बुधवार दि.24 सप्टेंबर रोजी भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करू लागले. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठविणार्या भारतीय शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा आणि आशियातील पहिलाच देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि जपान या महासत्तांना पहिल्या प्रयत्नात असे यश मिळवता आलं नाही. या यशामुळे भारत हा अवकाश क्षेत्रातील नवी ताकद म्हणून पुढं आला आहे.
या मंगळ मोहिमेची सुरवात गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला झाली. श्रीहरी कोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत मंगळयान(मार्स ऑर्बीटर) पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. सुमारे 300 दिवसांच्या प्रवासानंतर आणि सुमारे सहा कोटी किलोमीटर अंतर पार केल्यावर बुधवारी सकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी यानाचा वेग कमी करणारे इंजीन सुरू करण्यात आलं. प्रत्यक्ष इंजिन सुरू झाल्याचा संदेश 7 वाजून 29 मिनिटांनी मिळाला आणि नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला.
अमेरिकेच्या ‘नासा’ने सोडलेले माविन हे यानही दोन दिवसांपूर्वीच मंगळाच्या कक्षेत स्थिर झालं आहे. भारताच्या कामगिरीबद्दल नासाने भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं आहे. नासाची क्युरिऑसिटी(रोव्हर) ही बग्गी 6 ऑगस्ट 2012 रोजी मंगळावर उतरली होती. या बग्गीनेही आपल्या मंगळयानाशी संपर्क साधून अभिनंदन केले आहे.
मंगळ मोहीम कशासाठी? मंगळावर 15 किलो वजनाची शास्त्रीय उपकरणे बसविलेली आहेत. ‘लायमन अल्फा फोटोमीटर’ बंगळूरच्या संस्थेने तयार केले असून, त्याच्या सहाय्याने मंगळाच्या वातावरणातील हायड्रोजन व ड्युटेरियमचे प्रमाण मोजले जाईल. या अभ्यासामुळे मंगळावर पाणी आहे का? किंवा होते का? याची माहिती मिळू शकेल. यानातील मिथेन सेन्सर हा मंगळाच्या वातावरणातील मिथेनचे अस्तित्व शोधेल. अमेरिकेचे रोव्हर्स मंगळाच्या पृष्ठभागावरचा मिथेल शोधत आहेत तर आपलं यान वातावरणाच्या वरच्या भागातील मिथेनचा शोध घेणार आहे. मिथेन हा सजीवांच्या शरीर रचनेतील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचा शोध हा मंगळावरील जीवसृष्टीच्या शोधासाठी महत्वाचा ठरणार आहे. भविष्यकाळात इस्त्रोतर्फे चंद्र व मंगळ मोहिमा आखल्या जातील. तसं झालं तर भारत, अमेरिका व रशिया यांच्या बरोबरीने अवकाश-संशोधनात अग्रेसर होईल.
संपूर्ण भारतात बुधवारी सकाळी मंगळ विजयाचा जल्लोष चालू असताना महाराष्ट्रात काय घडत होतं? फेसबुकवरून आलेल्या संदेशातून महाराष्ट्रातील अनेक युवकांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अज्ञानावर मार्मिक भाष्य केलं आहे. सर्वपित्री पंधरवडा हा अशुभ समजला जातो. या काळात म्हणे चांगल्या कामाला मुहुर्त नसतो. म्हणून निवडणुकीचा फॉर्म न भरणार्या नेत्यांची या युवकांनी तीव्र शब्दात निर्भत्सना केली आहे. बुधवारी सर्वपित्री अमावास्या ती तर अधिकच अशुभ. म्हणून चर्चेचा घोळ चालूच ठेवून या मंडळींनी तिकीट वाटप व निवडणूक प्रक्रिया सुरू केली नाही. अशी मंडळी महाराष्ट्राच्या विकासात काय दिवे लावणार? सर्वपित्री अमावास्येदिवशी श्रीहरी कोटामधील शास्त्रज्ञ रिमोट कंट्रोलने मंगळयानाचा वेग कमी करत होते. त्यात ते यशस्वीही झाले आणि इकडे महाराष्ट्रात राजकीय मंडळी आपला रिमोट कंट्रोल एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी वापरत होती. विज्ञानदृष्टीचा अभाव असणारी ही मंडळी राज्य करणार असतील तर त्यांच्या राज्यात ज्योतिषी व बुवा महाराज यांची चंगळच होणार. या पार्श्वभूमीवर सर्वपित्री काळात निवडणुकीचा फॉर्म भरून अंधश्रद्धेला मूठमाती द्या असं आव्हान अंनिस सांगलीने राजकीय नेत्यांना केलं होतं. आटपाडीचे राजकीय नेते अमरसिंह देशमुख यांनी सर्वपित्री अमावास्येलाच आपला राजकीय निवडणुकीचा अर्ज भरला व एक चांगला आदर्श या राजकीय नेत्यांने घालून दिला. याबद्दल देशमुख साहेबांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत. अशी माणसं ही राजकीय अज्ञानरूपी वाळवंटातील विज्ञानवादी हिरवळच होय.
फेसबुकवर तरूणाईने पत्रिकेतील मंगळाच्या अडथळ्यावर जोरदार प्रहार केलाय. आतापर्यंत अनेक मुला-मुलींची लग्ने पत्रिकेतील मंगळामुळेच मोडली गेली. खरं तर मंगळ हा मंगल म्हणजे पवित्र मानायला हवा व त्याचं आपण स्वागतच करायला हवं. पण पोटार्थी मंडळींनी त्याला दुष्ट ठरविला व त्याच्यावर आणि युवकयुवतीवर अन्याय केला. निदान आता तरी या लोकांनी मंगळाची भीती फेकून द्यावी. केवळ मंगळच नव्हे तर मानवाला दैववादी बनविणार्या ज्योतिषशास्त्रालाच नाकारून पुरूषार्थी विज्ञानाचा स्वीकार करावा.