिनेते नसरूद्दिन शहा, रत्ना पाठक-शहा, अमोल पालेकर, नागनाथ मुंजळे, सोनाली कुलकर्णी, संध्या गोखले, गिरीश कुलकर्णी, कॉ. मुक्ता मनोहर, कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. किरण मोघे, नितीन पवार, विलास वाघ, ज्येष्ठ पत्रकार अनंत दिक्षीत, संजय आवटे, आशिष खेतान, अतुल पेठे, भाई वैद्य, अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मिलिंद देशमुख, संजय बनसोडे, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर इ. मान्यवर सहभागी झाले होते. ‘आवाज दो-हम एक है।’ ‘फुले -शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ इ. घोषणा दिल्या जात होत्या. माणूस मारता येतो-विचार मारता येत नाही, विवेकाचा आवाज यापुढेही दुमदुमत ठेवू इ. आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. खुन्यांचा शोध न लावणार्‍या पुणे पोलिसांचा व शासनाचा कार्यकर्ते घोषणा देऊन धिक्कार करत होते. मोर्चा पुणे महानगरपालिकेच्या आवारातील महात्मा फुले यांचे पुतळ्याजवळ पोचल्यानंतर नसरूद्दिन शहा यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजाला पुढे नेणारा विचार दिला. त्यांची हत्या होणं ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्याहीपेक्षा संतापजनक म्हणजे एक वर्षानंतरही त्यांच्या खुन्यांचा शोध अजूनही लागला नाही. खरं तर सरकारसाठी ही मोठी शरमेची बाब आहे. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. मी आज यासाठीच मोर्चात सहभागी झालो आहे. इतकंच नव्हे तर डॉक्टरांचा विचार पुढे नेण्यासाठी जे जे म्हणून मला करता येणं शक्य आहे, ते ते मी करीत राहीन. विज्ञाननिष्ठ, विवेकवादी समाज घडविण्यासाठी मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. यानंतर डॉ.बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांचा ‘सत्य सर्वाचे आदिघर’ हा अखंड म्हटला. त्यानंतर मोर्चा पुढे अलका टॉकीज चौकातून म्हात्रे पूलमार्गे एरंडवणेत पोहचला. तेथील मनोहर मंगल कार्यालयात मोर्चाचा समारोप होऊन निषेध सभेची सुरवात झाली. या निषेध सभेत कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या की, आज पुणे मनपाच्या 500 सफाई कामगारांना अर्धा दिवस सुट्टी देऊन मोर्चात सहभागी करून घेतले आहे. कामगार चळवळीत फक्त कामगारांच्या पगारवाढीचा विचार करणेबरोबरच त्यांना पुरोगामी विचारसरणी देण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी अं.नि.स.ने कामगार, कष्टकरी यांना कार्यक्रम द्यायला हवा. यानंतर कॉ. किरण मोघे यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच खुनी न शोधणार्‍या शासनाचा तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त केला व त्यांच्या या धिक्कारास सभागृहाने टाळ्यांच्या गजरात साथ दिली. त्या पुढे म्हणाल्या की, आता आपली सर्व ताकद एकवटावी लागेल. कारण आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

यानंतर प्रा. सुभाष वारे यांनी आपल्या भाषणात राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जाणते राजे ‘आम्हाला एवढ्या जागा सोडा, तुम्ही एवढ्या जागा घ्या’ अशा जागावाटपाच्या चर्चेत दंग आहेत. त्यांना दाभोलकरांच्या खुन्यांना पकडण्यात रस नाही. डॉ. दाभोलकरांचे जाणे हे इतके मनाला लागले आहे की, मन कितीही विवेकी केले तरी भावनांना आवर घालणे अशक्य होत आहे. राज्य घटनेतील धर्मस्वातंत्र्याची मर्यादा हे कलम सर्वांपर्यंत पोचविणे आता गरजेचे झाले आहे. फँड्री चित्रपटाचे दिग्दर्शक नागनाथ मंजुळे म्हणाले की, हा देवाधर्माचा बाजार टिकावा म्हणून इथली व्यवस्था जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. तरूणांना दहीहंडी सारख्या धार्मिक उत्सवात गुंतवून त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. मी लहानपणापासून नास्तिकच आहे. प्रत्यक्ष चळवळीत नसलो तरी मी अंनिसचाच कार्यकर्ता आहे. फँड्रीतील जब्याच्या वडिलांना असलेल्या जटा सोडविण्यासाठी अंनिसची मदत हवी आहे.

आपल्या शेकडो रिक्षाचालकांसह मोर्चात सहभागी झालेले रिक्षा पंचायतीचे तरूण कार्यकर्ते नितीन पवार म्हणाले की, पुण्यातील रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षास लिंबू मिरची बांधणे बंद करून डॉक्टरांना आदरांजली वाहिली आहे. रिक्षा स्टॉपवर होणार्‍या सत्यनारायण पुजाही अलिकडे कमी होतांना दिसतात. दाभोलकरांचा विचार कष्टकर्‍यांमध्ये रूजविण्यासाठी आम्ही यापुढे प्रयत्न करू. ज्येष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले की, दाभोलकरांच्या खून तपासात प्लँचेटचा वापर केला गेला. यावर गृहमंत्री आर.आर.पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी अजूनही कारवाई का केली नाही? अजूनही पोलीस दलाला इंग्रज काळातलेच ट्रेनिंग दिले जाते. त्यांना मालमत्तासंबंधी घडलेले गुन्हे शोधण्याचे ट्रेनिंग दिले जाते. पोलिसांना सामाजिक जडणघडण, चळवळी इत्यादींबद्दलचे ट्रेनिंग दिले जात नाही. त्यामुळे पोलीस डॉ. दाभोलकरांच्या खुन्यास पकडू शकले नाहीत. त्यामुळे आता पोलिसांचे ट्रेनिंग बदलण्याची गरज आहे. नर्मदा व लवासा आंदोलनाच्या कार्यकर्त्या सुनीती सु.र. म्हणाल्या की, डॉक्टरांना आता आदरांजली नव्हे तर कार्यांजली वाहण्याची वेळ आली आहे. चळवळीने जागतिकीकरण, खाजगीकरण यांच्याविरोधात आता भूमिका घेणं गरजेचं आहे.

‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकाच्या संपादिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ उपस्थित मुलींना उद्देशून म्हणाल्या की, ‘तू बदलेगी तो ही, ये जमाना बदलेगा’ आम्ही सखी सार्‍याजणी आपल्या चळवळीच्या सोबत आहोत. दै. पुढारीचे संपादक संजय आवटे यांचे प्रेरणादायी भाषण झाले. ते म्हणाले की, ‘माणूस मारल्यानंतर विचार संपविता येतो’, ही सनातन्यांची अंधश्रद्धा डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर दूर झाली आहे. हत्येने विचार मारता येत नाही हे अंनिसने सिद्ध करून दाखविले आहे. दाभोलकरांचे विचार हे विरोधकांना घातक वाटत होते म्हणून त्यांना संपविले गेले. पण डॉक्टरांच्या समर्थकांना त्यांचे विचार महत्वाचे व आपले वाटणे गरजेचे झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले म्हणाले की, ‘डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत हिंदू कायदा झाला, परंतु डॉ. दाभोलकरांना ते भाग्य लाभले नाही. दलितांना मंदिरात प्रवेश देणारा कायदा लागू झाल्यानंतर स्वामी नारायण मंदिराने या विरूद्ध कोर्टात धाव घेतली व आम्ही हिंदू नाही त्यामुळे हा कायदा आम्हास लागू पडत नाही. अशी भूमिका घेतली. 1964 सालापर्यंत केस चालून स्वामी नारायण मंदिर दलितांना खुले करण्याचे आदेश दिले. दलितांना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा लागतो म्हणून आम्ही हिंदूच नाही म्हणणारे आज हिंदुत्वाचा जोरदारपणे पुरस्कार करतात हे अनाकलनीय आहे. डॉ. दाभोलकर हे माझे वैयक्तिक मित्र होते. त्यांचेनंतर चळवळीस जी मदत लागेल ती मी करण्याचे आश्वासन देतो.

प्लँचेट प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन करणारे दिल्लीतील पत्रकार आशिष खेतान म्हणाले की, गांधीजींच्या हत्येचा कट रचणार्‍या पुण्यातच दाभोलकरांचा खून झाला आहे. वर्षभरातही पोलिसांना हत्येसंदर्भात कुठलेच धागेदोरे मिळू नयेत याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. ज्या नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने सत्यावर पडदा टाकण्याचा काही शक्तींकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वर्षभरानंतरही सत्य बाहेर आले नाही. अर्थात डॉ.दाभोलकरांनी सुरू केलेला लढा थांबणार नाही. डॉ. दाभोलकरांच्या सामाजिक बदलांचं वारं देशभर फिरत आहे. ते आता पुन्हा जोराने वाहू लागेल असा माहोल गेल्या वर्षभरात तयार झालेला मला पहायला व अनुभवयाला मिळाला आहे. पत्रकार म्हणून दिल्लीमध्ये जी काही समितीस मदत लागेल ती मी करण्यास नेहमीच तयार आहे. यानंतर मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, आज आमचा सामाजिक बाप गेला आहे. अशीच आपल्या सर्वांची भावना आहे.

यानंतर वाढत चाललेली नेत्यांची भाषणे यावर मार्मिक भाष्य करताना ज्येष्ठ संपादक अनंत दिक्षीत यांनी बाबा आढाव यांचा एक दाखला दिला. ते म्हणाले की, बाबांचे असे म्हणणे असते की, ‘मोर्चा मोठा व भाषणे छोटी’ हे वाक्य ध्यानात ठेवून मी दोन वाक्यात माझे विचार संपवितो. आज या विवेकजागराने पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास लिहिण्यास सुरवात झाली आहे. यानंतर युनिसेफच्या माजी अधिकारी विजया चौहान, माजी पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे, प्रा. कपोले, अतुल पेठे इत्यादींची भाषणे झाली.

डॉ. हमीद दाभोलकरांनी आभार मानले व ‘हम होंगे कामयाब!’ या गीताने निषेध सभेचा समारोप झाला.

-राहुल थोरात

संपर्क : 9422411862